सुनिता कुलकर्णी

तुमच्या आयुष्यातला एक दिवस कसा असतो हा प्रश्न तुम्हाला कधी कुणी विचारला आहे? तो शूट करा आणि आम्हाला दाखवा आम्ही ते जगाला दाखवू असं कुणी कधी सांगितलं आहे? युट्यूबने असं विचारलं होतं बरोबर दहा वर्षांपूर्वी आणि आताही ते विचारताहेत.

‘लाइफ इन अ डे’ हा युट्यूबचा २५ जुलैचा एक जागतिक इव्हेंट आहे. आणि त्यात कुणीही भाग घेऊ शकतं. तुम्ही त्यात सहभागी होऊन एवढंच करायचं आहे की कॅमेऱ्याच्या माध्यमातून जगाला तुम्ही सांगायचं आहे की, आत्ताच्या या महासाथीच्या काळातला तुमचा दिवस कसा असतो…

या दिवशी तुम्ही काहीही करत असाल. कुणी घराची साफसफाई करत असेल. कुणी लग्न करत असेल. कुणी रुग्णालयात दाखल झालेलं असेल. कुणाचं बाळ याच दिवशी जन्माला येईल. कुणी याच दिवशी एखादा नवीन पदार्थ शिकेल. कुणी आपलं चित्र पूर्ण करेल तर कुणी जीवाभावाच्या मित्र-मैत्रिणीला भेटेल. यातलं आणि याच्या पलीकडचं काहीही अगदी काहीही असेल तर ते शूट करायचं आणि युट्यूबला पाठवून द्यायचं. त्याची एक फिल्म तयार होणार आणि सगळं जग ती बघणार. त्यात कदाचित तुम्ही पाठवलेलं फुटेजही असू शकतं.

बरोबर दहा वर्षांपूर्वी २०१०च्या जुलै महिन्यात युट्यूबने ‘लाईफ इन अ डे’ हा इव्हेंट केला होता. त्यानंतर आता पुन्हा ते ही कल्पना घेऊन आले आहेत. रिडले स्कॉट हे निर्माते आणि केव्हिन मॅकडोनाल्ड हे दिग्दर्शक या संकल्पनेमागे आहेत. या प्रकल्पासाठी जगभरातल्या लोकांना व्हिडिओ पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं असून त्या फुटेजचा वापर करून एक फिल्म तयार केली जाणार आहे. तिचा प्रीमियर पुढच्या वर्षी सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये केला जाणार आहे. २०१० मध्ये तयार केलेली फिल्म युट्यूबवर उपलब्ध आहे.

या प्रकल्पात कुणीही भाग घेऊ शकतो. त्यासाठी काय करायचं आहे, तुमचं व्हिडिओ फुटेज किती वेळाचं असायला हवं आहे यासंबंधीच्या सगळ्या सूचना युट्यूबवर उपलब्ध आहेत. तुमचं फुटेज २५ जुलै याच दिवशी शूट झालेलं असलं पाहिजे. ते तुम्ही २ ऑगस्टपर्यंत युट्यूबवर अपलोड करू शकता. नंतर ३० जणांची टीम जगभरातून आलेले व्हिडिओ बघून निवड करेल. २०१०च्या या प्रकल्पात जगभरातून ८० हजार व्हिडिओ आले होते.