वारी ही कोणा एका पंथाची, समाजाची नसते, तर सर्वाना सोबत घेऊन चालणारी संस्कृती म्हणजे वारी. एकाच ओढीने, एकाच ध्येयाने भारलेले अनेकजण एकमेकांच्या साथीने करत असलेला प्रवास म्हणजे वारी. अंगात शक्ती नसतानाही भक्तीच्या जोरावर मार्गक्रमण करायची प्रेरणा म्हणजे वारी. दरवर्षी तोच रस्ता असला तरी नव्या उत्साहात, तितक्याच ओढीने चालायची वाट म्हणजे वारी. हातात सामान, डोक्यावर तुळस आणि ओठी विठ्ठलाचं नाव, गळ्यात टाळ, खांद्यावर वीणा आणि मुखी माऊलीचा गजर अशा तल्लीनतेने रममाण व्हायचा मार्ग म्हणजे वारी.

गेली वीस र्वष वारीत चालणाऱ्या आणि जवळपास पन्नास-पंचावन्न वय असलेल्या आजी जेव्हा म्हणतात की ‘फार वेळ नाही लागत, रांगेतून दीड दिवसांत दर्शन होतं’ तेव्हा आपल्याला आपल्या सहनशक्तीची कीव आणि त्यांच्या भक्तीबद्दल आदर वाटल्याशिवाय राहत नाही. आपलं ट्रेनचं आयुष्य कितीही धकाधकीचं असू दे, पण निसर्गाच्या मर्जीवर अवलंबून असलेलं त्यांचं आयुष्य आपल्यापेक्षा कैक पटींनी अनिश्चित आहे हे आपल्याला तेव्हा पटतं. इतर माणसांशी बोलायची त्यांना असलेली आस बघताना आपण किती ‘मी, माझं, मला’ यात अडकलेलो असतो हे जाणवत राहतं. वारकरी जेव्हा हरिपाठाचं पठण आत्मीयतेने आणि भक्तिभावाने करतात तेव्हा त्यांना कळलेला त्याचा अर्थ हा आपल्या पुस्तकी आणि शाब्दिक अर्थापेक्षा कितीतरी पटींनी सखोल आहे याची खात्री पटते.

या वीस दिवसांच्या वारीसाठी त्यांचं नियोजन आणि आखणी काही महिने आधीपासून सुरू असते. शेतातली पेरणी करून निघायचं आणि वारी करून आल्यावर लावणी करायची असं हे नियोजन असतं. पेरणी केलेल्या बियाण्याला पुरेसा पाऊस पडावा अशी विठूमाऊलीकडे प्रार्थना करत वारीचे वीस दिवस ते आनंदात घालवतात. काम करून थकलो म्हणून रविवारी घरी सोफ्यावर पसरून झोपणं ही त्यांची विश्रांती नसते; तर शेतात काम नसताना आपल्या विठूमाऊलीला पाहून येण्याचं हे नियोजन असतं. दिवसभर चालूनही न थकता रात्री स्वत चुलीवर जेवण शिजवून जेवणाऱ्या आणि त्यानंतर कीर्तनात थेट मध्यरात्रीपर्यंत दंग होणाऱ्या वारकऱ्यांचा उत्साह म्हणजे अजब रसायनच! कुठेही कसलेही फलक न लावता पाळली जाणारी शिस्त, नव्हे, स्वयंशिस्त आपल्याला थक्क करणारी असते. ‘चार-चारची लाइन करून चाला’ असं आपल्याला परत परत सांगूनही आपण ऐकत नाही तेव्हा ‘यांना मराठी कळत नसावं बहुतेक’ अशी त्यांची साहजिक टिप्पणी आपल्याला ‘कळतं हो मराठी’ हे सांगण्याचीसुद्धा लाज वाटायला लावते. अंगातल्या पांढऱ्या कपडय़ांची यित्कचितही पर्वा न करता जेव्हा वारकरी िदडीत रस्त्यावर लोळण घेतात तेव्हा त्यांच्या मळलेल्या कपडय़ांमधली निर्मळता आपल्याला आपल्या स्वच्छ कपडय़ांमधला बेगडीपणा जाणवून देते.

वारी हा एक उपक्रम नाही किंवा केवळ कोणतं कर्मकांड नाही. वारी केवळ धमाल-मजा-मस्ती नाही किंवा प्रचंड देवभोळेपणही नाही. वारी ही एक संस्कृती आहे, तो एक प्रवास आहे. सगळ्यांसोबत पुढे जाताना एकमेकांचा हात धरून, एकमेकांना सांभाळत पुढे जाण्याची ती शिकवण आहे. वारीत कोणी कोणाच्या ओळखीचं नसतं आणि अनोळखीही नसतं. वारीत सगळेच एकमेकांना ‘माऊली’ म्हणतात आणि कोणाचाच कोणाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न नसतो. एकाच ओढीने प्रवास करणारे ते सगळेजण आपल्याला जगण्यासाठी ऊर्जा देतात. त्यांच्यासाठी वर्षांतून एकदा हा ‘सोहळा’ असतो. या वीस दिवसांत ते वर्षभरासाठीचा उत्साह आणि शक्ती गोळा करतात. वर्षभर कितीही हातातोंडाशी गाठ पडली किंवा नाही, पाऊस मनासारखा झाला नाही, अस्मानीने छळलं तरीही सकारात्मकता टिकवून ठेवण्याचं बळ ते या वीस दिवसांतून घेऊन आलेले असतात. स्वतचा त्रास आणि दुख कुरवाळत बसण्यापेक्षा माऊलीवर श्रद्धा ठेवून ते आपापली कामं इमानेइतबारे करत राहतात. स्वतमध्ये कोणतीही नकारात्मकता न येऊ देण्याचे हे प्रयत्नच कदाचित त्यांना दरवर्षी नव्याने उत्साह देत असावेत.

वारी हा जणू एक मानसोपचार आहे. ती काही वेळा आपल्या क्षमता ओलांडून पलीकडे जाण्याची जिद्द शिकवते तर काही वेळा वर्षभराचा आनंद एकदाच आपल्यात भरून देते. काही वेळा आपल्या एकटेपणावर मात करायला मदत करते तर काही वेळा आपल्याला अंतर्मुख होऊन विचार करायला वाव देते. वारी हा केवळ एक दिवसाचा अनुभव नाही तर दर दिवशी वेगळे अनुभव आणि वेगळ्या जाणिवा देणारी शिदोरी आहे.
वेदवती चिपळूणकर – response.lokprabha@expressindia.com