-सुनिता कुलकर्णी

करोनामुळे सगळ्या नियोजित क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यातल्या क्रीडाविषयक सगळ्या घडामोडी ठप्प झाल्या आहेत. मैदानावर उतरून आपली रग जिरवणाऱ्या खेळाडूंसाठी घरी बसून राहणं किती त्रासाचं असेल याची आपण कल्पना करू शकतो. पण तुमच्या समोरचा एक रस्ता बंद झाला की, तुम्ही दुसरा रस्ता शोधायला लागता. तसंच झालं झॅच बिटर या अमेरिकी मॅरेथॉनपटूच्या बाबतीत.
झॅच बिटर हा मॅरेथॉनमधला विक्रमवीर आहे. त्याने ऑगस्ट २०१९ मध्ये विसकॉन्सिन इथं ११ तास १९ मिनिटे आणि १३ सेकंदात १०० मैल धावण्याचा विक्रम केला होता. एवढ्या अंतरासाठी त्यापूर्वीच्या खेळाडूला लागली होती, त्यापेक्षा झेकला १९ मिनिटं कमी लागली होती. विशेष म्हणजे आधीचा विक्रम मोडल्यानंतरही झेक आणखी ४० मिनिटं धावत राहिला आणि त्याने स्वतचाच विक्रम निर्माण केला.

त्यामुळे झॅच बिटरला सगळ्या स्पर्धा रद्द झाल्या आहेत आणि आता घरी बसून रहायचं आहे हे स्वीकारणं जड जात होतं. मग या पठ्ठ्याने काय केलं माहीत आहे…? त्याने घरबसल्या आपलाच धावण्याचा विक्रम मोडायचं ठरवलं. त्यासाठी त्याने  चक्क ट्रेडमिलवरच १०० मैल धावण्याचा विक्रम केला. त्यासाठी त्याने दिवस निवडला १६ मे,  या दिवशी तो घरातल्या ट्रेडमिलवर १२ तास, नऊ मिनिटं आणि १५ सेकंद सलग १०० मैल धावला. त्याला ट्रॅकवर धावण्याचा त्याचा विक्रम भलेही मोडता आला नाही, पण ट्रेडमिलवर अशा पद्धतीने १०० मैल धावणं हा एक वेगळा विक्रमच होता. ट्रेडमिलवर त्याचा धावण्याचा सगळ्यात जास्त वेग तासाला ९.२ मैल तर सगळ्यात कमी वेग तासाला ८ मैल होता.

ट्रेडमिलची ज्यांना कल्पना नसते त्यांच्यासाठी सांगायची गोष्ट म्हणजे ट्रॅकवर धावणं आणि ट्रेडमिलवर धावणं या पूर्ण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. छोट्याशा जागेत ट्रेडमिलवर धावताना झॅचच्या शरीरामुळे आसपास अधिक उष्णता निर्माण होत होती. ट्रेडमिलच्या मोटारपासूनदेखील उष्ण्ता निर्माण होत होती. शिवाय पंखा, वातानुकुलन यंत्र, कॅमेरा यांच्यामुळे त्या खोलीतलं वातावरण अधिक तापत होतं. या अधिकच्या उष्णतेमुळे एक क्षण असाही आला की एसी बंद पडला, ट्रेडमिलवरचा डिस्प्ले बिघडला, पण एक्स्टेंशन कॉर्ड वापरून दुसऱ्या खोलीमधली वीज वापरून हा प्रश्न सोडवला गेला.

झॅचला ट्रॅकवर १०० मैल धावायला लागली त्यापेक्षा ५० मिनिटं जास्त लागली खरी, पण त्यामागे काही कारणं होती. एकच ट्रेडमिल सतत सुरू ठेवता येत नसल्यामुळे तो अधूनमधून शेजारच्या दुसऱ्या ट्रेडमिलवर धावत होता. त्यासाठी ट्रेडमिल बदलण्यात त्याचा २० सेकंद वेळ जायचा. त्याने एकूण १० वेळा ट्रेडमिल बदललं. ५ वेळा नैसर्गिक विधींसाठी तो ट्रेडमिलवरून खाली उतरला. अधूनमधून पाणी प्यायलं. ८७ व्या मैलावर असताना त्याने उर्जेसाठी बटाट्याचे वैफर्स खाल्ले. याउलट ट्रॅकवर धावून विक्रम केला तेव्हा त्याने फक्त ३ ब्रेक घेतले होते.

१०० मैल धावणं संपल्यावर ट्रेडमिलवरून खाली उतरून त्याने बूट काढले तर त्याच्या पायाला जखमा झालेल्या होत्या. ट्रॅकवर धावताना असं होत नाही, असं तो सांगतो. शिवाय ट्रॅकवर धावताना तुम्हाला तुमचा धावण्याचा पेस थोडाफार बदलता येतो, तसं ट्रेडमिलवर होत नाही. तिथे तुम्हाला मशीनच्या पेसबरोबर जुळवून घ्यावं लागतं, असंही तो सांगतो.  झॅचने ट्रेडमिलबरोबर ही अनोखी स्पर्धा केली. परत नजिकच्या काळात आपण पुन्हा ती करू असं वाटत नाही, असं त्याने स्वत:बाबत सांगितलं असलं तरी सतत नवनवीन गोष्टींच्या शोधात असणाऱ्यांसाठी, ट्रेडमिलवर धावणं हा यापुढच्या काळात स्पर्धेचा नवा प्रकार असू शकतो.