News Flash

उत्सव विशेष : पारंपरिक कपडय़ांचा सुटसुटीत साज

सुटसुटीत पण आकर्षक असे कपडय़ांचे पर्याय बाजारात यायला लागले आहेत.

श्रावण सुरू झाला की, सणांची लगबग सुरू होते, पण त्यासोबत पेहरावात स्टाइलइतकीच सुटसुटीतपणाच्या नियोजनाची धावपळसुद्धा सुरू होते.

मृणाल भगत – response.lokprabha@expressindia.com
श्रावण सुरू झाला की, सणांची लगबग सुरू होते, पण त्यासोबत पेहरावात स्टाइलइतकीच सुटसुटीतपणाच्या नियोजनाची धावपळसुद्धा सुरू होते. यंदाचा कम्फर्ट ड्रेसिंगचा पर्याय याच मुद्दय़ाला अधोरेखित करतो.

आदल्या दिवशी बॉसकडून अध्र्या दिवसाच्या सुट्टीची परवानगी घेतलेली असते. त्यामुळे कामं आटोपण्यासाठी वेळेच्या थोडं आधी ऑफिस गाठलेलं असतं. ऑफिसमधून निघायची वेळ झाली, तरी सकाळपासून कोसळणारा पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही. ताईच्या मंगळागौरीला अशा पावसात पोहोचायचं म्हणजे चिखलाने ड्रेस खराब होणार, मेकअप, केस विस्कटणार. बरं तिथे गेल्यावर आधीच कार्यक्रम सुरू झालेला असल्याने कपडे बदलण्याची संधीही मिळणार नाही.

श्रावणासोबत सुरू होणाऱ्या सणांची रांग थेट दसऱ्यापर्यंत येऊन थांबते. दरम्यान नवे कपडे, छान लुक, फक्कड मेजवानी, भरपूर गप्पा, भेटीगाठी यांची रंगत वाढायला लागते. यादरम्यान प्रत्येक सणाला हक्काची सुट्टी काही मिळत नाही. त्यामुळे ऑफिस ते घर कसरत सांभाळायची त्यात लोकलची गर्दी, ट्रफिकमधून वाट काढताना पाऊस असला तर विचारायची सोय नाही. बरं कधीतरी हौस म्हणून घातलाच अनारकली किंवा एखादी महागडी साडी नेसली तर नंतर त्यावरची चिखलाची नक्षी काढायचा सोहळा काही सुटत नाही. त्यामुळे कितीही हौस असली तरी या दिवसांत दिवाळीसारखं फुरसतीने नटण्याची हौस काही पूर्ण करता येत नाही. त्यामुळे अशा वेळी पारंपरिक पेहरावाची हौस पूर्ण करतानासुद्धा तो ऑफिससाठी साजेसा असेल आणि प्रवासादरम्यान अडथळा होणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागते. त्यासाठी थोडय़ा नव्या शकला लढवाव्या लागतात. यंदाचा हंगाम अशाच नव्या कल्पनांचा आहे.

मधल्या दोन-तीन महिन्यांमध्ये बाजारातील कपडय़ांच्या दुकानांत चक्कर मारली असेल, तर एक बाब प्रकर्षांने लक्षात येईल की अनारकली, लेहेंगा, फँसी साडय़ा यांचे नेमके पर्यायच दुकानांमध्ये आले आहेत. त्याऐवजी लांब कुत्रे, ए-लाइन ड्रेसेस, शरारा, कॉटन पँट, चुडीदार असे सुटसुटीत कपडय़ांचे प्रकार पाहायला मिळताहेत. घेरेदार, स्टायलिश पारंपरिक कपडे यायची सुरुवात अजून दोन-तीन महिन्यांनंतर दिवाळी, लग्नाच्या मौसमात होईल. पण त्याआधी येणारे गणपती, मंगळागौर, नवरात्री, दसरासारख्या सणांमध्ये पेहराव दिमाखदार असण्यापेक्षा सुटसुटीत असेल, याकडे जास्त लक्ष दिलं जातं. कारण या दरम्यान सणांची संख्या मोठी असली तरी सुट्टय़ा नसतात. कॉलेज नुकतंच सुरू झालेलं असतं, ऑफिसमधल्या

सुट्टय़ा, पर्यटनवाऱ्यांमध्ये गुंतलेली मनं आत्ता कामाला लागलेली असतात. ऑफिस आणि सण दोन्ही सांभाळायची कसरत करायची असते. यामुळे सुटसुटीत पण आकर्षक असे कपडय़ांचे पर्याय बाजारात यायला लागले आहेत.

बहुपयोगी कुर्ते

लांब कुर्ते हे यातलं प्रमुख आकर्षण. स्ट्रेट फिटमध्ये लांब साइड कट, ए-लाइन किंचित घेरेदार कुर्ते हा सध्याचा मुख्य ट्रेण्ड आहे. सोबत शर्ट स्टाइल कुर्ते, सेमी अनारकली, अंगरखा स्टाइल कुर्तेसुद्धा बाजारात दिसत आहेत. रोजच्या वापरासाठी सुटसुटीतपणा ही मुख्य बाब नजरेत ठेवूनसुद्धा यांच्यावरील नाजूक नक्षीकाम, मोठय़ा िपट्र किंवा गडद रंग पटकन नजरेत भरतात. या कुर्त्यांची मुख्य खासियत म्हणजे साधारणपणे गुडघ्याच्या उंचीपर्यंत असल्याने तुम्ही ड्रेस म्हणून वापरू शकता. सलवार आणि दुपट्टा घेऊन सलवार सूट बनवू शकता. किंवा धोती पँट, प्लॅझो, स्कर्टसोबत हटके लुकसुद्धा करू शकता. शर्ट ड्रेस स्टाइलचा कुर्ता श्रग म्हणूनसुद्धा वापरता येतात. हे प्रयोग करताना एथनिक लुक आणि ऑफिस लुक हा समतोलसुद्धा साधता येतो. नारंगी रंगाचा लेहरीया, बांधणी िपट्रचा कुर्त्यांसोबत डेनिम जॅकेट आणि मोठाले झुमके असा साधासा पेहराव ऑफिसमध्ये घालता येतो. घरच्या कार्यक्रमासाठी याच कुर्त्यांसोबत धोती पँट आणि चांदीचा ऑक्सिडाइज नेकलेस आणि गडद लिपकलर वापरता येतो. चिकनकारी, कुर्त्यांच्या रंगाचं नाजूक नक्षीकाम, नाजूक मण्यांचं नक्षीकाम या कुर्त्यांवर खुलून दिसतं. बाटिक, मधुबनी िपट्र, लेहरीया, बांधणीचे कुत्रेसुद्धा अशा वेळी वापरता येतात. वेगवेगळे िपट्र्स, रंगांच्या जॅकेट, श्रगसोबत लेअिरगचे प्रयोग करता येतील. सिल्कच्या मोठय़ाला डिजिटल िपट्रच्या उजळ कुर्त्यांवर छानसा नेकपीस किंवा लांब कानातले डूलसुद्धा खुलून दिसतात.  तसंच ऐन समारंभात पोहोचून वेगळे दागिने किंवा देखण्या हेअरस्टाइलने वेगळा लुकसुद्धा मिळतो. लिपकलर किंवा आय मेकअपनेसुद्धा वेगळेपणा उठून दिसतो.

खादी आणि हँडलूमचा प्रभाव

सध्या खादी आणि हँडलूम कापडाचा प्रभाव बहुतांश पेहरावात पाहायला मिळतोय. विशेषत: महाराष्ट्रीय, दक्षिण भारतीय मोठाले िपट्र्स, भौमितिक आकार, मोठय़ा काठाच्या साडय़ा चलतीत आहेत. कॉटन, लिनिन, खादी साडय़ा वापरायला सुटसुटीत असतात. त्यांच्या गडद रंगांनी लक्ष वेधून घेतात. त्यावर नक्षीकाम केलेले ब्लाऊज मिक्स-मॅच करून सहज घालता येतात. गेल्या काही वर्षांपासून भारतातील पारंपरिक कला, चंदेरी, टसर सिल्कसारख्या साडय़ांबद्दल तरुणाईमध्ये आकर्षण वाढतंय. त्यामुळे कित्येक ऑनलाइन साइट्सवर अशा साडय़ा विक्रीस उपलब्ध होत आहेत. यंदाच्या सणांच्या मौसमात या साडय़ा आवर्जून पाहायला मिळतील. साडय़ांच्या स्टायिलगमध्येही वेगळेपणा आणला जातोय. पारंपरिक ब्लाऊजऐवजी शर्ट्सरूपाचा िपट्रेड कुर्ता किंवा क्रॉप टॉप घालता येईल. साडीवर एखादा श्रग घालता येईल. किंवा साडीशी मिळताजुळता दुपट्टा दुसरा पदर म्हणून खांद्यावर घेता येईल. सध्या लांब पदराचा ट्रेण्ड आहे. हँडलूम साडय़ांचा रंग काहीसा गडद असतो. त्यामुळे रस्टिक लुक येतो. चांदीचे ऑक्सिडाइज दागिने किंवा रंगीत खडय़ांचे दागिने या साडय़ांवर खुलून दिसतात. गेरू रंगाचे सोन्याचे दागिने, मीनाकारी नक्षीचे दागिनेसुद्धा वापरता येतात.

छोटय़ाशा बदलाचा परिणाम

एखाद्या छोटेखानी समारंभात भरजरी ड्रेस किंवा साडी नेसणं कधीतरी नकोसं वाटतं. अशा वेळी तुमच्या नेहमीच्या स्टाइलमध्ये केलेला एखादा छोटासा बदलही लोकांच्या नजरेत येतो. सध्या लेिगग आणि कुर्ता हे समीकरण अगदीच जिव्हाळ्याचं झालं आहे. पण सुरती वर्क, जरदोसी किंवा फुलकारी नक्षीकाम केलेला भरगच्च दुपट्टा तुमच्या कपाटात असू द्या. एखाद्या सिंपल ड्रेसवरसुद्धा हा दुपट्टा उठून दिसतो. सोबत छान दागिने घातले की पारंपरिक लुक सहज होतो. एखाद्या ए-लाइन वन पीस ड्रेसवरसुद्धा असे दुपट्टे खुलून दिसतात. तसंच नेहमीच्या लेिगगला पटियाला, धोती पँट किंवा सध्या प्रचंड लोकप्रिय असलेल्या शराराचा पर्याय द्या. कधीतरी गळ्यात नेकपीस घालण्याऐवजी नाजूक स्कार्फ बांधा किंवा हातात घडाळ्याऐवजी छान बांगडय़ा घाला. ऑफिसच्या कामात मधूनच ऐकू येणारा बांगडय़ांचा आवाज आपल्याला आणि शेजारच्यालाही सुखावतो. एखादी सुंदर हेअरपिन किंवा कर्णफूल केसात माळा. असे छोटे बदलसुद्धा पटकन नजरेत येतात. यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागत नाही.

ट्रायबल दागिने

पारंपरिक सोन्याच्या दागिन्यांना सध्या चांदीच्या दागिन्यांचा पर्याय मिळू लागला आहे. यंदा त्यात भर पडली आहे ती ट्रायबल स्टाइलच्या दागिन्यांची. आदिवासी पाडे, तिबेटीयन स्टाइल दागिने, बंजारा जमातीतील दागिन्यांचं नक्षीकाम सध्या दागिन्यांमध्ये पाहायला मिळतं. यामुळे दागिने बोल्ड दिसतात. भौमितिक आकार, वेगळी कलाकुसर यामुळे ते उठून दिसतात. हे वेगळेपण नेहमीच्या ड्रेसलासुद्धा उठाव आणतं. याला जोड म्हणून मोठाले रंगीत मणी, खडय़ांचा वापर दागिन्यात होत आहे. टेम्पल ज्वेलरी पुन्हा नजरेत येतेय. विशेष म्हणजे पारंपरिक दागिन्यांचे प्रकार वगळता हातफूल, कर्णफूल, केसांत खोचायची पिन, अंगठी, जोडवी, कंबरपट्टा, चोकर अशा पठडीबाहेरील दागिन्यांची सध्या चलती आहे. साध्याशा नथीमध्येही सध्या सुंदर पर्याय पाहायला मिळताहेत. या दागिन्यांच्या प्रकारामुळे पेहरावातील वेगळेपणा उठून दिसतो.

मुळात आपल्याकडील असंख्य सणांचं निमित्त एकच असतं, या कारणाने कुटुंब, नातेवाईक, मित्र-मत्रिणींनी एकत्र येऊन चार क्षण निवांत एकत्र घालवावेत. अर्थात अशा वेळीच गर्दीत भाव खाण्याची संधी असते. ती संधी पेहरावाच्या छोटय़ा क्लृप्त्यांनी मिळवता येते. ही संधी यंदा चुकवू नका!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2018 1:07 am

Web Title: traditional clothes for festival wear
Next Stories
1 उत्सव विशेष : सण-उत्सव कशासाठी?
2 उत्सव विशेष : पाऊस, धर्म आणि चातुर्मास!
3 उत्सव विशेष : आनंदोत्सवाची पखरण
Just Now!
X