12 December 2017

News Flash

अरूपाचे रूप : #जीवनातीलकला

शहरात जगण्याची अपरिहार्यता आणि गावची ओढ या अपरिहार्य कात्रीत आजचा माणूस कसा जगतो आहे.

विनायक परब | Updated: August 4, 2017 1:05 AM

कोकणी माणसाचे त्याच्या मातीवर असलेले प्रेम काही लपून राहिलेले नाही.

शहरात जगण्याची अपरिहार्यता आणि गावची ओढ या अपरिहार्य कात्रीत आजचा माणूस कसा जगतो आहे, ही गोष्ट मुंबईत सुरू असलेले ‘मुंबई रिटर्न’ हे अर्ब संस्थेचे प्रदर्शन अधोरेखित करते.

कोकणी माणसाचे त्याच्या मातीवर असलेले प्रेम काही लपून राहिलेले नाही. होळी असो किंवा गणपती अथवा इतर काही कोकणी माणूस गावाला जाण्याचे निमित्तच शोधत असतो, असे म्हणतात. बव्हंशी ते खरेही आहे, हेही आपल्याला आजूबाजूला असलेल्या कोकणी कुटुंबांकडे पाहिल्यास लक्षात येते. त्यामुळे आपले कोकणातील गाव सोडून मुंबईत येऊन स्थायिक झाल्यानंतरही त्याचे अध्रे लक्ष कोकणातील घराकडेच असते. किंबहुना कोकणात गावाकडे गेल्यानंतर त्याला घरी आल्यासारखे बरे वाटते. पण आठ दिवस झाले की, मग पुन्हा मुंबईच्या ‘घरी’ जाण्याचे वेध लागतात. तिथेही जीव अडकलेला असतो. कोकणी माणसाची ही सारी अवस्था समोर सुरू असलेल्या व्हिडीओमधील तो कोकणी माणूस नेमकी व्यक्त करत असतो. तो म्हणतो, माझे आयुष्य हे असे फिफ्टीफिफ्टी विभागलेले आहे!

भायखळ्याच्या जिजामाता उद्यानामध्ये (राणीबाग) असलेल्या भाऊ दाजी लाड संग्रहालयामध्ये सध्या ‘मुंबई रिटर्न’ नावाचे शहरीकरण आणि त्याच्या गोलाकार परी दाखविणारे एक प्रदर्शन सुरू आहे. अर्ब या संस्थेतर्फे हे प्रदर्शन भरविण्यात आले असून शहरीकरण आणि त्याच्याशी संबंधित निवासादी प्रश्नांवर ही संस्था काम करते. शहरीकरणाचा अभ्यास हा त्याचाच एक भाग. या दरम्यान त्यांनी चार कुटुंबांची निवड केली जी कोकणातील आहेत आणि मुंबईत राहातात. खरे तर त्यांनी मुंबईत स्थलांतर केले आहे. पण म्हणून गाव सुटलेले नाही. गावाशीही ते तेवढेच जोडलेले आहेत. दोन दिवसांची सुट्टी तर कधी चार दिवसांची घेऊन ते गावी जातात. कोकण रेल्वेने तर आयुष्य खूपच सुकर केले आहे. पूर्वी जिथे २४ तास पोहोचायला लागायचे. तिथे आता केवळ सहा तासांत घरी पोहोचता येते याचा आनंदही त्यांना आहे. त्यांचे आयुष्य हे असे गाव ते मुंबई गोलाकार फिरत असते.

पण फक्त एवढेच नाही तर मग त्यांच्या या दुहेरी आयुष्याचा प्रभाव त्यांच्या जगण्यावरही पाहायला मिळतो. म्हणजे कुटुंब मोठे झाल्यानंतर नवे घर बांधले जाते त्यावेळेस कुठे त्याच्यामध्ये मुंबईच्या चाळीसारखी चौकोनी कम्पार्टमेंटल रचना जाणवते तर मुंबईमध्ये बठे घर वाढवले जाते तेव्हा गावच्या खिडकीतून दिसणाऱ्या निसर्गाची आठवण येऊन प्रत्येक खोलीला एक खिडकी येते. माणूस अशा प्रकारे मनात खोलवर रुजलेल्या गोष्टींच्या प्रकटीकरणातून नकळत व्यक्त होत असतो. त्याचाच शोध या प्रदर्शन प्रकल्पाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. म्हणूनच या चारही कुटुंबांतील व्यक्तींनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेले फोटो देखील या प्रकल्पाचाच एक भाग होऊन जातात. कारण तेदेखील हाच वर्तुळाकार फेरा व्यक्त करतात.

शहरवासीयांच्या या दुहेरी जोडले जाण्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली आहे ती, रेल्वेसारख्या आधुनिक सोयींनी. मग वारली चित्रकाराने या प्रकल्पाच्या अनुभूती कलेच्या माध्यमातून व्यक्त करतानाही वारली चित्रामध्ये ती रेल्वे डोकावतेच डोकावते. दोन अर्धवर्तुळाकार रचनांमध्ये साकारलेले हे वारली चित्रही तोच दुहेरी फेरा कलात्मक पद्धतीने आपल्यासमोर सादर करते.

अखेरच्या भागामध्ये आपल्याला काही संरचना पाहायला मिळतात. या धारावीमध्ये उभारल्या जाणाऱ्या घर-ऑफिस-कारखाना यांच्या एकत्र संरचना आहेत. धारावीमध्ये जागेची कमतरता असल्याने बठी घरे एकमेकांना खेटून आहेत. धारावी म्हणजे खरे तर मिनी भारतच. कारण देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे आले आहेत. इथे आलेल्या आणि स्थानिक बांधकाम करणाऱ्यांना आवाहन करून या रचना साकारण्यात आल्या आहेत. त्या कमी उपलब्ध असलेल्या जागेत त्यांनी अधिकाधिक सुविधा निर्माण केलेल्या दिसतात. यांच्यापकी कुणीही आíकटेक्ट नाही, हे विशेष.

शहरीकरणाचे असे अनेक पलू हे प्रदर्शन कलात्मक पद्धतीने आपल्यासमोर मांडते. प्रदर्शनाचा अखेर विशेषच आहे. इथे भारताचा व मुंबईचा नकाशा बाजूबाजूला मांडलेला असून तुम्ही मुंबईच्या ज्या भागात राहाता तिथे आणि देशाच्या ज्या भागातून आला आहात त्या ठिकाणी नकाशावर टाचणी टोचायची. आणि त्या दोन टाचणींना तिथे असलेली रिबीन गुंडाळायची. हे आवाहन तर रसिकांसाठीही आहे.. आता तिथे रिबिनींचे एक जंजाळच तयार झाले आहे. शहरीकरणाशी संबंधित अनेक पलू हे प्रदर्शन असे कलात्मकरीत्या मांडत जाते. कलेसाठी कला की जीवनासाठी कला हा एक सनातन असा प्रश्न असून गेली काही शतके तत्त्ववेत्ते, सौंदर्यशास्त्रज्ञ, कलावंत आणि समाजशास्त्रज्ञ यांच्यामध्ये त्यावर चर्चा सुरू आहे. हे प्रदर्शन त्या प्रश्नाला #जीवनातीलकला असे उत्तर देते.
विनायक परब – vinayak.parab@expressindia.com, @vinayakparab

First Published on August 4, 2017 1:05 am

Web Title: urbz mumbai return exhibition