18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

उत्तरायणाचा दिवस बदलत जाणार…

आपणा सर्वाना दक्षिणायन व उत्तरायण अशी दोन अयने आहेत हे माहीत आहे.

किरण देशपांडे | Updated: January 6, 2017 12:48 PM

01-lp-kiranसध्या उत्तरायणारंभ झाल्यावर २४ दिवसांनंतर म्हणज १४-१५ जानेवारी रोजी मकर संक्रमण होत आहे. आणखी काही वर्षांनी हे मकर संक्रमण १६, १७, १८..२२, २३ जानेवारीला किंवा त्यानंतर काही दिवसांनी होऊ शकेल. असे का?

मानवाच्या जिज्ञासूवृत्तीने फार पहिल्यापासून व कायम सूर्य-चंद्र यांच्या आकाशीय (खगोलीय) स्थितीचा विचार केला. त्यांचे उगवणे, मावळणे, पौर्णिमा, अमावास्या, ग्रहणे, इ. स्थितींची विशिष्ट नोंद होत गेली. या नोंदीतून जन्म झाला तो पंचांगाचा. पंचांगाचे मुख्य साधन ठरले हे खगोलशास्त्र. पंचांगाचा एक मुख्य भाग कालगणनापण आहे. ही कालगणनाही खगोलशास्त्राच्याच आधारे होते.

मानवाने सूर्य-चंद्र यांच्या बारीक बारीक हालचालीच्या नोंदी ताऱ्यांच्या आधारे करत, या सर्व निरीक्षण व नोंदीतून संशोधनाची मोठी झेप घेतली.  त्यांची विशिष्ट स्थिती विशिष्ट वेळेला परत परत येते. त्या स्थितीचे महत्त्व धार्मिकदृष्टय़ा घेऊन त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न साधला गेला. उत्तरायण ही त्यातलीच एक खगोलीय घटना होय.

आपणा सर्वाना दक्षिणायन व उत्तरायण अशी दोन अयने आहेत हे माहीत आहे. त्यांचा उल्लेख पंचांगाच्या प्रत्येक पंधरवडय़ाच्या पानावर केलेला असतो आणि अयनारंभ कधी होतो याचा दिवस स्वतंत्रपणे पंचांगात दिलेला असतो.

काही पंचांगांत सूर्याचे निरयन (सायन वजा आयनांश) कर्क संक्रमण झाल्यावर म्हणजे सध्या १६-१७ जुल रोजी दक्षिणायणारंभ देतात आणि सूर्याचे निरयन मकर संक्रमण झाल्यावर म्हणजे सध्या १४-१५ जानेवारी रोजी उत्तरायणारंभ देतात. मात्र काही पंचांगांत २०-२१ जून रोजी दक्षिणायणारंभ आणि

२१-२२ डिसेंबर रोजी उत्तरायणारंभ देतात. तेव्हा अयनारंभ नेमका कोणता मानावयाचा आणि अयन म्हणजे काय ते पाहू!

अयन म्हणजे जाणे, चलन होणे. आपण रोजचा सूर्योदय-सूर्यास्त पाहिला असता क्षितिज संदर्भाने सूर्यिबबाची जागा उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे हळूहळू सरकते. या सरकण्यालासुद्धा मर्यादा आहे. त्याला आयाम असे म्हणतात. सूर्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या पृथ्वीचा आस २३॥ अंशाने कलता आहे. पृथ्वीचा आस कललेला असल्याने सूर्याचा दैनिक मार्ग उत्तर व दक्षिण असा सरकत जातो. पूर्व िबदूच्या उत्तरेस २३॥ अंशापर्यंत सरकत जाण्याची मर्यादा सूर्याने गाठली की २०-२१ जूनपासून तो दक्षिणेकडे येण्यास सुरुवात करतो त्यास दक्षिणायनारंभ म्हणतात (याचा निरयन सूर्य कर्क संक्रमणाशी संबंध नाही.)

तसेच याच्या उलट पूर्विबदूच्या दक्षिणेस २३॥ अंशापर्यंत सूर्य गेल्यावर तो २१-२२ डिसेंबरपासून उत्तरेकडे येण्यास सुरुवात करतो त्यास उत्तरायणारंभ म्हणतात (याचा निरयन सूर्य मकर संक्रमणाशी संबंध नाही) अशा तऱ्हेने उत्तरायण किंवा दक्षिणायन ही सूर्याच्या बाबतीत अनुभवाला येणारी (सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त, अधिक्रमण, ग्रहण, पिधान यासारखी) एक आकाशस्थ नसíगक घटना आहे.

सुमारे १७०० वर्षांपूर्वी अयनांश शून्य असताना सूर्याचे कर्कसंक्रमण व दक्षिणायणारंभाचा दिवस एकच होता. तसेच सूर्याचे मकर संक्रमण व उत्तरायणारंभाचा दिवसही एकच होता. मात्र साधारणपणे ७२ वर्षांनंतर उत्तरायणारंभ झाल्यावर एक दिवसाने सूर्याचे मकर संक्रमण होऊ लागले. याप्रमाणे एक एक दिवस पुढे पुढे मकर संक्रमण होत जात असून सध्या उत्तरायणारंभ झाल्यावर २४ दिवसांनंतर म्हणजे १४-१५ जानेवारी रोजी मकर संक्रमण होत आहे. आणखी काही वर्षांनी हे मकर संक्रमण १६, १७, १८..२२, २३ जानेवारीला व त्यानंतरसुद्धा काही दिवसांनी होणार आहे. अशा वेळेस ज्योतिषशास्त्राने आणि विज्ञानाने सिद्ध केलेली प्रत्यक्ष होणारी अयनारंभ ही आकाशस्थ घटना मान्य करणे योग्य होईल.

‘भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास’ या ग्रंथाचे लेखक शंकर दीक्षित हे उत्तम ज्योतिष गणिती होऊन गेले. त्यांनी ज्योतिष गणितावर अनेक ग्रंथ लिहून प्रकाशित केले. त्यांच्या विद्वत्तेची प्रशंसा त्या काळच्या अनेक पंडितांनी व गणितींनी केलेली आहे. त्यांच्या वरील ग्रंथात त्यांनी अयनाविषयी लिहिताना ‘‘उदगयन आणि दक्षिणायन या शब्दांनी कोणता काळ घ्यावयाचा आणि त्या काळी सूर्याची स्थिति कोठे असते याविषयी दोन मते दिसतात, मात्र ज्योतिष सिद्धांत ग्रंथात दोन मते नाहीत. सायन मकर ते सायन कर्क उदगयन व सायन कर्क ते सायन मकर दक्षिणायन असा अर्थ ज्योतिष सिद्धांत ग्रंथात निश्चित केला आहे.’’ असे म्हटले आहे. तसेच जेव्हा असा अयनारंभ होतो तेव्हा त्यानंतर तीन-चार  दिवसांत आपण आपल्या घरामध्ये येणाऱ्या सूर्यप्रकाशामध्ये एकाच जागी ठेवलेल्या शंकूसारख्या तत्सम वस्तूच्या बदलत जाणाऱ्या सावलीची प्रचीती घेऊ शकतो. म्हणून संपूर्ण जगाने, विज्ञानाने व ज्योतिर्गणिताने मान्य केलेले २०-२१ जून दक्षिणायनारंभ व २१-२२ डिसेंबर उत्तरायणारंभ सर्वार्थानी योग्य आहेत.
किरण देशपांडे – response.lokprabha@expressindia.com

First Published on January 6, 2017 1:15 am

Web Title: uttarayan 2017