श्रद्धांजली
शांती देव – response.lokprabha@expressindia.com
सायकलच्या मागे कॅरिअरवर ‘राष्ट्रधर्म’च्या अंकाचे गठ्ठे आणि पुढे अटलजी अशी आमची डब्बल सीट यात्रा हे त्या वेळी लखनौमध्ये दिसणारं हमखास दृश्य झालं होतं. दिवस—रात्र आम्ही ‘राष्ट्रधर्म’च्या कामात गढलेलो असायचो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तेव्हा मी लखनौला महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो. संघाच्या कामात होतो. वाजपेयींचा प्रत्यक्ष संपर्क झाला नव्हता. संघ शिक्षा वर्गात एकदा त्यांची कविता ऐकल्यावर तेवढय़ापुरती ओळख झाली. १९४७ चा काळ होता तो. काही संघटनांची मुखपत्रं होती. त्यांचे कार्यकत्रे झटून काम करत आणि ती मुखपत्रं वाचकांपर्यंत पोहोचवीत. आमच्याकडे काहीच नव्हतं. तेव्हा संघानं एक मासिक सुरू करायचं ठरवलं. दीनदयाळ उपाध्याय आणि भाऊराव देवरस यांनी लखनौच्या

ए. पी. रोडवर एका छोटय़ा खोलीत जुळवाजुळव सुरू केली होती. या दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून वेचून कार्यकत्रे जमा केले आणि मासिकाचा कर्मचारीवर्ग तयार केला. अटलजींवर संपादकीय जबाबदारी होती आणि मी सजावटकार. अटलजींशी ही पहिली थेट भेट.

आमच्यामध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. सगळेच हाडाचे कार्यकत्रे होते. नानाजी देशमुख, दीनदयाळ उपाध्याय, राजीवलोचन अग्निहोत्री, विष्णू भार्गव आणि भाऊराव आम्ही सारे ए. पी. रोडवरच्या कालंत्रीजींच्या घरातील एका खोलीत एकत्र आलो होतो. ‘राष्ट्रधर्म प्रकाशन’चं हे पहिलं कार्यालय. छोटय़ाशा खोलीत छोटंसं टेबल. बाकी सारे सतरंजीवर बसायचो. पहिल्याच अंकात अटलजींची ‘िहदू तन मन, िहदू जीवन’ ही कविता छापायचं ठरलं. ही कविता त्यांनी दहावीत असताना केली होती. मासिकात छापायची म्हटल्यावर या कवितेला पूरक अशी रेखाटनं काढावीत आणि चित्रकविता करावी असा आम्ही विचार केला. दीनदयाळजी आणि नानाजींनी कल्पना उचलून धरली. ही कविता म्हणजे अटलजींच्या प्रतिभेचा आविष्कार होता. िहदी भाषेवरची त्यांची पकड आणि प्रखर राष्ट्रभक्तीची जोड असा हा कलाविष्कार होता. त्याला साजेशी चित्रं काढायचं काम मला करायचं होतं. नानाजी वर्णन करायचे. मी त्याप्रमाणे चित्रं काढत होतो. एका कडव्यात शंखाचा उल्लेख होता. शंख कसा पकडतात ते मला नेमकं माहीत नव्हतं. मग नानाजींनी एक लोटा आणला आणि कृती करून दाखवली. पुढच्या एका कडव्यात परत अडलो. तेव्हा अटलजी स्वत:च उभे राहिले. एक दमला-भागलेला असा साधारणपणे उतारवयाचा गृहस्थ आहे, तो रस्त्यावर बसला आहे आणि एक तरुण त्याला आधार देतोय, हे सारं त्यांनी कृतीतून दाखवलं.

पथ के आवर्तो से थककर

जो बठ गया आधे पथ पर

उस नर को राह दिखाना ही

मेरा सदैव का दृढ निश्चय

अशा त्या ओळींप्रमाणे चित्र तयार झालं. कवितेच्या प्रत्येक कडव्याला एक याप्रमाणे नऊ चित्रं काढली. भाऊरावांना ती कविता पहिल्या पानावर छापायची होती. वाजपेयी संकोचले, संपादकाचीच कविता म्हणून पहिल्या पानावर छापणं त्यांना अप्रस्तुत वाटत होतं. पण भाऊरावांनी त्यांना पटवलं. ‘राष्ट्रधर्म’चा पहिला अंक अशा रीतीने सजला. आमच्याकडे छापखाना नव्हता की अन्य काही व्यवस्था. भार्गव प्रेसमध्ये अंक छापले गेले. आता वितरणाची धावाधावदेखील आम्हालाच करायची होती. मग काय मी, अटलजी आणि सायकल लखनौच्या गल्ली-गल्लीतून फिरू लागलो. अंक पोस्टात पाठवायचे तरी असाच प्रवास असायचा. सायकलच्या मागे कॅरिअरवर अंकाचे गठ्ठे आणि पुढे अटलजी अशी आमची डब्बल सीट यात्रा हे त्या वेळचं नेहमीचं दृश्य झालं. दिवस-रात्र आम्ही त्या अंकाच्या कामात गढलेलो असायचो. अटलजी तर रात्री बारा-बारा वाजता यायचे. माझ्या इमारतीखाली उभं राहून हाक मारायचे ‘‘ए. कलाकार..’’ सारी बििल्डग जागी व्हायची. अटलजींची कविता आणि माझं चित्र असं आम्ही बरंच रेखाटलं. अंकातील कार्टुन्स मी रेखाटली असली तरी बऱ्याच वेळा संकल्पना अटलजींची असायची. अटलजींनी माझ्या कलेचा योग्य वापर केला.

आम्ही सारेच कार्यकत्रे, त्यामुळे सारेच विनावेतन काम करणारे. ‘राष्ट्रधर्म’ हे आमचं कुटुंब होतं. सर्वाचे सूर एकमेकांशी जुळले होते. ‘राष्ट्रधर्म’चे ते दिवस आजदेखील आठवतात. अटलजी पुढे नेते झाले, पंतप्रधान झाले, पण हा कौटुंबिक घरोबा त्यांनी सदैव जोपासला. नंतरदेखील कोठेही भेटलो की ‘ए शांती..’अशी खणखणीत हाक कायम ऐकू यायची.

पुढे अटलजी सक्रिय राजकारणात शिरले, तर उपजीविकेसाठी मी चित्रपटसृष्टीत आलो. संघाचा आणि माझा संबंध होताच. व्यासपीठ, सभास्थानाची सजावट अशी बरीच कामं करायचो. जनसंघाचं पहिलं पोस्टर मलाच करायला मिळालं होतं. अटलजी मुंबईत आले की त्यांची भेट व्हायची. माझ्या लग्नानंतर एकदा त्यांना आग्रहानं घरी नेलं. रात्री घाटकोपरला भाषण होतं, मी चेंबूरला राहायचो. भाषण झाल्यावर घरी आले, जेवण वगरे झालं. त्यांना दुसऱ्या दिवशी ‘लवकर जायचं आहे, तेव्हा लवकर झोपा’ असं सांगून मोनिशकुमार निघाले आणि आम्ही गप्पा मारत बसलो. त्यांना चित्रपटाबद्दल घृणा नव्हती, चांगला चित्रपट ते आवडीने पाहतदेखील. पण मी चित्रपटसृष्टीत येणं त्यांना रुचलं नव्हतं. ‘राष्ट्रधर्म’चे दिवस, आताची धावपळ अशा आमच्या रात्री तीन वाजेपर्यंत गप्पा सुरू होत्या.

अटलजी नंतर राष्ट्रीय नेता झाले होते. वारंवार त्यांना भेटणं होत नसे. एकदा दादरला जनसंघाच्या एका कार्यक्रमाला ते आले होते. मी, पत्नी आणि मुलांसहित त्यांना भेटायला गेलो. आम्ही भेटल्यावर आमच्या गप्पा सुरू झाल्या. नानाजीदेखील होते. आमच्या गप्पा रंगल्यावर त्यांच्या व्यवस्थेतील कार्यकर्त्यांना अटलजींच्या जेवणाची चिंता लागली. त्यांची ही व्यवस्था पाहणाऱ्या त्या घराच्या मालकांचा फोन आला, अटलजींना जेवू देणार नाही का, म्हणून त्यांनी मला फोनवरून खूप ऐकवलं. मला खूपच संताप आला. मी अटलजींकडे येऊन चिडून म्हणालो, ‘‘मी कधी तुम्हाला नाही म्हटलंय जेवायला, आणि आपण तेव्हा कामानिमित्त रात्री-अपरात्री जागवल्या तेव्हा..’’ त्याच तिरमिरीत मी घरी आलो.

दुसऱ्या दिवशी प्रात: शाखेवरून घरी आलो तर समोर नानाजी आणि अटलजी. नानाजी कालच्या प्रसंगाबद्दल वेळ मारून नेणारं बोलत होते. मी झाला प्रसंग विसरून गेलो होतो. त्यांच्याशी बरोबरी करायची माझी पात्रता नाही. पण आमच्या नात्यातील जिव्हाळा ताजा होता. जणू काही ते कृष्ण आणि मी सुदामा. अटलजींना नंतर त्यांच्याच कवितेतील एक ओळ ऐकवली.

‘छोटे मनसे कोई बडा नहीं होता,
टुटे मनसे कोई खडम नहीं होता.’

अटलजी आले होते, माझं मन तुटलंय हे त्यांना कळलं होतं. कार्यकर्त्यांची जाणीव त्यांना होती. त्याचं मन जपायची जाणीव होती. अन्यथा त्या तुटलेल्या मनाने मी कधीच उभा राहिलो नसतो.

हीच जाणीव त्यांनी सुरुवातीपासून आजवर जोपासली होती. अगदी ते पंतप्रधान झाले तेव्हादेखील. संसद सदस्यांच्या एका कार्यक्रमाची सारी सजावट व्यवस्था मी पाहत होतो. पण तेथील सुरक्षेमुळे माझी भेट होत नव्हती. राम नाईकांनी ती घडवून आणली. ए. पी. रोडवरच्या कार्यालयातील ‘राष्ट्रधर्म’च्या आमच्या चमूचे संपादक अटलजी आता पंतप्रधान म्हणून समोर उभे होते. पण त्यांच्यातला कार्यकर्ता जागा होता. पुन्हा एकदा तीच जुनी हाक आली ‘‘ए शांती.’’ माझ्या डोळ्यांसमोर राष्ट्रधर्मचा काळ जागा झाला. तेव्हा मात्र अश्रू आवरले नाहीत. त्यांच्या पंतप्रधान झाल्याचा आनंद मला वाटायचा होता. राजीव लोचन, विष्णू भार्गव, रामनाथ भल्ला हे तेव्हाचे सहकारी आता नव्हते, मी आणि तेच काय ते होतो. मी चक्क गळाभेटच घेतली. सुरक्षेची सारी कवचं गळून पडली होती. माझ्या आयुष्यातील सर्वात सुखद क्षण होता तो. पुन्हा त्याच ओळी मला आठवत होत्या ‘‘छोटे मन से कोई बडा नहीं होता, टूटे मन से कोई खडम नहीं होता.’’

शब्दांकन : सुहास जोशी

(माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना जाहीर झालेल्या ‘भारतरत्न’च्या निमित्ताने त्यांचे दीर्घकाळ सुहृद शांती देव यांची जानेवारी २०१५ च्या अंकातील प्रकाशित मुलाखत.)

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tribute to atal bihari vajpayee
First published on: 24-08-2018 at 01:06 IST