X

हरहुन्नरी कर्णधार हरपला!

परदेशात कसोटी मालिका जिंकून देणारे कर्णधार अशी अजित वाडेकरांची ओळख होती.

श्रद्धांजली

ऋषिकेश बामणे – response.lokprabha@expressindia.com

परदेशात कसोटी मालिका जिंकून देणारे कर्णधार अशी अजित वाडेकरांची ओळख होती. त्यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला आहे. क्रिकेटला आजच्यासारखे झगमगाटी आणि व्यापारी स्वरूप आलेले नव्हते, तेव्हाच्या काळाचे वाडेकर हे प्रतीक होते. क्रिकेट हा तेव्हा सभ्य माणसांचा खेळ होता. सुसंस्कृत मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील वाडेकर अपघातानेच क्रिकेटकडे वळले. त्यांनी मिळालेल्या संधीचा पुरेपूर वापर केला. वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघाच्या कामगिरीला अधिक महत्त्व दिले आणि भारतीय क्रिकेटला एक आत्मविश्वास मिळवून दिला आणि विशेष म्हणजे या सर्वाचा ढांडोरा न पिटता अखेरच्या श्वासापर्यंत ते असेच वावरले.

वाडेकर यांनी दादरच्या शिवाजी पार्क जिमखाना या संघाकडून खेळताना अनेकांची वाहवा मिळवली. वडिलांची इच्छा होती की, अजितने गणितज्ञ बनावे, मात्र वाडेकर यांना क्रिकेटचे वेड होते. १९५८ मध्ये त्यांनी मुंबईसाठी रणजी स्पध्रेद्वारे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २३७ प्रथम श्रेणी सामन्यांत वाडेकर यांनी तब्बल १५ हजार ३८० धावांसह ३७ शतके झळकावली.

१९६६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध वाडेकर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांच्या कारकीर्दीचा आलेख नेहमीच उंचावत राहिला. ४ जुल १९७४ रोजी कारकीर्दीतील अखेरचा कसोटी सामना खेळल्यावर त्यांनी १३ जुलला इंग्लंडविरुद्धच एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र अवघे दोन एकदिवसीय सामने खेळून त्यांनी या प्रकारातूनही निवृत्ती पत्करली.

१९७१ हे वर्ष वाडेकरांच्या कारकीर्दीतला सर्वात महत्त्वाचा टप्पा होता. सत्तरच्या दशकात इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यासारख्या संघांना त्यांच्याच भूमीत नमवणे, म्हणजे अशक्यप्राय अशीच गोष्ट होती; पण मुंबईच्या वाडेकर यांना इतिहास बदलण्याची नेहमीच उत्सुकता होती. १९७१च्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात प्रथमच कर्णधारपदाची जबाबदारी हाताळणाऱ्या वाडेकरांनी आत्मविश्वासाने संघबांधणी करून िवडीजला कडवी झुंज दिली. विशेष म्हणजे मन्सूर अली खान पतौडी आणि चंदू बोर्डे दोघांनाही खराब कामगिरीमुळे संघातून वगळण्यात आल्यामुळे वाडेकर यांच्याकडे तसा नवखाच संघ हाताशी होता. मात्र तरीही भारताने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० असा विजय मिळवला. मालिकेतील उर्वरित चार सामने अनिर्णीत राखण्यातही भारताला यश आले. महान फलंदाज सुनील गावस्कर यांचीही कारकीर्दीतील पहिलीच कसोटी मालिका होती. त्यांनी एका द्विशतकासह मालिकेत तब्बल ७७४ धावा काढल्या. वेस्ट इंडिजच्या भूमीवर भारताने प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याची किमया साधली.

बलाढय़ िवडीजला धूळ चारल्यामुळे गगनभरारी घेतलेला वाडेकर यांचा भारतीय संघ १९७१मध्ये इंग्लंड दौऱ्यावर दोन हात करण्यासाठी गेला. बिशनसिंग बेदी, गुंडप्पा विश्वनाथ, दिलीप सरदेसाई असे मातब्बर खेळाडू संघात असल्यामुळे भारताने ही तीन कसोटी सामन्यांची मालिकादेखील १-० अशा फरकाने खिशात घातली. वेस्ट इंडिजप्रमाणेच प्रथमच भारताने वाडेकरांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या मदानावर कसोटी मालिका जिंकण्याची किमया साधली.

वाडेकरांच्या कर्णधारपदाची यशाची कमान पुढील वर्षीदेखील अशीच उंचावत गेली. १९७२-७३ ला इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. भारताच्या दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाला भारतीय फिरकीपटू भागवत चंद्रशेखर यांनी चांगलेच नाचवले. पहिली कसोटी इंग्लंडने सहा विकेट राखून जिंकली, मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडवर मात करून पाच सामन्यांची मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. चंद्रशेखर यांनी या मालिकेत तब्बल ३५ बळी मिळवले, तर वाडेकर यांनी एकूण ३१२ धावा काढल्या होत्या.

वाडेकर यांची कारकीर्द पाहिल्यास लक्षात येते की, त्यांनी सांघिक खेळालाच अधिक महत्त्व दिले होते. योग्य खेळाडूंची निवड, योग्य क्रम आणि आत्मविश्वास या बळावर त्यांनी भारतीय संघाला यशाची नवी कवाडे खुली करून दिली. गावस्कर यांच्यासारख्या फलंदाजाच्या कारकीर्दीची सुरुवात वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली झाली. पुढे नव्वदच्या दशकात वाडेकर यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी चोखपणे पेलली. भारत सरकारने त्यांचा अर्जुन व पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला. वाडेकर यांच्या जाण्याने एक हरहुन्नरी कर्णधार तर गमावलाच, पण क्रिकेटच्या एका वेगळ्या काळाचा शिल्पकारदेखील आपल्यातून निघून गेला आहे, असे क्रिकेटविश्वात म्हटले जात आहे.

First Published on: August 24, 2018 1:04 am