News Flash

कथा : अवकाळी बर्फ

अवेळी येणाऱ्या गोष्टी अडचणीच असतात.

अगदी उजाडायची वेळ.. झुंजूमुंजू म्हणाना!! तिने खिडकी उघडली. तशी तिला रोजच घाई असायची खिडकी उघडण्याची. पहिल्यांदा विचार असायचा की, वातावरण कसे असेल नि पक्षी कोणते असतील झाडांवर? नंतर उन्हाचा कवडसा कसा येईल हे पाहण्याची घाई असे. ऊन आणि नैसर्गिक उजेडाची आवड. सगळ्या तऱ्हेने तिला निसर्ग मनापासून आवडे. त्यात रमून ती निरखत असे. आकाशाचा रंग, झाडांचा रंग, रंग बदललेली पाने. रोज सकाळीच सूर्याची जणू ती हजेरी घेण्यास सज्ज असे. पण हे करताना तिला माहीत होते की, सूर्य उगवणारच!!

आज सकाळी मात्र तिला वेगळंच वाटलं. आजची सकाळ सोनेरी वाटायच्या ऐवजी तिला उगीचच कोणीतरी त्या कॅनव्हासवर पांढरा रंग टाकून एव्हढीशी जागा न ठेवता सगळे रंग नाहीसे केलेत असे तिला वाटून खिन्नता आली.

बर्फाची भुरभुर वाढली हे तिला दिसताच अवकाळी पावसाचं (बर्फ पडण्याचं) स्वागत करावं कसं? कारण अवेळी येणाऱ्या गोष्टी अडचणीच असतात.

तेवढय़ातच मालती जागी झाली. ‘‘आई सरक, मला बघू दे ना.’’ आळसावलेल्या स्थितीतच ती बोलली.

डोकं चिकनंचोपड, केसांचा पत्ताच नाही. तीस वर्षांची मालू, अगदी पाच वर्षांच्या लहान मुलीप्रमाणे दिसत होती.

पिवळी पडलेली त्वचा, सुकट देह, मलूल पडलेला चेहरा, फक्त त्यांवर मोठ्ठे काळे डोळे जणू माझ्याकडे पाहा असं सांगत आहेत.

बाहेर बर्फाच्या पावसाने थैमान मांडले होते. काल संध्याकाळी सुरू झालेला वर्षांव थोडा कमी झाला असला तरी पूर्णपणे थांबला नव्हता.

‘‘कशी आहे तब्येत?’’ शकूने विचारले.

‘‘अंऽअँ, आहे तशीच!’’ म्हणत ती बाहेर असलेल्या मैग्नोलियाच्या झाडाकडे बघत राहिली. तिकडे पाहताना तिचा चेहरा थोडासा हसरा आणि शांत वाटला.

‘‘मालू बघ, ते झाड कसं लदबदलंय कळ्यांनी! काही दिवसांतच कळ्या उमलतील, झाड कसं भरून जाईल फुलांनी आणि मग कित्ती छान दिसेल हे झाड?’’ आई लेकीला काहीतरी बोलायचं म्हणून बोलली.

‘‘म्हणून तर मी येथे झोपते. ही तुझी अभ्यासाची खोली! माझ्या खोलीत न झोपता इथे डोळे उघडताच मेग्नोलिया मला जणू जागं करतो असं वाटतं. त्याच्या जांभळ्या-गुलाबी कळ्या गच्च मूठ आवळल्यासारख्या वाटतात. जेव्हा उमलतील तेव्हा गुलाबी-पांढऱ्या रंगांचं सौंदर्य दिसेल. नंतर ती फुलं गळतील तेव्हा झाडांखाली गुलाबी चादर टाकल्यासारखं वाटेल आणि मग मी त्यावर जाऊन झोपेन.’’ काही शब्द मनाशीच बोलल्यासारखी बोलते.

मात्र शकूच्या मनात यायचं की, याला ‘सुहागसेज’- ‘शुभरात्री’ म्हणायला काय हरकत आहे?

हे मनात येत असतानाच ती मालतीच्या तब्येतीचा पण विचार करतेय. इतक्या तरुणपणातलं सगळं सुख हिरावून घेतलंय देवाने!! अजून लग्न नाही नि कसचा कशाचा विचार करतेय ही पोरगी? कसची तक्रार नाही. फक्त हसते, झालं!!

‘‘आज सकाळी काय झालं बरं का आई?’’ तिला वाटत असतं आईला पटेल का हे बोललेलं?

शकू मात्र हसू शकत नाही. काटा टोचल्यासारखं होतं तिच्या छातीत. आयुष्य कसं धूसर होत चाललंय! श्वास आहे म्हणून आणि शेखरची साथ आहे म्हणून!! दूर दिसणाऱ्या उजेडाकडे पाहत राहिली. जणू काही तेवढाच ऊर्जेचा स्रोत.

शेखरच्या हे लक्षात येताच, ‘‘मालू तशी बरी झाली होती ना गं? परत कामावर पण जात होती. वेगळ्या जागेत राहायला पण गेली होती. विश्वास ठेव ती लवकरच बरी होणार आहे पूर्णपणाने.’’

‘‘सांभाळू शकेल का ती स्वत:ला तरी.’’ शकू काळजीने नि अस्वस्थ मनाने बोलली.

‘‘तिला स्वावलंबाने राहू दे. तिच्या विचाराने तिला जगू दे. बरेचसे अपवाद असतात. शरीराच्या बऱ्याच व्याधी या मनोबलावर अवलंबून असतात.’’ शेखर बोलला.

‘‘मनोबल?’’ तिने तेवढाच शब्द उच्चारला. अस्वस्थ मन आणि असहायता भासत होती तिच्या बोलण्यातून!

तिचं धैर्य खचतच चाललं होतं. मग ती ते एकवटण्यासाठी सतत तोच विचार करत असे की, मालूला कसं बरं वाटेल? ती सगळ्यांनाच कशी चांगली दिसू शकेल?

‘‘तुझ्या खोलीतून ते हिरवेगार झाड दिसतंय ना! सदाबहार असतं. प्रत्येक मोसमात हिरवाईनं भरलेलं!!’’

‘‘..मग?’’

‘‘पण मला हेच मैग्नोलियाचंच आवडतं जास्ती. लहानसं झाड, हळूहळू  वाढतं.’’ भरपूर फुलं येतात. बहरल्यावर कसं छान वाटतं ना गं आई?’’ मालू खिडकीबाहेर बघते.

‘‘अगं आवडतं म्हणून? मग दिवसा केव्हातरी येथून बघत जा नं. असं उतारकरूसारखं काय झोपायला?’’ आईच्या कडक शिस्तीची आठवण झाली तिला.

तितक्यात औषधाची वेळ झाली म्हणून एका हातात पाणी आणि दुसऱ्या हातात औषध घेऊन शेखर आला. बाहेर बर्फ वर्षांव चालूच होता.

‘‘गुड मॉर्निग माय स्विट हार्ट.’’ म्हणत पाणी आणि औषध मालूसमोर धरलं. गेल्या पाच-सहा वर्षांतला हा नित्यक्रम झाला होता.

मालूने वडिलांचा एक हात सहजतेने पकडला नि दुसऱ्या हातातील औषध घेतले. औषध गिळून घेऊन तिने डोळे लावून घेत अंग अंथरुणावर पसरून दिले. ते नुसतेच तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. दोघेही एकमेकांकडे पाहत होते. पाण्याचा पेला तिने त्यांच्या हातात दिला. शकूने उच्छ्वास घेत खोलीतून बाहेर जाणेच पसंत केलं.

तेवढय़ातच खोलीतल्या अंध:काराबरोबर बाहेर सगळीकडे अंधार पसरलाय हे लक्षात आले. आपल्या आजाराने आपले वडील कंटाळलेत हे तिच्या लक्षात आले होते.

‘‘तब्येत ठीक नाही कां ग?’’ त्यांनी तिला विचारले.

मानेनेच नकार देत तिने डोळे मिटून घेतले. शेखरने जवळचा पेपर हातात घेतला आणि तिथेच खुर्ची ओढून घेतली.

केमोथेरपीनंतर आजारी व्यक्तीवर काय परिणाम होतो हे त्यांना नीट लक्षात आले होते. जर वातावरण चांगलं असतं तर हिला बरं वाटलं असतं का? उन्ह असेल, मोकळी हवा आणि स्वच्छ प्रकाशाने थोडं उल्हसित होतं मन! त्यांचं मन नि डोकं वेगवेगळ्या रस्त्याने भटकत होतं विचाराने!!

त्यांना वाटत होतं की, ती आता लवकर बरी होईल. काहीतरी गडबड नक्कीच झालीय. कोलोनचा कॅन्सर केमोथेरपी, रेडिएशनच्या प्रतिक्रिया, वमन, दवाखान्याच्या चकरा, तपासणी, औषध, उपास? कशानं काय झालं या वयात असा आजार झालेला पाहिलाच नव्हता त्यांनी! तिच्या आजाराबरोबरच वातावरणाचा ताण त्यांच्यावर पडलेला लक्षात येत होता.

बर्फाची भुरभुर चालूच होती. त्यात अंधार!! त्यांनी मित्राला फोन लावला. ‘‘अरे राजा वीज आहे का?’’

चौकशी करताना परत परत सांगितलेल्या बातम्यांची आठवण होत होती. अशावेळेस प्रत्येकाकडे टी.व्ही. लावलेला असतो. नगरपालिकेकडून सतत बातम्यांतून सांगण्यात येत होतं की, ज्यांच्याकडे वीजपुरवठा खंडित झालेला आहे त्यांनी मित्रमंडळ नाहीतर नातेवाईकाकडे आश्रयाला जावे. किंवा जर कोणीही नसेल तर नगरपालिकेत सोय करण्यात येईल. कोणीही अंधारात थांबू नये.’’

शेखरचा मित्र राजाने वीज आहे म्हणताच, ‘‘अगं, शकू मालूला तयार कर आणि तुही तयार हो.’’ राजाकडे जाण्याच्या विचाराने त्याची गडबड नि बडबड सुरू झाली होती. ‘‘मी बर्फ सरकवून रस्ता करतोय तोपर्यंत आटोपून तयार व्हा दोघी जणी.’’

नगरपालिकेकडून बर्फ काढण्यासाठी अजून यंत्रणा कामाला लागली नव्हती. तसं बोस्टनला नगरपालिकेचं काम तत्पर असतं. नुकताच पडलेला बर्फ काढायला कठीण नसतो. अवजारे घेऊन शेखर कामाला लागला पण!! भुरभुर अजून चालूच होती. पण तुरळक सरी येत होत्या. गारठून जाणारे वारे नि सगळीकडे बर्फच बर्फ! त्यामुळे कठीण जात होतं. फावडय़ांवर घेतलेला बर्फ सगळाच काही दूर टाकला जाऊ  शकत नव्हता. काही अंगावर, काही पायांवर, तर काही मध्येच सांडत होता. रस्त्यावरच्या बर्फाचा दुसऱ्या बाजूला ढीग साठत होता. माणसाच्या कुवतीबाहेरचं काम होतं ते. पंरतु करणं भाग असतं अशा वेळेस! ‘ना नोकर ना चाकर’ आणि तशात आजारी व्यक्ती सहवासाला!!

दुपारी शकूने मालूकरता गाजर आणि पालकाचा ताजा रस काढून आणला होता, परंतु तोसुद्धा तिला प्यावासा वाटला नाही.

‘‘यावेळेस वीज कंपनीने दुरुस्ती करणे शक्य नाही असे जाहीर केले आहे.’’

‘‘असं होईल की, आज काय उद्या रात्रीपर्यंत पण वीज येणार नाही. पॉवर कंपनीच्या लोकांची पहिलीच वेळ दिसतेय.. इमरजन्सी.. आपत्कालीन..’’

अवकाळी पडणाऱ्या बर्फाच्या बातम्यांची टीव्हीवर खैरात होत होती. खरी अडचण असल्याशिवाय बाहेर पडू नका, अशा सूचनाच दिल्या जात होत्या.

‘‘थोडय़ा वेळांत येऊ  शकेल वीज. मागे पण असंच झालं होतं.’’ शकू आशावादाने म्हणाली.

‘‘पहिल्यांदाच होतंय हे, इथे ऑक्टोबरमध्येसुद्धा एव्हढं मोठं बर्फाचं वादळ नव्हतं आलं. हे एक अवकाळी आलेलं वादळ आहे.’’ फेब्रुवारी-मार्च कुठे पावसाचे महिने आहेत का? सगळं जगच बदलत चाललंय. तिकडे भारतातसुद्धा पावसाच्या बातम्या आहेत. दिल्लीत तर कडाक्याची थंडी वाढतेय. या महिन्यात तर तेथे उन्हाळा सुरू असायचा. तिकडे महाराष्ट्रातसुद्धा पाऊस आणि गारपीट सुरू आहे म्हणे. शकूचे विचारचR  सुरूच होते. जगणे मुश्कील करून सोडलंय ‘ा निसर्गाने!!’’

प्रवास कसा करायचा? बाहेर जाणे कठीण, भाजीपाला महागणार, औषधांचा तुटवडा, तर जास्तीचे आजारी, मुलांच्या वार्षिक परीक्षांचे दिवस, लोकांना भरती करून घेताना दवाखान्यातील लोकांची मारामार!!

निसर्ग नियम आणि क्रमानुसार वेगळं जायला मन तयार होत नव्हतं. जसं प्रत्येक वेळेला म्हटलंच जातं हे चुकलं ते चुकलंय, असं होणं शक्यच नाही.

मालती डोळे बंद करून पहुडली होती. आजाराने त्रस्त झालेली. शकू तिच्याकडे पाहत असताना हळूहळू जवळ येऊन बसते.

हळुवारपणे तिने आपलं डोकं तिच्या खांद्यावर टेकवते. दोघीही अस्वस्थ होत्या. कसं आयुष्य होतं एकेकाचं! गडद अंधार!! तिघेही निश्चल बसलेले. मेणबत्त्या जळताना डिशच्या काठाखाली मेण पडून ओघळलं होतं.

‘‘बाबा थंडी वाटतेय.’’ मालू कुरकुरली. शकूने तिला अजून एक पांघरुण घातले. तिने स्वत:साठी आणि शेखरलाही पांघरायला घेतलं तिने एकएक. ‘‘बाथरूमला जायचंय का?’’

हलकेच डोळे उघडून तिने नकार भरला. ‘‘चांगलं लागूनच सगळी सोय असताना इथं झोपायला का, तर त्या मॅग्नोलियाकरता. फार आवडतं तिला.’’ शकू कुरकुरली. तिने जसं स्वगतच बोलणं केलं. नंतर ती खिडकीजवळ उभी राहिली. बर्फाच्या वर्षांवाला खंड नव्हता. तिकडे टीव्हीवर बातम्या सुरू होत्या.

शेखरने तिला डोळे वटारून गप्प केले.

‘अजून बर्फ पडणार आहे असं वाटतंय.’ ती मनाशीच बोलली. ‘‘मी न्यूयॉर्क टाइम्समध्ये वाचलंय की, बर्फाचा पाऊस पडणार आहे. टीव्हीवरच्या आणि पेपरच्या बातम्या सहसा खोटय़ा ठरत नाहीत.’’ हिला एकदा डॉक्टरकडे पण न्यायला हवे. अजून जोराचा पाऊस आणि वादळ यायची संभावना असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

‘‘डॉक्टरला फोन तरी लाव.’’ शेखर म्हणाला.

‘‘तो नेहमीचा डॉक्टर गावाला गेलाय म्हणे. नवीन डॉक्टरला तर हिची केस माहीत नसणार. टायलेनॉल देतो. नेहमीच देतो तसंच. कदाचित ताप उतरू शकेल.’’ शेखर स्वत:च औषध नि पाणी घेऊन आला.

रिकामे रस्ते, पावसाचे अवकाळी येणे म्हणजे व्यक्ती-व्यक्तीला वेगळं वाटतं. दिल्लीच्या लोकांना याची सवय असली तरी त्यांना पण घराबाहेर पडणे कठीण जातंय. फेब्रुवारीत बोस्टनला (अमेरिका) तर मार्चला दिल्लीला (भारत) हैराण करणारा हा पाऊस!!

नगरपालिका तयार नसल्यामुळे नागरिकांना भोगावं लागतंय इथं परदेशात. आजाराला आवतन नि महागाईला निमंत्रण!! २०१५ हे वर्ष सुरुवातीलाच अवकाळी पावसाचं नोंदवायला हरकत नाही. सरकारी आणि घरगुती कामांना खीळ बसलीय. छोटय़ा कामांना बंद करावे लागते. एकूण विकासाला विलंब! निसर्ग, पशू, पक्षी नि मानव या सगळ्यांनाच त्रास होतोय.

‘‘हंऽऽअँ, अजून ऑक्टोबर नाही आला. अजून ‘हैलोवीन’ही नाही. पानझड नाही. या भागात ख्रिसमसनंतरच बर्फ नि पाऊस पडू लागतो. केव्हाही काहीही होऊ  शकते. निसर्ग आपला नियम आपणच बनवतो आणि आपणच तोडतो. पण निसर्गाने नियम तोडले तर मानवाला जास्त त्रास होतो. सगळं उद्ध्वस्त होऊ  शकतं.’ शकू सारखी विचारातच असते.

‘‘मालू खोलीत जाऊन झोपली तर अजून मलूल वाटायला लागलीय.’’ ज्यूसचे दोन घोट कसे तरी तिने घेतले नि ग्लास सरकवून झोपली.

‘‘कांही हवं असेल तर सांग.’’ असे म्हणत शेखर खोलीबाहेर आला.

थोडय़ा वेळातच शेखर पटकन उठला, ‘असं झोपून कसं चालेल’ असं पुटपुटतच त्याने सेलफोन उचलला आणि राजाला सांगितलं की, ‘‘आम्ही येत आहोत.’’

ड्राइव्ह करण्यापुरता बर्फ काढत असताना शकू खिडकीजवळ उभी राहून पाहत असताना तिने शेखरला विचारले, ‘‘मी येऊ  का मदतीला?’’ कारण तिने हे पाहिले की, इमारतीच्या टॉपवरून बर्फ खाली ओघळत आलेला दिसत होता. तो तसाच खिडकीवरून आल्यामुळे बाहेरचे दिसणे दुरापास्त झाले होते. तेवढय़ातच आतून मालूला काहीतरी हवंय असं वाटून ती तिच्या खोलीकडे जाते.

शकू खोलीबाहेर पाहतेय. तर बर्फाचा वर्षांव वाढलेला दिसत होता. त्यामुळे सडकेवर भरपूर बर्फ साठत होता. हा काही धुळीप्रमाणे उडणारा बर्फ नव्हे तर भरपूर वजनदार पाण्याने भरलेला आहे. त्यातून वारं पण सुटलंय. बर्फाचा साठा पटकन वाढतोय. हळूहळू सगळीकडे पांढरंच पांढरं वाटतंय. घरांच्या, कारच्या छतांवर, झाडेझुडपे, सडकेवर सगळीकडे बर्फच बर्फ!! परत वादळाची शक्यता. त्याचा घोंगावणारा आवाज. झाडांच्या फांद्या, विजेची तार सगळेच बर्फाने भरलेले दिसताहेत. बस्स, सगळीकडे बर्फच बर्फ!!

दोघेही खूप विचारात पडले. सतत येणारे हे विचार आणि हा बर्फाचा पाऊस!!

शकूच्या मनात येतं की, ‘अजूनपर्यंत असा डंवरलेल्या पानाफुलांवर पडलेला पाऊस नाही पाहिला. पानझडीनंतर जेव्हा काडय़ा, खराटय़ासारखी झाडे असतात तेव्हा पाऊस पडतो नि त्याच्या ओलाव्याने पुन्हा पालवी फुलून येते.’’

असा विचार येत असतानाच शेखरने तिला जागे केल्यासारखे आपला मित्र राजाकडे जायचेय याची आठवण करून देत जाण्याची घाई केली.

बर्फाचा रस्ता तर साफ करून झालेला होता. मालूला सांभाळून शेखरने बाहेर आणले. दोघांनी मिळून तिला गाडीत बसते केले. रस्त्यालगत असलेला बर्फ टाळण्यासाठी त्यांनी गोल चक्कर मारून कसेबसे दोन गल्ल्याच दूर असलेलं राजाचं घर गाठलं. तो नि त्याची बायको राधा दूरदर्शन संचावर डोळे खिळून बसले होते. सतत खालच्या बाजूने सरकणाऱ्या बातम्यांकडे नजर लावून बसणे भाग होते. एखादा तास झाला नसेल तोवर वीज आल्याची बातमी सरकताना दिसली. त्यांवर सूचनाच सूचना चालू होत्या.

१) सकाळ-संध्याकाळ गरम कपडे घाला.

२) वयस्कर लोकांनी मॉर्निग वॉकला जाऊ  नये. तर

३) थंडपेय, पदार्थ खाऊ नका.

४) फ्लूची कल्पना आल्यास डॉक्टरला दाखवा.. वगैरे सूचनाच.

आम्ही परततोय म्हटलं तर राजा जरा नाराज झाल्याचे दिसले. परंतु त्याची समजूत काढून ‘निघायलाच हवे’ असं म्हणत त्या आईवडिलांनी मालूला आधार देत गाडीत बसवलं. आणि घरी परतले. शकूचे लक्ष नेमके त्या मॅग्नोलियाच्या झाडाकडे गेले. ते उन्मळून पडले होते. आणि त्यावर भरपूर बर्फ साठला होता. मालूच्या लक्षात येऊ  नये म्हणून त्यांनी तिला घाईने घरात नेले. आणि तिला तिच्या खोलीत झोपवून मात्र ती स्वत: दारात येऊन उभी राहून परत त्या झाडाची अवस्था बघत राहिली. नि तिला रडे आवरता आवरले नाही. या अवकाळी वर्षांवाने किती व कसे कुणाचे नुकसान झाले असेल? याचा विचार त्या दोघांच्याही मनाला खिन्न करून गेला.
तारा माहूरकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2016 1:08 am

Web Title: unseasonal ice
टॅग : Story
Next Stories
1 अनुभव : दूर कही जब दिन ढल जाऐ
2 कला : चित्रभाषेतून मदत!
3 रोजगार हमीचा ‘प्रायव्हेट’प्रयत्न
Just Now!
X