21 February 2019

News Flash

श्रद्धांजली : ज्योतिष हाच त्यांचा ध्यास होता

प्रसिद्ध ज्योतिषी विजय केळकर यांचे २० फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी हृदयविकाराने दु:खद निधन झाले.

‘लोकप्रभा’मध्ये १९७९ सालापासून ते आजतागायत म्हणजे गेली जवळपास ३९ वर्षे राशिभविष्य लिहिणारे प्रसिद्ध ज्योतिषी विजय केळकर यांचे २० फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी हृदयविकाराने दु:खद निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. बी. एस्सी.,एम. बी. ए., तसेच पत्रकारितेची पदवी प्राप्त केलेल्या केळकरांनी काही नामांकित कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केल्यानंतर आपल्या आवडीच्या ज्योतिष कार्याला वाहून घेतले होते. विख्यात ज्योतिर्विद डॉ. श्री. के. केळकर यांचे ते चिरंजीव!

श्री. के. केळकर, म. दा. ऊर्फ शंभुराव भट, शिराळकर, हरिप, दीक्षित इत्यादी साठीच्या दशकातील मातबर ज्योतिर्विदांचा कारभार असलेल्या ग्रहनक्षत्र फलादेश मंडळाच्या ज्योतिष विशारद पदवी परीक्षेत विजय केळकर प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. तेव्हा ते नू. म. वि. मध्ये इयत्ता नववीत शिकत होते. इतक्या लहान वयात त्यांनी या विषयात चुणूक दाखवली होती. तेव्हापासून ते ज्योतिषशास्त्राशी निगडित होते. नंतरच्या काळात त्यांनी अनेक नियतकालिकांमध्ये ज्योतिषशास्त्र या विषयावर प्रदीर्घ काळ लेखन केले.

विजय केळकर यांची १९९९ सालापासून प्रत्येक राशीची भविष्यविषयक पुस्तके दरवर्षी प्रसिद्ध होत. ती लोकप्रिय होती. सुप्रसिद्ध दाते पंचांगात ते दरवर्षी राजकीय आणि सामाजिक भविष्य लिहीत. झी मराठी या वाहिनीवर वेध भविष्याचा हा कार्यक्रम १३ वर्षांहून अधिक काळ सादर करीत होते. त्यांचे आत्तापर्यंत चार हजारहून जास्त भाग झाले आहेत. त्यांनीच काढलेल्या ज्योतिषविषयक विशेषांकाचे संकलन त्यांनी केले होते. त्यालाही वाचकांकडून वेळोवेळी चांगला प्रतिसाद मिळाला.

याव्यतिरिक्त त्यांनी करिअर, विवाह, वास्तू, आरोग्य, व्यवसाय-धंदा, नोकरी आणि इतर विषयांवर अनेक लेख लिहिले होते आणि व्याख्याने दिली होती. त्यांनी तयार केलेले विवाहविषयक ‘जोडी तुझी माझी’ आणि करिअरविषयक ‘दिशा करिअरच्या’ असे दोन कार्यक्रम लोकांनी चांगलेच उचलून धरले होते. पुणे, मुंबई, अहमदनगर, नाशिक आणि नागपूर येथे या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. २००३ साली त्यांना कै. शाहू मोडक स्मृतिप्रीत्यर्थ ज्योतिष कार्याशी निगडित सन्मानपत्र आणि पुरस्कार मिळाला होता.

त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या केळकर फौंडेशन या ज्योतिष संस्थेचे कार्यवाह म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ कार्य केले. डॉ. बी. व्ही. रामनसारख्या ज्योतिष क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांच्या कार्याचा गौरव करून सन्मानित केले होते. अनेक ज्योतिष संस्थांनी सन्माननीय पदव्या देऊन त्यांचा गौरव केला होता. प्रदीर्घ सेवेसाठी झी टीव्हीने त्यांचा  मोठा सन्मान केला होता.

सामाजिक पातळीवर विजय केळकर यांची काही भाकिते खरी ठरली होती. उदाहरणार्थ त्यांनी असे भाकीत केले होते की, १९९९ साल भारतीय राजकारणात अविस्मरणीय वर्ष ठरेल, त्यावर्षी वाजपेयी सरकार केवळ एक मताने हरले आणि पुन्हा नव्याने निवडणूक घेऊन त्यांना सत्तेवर यावे लागले. त्यांनी असेही भाकीत केले होते की इंद्रकुमार गुजराल जास्त काळ पंतप्रधान पदावर राहणार नाहीत. आपल्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासातून त्यांनी ‘लोकप्रभा’साठी लिहिलेल्या भविष्यात असे लिहिले होते की लादेन अमेरिकेला सापडणार नाही, तसेच युद्धाचे लोण अमेरिकेकडे जाईल. नंतर अमेरिकेने अफगाणिस्तानवर कब्जा केला, हे आपण पाहिलेच.

दाते पंचांगातील भविष्यात त्यांनी वर्तवले होते की २००५ सालात अभूतपूर्व पावसामुळे जीवित आणि वित्त हानी होईल. त्या वर्षीचा पाऊस, ढगफुटी कुणीच विसरू शकत नाही. त्यांनी असे वर्तवले होते की भाजपा या पक्षाला महत्त्वाचा नेता गमवावा लागेल. त्यानंतरच्या काळात भाजपा नेते प्रमोद महाजन यांचा अनपेक्षित मृत्यू झाला. महाराष्ट्रातील व्यक्तीला महत्त्वाचे स्थान भारतीय राजकारणात मिळेल असे त्यांचे भाकीत होते. त्यानंतरच्या काळात  प्रतिभाताई पाटील पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या. त्यांनी वर्तवलेल्या आणखी एका भाकितानुसार एप्रिल ते जून २०११ या कालावधीमध्ये भारतीय कलाकार आणि खेळाडू अद्वितीय कामगिरी बजावतील. त्याचं प्रत्यक्षातलं रूप म्हणजे भारताने त्यावर्षीचा क्रिकेटचा वर्ल्डकप जिंकला.

२०१२-२०१३ मध्ये त्यांनी असे वर्तवले होते की मंगळाच्या प्रदीर्घ अष्टमस्थानातील भ्रमणामुळे पर्जन्यमान कमी राहील. महागाई वाढेल. रुपयाचे अवमूल्यन करावे लागेल. तरुण रक्ताला वाव मिळेल. राजकीय पक्षातील ज्येष्ठ व्यक्तींना वर्ष प्रतिकूल असल्यामुळे नेतृत्वाची धुरा दुसऱ्या फळीतील व्यक्तींना स्वीकारावी लागेल. स्वत:चे प्रश्न सोडवण्याकरिता सामान्यजनांना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावे लागेल असे भाकीत त्यांनी वर्तवले होते. त्यानंतरच्या काळात राहुल गांधी राजकारणात सक्रिय झाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे शिवसेनाप्रमुख झाले. अण्णा हजारे, रामदेव बाबा यांच्या नेतृत्वाखाली लोक रस्त्यावर उतरले. विजय केळकर यांची ही आणि अशीच बरीच भाकिते बरोबर ठरली आहेत.

विजय केळकर यांचे ‘लोकप्रभा’शी गेल्या ३९ वर्षांचे ऋणानुबंध जुळलेले होते. लोकप्रभा परिवारातर्फे त्यांना आदरांजली. त्यांनी पुढील वर्षभराचे काम आधीच करून ठेवलेले असल्याने पुढील वर्षभर त्यांनी लिहिलेले राशिभविष्यच प्रसिद्ध होईल.
अमेय केळकर – response.lokprabha@expressindia.com

First Published on March 9, 2018 1:02 am

Web Title: tribute to astrologer vijay kelkar