अलीकडेच झालेली दंगल अनेक संवेदनशील मनांना अस्वस्थ करून गेली. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दोन कलाकारांच्या मनातल्या अस्वस्थतेचं हे शब्दरूप..

रंग हा तुझा माझा धमन्यांत वाहणारा..

जातीचा पातीचा..

भिरकावलेल्या त्या दगडाचा..

आडनावाचा पाठलाग करत पाठीत खुपसलेल्या खंजिराचा.

लोकशाहीची लक्तरे करून डोळ्यात उतरलेल्या रागाचा..

मावळतीला आलेल्या सूर्याचा..  ऱ्हासाला आलेल्या माणुसकीचा..

सांजवेळी येणाऱ्या, न येणाऱ्या नवऱ्याची वाट पाहणाऱ्या तिच्या कपाळाचा..

रंग हा तुझा माझा धमन्यांत वाहणारा..

थेंब थेंब माणसाला जगवणारा..

थेंब थेंब वेचून माणसाला मारणारा..

जातीचा पातीचा..  भिरकावलेल्या त्या दगडाचा..

रंग हा तुझा माझा धमन्यांत वाहणारा..

शूटिंगच्या दरम्यान कोणाचा तरी फोन वाजला. आणि मग ‘कधी?’, ‘बापरे?’, ‘दंगल?’, ‘कुणाकुणाची?’ शेवटच्या प्रश्नाचं उत्तर मात्र अधिक बोचणारं होतं. देशाबाहेरच्यांनी दंगल घडवून आणली तर आतंकवाद अशी आम्हा सामान्यांची संकल्पना असते. पण देशांतर्गत आपल्याच माणसांनी आपल्याच माणसाविरुद्ध केलेल्या या प्रकाराला ‘चळवळ’ म्हणायचं का ? चळवळ म्हटल्यावर न्याय-अन्यायाचा प्रश्न उभा राहतो. पण कुणाला न्याय आणि कुणावर अन्याय हेच कळलं नाही.

त्या घटनेनंतर फेसबुकवर, व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक जण पेटून उठले. अनेक लेखक तयार झाले. अनेक अभ्यासक उदयास आले. पण बरेच जण सुन्न होते. माझ्यासारखेच. कदाचित आमचा त्या विषयाचा अभ्यास नव्हता. कधी करावासाही वाटला नाही. कुतूहल म्हणून किंवा इतिहासाची माहिती असावी म्हणून ज्यांचा अभ्यास होता त्यांचाबद्दल आदर आहेच. पण अभ्यास नसतानाही काही विद्वानांनी जी हिंमत केली ती आमच्यात कधी आलीच नाही. कारण शाळेत असताना आम्ही आमच्या कोणत्याही मित्राला आडनावाने ओळखत नव्हतो.

बालपणीचा काळ सुखाचा असं म्हटलं जातं. तो का सुखाचा हे आज मोठं झाल्यावर कळतंय. तिथे आम्ही समाज नावाच्या घोळक्यात वावरायला लागलो, जिथे माणसाची माणसाशी ओळख खूप वेगळ्या पद्धतीने होते. ‘कांबळे म्हणजे तुम्ही?’, ‘पाटील म्हणजे तुम्ही?’, ‘सावंत म्हणजे तुम्ही?’, ‘कुलकर्णी म्हणजे तुम्ही?’ हे शाळेत एका मित्राने दुसऱ्या मित्राला विचारलेलं मला आठवत नाही. कारण मधल्या सुट्टीत सगळ्यांच्या डब्यातला खाऊ  एकमेकांना खायचा होता. भूकच एवढी असायची की ‘तुझ्या घरात कोणत्या देवाचा फोटो आहे’ किंवा ‘तुम्ही कोणता सण साजरा करता’ हे विचारायला वेळच मिळायचा नाही. कारण मैदानात जाऊन एकत्र हातात हात घालून साखळी साखळी खेळायचं होत. एकाच टीममध्ये पाटील, लोंढे, जोशी, कुडतरकर यांनी एकत्र खेळून टीमला जिंकवायचं होतं. एकमेकांच्या वह्य़ा घेऊन अभ्यास करायचं वय होतं ते. ‘तू कुठला’ आणि ‘मी कुठला’ असं म्हणत राहिलो असतो तर कदाचित एका वर्गात बरीच वर्ष बसलो असतो. आणि असं म्हटलं असतं की ‘जात’ आहे ना म्हणून पुढे जात नाही. हे सगळं झाल्यावर आम्हाला ज्या सोशल मीडियाने अजूनही बांधून ठेवलंय, त्यातल्या आमच्या शाळेच्या ग्रुपवर एका मित्राचा दुसऱ्या मित्राला मेसेज आला. ‘कुठे आहेस रे? घरी नीट जा.’ दुसऱ्याचा तिसऱ्याला आला. ‘आम्हाला फक्त तुझ्या घरी खाल्लेला झुणका आठवतोय. आपल्यात असं काही नाही.’ तिसरा दुसऱ्याला म्हणाला, ‘ये ना घरी. आई विचारात होती तुला?’ आणि मग सगळा काळ समोरून गेला. आणि शाळेने केलेल्या एका ऋणात भर पडली. ‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.’ या ओळी आमच्याकडून सक्तीने वदवून घेतल्या नव्हत्या तर आमच्या मनात बिंबवल्या होत्या. आमच्यातला माणूस जागवला होता. ज्याला कळलं होतं धमन्यांमध्ये वाहणारं रक्त लालच असतं, ते भगवं किंवा निळं नसतं.

त्या दिवशी पहिला दगड भिरकावला गेल्यावर ज्याचं कपाळ फुटलं त्यातून वाहणाऱ्या रक्ताचा रंग कुठला होता? कारण कोण कुणाला मारतंय, कशासाठी मारतंय याचं भान हातात दगड असणाऱ्यालाही नव्हतं. अगदी एका चिमुकल्याच्या हातात दगड होता. त्याच्यामधला  निरागसपणा त्याच्याच हातातल्या दगडाने ठेचला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेली क्लीप बघून चर्रर झालं. हे असंच सुरू राहिलं तर बाहेरच्या दहशतवादाची गरजच नसेल ना आपल्याला संपवायला. आपणच आपल्या माणसांना संपवू या. किमान बाहेरच्या कुणीतरी आपल्याला संपवलं याचं दु:ख नाही राहणार. पण खंत राहील, आपण आपलेपणा मात्र संपवलेला असेल. भविष्यात कुठल्याच शाळेत एक मित्र दुसऱ्या मित्राचा डब्बा खाताना दिसणार नाही. एक टीम म्हणून भारताला जिंकवणाऱ्या टीमने पण हाच विचार केला तर पाकिस्तानसोबतच्या विजयानंतरही आपल्या अंगावर रोमांच उठणार नाही. ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत’ असं म्हणताना तिरंग्यासमोर कुणी ताठ उभं राहू शकणार नाही. कारण प्रत्येक जण तिरंग्यातील हवा असलेला रंग वेचत असेल.

या सगळ्या प्रकाराबद्दल बोलण्याचा, कुणाची बाजू मांडण्याचा मला अधिकार नाही. कारण माझा तेवढा अभ्यास नाही. पण एक प्रश्न राहून राहून मनात येतो, त्या दिवशी कुणाच्या हातात दगड होता, कुणाच्या हातात काठी होती, कुणाच्या हातात आपल्याच माणसांचा मृतदेह होता. पण कुणा नेत्याच्या हातात कुणी दगड पाहिला का?  काठी पाहिली का? किंवा त्यांनी कुणासाठी आसवं गाळलेली पाहिली का? हे कुणीच पाहिलं नसेल. मग आपण कुणासाठी भांडत होतो, कोणी कोणाला भडकवलं याचा सारासार विचार केला? मी म्हणत नाही की अन्याय सहन करा. पण न्याय मिळवण्यासाठी आपल्यावर नेमका काय अन्याय झाला आहे याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. काही जणांना त्यांच्या त्यांच्या जातीचा मोठेपणा हवा आहे. कुणा एका जातीवर राज्य करायचं आहे. पण जातीनं नाही, कर्तृत्वाने मोठेपणा येतो आणि जिथे कर्तृत्व संपतं तिथे राजकारण सुरू होतं. राजकारणात होरपळून निघणारा कुठल्याही जातीपातीचा नसतो. त्याला एकाच जात असते, सामान्य माणूस. त्याच्या रक्ताचा रंग लालच असतो.

राजांनी आम्हाला स्वराज्य दिलं. बाबासाहेबांनी आम्हाला लोकशाही दिली. पण आम्ही मात्र स्वराज्य टिकवू शकलो नाही. आणि लोकशाही समजून घेऊ  शकलो नाही. आम्ही फक्त आमच्याच फायद्यासाठी मतदान करत राहिलो. मुळात मताधिकार असा शब्द असतानाही आम्ही आमच्या मतांचं दान केलं आणि दान मागण्यासाठी आमच्याच स्वाभिमानाचं भांडवल केलं. मुळात व्यवसायाने ओळखली जाणारी माणसांची जात मोठी केली गेली आणि लोकशाहीत जातीचं राजकारण खेळलं गेलं. कित्येकांना कल्पनाही नसावी की या जातीपाती व्यवसायाने आल्या. कुणी खालच्या जातीचा, कुणी वरचा जातीचा असं मुळात नाहीच आहे. व्यवसाय वेगवेगळे आहेत. संविधानाने सगळ्यांना शिकण्याचा समान हक्क दिला त्यामुळेच आज कोणीही कोणताही व्यवसाय करू शकतो. अगदी कुडतरकर आडनावाचा मुलगा लिहूदेखील शकतो. कुडतरकर हा नावावरूनच लेखक वाटत नाही असं म्हणणाऱ्यांसाठी मुद्दाम लिहितोय. कारण आज संविधानाने आपल्याला आपलं भविष्य ठरवण्याचा अधिकार दिलाय. मग आपण संविधानाचा आदर राखू या. एक चित्रपट येतो. सगळेच त्याचं कौतुक करतात. त्यातल्या गाण्यावर ताल धरतात ‘तुझा पिरतीचा हा विंचू मला चावला’ असं म्हणत नाचतात. तो चित्रपट पाहिला जातो. त्यातला भिरकावलेला दगड अंगावर काटा आणतो. पण तो आपल्यापर्यंत, आपल्या समाजव्यवस्थेपर्यंत पोहोचत नाही. हे चित्रपटाचं अपयश नसून आपल्या मानसिकतेला बसलेली दातखिळी आहे. संवेदना बोथट झाल्यायत. ‘सैराट’मधल्या बाळाच्या पावलांच्या ठशांसारख्या.

माझं कुणालाही शिकवण्याचं वय नाही. तेवढी समजही नाही. पण भीती वाटते. उद्या एखादा दगड माझ्या शाळेतल्या एखाद्या मित्राच्या अंगावर भिरकावला गेला तर? कारण आज सगळं शांत झालेलं दिसतंय. पण कुठेतरी आग धुमसत असेल. कुठेतरी राजकारण शिजत असेल. उद्या भांडवल कशाचं करायचं? सामान्यांच्या भावनांचं? कारण त्या प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात माझं अस्तित्व धोक्यात तर नाही ना, ही दंगल सुरू असते. पण अस्तित्व धोक्यात आहे, तुमच्या-आमच्यातल्या माणसाचं. नवऱ्याची वाट बघणारीचं. चिमुरडय़ाच्या डोळ्यात असलेल्या निरागसतेचं. थेंबाथेंबाने माणसाला जगवणाऱ्या तुझ्या-माझ्या धमन्यात वाहणाऱ्या लाल रंगाचं. कारण दंगल अजून सुरूच आहे..

प्रल्हाद कुडतरकर