18 October 2018

News Flash

श्रद्धांजली : नक्षत्रलोकीचा प्रवासी

शशी कपूर हा माणूस खरोखरच नक्षत्रलोकीचाच प्रवासी होता.

शशी कपूर हा माणूस खरोखरच नक्षत्रलोकीचाच प्रवासी होता. कपूर घराण्यात जन्म, निसर्गदत्त असं कमालीचं देखणेपण एवढय़ा भांडवलावर बॉलीवूडमध्ये राज्य करता येत असताना नाटकाच्या शोधात देशभर फिरण्याचा वेडेपणा त्याच्याकडे होता. रुपेरी पडद्यावर लोक त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला तयार असताना पृथ्वी थिएटरसारखं अप्रतिम नाटय़गृह उभं करण्याचा झगमगाटी बॉलीवूडकरांच्या लेखी वेडेपणा त्याच्याकडे होता.

या माणसाचं आयुष्यच वेगळं होतं. वडील पृथ्वीराज कपूर, भाऊ राज कपूर यांच्यासारखा दबदबा निर्माण करता यावा, असं खरं तर शशी कपूर यांच्याकडे काहीच नव्हतं. तरीही देखणेपणाच्या जोरावर थोडेथोडके नाही तर ११६ सिनेमे त्यांनी केले. त्या देखण्या रूपानेच त्यांना चॉकलेट हिरोच्या प्रतिमेमध्ये अडकवलं. अर्थात त्यांच्या अभिनयाला, आवाजाला असलेल्या मर्यादा त्यांना फार पुढे घेऊन जाणार नव्हत्याच; पण आपल्या वाटय़ाला आल्या त्या भूमिका या माणसाने इतक्या मनापासून केल्या की, ज्यासाठी आयुष्यभर वाट बघायची असते, अशी एक भूमिका त्यांच्या नशिबाने त्यांच्यावर फिदा होऊन त्यांना दिलीच. उंची, आवाज, अभिनय सगळ्याच बाबतीत सुपरस्टार असलेला अमिताभ बच्चनसारखा अभिनेता समोर उभा असताना, ‘मेरे पास माँ है’सारखं तमाम भारतीय माणसाच्या काळजाला हात घालणारं एकच वाक्य शशी कपूर यांची सगळी कारकीर्द झळाळून गेलं. प्रेक्षकांना त्यांनी त्याआधी केलेले, त्यानंतर केलेले सिनेमे किती आठवतील ते माहीत नाही, पण शशी कपूर म्हटलं की ‘दीवार’ हा सिनेमा आणि ‘मेरे पास माँ है’ हे वाक्य माहीत नाही, असा सिनेप्रेमी आजही सापडणार नाही.

‘आज मेरे पास बंगला है, गाडी है, दौलत है, क्या है तुम्हारे पास’ या विजयच्या प्रश्नावर पोलीस इन्स्पेक्टर असलेला भाऊ रवी शांतपणे सांगतो, ‘मेरे पास माँ है..’

समाजवादाचं स्वप्न बघणाऱ्या, नैतिकता हे आयुष्यातलं महत्त्वाचं मूल्य मानणाऱ्या तत्कालीन भारतीय माणसाचे शशी कपूर केवळ या एका वाक्याने पडद्यावरचा प्रतिनिधी झाले. धट्टीकट्टी, मूल्यवान गरिबी आणि लुळीपांगळी, मूल्यहीन श्रीमंती अशी विभागणी करणाऱ्या भाबडय़ा काळाचे ते अस्सल प्रतिनिधी ठरले ते निव्वळ या एका वाक्यामुळे.. एका पारडय़ात ही ‘दीवार’मधली रवीची भूमिका आणि दुसऱ्या पारडय़ात त्यांच्या बाकी सगळ्या भूमिका ठेवल्या तरी या एका वाक्यामुळे रवीच्या भूमिकेचंच पारडं जड होईल, अशी भारतीय प्रेक्षकांच्या काळजाला हात घालणारी भूमिका त्यांच्या वाटय़ाला आली.

खऱ्या आयुष्यातही शशी कपूर यांचं जगणं वेगळंच होतं. नाटकाच्या निमित्ताने जेनिफर केंडलशी झालेली ओळख, तिच्या कुटुंबाच्या शेक्सपीअराना नाटक कंपनीबरोबर भारतभर नाटकाचे प्रयोग करत केलेली भटकंती, जेनिफरमध्ये सापडलेली आयुष्याची साथीदार या सगळ्यात त्यांचं सगळं आयुष्यच बदलून गेलं. बॉलीवूडच्या पडद्यावर कचकडय़ाच्या प्रेमाचे खेळ रंगवणाऱ्या या अभिनेत्याने प्रत्यक्ष आयुष्यात मात्र खरोखरच वेडं प्रेम केलं. जेनिफरचा कॅन्सरने मृत्यू झाल्यानंतरची सगळी वर्षे शशी कपूर अत्यंत सैरभैर आयुष्य जगले, असं त्यांचे निकटवर्तीय सांगत. त्यांचे सिनेमे, त्यांना मिळालेले पद्मभूषण, दादासाहेब फाळके असे पुरस्कार यांच्यात शशी कपूर यांचं आयुष्य, त्यांची कारकीर्द म्हणूनच मोजता येत नाही. त्या सगळ्यामध्ये असूनही कशातच नसलेला, नाटकातल्या, प्रेमातल्या अभिजाततेच्या शोधात असलेला हा नक्षत्रलोकीचा माणूस..

‘लोकप्रभा’तर्फे त्याला आदरांजली.
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com

First Published on December 8, 2017 1:06 am

Web Title: veteran actor shashi kapoor dies at 79