एकीकडे साऱ्या महाराष्ट्रात दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीच्या कारुण्यकथा प्रसिद्ध होत असताना याला छेद देणाऱ्या काही अनोख्या प्रयत्नांचीही एक आशेचा किरण म्हणून माहिती घ्यायला हवी. जे प्रत्यक्ष या दुष्काळात होरपळताहेत ते सारेच सरकारी मदत वा पॅकेजची वाट न बघता समोर ठाकलेल्या संकटाशी कसा सामना देताहेत याचे एक चांगले उदाहरण सिन्नरसारख्या दुष्काळी तालुक्यातच बघायला मिळतेय. या प्रयत्नांतून लाभलेले यश व स्वत:चा साधलेला सर्वागीण विकास ही या प्रकल्पाची यशस्थळे असली, तरी या संकटातून बाहेर पडण्याचा खरा मार्ग कुठला, हे अजूनही नेमके काय केले पाहिजे याबाबत अंधारात चाचपडणाऱ्या सरकारला एक दिशा व मार्गदर्शक ठरू शकेल एवढे सिद्ध झालेले सामथ्र्य या प्रकल्पात आहे..

सिन्नर हा तसा दुष्काळी तालुका समजला जातो. पावसाचे दुíभक्ष तर पाचवीलाच पूजलेले. अशा या तालुक्यातील लोणारवाडी हे १५०-२०० घरांचे गाव देव नदीच्या खोऱ्यात दोन टेकडय़ांच्या बेचक्यात वसलेले. सततच्या दुष्काळामुळे कोरडी होत गेलेली नदी व त्यामुळे कमीकमी होत गेलेले बागाईत क्षेत्र यामुळे गावकरी चिंतेत, तर सारा गाव दारिद्रय़ाच्या उंबरठय़ावर. गावातील शिकलेली मुले नजीकच्या एमआयडीसीत कामगार म्हणून नोकरीला जाऊ लागली, तरी गावातील काही हरहुन्नरी मुलांना काही तरी करावे, असे प्रकर्षांने वाटत होते व गावातील वयस्कर मंडळींनाही दुष्काळ असला तरी आपले गाव अशा बिकट व विपन्नावस्थेला कधीच पोहोचले नव्हते याची सारखी जाणीव होत होती. गावाच्या पारावरील चर्चामधून गावात पूर्वी इंग्रजांच्या काळातील फड व्यवस्थेचा शोध लागला व कुठल्याही प्रकारे ऊर्जेची मदत न घेता केवळ ग्रॅव्हिटीवर याच नदीचे पाणी साऱ्या शिवारात फिरवले जाऊन बागाईत होत असे अशी माहिती पुढे आली. मात्र पुढे पंप व पाइप अशा उपसा साधनांचा शोध लागताच ही नसíगक व्यवस्था अडगळीत गेली व साऱ्यांनी आपापल्या शेतातून विहीर बागाईत करत उपसा करायला सुरुवात केली. कालांतराने याचा परिणाम जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर जाण्यात व सारे शिवार कोरडेठाक पडण्यात झाला. पूर्वी मात्र फडात पाणी असताना विहिरींना भरपूर पाणी असे व ते केवळ हातानेही घेता येई अशी माहिती पुढे आली. या फड व्यवस्थेचा पाठपुरावा करणाऱ्या गावातील तरुणांनी इंग्रजांच्या काळच्या पाटांचे नकाशे शोधून काढले व वापरात नसल्यामुळे बुजल्या गेलेले सारे पाट व चाऱ्या परत खोदून काढल्या. हे सारे काम गावकऱ्यांनी कुठलाही मोबदला न देता-घेता श्रमदानातून केले. ही व्यवस्था त्याही काळात एवढी प्रगत व अद्ययावत होती की कुठल्या चारीवर किती क्षेत्र भिजते याचे मोजमाप करूनच त्या चारीत पाणी सोडले जाई. त्यामुळे असलेल्या पाण्याचा पुरेपूर वापर व टंचाई काळातही पाण्याची उपलब्धता ही या योजनेची वैशिष्टय़े होती. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर परत साऱ्या शिवारात पाणी खेळू लागले व परत बागाईत पिकांची रेलचेल सुरू झाली.
आजच्या या भीषण दुष्काळातही या खोऱ्यातील पाण्याचे व हिरव्यागार पिकांची छायाचित्रे सोबत दिली आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की पारंपरिक पिके न घेता ज्या पिकांना बाजारात चांगली किंमत मिळते अशीच पिके घ्यायचे प्रयोग या तरुणांनी राबवले आहेत. दुधाचा धंदाही चाऱ्याच्या उपलब्धतेमुळे चांगलाच फोफावला आहे. कांदा व भाजीपाला या नगदी पिकांबरोबर शतावरी, ब्रोकोली, सिमला मिरची, डािळब अशी पिके घेत चांगले भाव देणाऱ्या हैदराबाद व गोव्यासारख्या बाजारपेठा त्यांनी शोधून काढल्या आहेत. माल पाठवल्यानंतर त्यांच्या खात्यावर ऑनलाइन जमा झालेले पसे आजही सारे तरुण अभिमानाने दाखवतात. जी तरुण मुले कामगार म्हणून अडीच-तीन हजारांवर काम करायची त्यांच्या खात्यावर आज लाखो रुपये जमा दिसतात. आज या तरुणांकडे अद्ययावत संपर्क साधनेच नव्हे तर महागडय़ा गाडय़ा त्यांच्या दाराशी आहेत. प्रत्येक मळ्यात अद्ययावत बंगला व त्यात सारी अत्याधुनिक साधने आहेत. साऱ्यांची मुले सिन्नरच्या इंग्रजी माध्यम शाळेत शिकायला जातात.
माल तयार झाल्यावर कुठल्या बाजारपेठांत काय भाव आहेत याचा अभ्यास करून तेथील व्यापाऱ्याला आपल्या मालाचे फोटो पाठवून काय दर देणार, हे निश्चित झाल्यानंतरच माल पाठवला जातो व पसे ऑनलाइन जमा होत असतात. आज गावात शेतीसाठी लागणाऱ्या साऱ्या निविष्ठांचे स्वत:चे दुकान आहे. सारा शेतमाल विक्रीत मदत करणारी देव नदी व्हॅली अ‍ॅग्रो प्रोडय़ुसिंग कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीचे शेतमालाची विक्री करणारे एक फिरते दुकान आहे. स्वच्छ व ताजा भाजीवाला इलेक्ट्रॉनिक काटय़ावर देणारे हे दुकान नाशिकच्या विविध रहिवासी भागातून आपला शेतमाल चांगल्या दराने विक्री करीत असते. याचबरोबर या कंपनीने कृषितज्ज्ञ नोकरीला ठेवले असून ते साऱ्या पिकांबाबत साऱ्या शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करीत असतात. यात लक्षात आलेली महत्त्वाची बाब म्हणजे पूर्वी साऱ्या शेतकऱ्यांचा औषधे व कीटकनाशकांवर जो भरमसाट खर्च होत असे तो आटोक्यात येऊन ग्राहकांनाही किमान वापर झालेली सुरक्षित उत्पादने मिळू लागली.
हा प्रकल्प यशस्वी होण्यामागे गावकऱ्यांनी काही पथ्ये पाळली, त्यांचा परामर्श घेणे फार महत्त्वाचे आहे. या प्रकल्पात सरकार नामक व्यवस्थेची कितपत मदत झाली याची चौकशी केली असता गावकऱ्यांनी नकारात्मक सूर लावला. मात्र त्याचे भांडवल न करता आता जे काही करायचे ते स्वबळावरच करावयाचे हे त्यांनी निश्चित केले व त्यादृष्टीने आखणी करत वाटचाल सुरू केली. सरकारी योजना या प्रामुख्याने भांडवली गुंतवणुकीच्या असत व तुम्ही हे घेतले तर तुम्हाला ते मिळेल अशा अनुत्पादक अटीशर्तीवर असत. अनुदाने असलेल्या निविष्ठांच्या किमती अगोदरच वाढवलेल्या असतात व ही अनुदाने मिळवण्यात अनेकांची पोटं भरावी लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फारसा फायदा होत नसल्याचे दिसून आले. यावरून एक मात्र सिद्ध झाले की विकास व सरकार यांचे नेमके नाते काय असते व विकास व्हायचाच असला तर सरकारची तशी फारशी गरज नसते. दुसरे पथ्य म्हणजे या साऱ्या विकास प्रक्रियेत गावकऱ्यांनी राजकारण व राजकारण्यांना बिलकूल थारा दिला नाही. सुरुवातीला साऱ्या राजकारण्यांनी या प्रयत्नांना त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने वेडय़ात काढले होते व असा काय विकास होतो काय अशी शेरेबाजीही होत असे. राजकारण न शिरण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे साऱ्या गावाने हद्दपार केलेला जातीयवाद. तसे पाहायला गेले तर सारा सिन्नर तालुका हा मराठा व वंजारी यांच्या राजकारणावर ओळखला जातो. मात्र या गावात सारे मराठे व वंजारी सर्व भेद विसरून केवळ विकासाचा ध्यास घेत आपली आíथक उन्नती साधून घेत आहेत. बाहेरच्या कारणांमुळे गावात वितुष्ट येऊ द्यायचे नाही यावर गावाचा कटाक्ष असतो.
आजच्या राज्यातीलच नव्हे तर देशातल्या कृषी क्षेत्राच्या बिकट परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर ग्रामीण भागात नेमके काय केले म्हणजे काय निष्पन्न होते, याचे चांगले उदाहरण देणारा हा प्रकल्प आहे. या साऱ्या प्रयत्नांचा सखोल अभ्यास करून याची पुनरावृत्ती करण्याच्या दृष्टीने काय करावे लागेल, याबाबत पवईच्या आयआयटीने अगोदरच ग्रामीण विकास योजनांत या प्रकल्पाचा अंतर्भाव केला आहे. राज्यातील इतर भागांतील तरुणांनी या गावाला भेट देऊन नेमकी किती व कशी समृद्धी मिळवली आहे याचे प्रात्यक्षिक बघावे व आपल्या भागातही तसे काही प्रयत्न करता येतात का हे बघावे. सरकार आहेच व तसेच राहणार आहे. त्याने काही तरी करायची वाट बघत आपण किती दिवस विपन्नावस्थेत राहणार?
Girdhar.patil@gmail.com