06 December 2019

News Flash

विमानवाहू युद्धनौकांची मोर्चेबांधणी

गेल्या तीन दशकांमध्ये चीनने शंभरहून अधिक युद्धनौकांची बांधणी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही विमानवाहू युद्धनौकेवर हल्ला चढविणे हे मुळातच एवढे सोपे नसते. कारण त्यांना इतर अनेक युद्धनौकांचे एक संरक्षक कवच लाभलेले असते.

संरक्षण
विनायक परब – response.lokprabha@expressindia.com
गेल्या तीन दशकांमध्ये चीनने शंभरहून अधिक युद्धनौकांची बांधणी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. हा वेग अमेरिकेसह सर्वच राष्ट्रांना केवळ थक्क करणारा आहे. म्हणूनच अमेरिका त्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

रशियाने १९८० साली बांधणी करण्यास घेतलेल्या वार्याग या विमानवाहू युद्धनौकेची खरेदी चीनने १९८८ साली केली आणि तिचेच रूपांतर नंतर लिआओिनग या त्यांच्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेमध्ये केले. ही विमानवाहू युद्धनौका २०१२ साली चीनच्या नौदलात दाखल झाली. तिच्यावर जे-१५ ही लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्सचा ताफा कार्यरत आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात चीनच्या दुसऱ्या आणि सपाट धावपट्टी असलेल्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेच्या सागरी चाचण्यांना सुरुवात झाली. शँगडाँग असे तिचे नामकरण करण्यात येणार आहे. सध्या तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकेची बांधणी जिआंगनान गोदीमध्ये तर चौथ्या युद्धनौकेची डालिआनमध्ये छुप्या रीतीने सुरू आहे. तिसऱ्या युद्धनौकेचे नाव शांघाई असणार आहे.

सध्या डालिआन गोदीमध्ये बांधणी सुरू असलेली चौथी विमानवाहू युद्धनौका ही ९० हजार ते एक लाख टन वजनाची असणार आहे. शिवाय तिच्यावर विद्युतचुंबकीय यंत्रणा विमानोड्डाणासाठी कार्यरत असेल आणि त्यामुळे विमानवाहू युद्धनौकांवर असणाऱ्या नेहमीच्या आकारातील विमानांपेक्षाही मोठय़ा आकाराच्या लढाऊ विमानांचा वापर यावर करणे सहज शक्य होणार आहे, तसे झाल्यास किमान कागदावर तरी चीनचे नौदल अमेरिकेच्या नौदलाशी तुल्यबळ असेल. सध्या निर्मिती सुरू असलेल्या दोन्ही म्हणजेच तिसरी आणि चौथी विमानवाहू युद्धनौका प्रशांत महासागर आणि िहदी महासागरात तनात करून या परिसरात वर्चस्व निर्माण करण्याचा चीनचा मानस आहे.

चीनच्या या सागरी कारवायांकडे अमेरिकेच्या पेंटॅगॉनचे बारीक लक्ष आहे. नजीकच्या भविष्यात एकूण सहा विमानवाहू युद्धनौका जगभरात तनात करण्याचा चीनचा मानस आहे, असे पेंटॅगॉनने त्यांच्या अहवालात म्हटले आहे. सध्या अमेरिकन नौदल जगभरातील सर्वाधिक म्हणजे १० सपाट धावपट्टी असलेल्या विमानवाहू युद्धनौका राखून आहे. सहाचा आकडा गाठल्यास अमेरिकेखालोखाल चीनचा क्रमांक लागेल. फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, भारत आणि रशिया यांच्याकडे प्रत्येकी एक विमानवाहू युद्धनौका आहे. भारताला गरज आहे ती, देशाच्या तिन्ही सागरी सीमांवर प्रत्येकी एक म्हणजेच एकूण तीन विमानवाहू युद्धनौकांची.

या पाश्र्वभूमीवर चीनच्या नौदलाचे रिअर अ‍ॅडमिरल लौ युआन यांनी चीनमधील लष्करी उद्योजकांच्या परिषदेत थेट अमेरिकेलाच धमकी देण्याची भाषा केली, त्याला वेगळेच महत्त्व प्राप्त होते. एरवी चीनमध्ये काय चालले आहे, ते बाहेर जगाला फारसे कळत नाही. मात्र इंटरनेटच्या जमान्यात फार काही लपून राहत नाही. शिवाय अमेरिका असतेच चीनवर लक्ष ठेवून त्यामुळे ही बातमी बाहेर फुटली. अमेरिकेच्या सपाट धावपट्टी असलेल्या विमानवाहू युद्धनौकांचाही वेध घेता येऊ शकेल, अशा प्रकारची यंत्रणा चीनच्या नौदलाने विकसित केल्याचे युआन यांनी जाहीर केले. एका अमेरिकन विमानवाहू युद्धनौकेचा घास घेतला तरी किमान पाच हजार अमेरिकन नौसनिकांचा बळी जाईल आणि दोनचा वेध घेतला तर हीच संख्या १० हजार नौसनिक अशी असेल, युआन यांनी केलेल्या या विधानावर जगभरात संरक्षणतज्ज्ञांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही विमानवाहू युद्धनौकेवर हल्ला चढविणे हे मुळातच एवढे सोपे नसते. कारण त्यांना इतर अनेक युद्धनौकांचे एक संरक्षक कवच लाभलेले असते. त्यामध्ये विनाशिका असलेल्या युद्धनौका, क्रूझर्स, पाणबुडय़ा आणि फ्रिगेटस् शिवाय हवाई हल्ल्यासाठीची लढाऊ विमाने यांचा ताफा या साऱ्याचा समावेश असतो. सध्या तरी अमेरिकेचे नौदल हे जगातील सर्वात मोठे व प्रबळ नौदल असून त्यामुळेच त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न हा कोणत्याही नौदलासाठी आत्मघातकी ठरू शकतो.

महासत्ता व्हायचे तर सक्षम नौदलाला पर्याय नाही, हे मात्र चीनला पुरते लक्षात आले आहे. नौदलात विमानवाहू युद्धनौकांना पर्याय नाही, हे तर निर्विवाद सत्य आहे. म्हणूनच कदाचित गेल्या दोन दशकांमध्ये चीनने त्यांच्या युद्धनौका बांधणीचा वेग कमालीचा वाढविला आहे. तीन दशकांमध्ये त्यांनी शंभरहून अधिक युद्धनौकांची बांधणी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. हा वेग अमेरिकेसह सर्वच राष्ट्रांना केवळ थक्क करणारा आहे. म्हणूनच अमेरिका त्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

प्रत्यक्षात यापुढे खरेच युद्ध होणार की नाही, हा भाग सध्या तात्पुरता बाजुला ठेवला तरी विमानवाहू युद्धनौकांचे महत्त्व हे काही कमी होत नाही. अमेरिकेच्या नौदलाला सर्वाधिक फटका बसला होता तो दुसऱ्या महायुद्धामध्ये; त्या वेळेस तब्बल १२ विमानवाहू युद्धनौकांना जलसमाधी मिळाली होती. विमानवाहू युद्धनौकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर उच्च दर्जाच्या स्टीलचा वापर केलेला असतो. शिवाय त्या आकारानेही अवाढव्य असतात. प्रत्यक्षात अलीकडच्या काळात तयार झालेल्या विमानवाहू युद्धनौकेला कुणी लक्ष्य केलेच तर तिला सागरतळाला जाण्यासाठी किती वेळ लागेल याचा अंदाज घेण्यासाठी २००५ साली अमेरिकेच्या नौदलाने एक प्रयोगही करून पाहिला. नौदलातून निवृत्त झालेल्या ‘अमेरिका’ या युद्धनौकेमध्ये स्फोटके भरली आणि तिच्यावर क्षेपणास्त्रांनी मारा केला. त्या वेळेस असे लक्षात आले की, ही युद्धनौका पूर्णपणे बुडण्यास चार आठवडय़ांचा कालावधी लागला. त्यामुळे चिनी नौदलाला असे कितीही वाटले की, हल्ला करून अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकांना सागरतळी पाठवावे तरी प्रत्यक्षात ते कितपत आणि कसे शक्य असेल याविषयी साशंकताच आहे.

First Published on November 15, 2019 1:04 am

Web Title: warship china india america
Just Now!
X