– राधिका कुंटे

“कृपया यात्रीगण ध्यान दे। चलती गाडी से उतरना मना हैं। उतरते वक्त कृपया ध्यान दे।… अगला स्टेशन…“ काय ओळखीची वाटतेय ना ही उद्घोषणा?… मिस करताय ना मला?… होय! करेटक्ट ओळखलंत मला! मी तुमची फ्रेण्ड, मुंबईची लोकल! मीही तुम्हाला जाम मिस करते आहे. खरं तर मी बोलतेय ही कल्पना असली तरी आपलं इतकं जिव्हाळ्याचं नातं आहे की तुम्ही मला नक्कीच समजून घ्याल याची मला खात्री वाटते. ते नाही का एके काळी `थॉमस अँड फ्रेण्डस्` नावाचं कार्टून त्याचीही आठवण होऊ शकेल कदाचित तुम्हाला या निमित्तानं…. तर जवळपास सव्वा महिन्यापूर्वी रेल्वे प्रवासावर थोडे निर्बंध घातले गेले. मात्र तुमच्यापैकी काही प्रवाशांना त्याचं गांभीर्य समजलं नसावं. त्यांनी त्यांना अत्यावश्यक वाटणारा प्रवास केला शेवटपर्यंत… मात्र पहिल्या लॉकडाऊन जाहीर झाला आणि नाईलाजानं सगळच लोकलप्रवास थांबवावा लागला. एरवी कधी २६ जुलै किंवा गेल्या वर्षीचा ऑगस्टमधला धुंवाधर पाऊस असे काही अपवाद तेही जेमतेम १-२ दिवसांचे, वगळता मी कधीच थांबलेले नाही. मुंबईची `लाईफलाईन`-`जीवनवाहिनी` म्हणून मी ओळखली जाते. या तुमच्या `लाईफलाईन`नं सध्या नाईलाजानं पॉज घेतला आहे. केवळ आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी मी तुमचा दुरावा सहन करते आहे.

खरंतर अगदी सुरुवातीला तुम्ही कुणीच येणार नाही, मला अगदीच आराम मिळणार म्हणून काय भारी वाटलं होतं. `आनंद पोटात माझ्या मायेना`ची स्थिती झाली होती… कारण एरवी मी वरवर पाहाता तुम्हालाच वाहून नेत असते असं नाही तर तुमच्या व्यथा-कथा, सुख-दुःखही मी आपलीच मानते. तुमच्या मुक्कामी पोहचेपर्यंत मदत करणारी, तुमची सोबत करणारी मी आहे. `सारे प्रवासी घडीचे` असले तरीही त्यांची त्यांची वर्तुळं निर्माण करायला एक हक्काचं स्थान म्हणजे मी. `ट्ह्याँपासून ते राम नाम सत्य हैं`पर्यंतच्या तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मी तुमच्या दिमतीला राहिलेली आहे आणि अर्थातच यापुढंही राहिन. ही आपली अशीच साथ कायम राहावी, म्हणून सध्या लॉकडाऊन असला तरीही माझ्यासारख्या अनेक गाड्यांच्या देखभालीचं काम सुरू आहे.

आमचं चुलत भावडं असणाऱ्या मालगाड्यांना जीवनावश्यक वस्तू पुरवठ्याचं काम करायचं भाग्य लाभलं आहे. मात्र परवाच कळलं की त्यातून गरीब मजूर पोटापाण्यासाठी लपूनछपून वणवण करणारा प्रवास सहन करत आहेत. त्यांच्यासाठी जीव तुटला अगदी आणि हेही तितकंच खरं की अशा प्रवासामुळं त्यांचं, मालगाडी जाईल त्या ठिकाणाचं आणि रेल्वेव्यवस्थेचं आरोग्यव्यवस्थापन धोक्यात येऊ शकतं. तरी संबंधित त्यात त्वरित लक्ष घालतील. कारण सध्या तुम्ही तुमच्या घरात आणि मी कारशेडमध्ये राहाणं हेच इष्ट आहे. लवकरच हेही दिवस जातील आणि टप्प्याटप्प्यानं आपल्या सगळ्यांची पुन्हा भेट होईल, अशी आशा आहे. लक्षात ठेवा, “गाडी बुला रही हैं, सीटी बजा रही हैं। चलना ही जिंदगी हैं, चलतीही जा रही हैं। गाडी बोल रही हैं…“