सरत्या वर्षांला निरोप देऊन आपण नुकतेच मोठय़ा जल्लोषात नवीन वर्षांचे स्वागत केले, त्यानिमित्त अनेक संकल्प केले, स्नेही मंडळींना शुभेच्छा दिल्या-नववर्षांत आनंद, सौख्य, यश, आरोग्य लाभो इ. इ.
याच आपल्या सुखासमाधानाच्या कल्पना असतात, नाही का? मी, माझे कुटुंब, मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याभोवती आपल्या आनंदी व यशस्वी जीवनाच्या कल्पना पिंगा घालत असतात; आणि त्यात गैर काय आहे? ‘हे विश्वचि माझे घर’ अशी समर्थ रामदासांसारख्या संतकोटीतील महानुभावांना शोभून दिसते. तुम्हां-आम्हांसारख्या ‘आम आदमी’च्या मनावर ‘हे घरचि आमचे विश्व’ हेच पक्के कोरलेले असते.
आमचे आयुष्यही अशा जगन्मान्य रस्त्यावरून सुखनैव पुढे सरकत होते. शिक्षण, नोकरी, लग्न, मुलेबाळे असे नेमके टप्पे नेमक्या कालांतराने पार पडले. ‘स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच’ अशा हवेत तरंगत असताना काही घटनांनी जमिनीवर आणून आदळले. संसारनौका हेलकावे खाऊ लागली. अवतीभवती कुठे आसरा मिळेना. जहाज बुडायला लागल्यावर जसे उंदीर उडय़ा मारून पळून जातात तसेच अपेक्षा ठेवून जमा झालेले स्नेही, नातलग दुरावले.
अशा प्रसंगात आपण अचानक भाविक होतो, आपल्याला परमेश्वराचे स्मरण होऊ लागते. संत तुकारामांच्या आयुष्यातही त्यांच्या विठ्ठलभक्तीची सुरुवात त्यांच्यावरील गंभीर संकटांमुळे झालेली दिसते. अर्थात या ठिकाणी तुकाराम महाराजांची बरोबरी करण्याचा हेतू अजिबात नाही. मुद्दा अगदी साधा आहे की, संकटप्रसंगी परमेश्वराचा धावा करणे ही मनुष्याची स्वाभाविकप्रवृत्ती आहे. आम्हीही असे नकळतपणे श्रद्धाळू झालो असताना आम्हाला एक विलक्षण अनुभव आला. आम्हाला परमेश्वराने प्रश्न केला, ‘‘तुमच्या आयुष्यात तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टी मिळाल्या, यश मिळाले. या पृथ्वीवर मनुष्याचा जन्म मिळाला. अनेकांच्या योगदानामुळे तुमचे जीवन सफल झाले. याची परतफेड तुम्ही कशी करणार? इतकी वर्षे या पृथ्वीतलावर राहण्याची किंमत तुम्ही कशी चुकवणार?
आम्ही चक्रावलो. असा विचार या क्षणापर्यंत आम्ही कधीच केला नव्हता. या पृथ्वीतलावर राहण्याची किंमत कशी चुकवायची? किती पैसे..
आमचे मन जणू वाचल्यासारखे पुढचे शब्द ऐकू आले, ‘‘या तुमच्या करकरीत नोटांनी आणि खणखणीत नाण्यांनी काय होणार? तुमचं आयुष्य ही काय विक्रेय वस्तू आहे का?’’
आम्ही आणखी कोडय़ात पडलो. आपल्या नाण्यांनी जर कशाची परतफेड होणार नसेल, तर आपल्याकडे काय आहे? स्वत:च्या कंगालपणाची ती जाणीव फार बोचरी होती. पण यापुढचे शब्द चंद्राची शीतलता शिंपडल्यासारखे होते..‘‘छे, तुम्ही कंगाल कसे? तुमच्याकडे तुमचं हृदय आहे.. प्रेमाने भरलेलं. ते प्रेम सर्व जगाला भरभरून वाटा. त्या प्रेमाचे मोजमाप करू नका. त्या प्रेमाचा झरा सर्वांपर्यंत वाहू द्या.’’
हे ऐकून आम्हाला काही वेगळीच अनुभूती येऊ लागली. पण व्यावहारिक कुशंका सवयीने डोके वर काढणारच ना! सर्व जगाला वाटण्याएवढं प्रेम आणायचं तरी कुठून? आणि असं जर प्रेम आम्ही सर्वाना वाटत सुटलो, तर ते संपणार नाही का? त्यापेक्षा सारासार विचार करून प्रेम कोणाला द्यायचं हे ठरवलं, तर दोन्ही बाजूंचा, प्रेम घेणाऱ्यांचा आणि देणाऱ्यांचाही फायदा होईल.
हा विचार मनात घर करेपर्यंत पुढचा प्रश्न आला. ‘‘निसर्गाकडून तुम्हाला जे मिळते, ते असा सारासार विचार करून मिळते का? पृथ्वी, चंद्र, सूर्य, वृक्ष, नद्या, ढग हे सर्व तुमच्यावर भरभरून उधळण करतात, कुठलाच भेदभाव न करता! मग तुम्ही असा भेदभाव का करायचा? सारासार विचार करून जे केलं जातं तो व्यवहार असतो. प्रेम नव्हे. प्रेम या सगळ्या लौकिक गोष्टींच्या पलीकडे असते. निरपेक्ष प्रेम, त्याचा अक्षय झरा तुमच्या हृदयातच आहे. जगावर याचे सिंचन केल्याने ते प्रेम संपणार नाही, उलट ते अखंड प्रवाही राहील. तुम्हाला अनेक समानधर्मी भेटतील. व्हा, पुढे व्हा, जगाला प्रेम अर्पण करण्याचा धर्म धारण करा. तुमच्या जीवनाला किती वेगळा रंग चढेल, त्याचा अनुभव घ्या, मानवतेकडून ईश्वराकडे वाटचाल करा, उन्नत व्हा!’’
आम्ही स्तब्ध झालो. आमच्या सर्व व्यावहारिक विचारांचा हळूहळू उपशम होऊ लागला. मनात एका दिव्य अनुभूतीचे स्फुरण होऊ लागले. प्रेम हे आपल्याला लाभलेले ईश्वरी वरदान आहे, याची खात्री पटली. शंका-कुशंका पार पळाल्या. स्वत:च्या मनुष्य जन्माचे सार्थक करायचे, या एकाच भावनेने आम्हाला झपाटले. जगाला निरपेक्ष, नि:स्वार्थी प्रेम देऊन निर्माण होणारा आनंद कसा असतो, याचा अनुभव घेण्यास मन उत्सुक झाले.
अवतीभवती नजर टाकल्यावर असे लक्षात आले की अशा प्रेमाची प्रत्येकालाच अपेक्षा असते. मनुष्य, प्राणी, झाडे. सर्वानाच. आपण स्वत: तरी याला अपवाद कुठे आहोत? आपल्या परिचिताकडून प्रेम मिळणे हा आपल्याला हक्क वाटतो, पण अपरिचिताकडून मिळालेले प्रेम सुखद धक्का देऊन जाते. असे सुख आपण दुसऱ्यांना दिले तर त्यांच्या जीवनात दोन आनंदाचे क्षण आपण निर्माण करू शकू. हीच का ती ‘लाभावीण प्रीती?’ या विचाराने आमच्या अंगावर रोमांच उभे राहिले. आमचे वैयक्तिक दु:ख आम्हाला क:पदार्थ वाटू लागले. या जगावर प्रेमाचे सिंचन करण्याचे कार्य आपल्यावर सोपवले गेले आहे याची जाणीव झाली. मग तर आम्हाला स्फुरणच चढले आणि सुरू झाला आमच्या प्रेमाच्या प्रयोगांचा मनोरम सिलसिला! याच प्रेमाच्या प्रयोगांची ही गाथा-सुहृद वाचकांना समर्पित!