रात्र झाली होती. विनय आणि सुशीला निवांत बसले होते. काही दिवसांपूर्वीच- नीलिमाचे- त्यांच्या एकुलत्या एक मुलीचे लग्न झाले होते. जावई मनासारखा मिळाला होता. मुलगीही खूश होती.

या सुखाच्या क्षणी सुशीलाला लग्नापूर्वीचे दिवस आठवले आणि नकळत तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

विनयने लग्नाचे विचारल्यावर सुशीलाने वेळ मागून घेतला होता. त्यालाही कारण होते. तिशी उलटून गेली तरी सुशीलाच्या लग्नाचा योग आला नव्हता. तिला आता लोकांच्या खोटय़ा सहानुभूतीचा तिटकारा आला होता. दुसऱ्याच्या दु:खाविषयी चर्चा करताना लोकांना सूक्ष्म आनंद होतो याची तिला जाणीव होती. लोकांचे अजब सल्ले ऐकल्यावर तिच्या तळपायाची आग मस्तकात जायची. अगदीच अस झाल्यावर सुशीला काही बोलली की तो उद्धटपणा वाटायचा.

सुशीला जिथे नोकरी करीत होती तिथे प्रथमेश नावाचा तिचा एक सहकारी होता. त्याच्याशी बोलताना सुशीलाला आश्वस्त वाटायचे. तिच्या एकटेपणाचा गरफायदा घेऊ इच्छिणाऱ्यांना तिने दूरच ठेवले होते. प्रथमेश तिला वेगळा वाटायचा. आयुष्यातील कटू अनुभवांनी सुशीलाने स्वप्ने पाहणे कधीच सोडले होते. प्रथमेशच्या सहवासात तिला सुरक्षितता वाटू लागली.

एक दिवस प्रथमेश तिला म्हणाला, ‘‘माझे लग्न ठरलेय!’’

यावर प्रतिक्रिया काय द्यावी हेच सुशीलाला समजेना. त्या दोघांनी एकमेकांसोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या नसल्या तरी एकमेकांविषयी वाटणारी ओढ लपून राहिली नव्हती.

‘‘आमच्या परिचयातील मुलगी आहे. आई-बाबांनी ठरवून टाकले. मी नाही म्हणू शकलो नाही. बिकट परिस्थिती असतानादेखील त्यांनी मला काही कमी पडू दिले नाही. त्यांचे मन दुखावणे मला शक्य नाही.’’

हे सांगताना प्रथमेश भावविवश झाला होता. या गोष्टीचा सुशीलावर काय परिणाम होईल हे प्रथमेशला कळत होते. पण सुशीलाला भ्रमात ठेवण्यातही काही अर्थ नव्हता.

त्याच्या मनातील घालमेल सुशीलाला स्पष्ट जाणवत होती.

‘‘अभिनंदन,’’ सुशीला म्हणाली, ‘‘लग्नाला बोलावणार की नाही? आणि काय गिफ्ट आणू?’’

सुशीलाच्या या सहजपणाच्या अभिनयाला दाद देण्याच्या मन:स्थितीत प्रथमेश नव्हता. सुशीला प्रथमेशच्या लग्नाला नाही गेली. मात्र तिला अधिकच एकाकी वाटू लागले.

या परिस्थितीत विनयने तिला लग्नाबाबत विचारले.

इतक्या वर्षांनी हे आठवत असताना, विनय शेजारी येऊन बसला. त्याने टी.व्ही. चालू केला. टी.व्ही.च्या आवाजाने सुशीला वर्तमानात आली. तिने घाईघाईने डोळे पुसले. लग्नापूर्वीचे दिवस आणि लग्नानंतरचा सुखाचा काळ, अशी सुशीलाच्या आयुष्याची सरळ विभागणी झाली होती. त्यामुळे स्वप्न काय आणि वास्तव काय, याबाबत तिच्या मनात कधी कधी संभ्रम निर्माण होत असे. विनय रिमोटवरून चॅनल बदलत बसला होता..

सुशीलासारखी समजूतदार बायको मिळाल्याने विनय समाधानी होता. व्यवसायात जम बसेपर्यंत लग्न करायचे नाही हे विनयने ठरविलेच होते. कामानिमित्त मित्राकडे जाणे-येणे व्हायचे. त्याच्या शेजारीच राहणाऱ्या सुशीलाला विनय नेहमी पाहत असे. मित्राकडून सुशीलाची पाश्र्वभूमी समजल्यावर विनयने मित्राच्या मदतीने सुशीलाशी ओळख वाढवली. व्यवसायानिमित्त अनेक माणसांशी संबंध येत असल्याने विनयला माणसांची चांगली पारख होती.

सुशीला देवधर्म मानत नाही. कुणी काही सल्ला दिला तर सरळ अपमान करते, उद्धट आहे, वगरे गोष्टी विनयला समजल्या होत्या. तरीपण सुशीलात काही तरी वेगळेपण आहे हे विनयला जाणवले आणि त्याने सुशीलाशी लग्न करायचा निर्णय घेतला.

दोघेही टी.व्ही. बघत असले तरी एक अस्वस्थ शांतता होती. दोघांनाही काही तरी बोलायचे होते. पण कुणीच बोलत नव्हते. न राहवून सुशीलाने विचारले, ‘‘अहो, एक प्रश्न विचारू?’’

‘‘विचार ना!’’ विनय म्हणाला, ‘‘परवानगी कशाला हवी?’’

‘‘तसे नाही हो, आजपर्यंत कित्येकदा हाच प्रश्न विचारला होता, पण तुम्ही प्रत्येक वेळी उत्तर देण्याचे टाळलेत. आता तरी सांगाल का?’’  सुशीला भावविवश झाली.

‘‘विचार, काय विचारायचे आहे?’’

‘‘तुम्ही माझ्याशी लग्न कसे काय केलेत?’’ सुशीलाचा प्रश्न.

‘‘आता या गोष्टीला २५ वष्रे झाली. आता जाणून काय करायचे आहे? तू सुखात आहेस ना?’’

‘‘फक्त सुखात? यापेक्षा अधिक सुख काय असते? लोकांना स्वर्गप्राप्तीची आस असते. पण मला नाहीये. कारण यापेक्षा अधिक सुख स्वर्गात मिळेल यावर माझा विश्वास नाही. माझ्यासारख्या अभागी स्त्रीला सुख म्हणजे काय हे माहीतच नव्हते. माझ्या जन्माआधीच आई-बाबांचा घटस्फोट झाला आणि मी बिनबापाची झाले. माझ्या आजीने आम्हाला सांभाळले. पण लहानपणापासूनच ‘तुझे बाबा कुठे आहेत?’ या प्रश्नाने मी हैराण होत असे.

‘‘तुम्ही मला लग्नाचे विचारलेत तेव्हा तर विचित्र अवस्था झाली. सतत दु:ख वाटय़ाला आलेल्या माणसाला सुखाची नुसती चाहूल लागली तरी भीती वाटायला लागते. हे स्वप्न आहे आणि जागे होऊ तेव्हा संपेल, मग पुढे काय? वास्तव आणि स्वप्न यांची सरमिसळ होते. खरे काय आणि भास काय हेच कळेनासे होते. माझीही तीच अवस्था झाली होती.’’

‘‘किती छान बोलतेस.’’ विनय मध्येच म्हणाला.

‘‘हीसुद्धा तुमचीच कृपा. सततच्या कोंडमाऱ्याने काही करावे असे वाटतच नव्हते. आई उद्ध्वस्त झाल्याने तिने नोकरी करण्याचा प्रश्नच नव्हता. आजीवर किती भार टाकायचा म्हणून बारावीनंतर छोटी-मोठी नोकरी करत होते. मत्रिणींबरोबर खेळायला जात नसे, पिकनिक वगरे तर दूरच्या गोष्टी. मग वाचन करणे हा एकच विरंगुळा. मात्र मराठी साहित्यात एम.ए. होईन असे स्वप्नातदेखील वाटले नव्हते. केवळ तुमच्या प्रोत्साहनामुळे ते शक्य झाले. सत्य हे कल्पनेपेक्षा भयंकर असते असे म्हणतात. तसे पाहिलेसुद्धा होते. पण सत्य हे कल्पनेपेक्षा सुंदर असते हे तुमच्याशी लग्न झाल्यावर अनुभवले. विद्वान लोकांना अपूर्णतेची जाणीव असते. त्यांना ज्ञानाच्या अथांग सागराची कल्पना असते, अनंत आकाश त्यांनी पाहिलेले असते. आपल्या आवाक्यात आलेले ज्ञान किती मर्यादित आहे याची त्यांना पूर्ण जाणीव असते. तुम्ही नाही का म्हणत, ‘दशलक्ष प्रकाशवष्रे म्हणजे किती अंतर हे मेंदूच्या आकलनापलीकडले आहे.’ पण मी विद्वान नसल्याने, माझे विश्व मर्यादित आहे. त्यात मी सुखी आहे. मला आणखी काही नको. ते असू द्या, पण मूळ प्रश्नाचे उत्तर आजही टाळता आहात.’’ सुशीला भरभरून बोलत होती.

विनय म्हणाला, ‘‘सुशे, मला एक सांग, तू एवढी कुशाग्र बुद्धीची, तू एवढे भोगले आहेस, तरी परवाच वटसावित्रीच्या दिवशी वडाची पूजा केलीस. या खुळचट गोष्टींवर तुझा विश्वास आहे? तूदेखील या प्रश्नाचे उत्तर कधी दिले नाहीस.’’

‘‘मला समजतेय की तुम्ही विषयाला बगल देताय, पण ठीक आहे. तुमच्या या प्रश्नाचे उत्तर आता द्यायला हरकत नाही. माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही. वटसावित्रीच्या कथेतील फोलपणा मलाही माहीत आहे. लहानपणापासून भोगलेल्या दु:खाने मी बंडखोरही झाले आहे. पण तुमच्या चांगुलपणाने मी भारावून गेले आहे. माझा मलाच हेवा वाटतो. एखादा माणूस इतका चांगला आणि समंजस असतो ही मला परीकथा वाटते. तुमच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दुसरा कुठलाच मार्ग मला दिसेना. पुनर्जन्म असलाच तर जन्मोजन्मी तुमच्यासारखाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करण्यापलीकडे मी काय करू शकते? मी देवभोळी नाही. पण माझे सुख दैव हिरावून नेईल, याची सतत भीती वाटत राहते. मी तरी काय करू?’’ सुशीलाला गदगदून आले.

‘‘हे बघ, मी काही महान नाही, मी एक साधा माणूस आहे. आणि..’’

सुशीलाने विनयचे वाक्य मधेच तोडले, ‘‘हे बघा, सतान बनणे सोपे आहे, ती माणसाची मूळ प्रवृत्तीच आहे. देव बनणे कठीण नाही, पण माणूस असणे खूप अवघड आहे.’’

‘‘कधी कधी तू काय बोलतेस ते मला कळत नाही.’’

‘‘तुम्ही उगाचच न समजण्याचा आव आणताय. मला काय म्हणायचे आहे हे तुम्हाला नक्कीच कळलेय.’’

‘‘होय, देव बनणे हे माणूस असण्यापेक्षा तुलनेने सोपे आहे. कुणालाच कुठच्याही कारणासाठी दुखवायचे नाही, स्पष्ट कधी बोलायचे नाही. दुसऱ्याला मदत करताना स्वत:चा किंवा कुटुंबीयांचा विचार करायचा नाही. त्यामुळे लोक अशा माणसांचा उदो उदो करतात, त्यांना देवमाणूस म्हणू लागतात. आणि मग या लोकांनाही त्याचेच व्यसन लागते. सद्गुणांचादेखील अतिरेक वाईटच असतो. आपली प्रतिमा जपण्यासाठी हे लोक स्वकीयांवर अन्यायदेखील करतात.’’

‘‘पण तुम्ही माझ्यावर प्रेम तर केलेतच, पण प्रसंगी समाजाचा रोष ओढवून घेत मला साथ दिलीत. तुम्ही एवढे समर्थ असल्यानेच मला कसोटीच्या क्षणी प्रसंगाला तोंड देण्याची शक्ती मिळाली.’’

सुशीला भावविवश झाली. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहायला लागले. विनयला काय करावे तेच कळेनासे झाले. त्याने सुशीलाला जवळ घेतले आणि तिला आत्मीयतेने थोपटू लागला.

विनयच्या डोक्यात वेगळेच विचार चालू होते. नीलिमाचे लग्न झाल्यापासून विनय आणि सुशीला स्वस्थचित्त झाले होते. जावई जवळच राहत होता. विनयचा व्यवसायही व्यवस्थित चालू होता. नीलिमा लहानपणापासूनच त्याच्या व्यवसायात मदत करीत होती. आता हा व्यवसाय मुलीच्या ताब्यात देऊन निवृत्त जीवन जगायचा विनयचा विचार होता. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नातवाईक, मित्र, याबरोबर समाजातील अनेक जणांची मदत होत असते. तसेच समाजामध्ये अनेक कमनशिबी लोक असतात. समाजाचे ऋण फेडण्यासाठी काही तरी करावे असे विनयला वाटू लागले.

सुशीलाशी लग्न करायचे ठरविल्यावर लोकांच्या प्रतिक्रिया त्याला अपेक्षित अशाच होत्या. विनय देखणा, उच्चशिक्षित व व्यावसायिक. त्याने सुशीलासारख्या त्याच्या तुलनेत कमी शिकलेल्या व घटस्फोटित आईच्या पोटी जन्मलेल्या मुलीशी लग्न करायचे म्हटल्यावर लोकांच्या भुवया उंचावणारच. विनयच्या मित्राच्या शेजारी राहणाऱ्या सुशीलेशी विनयची सहजच ओळख झाली. सुशीलेचा होणारा कोंडमारा, त्यातून सावरण्याची तिची धडपड, तिच्या स्वभावातील साधेपणा या गोष्टी विनयला भावल्या.

‘‘अहो, कसला विचार करताय?’’

‘‘नाही. काही विशेष नाही.’’ विनय उत्तरला.

‘‘सुशे, तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला हवेय ना?’’ विनयने तिला थोपटतच विचारले. सुशीलाने हुंदके देत असतानाच मान हलवली.

‘‘माझ्या व्यसनी बापामुळे आईने काय दु:ख भोगले आहे ते तुला मी सांगितलेच आहे, पण त्याही परिस्थितीत ती खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली. आई म्हणायची, ‘‘आमच्या घरी अठरा विसे दारिद्रय़. आम्ही मुली म्हणजे भुईला भार. तुझ्या बापाने माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधले तेव्हापासून माहेर सुटले. तुझा बाप वाईट नव्हता. पण हे व्यसन कसे लागले हे मलादेखील कळले नाही. त्यानंतरचे सर्व दिवस म्हणजे नरकयातनाच. नशिबाचे भोग म्हणायचे. तू याकडे लक्ष देऊ नको. फक्त भरपूर शिक्षण घे. व्यसनापासून दूर राहा. तुझ्या आईला जे भोगायला लागले ते तुझ्या बायकोला नको भोगायला लावू.’’

‘‘बाप गलितगात्र झाल्यावरसुद्धा आईने कर्तव्यात कसूर नाही केली. एक दिवस बाप गेल्यावर आईच्या डोळ्यांत अश्रू होते. ते कशासाठी होते हे मी कधी विचारले नाही.’’

‘‘तेव्हाच मी ठरविले होते की लग्न करीन तर अशाच मुलीशी जिला माहेरचा आधार नाही. एका उजाड बागेत आपण वसंत फुलवायचा. तुला पाहिले तेव्हा तुझ्या डोळ्यांतील वेदना मी वाचली. तुझ्या बंडखोर वागण्यामागील दु:ख मला जाणवले. समाजापासून फटकून राहणे हे तू स्वत:भोवती निर्माण केलेले सुरक्षाकवच आहे हे मला स्पष्ट दिसले. म्हणून मी तुला मागणी घातली. आईचा अर्थातच पाठिंबा होताच. समाजाचे वागणे मी गृहीतच धरले होते.’’

विनयचा आवाज जड झाला. ‘‘भूतकाळातील दु:ख विसरून तू नव्या जीवनाशी पूर्णपणे समरस झालीस. माझाही भूतकाळ विसरून नव्या उमेदीने जगण्यात तू मला साथ दिलीस. मी पूर्णपणे समाधानी आहे. मघाशी मी तुला वटपौर्णिमेविषयी विचारले, पण मनापासून सांगतो, वटपौर्णिमेसारखे व्रत पुरुषांसाठी असते तर जन्मोजन्मी तूच बायको म्हणून मिळावीस यासाठी मीदेखील ते व्रत आनंदाने केले असते.’’

सुशीलाने मान वर करून विनयकडे पाहिले. तिच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या. सुशीला समाधानाने विनयला अधिकच घट्ट बिलगली.

तिच्या आयुष्यातील हा सर्वोच्च आनंदाचा क्षण होता.
अजित पाटणकर – response.lokprabha@expressindia.com