टाळेबंदीच्या परिणामांचा ताळेबंद सुरू असताना एक वेगळीच बातमी पुढे आली आहे. ‘गुलाबो सिताबो’ हा अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराणा यांच्या प्रमुख भूमिका असलेला शुजित सरकार दिग्दर्शित सिनेमा आता अॅमेझॉन प्राईमवर म्हणजेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. प्रत्यक्षात हा सिनेमा एप्रिल महिन्यात सिनेमागृहांमध्ये लागणं अपेक्षित होतं. पण करोनामुळे टाळेबंदी झाली आणि सगळ्या गोष्टी बदलल्या. त्याबरोबरच नवाजुद्दिन सिद्दिकीची प्रमुख भूमिका असलेला ‘घुमकेतू’ देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवरच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

कपिल देव यांच्यावरचा रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ’83’, अक्षय कुमारचा ‘लक्ष्मीबॉम्ब’, वरूण धवन आणि सारा अली खानचा ‘कुली नंबर वन’ हे सिनेमेदेखील पोस्ट प्रॉडक्शनच्या टप्प्यावर आहेत. सिनेमागृहे हे गर्दी जमण्याचे प्रमुख ठिकाण आहे. ती गर्दी टाळायची असेल तर कुणी सांगावं, उद्या हे सिनेमेही ओटीटी प्लॅटफॉर्मवरच प्रदर्शित होतील.

सिनेमागृहांमध्ये सिनेमा प्रदर्शित होणं ही अर्थातच त्या सिनेमाशी संबंधित सगळ्याच घटकांसाठी मोठी गोष्ट असते. निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते तर लोकांच्या प्रतिसादावर डोळे लावून बसलेले असतात. पण करोनाच्या भयपटाने हॉरर, अॅक्शन, कॉमेडी, ड्रामा अशा सगळ्याच जॉनर्सची वाट लावून टाकली आहे.

करोनामुळे अनेक गोष्टी ऑनलाईन केल्या जात असताना अमिताभसारख्या महानायकाची भूमिका असलेला सिनेमा ऑनलाईन प्रदर्शित करणं ही खूपच मोठी गोष्ट म्हणायला हवी. एकीकडे आपल्याला आता करोनाबरोबर जगायला शिकावं लागेल असं सांगितलं जात असताना दुसरीकडे चित्रपट जर ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रदर्शित होत असतील तर उद्याच्या मनोरंजनाच्या क्षेत्राची सगळी गणितं बदलण्याची बीजं त्यात आहेत, हे लक्षात घ्यायला हवं.

आज सगळे नाट्यकलाकार घरी बसून आहेत. कुणी सांगावं उद्या एखाद्या नाट्यगृहात सेट लावला जाईल. नाटकाचा प्रयोग होईल. ऑनलाईन तिकिटं खरेदी केली जातील. ती खरेदी करणाऱ्यांना विशिष्ट लिंक पाठवली जाईल आणि ते घरी बसून नाटकाचा आस्वाद घेतील…
शो मस्ट गो ऑन…