11 December 2017

News Flash

फुलली कारवीची फुले

सह्यद्री ही महाराष्ट्राला मिळालेली देणगी आहे. अशा या रांगांत कारवीची फुले पाहण्यासाठी जायचे असे

अंजली फडके | Updated: October 23, 2015 1:16 AM

सह्यद्री ही महाराष्ट्राला मिळालेली देणगी

सह्यद्री ही महाराष्ट्राला मिळालेली देणगी आहे. अशा या रांगांत कारवीची फुले पाहण्यासाठी जायचे असे ठरवले. कारवी पाहण्यासाठी सहल काढली असल्याचे कळले म्हणून आम्ही त्यांच्या सोबत जाण्याचे ठरवले. आम्ही ४० लोक होतो. हे ठिकाण पुण्याहून खूप जवळ आहे. एकदिवसीय छोटी सफारी म्हणा हवं तर!

बॉटनी शिकणारी काही मुले व आम्हाला माहिती सांगण्यासाठी तज्ज्ञ मंडळीही त्यात होती. शनिवारी पुण्यात खूप पाऊस पडला व वाटले उद्या जर असा पाऊस पडला तर (तारीख होती १३ सप्टें.) कारवीची फुले कुजून जातील व आपल्याला पाहायला मिळणार नाहीत. लगेच दुसरे मन म्हणाले पाण्याचा दुष्काळ सर्वत्र असताना आपण पाऊस नको म्हणणे म्हणजे किती स्वार्थीपणा. मी विचार करणे सोडून दिले.

आम्ही सकाळी ६.४५ ला सिंहगड रोडवरून डोणजे गावावरून पुढे वेल्हेमार्गे मढे घाटातून जाणार होतो. हा मार्ग घाटाचा असल्यामुळे आम्हाला थोडा जादा वेळ लागला. साधारण ९.३० ला आनंदाश्रम या ठिकाणी वनस्पती निरीक्षणासाठी बसमधून उतरलो. प्रथम आम्हाला दिसले ते ग्लोरियसी सुपरबा; मराठीत त्याला कळलावीचे झाड म्हणतात. त्याची फुले प्रथम हिरवी, नंतर पिवळी व पूर्ण उमलली की लाल दिसतात. हे कंद वर्गातील झाड आहे. त्याचा रस Labour pain म्हणून वापरतात. डोंगरावर लांब भारंगीची फुले दिसली. त्या फुलांची भाजी करतात. पुढे गेलो तर मोनोफॉरेस्ट होते म्हणजे एकाच प्रकारची झाडे लावलेली असतात. ती झाडे होती सागवानाची. ही बहुतेक ब्रिटिशकालीन असावीत. पाने मोठी मोठी असतात, पळसाच्या पानासारखी, पण खरखरीत असतात. पळसाची मऊ असतात, म्हणून त्याचा पत्रावळीसाठी आपण उपयोग करतो. याची पाने कशाचाही संयोग झाला की त्यातून लाल रंग (रस) बाहेर येतो, जो विषारी असतो म्हणून पत्रावळीसाठी वापरत नाहीत. सागवानाला ६०७० वर्षांनंतर केशरी, पांढरी फुले येतात व मग झाड तोडून फर्निचरसाठी उपयोग करतात. फुलांच्या बीजप्रसाराने नवे झाड येते. याचा कालावधी बराच असतो.

नंतर लागले मालकांगोणी. याचे आयुष्य फार कमी असते. पोटाच्या विकारावर वापरतात. याचा स्टीग्मा बाहेर असतो व ३ च्या पटीत असतो.

पुढे शिकेकाईचे झाड होते. बारीकशा शेंगा होत्या. त्या मार्चपर्यंत मोठय़ा होऊन नंतर बाजारात विकण्यास येतात.

ज्योतीस्मृती हे झाड दिसले. मेंदूच्या टॉनिकमध्ये याचा उपयोग होतो. धायटीची थोडी झाडे दिसली. त्याच्या रसापासून आयुर्वेदिक कुमारी आसव तयार करतात.

तेवढय़ात पक्षी निरीक्षणपण झाले. ब्रायडेलिया झाडावर बसला होता. निखार पक्षी. या झाडाची छोटी छोटी काळी फळे खाऊन जो बीजप्रसार करतो तो हा निखार पक्षी.

सोनकीची पिवळी फुले वाटेत दिसली इथेच. आम्ही आमचा नाश्ता केला व परत गप्पा मारत मारत बसमध्ये जाऊन बसलो.

आता आमची बस निघाली कुदळे गावाच्या दिशेने. वाटेतच आम्हाला डोंगरउतारावर कारवीची फुले दिसली. ही फुले डोंगरउतारावरच येतात. यामुळे जमिनीची धूप होत नाही. मुळे घट्ट असतात. ८ वर्षांतून एकदाच फुले येतात म्हणून त्याचे अप्रूप. जांभळ्या रंगाचा डोंगरावरचा उतार नेत्रांना सुखद, आल्हाददायक वाटतो. ही फुले सह्यद्रीत जशी आढळतात तशीच मध्यप्रदेशमध्येपण आढळतात. कारवीच्या कॅलिस करोडामधून एक एक करत फूल फुलत जाते व मग ती गळून जातात. म्हणजे त्यांचे आयुष्य संपते. डहाळ्या हळूहळू वाळतात. त्याचा उपयोग टोमटोंच्या झाडांना आधार देण्यासाठी करतात. फुलामधून जे बी खाली पडते त्यातून नवे झाड येते, पण रुजून परत फुले येण्यास ७ ते ८ वर्षांचा काळ जावा लागतो. मारुडाना असे इंग्रजी नाव कारवीचे आहे. ज्यात भरपूर न्युट्रीएंट व आयर्न असते. या फुलांचा मधही औषधी असतो.

तसेच खूप आत गेल्यावर उंच मोठा धबधबा दिसला. पाहून मन आल्हाददायी झाले. वाटेतच गुलाबी गुलछडी दिसली. तिला काहीजण गौरीचा हात म्हणतात असे कळले. गणपतीत जी गौरी येते तिला हे फूल वाहतात असे कळले.

नरक्या म्हणून झाडे आढळली. ही कॅन्सरवरच्या उपचारासाठी वापरतात. जपानने याचे पेटंट घेतले आहे. भारतातून याची निर्यात होते म्हणून ही झाडे आता दुर्मीळ होऊ लागली आहेत.

पुढे आम्हाला ड्रॉसेराची फुले दिसली. ड्रॉसेरा हे कीटकभक्षक झाड आहे. यांच्या पानावर चिकट द्रव असतो. व छोटे छोटे बिंदूसारखे भाग असतात. यामुळे कीटक आकर्षित होतात. कीटक पानावर बसला की चिकटला जातो. नंतर ती पाने कीटकाला गुंडाळून त्यातली उपयुक्त पोषण द्रव्ये शोषून घेतात.

पायपिटीने आम्ही खूप दमलो होतो. आम्ही पारावर जेवायला बसलो. जेवण साधेच होते, पण दमल्यामुळे चांगला जेवणावर ताव मारला. गप्पा मारत होतो, जिथे बसलो होतो त्याच पारावर ऑर्किड होते. ते पाहायला मिळाले. आता आम्ही परतत होतो. चहाला आम्ही मध्यंतर घेतला तर तिथे एका झाडावर बांडगूळ दिसले. परत बसमध्ये बसून थेट पुण्याला आलो तेव्हा सतत रिमझिम पाऊस होता. आता मी मनात म्हणत होते जोरात पड बाबा जोरात.

अशा तऱ्हने कारवीची फुले व वनस्पती निरीक्षण झाले. हे फक्त सप्टेंबर अखेपर्यंतच पाहायला मिळते.

छायाचित्रे वामन पंडित

First Published on October 23, 2015 1:16 am

Web Title: trip to sahyadri fort