18 February 2019

News Flash

वारली चित्रांचा प्रणेता

जंगलांमधल्या कडीकपारीत लपलेली वारली चित्रकला जगाच्या नकाशावर नेणारे वारली चित्रकार पद्मश्री जीव्या सोमा यांच्या कारकीर्दीवर एक नजर.

सर्व छायाचित्रे : जीव्या सोमा म्हसे यांच्या ब्लॉगवरून सभार

संदीप राऊत – response.lokprabha@expressindia.com
आदरांजली
जंगलांमधल्या कडीकपारीत लपलेली वारली चित्रकला जगाच्या नकाशावर नेणारे वारली चित्रकार पद्मश्री जीव्या सोमा म्हसे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कारकीर्दीवर एक नजर-

डहाणू तालुक्याच्या पूर्वेकडील गंजाड गावातील एक व्रतस्थ चित्रकार, वारली चित्रकलेचे जनक जीव्या सोमा म्हसे यांनी १५ मे २०१८ रोजी गंजाड येथील आपल्या राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला. आज वारली पेंटिंग्ज हा चित्रप्रकार जगभर प्रसिद्ध आहे. ही पेंटिंग्ज आज अनेक उच्चभ्रू, हॉटेल्स, कार्यालयांमध्ये कौतुकाने लावली गेलेली आढळतील. परंतु ती जगापर्यंत नेण्याचे काम कोणी केले, असा प्रश्न विचारला तर एकच नाव पुढे येते ते जीव्या सोमा म्हसे यांचे. वारली चित्रकलेचे जनक समजले जाणारे म्हसे हे तसे उपेक्षित होते. परंतु मुंबईतील भास्कर कुलकर्णी या पत्रकारामुळे जीव्या आणि त्यांची कला जगाच्या नकाशावर आली. ते नसते तर कदाचित जीव्या यांचं काम जगापर्यंत पोहोचलंही नसतं. जीव्या यांनी या कलेला ग्लॅमर मिळवून दिले, पण कला शिकलेल्या बाकीच्यांनी पुढे या कलेचा व्यवसाय केला आणि कोटय़वधी रुपये कमावले. अर्थात जीव्या सोमा म्हसे यांना या सगळ्या भौतिक गोष्टींपेक्षा वेगळ्याच गोष्टीची खंत वाटत होती. वारली कलेला कला महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमामध्ये स्थान मिळावे ही त्यांची मनापासूनची इच्छा होती. आणि ते तसे अजूनही मिळालेले नाही, ही त्यांची खंत होती. जीव्या सोमा म्हसे यांच्या चित्रमय प्रवासाची चित्तरकथा वेधक आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील आदिवासीबहुल, डहाणू, विक्रमगड, मोखाडा, जव्हार, तलासरी, आणि वसई पालघर या तालुक्यांत तुरळक वस्ती असलेल्या वारली जमातीमध्ये लग्न, बारसे, पूजापाठादी अनेक संस्कार श्रद्धेने पाळले जातात. अनेक विधींमध्ये देवदेवतांची चित्रे काढणे ही परंपरा असते. येथील आदिवासींच्या झोपडय़ांमधील कारवींच्या विणलेल्या आणि शेणाने लिंपलेल्या कुडावर, प्राणी, पक्षी देवदेवता, निसर्ग आदी चित्रे चितारलेली असतात. ही चित्रे काढण्याची मक्तेदारी स्त्रियांची असायची. परंतु १३ वर्षांच्या जीव्याने सहजच म्हणून जंगली काटय़ाकुटय़ांचा बनविलेला कुंचला उचलला आणि कुडावर खरडला. त्यातून वेगळंच पण, बरं दिसणारं चित्र तयार झालं. ‘शितरं बेस हाय रं’ अशी वाहवा होऊ लागली.

१३ मार्च १९३१ रोजी जन्मलेला जीव्या तेव्हा १३ वर्षांचा होता. म्हणजे ही गोष्ट १९४४ सालातली. आदिवासी संस्कृतीतील तारपा नृत्य, लग्नाचा मांडव, लग्नाचे विधी, जंगलातील व्यवहार आदींची चित्रे जीव्या काढू लागले. या चित्रमय जगताचे जीव्यांना प्रचंड आकर्षण होते. गावातील स्त्रियांबरोबच त्यांचाही हात चित्रं रेखाटू लागला. त्यांची चित्रं अर्थातच उठावदार आणि वैशिष्टय़पूर्ण असायची. १९५० च्या दशकात जीव्या थोडेफार शाळेत जात असत, दहा किलोमीटर अंतरावर. शाळेतही त्यांच्या चित्रांची प्रशंसा व्हायची. कारण यापूर्वी अशा प्रकारची चित्रं कुणीच काढली नव्हती. त्रिकोणा त्रिकोणातून साकारलेल्या प्रतिमा हा वेगळा प्रकार होता. ‘तू चित्रंच काढ’ असं देवीने त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं होत, असं ते सांगत.

जीव्या म्हसे यांच्या पेंटिंग्जची माहिती ऐकून एकदा भास्कर कुलकर्णी हे मुंबईतील कलापत्रकार त्यांच्या गंजाड येथील मुक्कामी आले. हे काहीतरी वेगळे प्रकरण आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी जीव्या म्हसे यांची कीर्ती थेट तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सांस्कृतिक सचिव आणि तेव्हाच्या ट्रेड फेअर अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या अध्यक्ष पुपुल जयकर यांच्या कानावर घातली. पुपुल जयकरांसारख्या रत्नपारखींनी ताबडतोब जीव्या म्हसे यांच्याशी संपर्क साधला. एवढेच नव्हे तर, त्यांची कला जयकरांनी आधी राष्ट्रीय स्तरावर आणि नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवली. पुपुल जयकर या सांस्कृतिक क्षेत्रातील जाणकार आणि भारतीय संस्कृतीच्या अभ्यासक होत्या. त्यामुळेच त्यांच्या चौकस नजरेतून म्हसेंची ही उपेक्षित राहिलेली वारली कला सुटली नाही. परदेशी रसिकांना भारतीय अभिजात संस्कृती, तसंच कलेचं फार आकर्षण असतं. तोच विचार करून जयकर यांनी जीव्या म्हसेंना प्रसिद्धीचा व्यापक पट दिला. त्यातूनच जर्मनी, इस्रायल, अमेरिका, इंग्लंड, रशिया, चीन, आखाती देश अशा जगाच्या कानाकोपऱ्यांत त्यांची चित्रे पोहोचली.

वारली पेंटिंगसाठी वापरले जाणारे रंगही नैसर्गिक, फुलापानांपासून तयार केलेले असतात. म्हसे हे रंग स्वत: बनवीत. बाहेरचे वारली पेंटिंगचे आर्टिस्ट, कारखान्यात बनवलेले रंग वापरतात. तसेच चित्रं काढायला लागणारी आयुधं म्हणजे ब्रश, काटे, काडय़ा हीदेखील म्हसे जंगली वनस्पतींपासूनच स्वत: बनवत.

भारत सरकारने १९८२ साली म्हसे यांना, तुम्हाला सरकारकडून काय पाहिजे, असं विचारलं तेव्हा, या आदिवासी माणसाने काय मागावं? तर, ‘मी जंगला ऱ्हेतो. आदिवाशी हांय.. माला कसाया न्हा पोट भराया सोताच्या मालकीची जमीन द्या. दुसरा काय नोको’, असं सांगितलं. त्यानुसार सरकारने त्यांना गंजाड येथील गावात साडेतीन एकर जमीन मंजूर केली. पैकी पावणेतीन एकर जमीन त्यांना आठ वर्षांपूर्वी मिळाली. त्या जागेत त्यांनी छोटेखानी घर आणि शेतीबागायती अशी आपल्या उदरनिर्वाहाची व्यवस्था लावली आहे. गेल्या वर्षीपर्यंत त्यांची कलासाधना चालू होती. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव सदाशिवदेखील या कलेची परंपरा पुढे चालवत आहेत. जीव्यादादा म्हसे यांनी, डहाणू तालुक्याबाहेर डोंबिवली, ठाणे, भिवंडी, मुंबई, वसई येथील महाविद्यालयांत वारली चित्रकलेचे धडे विनामूल्य दिले आहेत. त्यांना आजवर अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सन्मानांनी गौरविले गेले आहे. २०११ साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ देऊन वारली कलेला राजमान्यता आणि लोकमान्यता मिळवून दिली. वारली चित्रकला महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समाविष्ट केली जावी ही त्यांची इच्छा होती. सरकारने ती पूर्ण करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

First Published on May 25, 2018 1:04 am

Web Title: warli artist jivya soma mashe