News Flash

सोन्यासम ट्रफ्ले मश्रूम

हल्ली चांगल्या हॉटेलमध्ये मश्रूमचे सूप वा एखादी डिश सहज मिळते.

हल्ली चांगल्या हॉटेलमध्ये मश्रूमचे सूप वा एखादी डिश सहज मिळते. बर्गर वा पिझ्झात ते आढळते. या डिशची किंमत दोन-तीनशे पलीकडे नसते. पण ग्रीस वा इटलीच्या हॉटेलात तुम्ही ट्रफ्ले मश्रूमची मागणी केली तरी ती ऑर्डर घेणारा वेटर कमरेतून आणखी वाकेल. कारण अशी ऑर्डर देणारा कोणी सामान्य नाही तर लखपती असणार व त्याच्याकडून दणकून टीप मिळणार ही जाणीव त्याला असते. काय असते हे ट्रफ्ले मश्रूम?

जगभरात सुमारे ३३०० जातींचे मश्रूम नैसर्गिकरीत्या उगवत असते. झाडाचे खोड, एखाद्या लाकडाचा ओंडका वा पानांवर देखील मश्रूम उगवते. काही पिवळसर, काही किरमिणी वा फिकट पांढरे. यांतील फारच थोडय़ा जाती खाण्यालायक असतात. पण ट्रफ्ले मश्रूम जमिनीवर येतंच नाही. ते भूमिगतच राहते. मश्रूम दिसायला वनस्पतीसारखे असले तरी ते वनस्पती नाही. ते आहे पराजीवी कवक (इहलुहे). त्याची कृत्रिम पैदास होऊ शकत नाही. त्याची लागवड करण्याचे प्रयत्न झाले. पण ते अयशस्वी ठरले.

मश्रूमचा भाव देशसापेक्ष बदलत असतो. भारतात वापरले जाते ते ऑयस्टर मश्रूम सव्वाशे ते दीडशे रुपये किलोने विकले जाते. पण तेच युरोपीय देशात चौपट भावाने विकले जाते. फक्त काश्मीरमध्ये होणाऱ्या काळ्या मोरेल मश्रूमला हजार रुपये किलो द्यावे लागतात. ते फार छोटय़ा क्षेत्रात अल्प प्रमाणात येते. मुंबईच्या पाच स्टार हॉटेलात त्याच्या डिशला तीन हजार रुपये पडतात. हा झाला चांदीचा भाव. ते खाणाऱ्याची ब्रह्मानंदी टाळी लागते इतके ते अप्रतिम चवीचे व स्वादाचे असते म्हणतात.

काळ्या मोरेल मश्रूम इतके उत्तम चवीचे कदाचित काकणभर सरस असणारे ट्रफ्ले मश्रूम जमिनीच्या आत पसरलेल्या काही झाडांच्या मुळातून पोषण मिळवते. ओक, पाइन, पॉप्लर इ. झाडांखाली ते सापडण्याची शक्यता असते. पण खात्री नाही. म्हणून या झाडापासून त्या झाडापर्यंत त्याचा शोध घेण्याचे परिश्रम करावे लागतात. त्याच्या कोणत्याच खुणा भुईवर दिसत नाहीत. ते जमिनीत ३० ते ४० सेंमी खोलीवर असते. त्याची लागवड होऊ शकत नाही. ओक झाडांची लागवड करायची आणि त्याखाली ट्रफ्ले मिळते का याची वाट बघायची! ट्रफ्ले तयार व्हायला कमीत कमी दहा वर्षे लागतात. त्यांची बऱ्यापैकी पैदास होण्यासाठी आणखी १५/२० वर्षे वाट पाहावी लागते. इतकी वर्षे कोण वाट पाहणार? त्यामुळे वनजमिनीत ते कुठे मिळते का याचा शोध घेतला जातो. त्यासाठी विशिष्ट जातीच्या डुक्कर मादीची मदत घेतली जाते. तिला अर्धा-पाऊण मीटर खोलीवर असलेल्या मश्रूमचा वास येतो व ती त्या जागी मागच्या पायाने उकरू लागते. ती मश्रूमपर्यंत खोदत गेली की तिला आवरणे अवघड होते. काही करून तिला ते मश्रूम मटकवायचे असते. त्यासाठी तिची धडपड चालू असते. ती मश्रूमपर्यंत पोचण्याच्या बेतात असताना तिला बाजूला करून मश्रूम खुडले जाते. वरच्या शतकात ट्रफ्लेचा शोध घेणाऱ्या डुकरिणीच्या पालकाला २०० डॉलर मजुरी द्यावी लागायची. बाँब शोधणाऱ्या कुत्र्यांनाही हे काम जमू शकते. पण त्यासाठी त्यांना दीर्घकाळ प्रशिक्षण द्यावे लागते; ते अर्थातच महाग पडते.

ट्रफ्लेचे वैशिष्टय़ आहे ते त्याच्या अफलातून स्वादात. त्याचा छोटा तुकडा त्या पाककृतीला फाईव्ह स्टार वैभव देतो. ते मिळवणे अवघड असते; संख्येनेही कमी मिळते. त्यामुळे त्याला प्रचंड किंमत मोजावी लागते; इतकी की आपल्याला अवास्तव वाटावे.

२००१ साली त्याची किंमत किलोला २००० ते ४५०० डॉलर्स (म्हणजे सुमारे एक लाख ते सव्वादोन लाख रुपये) इतकी होती. २००७ मध्ये भावाने उच्चांक गाठून ३३००० डॉलर्सची पातळी गाठली होती. मात्र २००९ मध्ये तो काहीसा उतरून १४००० वर आला होता.

माणूस कितीही धनवान असला तरी त्याला सोने-चांदी खाता येत नाही. त्याचा शौक त्याला ट्रफ्लेची महागडी डिश खाऊन फार तर पुरा करता येतो. ट्रफ्ले हा कंद नाही. पण दिसायला ते साधारण साळ्यासारखे दिसते. आजतागायत त्याचा सगळ्यात मोठा कंद १.३१ किलो ने भरला आहे.
दिगंबर गाडगीळ – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2016 1:22 am

Web Title: truffle mushroom
Next Stories
1 कथा : एका नकाराची गोष्ट
2 कथा : अवकाळी बर्फ
3 अनुभव : दूर कही जब दिन ढल जाऐ
Just Now!
X