अमित भगत response.lokprabha@expressindia.com

विदर्भात चंद्रपूरजवळ असलेली पापामियाँ टेकडी या ठिकाणी उत्खनन सुरू केल्यानंतर संशोधकांच्या लक्षात आले की या परिसरात अश्मयुगीन काळात मानव वस्ती करून रहात होता. एवढेच नाही तर हे त्या काळात हत्यारनिर्मितीचे केंद्र असावे असेही लक्षात आले आहे. त्यावर एक झोत-

the Meteorological Department has predicted unseasonal rain with gale force winds in Maharashtra Pune news
राज्यात दोन दिवस पावसाचे; विदर्भाला गारपिटीपासून दिलासा ?
Drought in the state but plenty of water in Koyna dam
राज्याला दुष्काळाचा झळा, कोयना धरणात मात्र मुबलक पाणी
BRS in Maharashtra
अवघ्या काही महिन्यांतच ‘गुलाबी रंग’ उडाला, भारत राष्ट्र समितीचे राज्यातील अस्तित्वच धोक्यात
Cooking Competition in Mumbai on the occasion of Loksatta Purnabraham publication Mumbai
‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ प्रकाशनानिमित्त आज मुंबईत पाककला स्पर्धा

चेन्नईजवळील (पूर्वीचे मद्रास) पल्लावरम येथे ३० मे १८६३ साली रॉबर्ट ब्रूस फूट यांना अश्मयुगीन दगडी हातकुऱ्हाड सापडली. तेव्हापासून भारतात अश्मयुगीन संशोधनाची सुरुवात झाली. महाराष्ट्रामध्ये अश्मयुगीन संशोधनाची सुरुवात १८६५ साली झाली. त्यावेळी वायने या भूगर्भशास्त्रज्ञाला पहिल्यांदा गोदावरीकाठी पठणजवळ मुंगी येथे ‘अ‍ॅगेट’ या दगडापासून काढलेल्या छिलका या हत्याराचा शोध लागला होता. त्यानंतर थेट १९३९ साली के.आर. यू टॉड यांना मुंबईच्या कांदिवली-बोरिवली या उपनगरांत पुराणाश्मयुगीन आणि मध्याश्मयुगीन दगडी हत्यारे सापडली. पुढे १९५४ मध्ये डेक्कन महाविद्यालयाचे एच. डी. सांकलिया यांना प्रवरा नदीकाठी नेवासा येथे अश्मयुगीन हत्यारे मोठय़ा संख्येने आढळून आली. त्यानंतर डेक्कन महाविद्यालयाच्या आर. एस. पप्पू, एस. एन. राजगुरू, सुषमा देव आदी संशोधकांनी आणि विदर्भातील एल. के. श्रीनिवासन, बी. के. सिन्हा आणि डी. हनुमंत राव यांच्यासारख्या भारतीय पुरातत्त्व विभागाच्या शास्त्रज्ञांनी अश्मयुगीन महाराष्ट्राच्या संशोधनाचा पाया भक्कम केला.

महाराष्ट्र राज्याचा विचार करता पूर्व विदर्भात तुलनेने मोठय़ा प्रमाणात अश्मयुगीन स्थळे आढळून येतात. वर्धा आणि वैनगंगा नदी खोऱ्यांदरम्यानच्या विशिष्ट भौगोलिक स्थानामुळे चंद्रपूर जिल्ह्यात नोंद झालेल्या अश्मयुगीन स्थळांची संख्या सर्वाधिक आहे.

पापामियाँ टेकडीचा इतिहास

पापामियाँ टेकडी हे प्रागतिहासिक स्थळ असून चंद्रपूर जिल्हा मुख्यालयापासून पूर्वेस तीन किलोमीटर आणि नागपूरच्या दक्षिणेस १६० किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण इरई नदीची उपनदी असलेल्या झरपट नदीच्या काठावर वसलेले आहे. इरई नदी ही स्वत: वर्धा नदीची मुख्य उपनदी आहे. इथे जवळच पापामियाँ या मुस्लीम संताचा दर्गा आहे. त्याच्या नावावरूनच या भागास पापामियाँची टेकडी असे नाव मिळाले. १९६०-६१ मध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या दक्षिण-पूर्व मंडळाच्या एल. के. श्रीनिवासन यांनी प्रथमच पापामियाँ टेकडी हे स्थळ अश्मयुगीन स्थळ असल्याची नोंद केली. तत्संबंधीचा विस्तृत अहवालसुद्धा त्यांनी विभागाच्या वार्षकिीमध्ये सादर केला होता. पुढे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या एस. एन. रघुनाथ यांनी १९७६-७७ मध्ये छिलका हत्यारांची नोंद केली आणि शेवटी पुरातत्त्व विभागाच्या नागपूर मंडळाच्या एस. बी. ओटा यांनी १९९३-९४ मध्ये या ठिकाणच्या स्तरीय रचनेच्या अभ्यासासाठी लहानसे उत्खनन केले. पापामियाँ टेकडी हे स्थळ साधारणत: ४०-४५ एकरमध्ये पसरलेले होते. परंतु वाढत्या शहरीकरणामुळे नदीच्या उजव्या किनाऱ्यावरील परिसरात झोपडपट्टीवासीयांचे अतिक्रमण झाले आहे. नदीच्या डाव्या किनाऱ्यावरील केवळ १०-१२ एकर क्षेत्रच तेवढे शिल्लक राहिले आहे. वस्तुत: हा टेकडीचा भाग नसून जंगलातून येणाऱ्या असंख्य लहान-मोठय़ा ओढय़ांच्या प्रवाहामुळे उंचसखल तयार झाला आहे. हे प्रवाह पावसाळ्यानंतर कोरडे होतात तेव्हा त्यांच्या पात्रात दगडगोटय़ांचा स्तर उघडा पडतो आणि त्यात अश्मयुगीन हत्यारांचा आढळ दिसून येतो.

पापामियाँ टेकडीचे महत्त्व

पापामियाँ टेकडीने प्रागतिहासिक काळात साधारणत: इ.स. पूर्व १,५०,००० ते इ.स. १०,००० इतक्या प्रदीर्घ काळादरम्यान अश्मयुगीन मानवाची जगण्याची प्रचंड धडपड अनुभवली आहे. हे स्थळ मुख्यत: त्यांच्या वस्तीची जागा होती. तिथेच अश्मयुगीन हत्यारेसुद्धा प्रचंड मोठय़ा प्रमाणावर तयार केली जात होती. या स्थळावर पुराणाश्मयुगाचे पूर्व-पुराणाश्मयुग, मध्य-पुराणाश्मयुग आणि उत्तर-पुराणाश्मयुग असे तीन टप्पे दिसून येतात. त्याशिवाय मध्याश्मयुग आणि नवाश्मयुगाचे सबळ पुरावेही आढळून येतात. सखोल सर्वेक्षणातून या जागी असलेल्या अश्मयुगीन मानवाचा वावर येथून जवळपास पाच ते सहा किलोमीटर दूर असलेल्या लालपेठ, बाबुपेठ या वस्तीस्थानापर्यंत असल्याचे आढळून आले आहे. यावरून इतक्या दूरवर पसरलेल्या अश्मयुगीन स्थळाच्या हत्यारानिर्मितीचे हे केंद्रीय ठिकाण असल्याचे सिद्ध होते.

अश्मयुगीन हत्यार निर्मितीचे प्रमुख स्थळ

पुराणाश्मयुगीन हत्यारांमध्ये हातकुऱ्हाडी, फरश्या, तासण्या, वेधण्या, छिन्न्या, नोकहत्यारे, तोडहत्यारे आदींचा समावेश होतो. ही सारी हत्यारे मुख्यत्वेकरून लाल, पिवळ्या, तपकिरी रंगाच्या ‘चर्ट’ या दगडांपासून बनविण्यात आली आहेत. याउलट मध्याश्मयुगीन हत्यारांमध्ये तासण्या, वेधण्या, ब्लेड्स, छिलके, छिद्रके, रंधके, बाणाग्रे आदी भौमितिक आणि अभौमितिक हत्यारांचा समावेश होतो. ती प्रामुख्याने अ‍ॅगेट, जास्पर, गारगोटी आणि चकमक दगडांपासून तयार केली जात असत. पृष्ठभागीय गवेषणादरम्यान या जागेवर अतिशय तीक्ष्ण, धारदार, सुबक आणि कौशल्यपूर्ण अशी दगडी हत्यारे आढळून आली आहेत. इतक्या मोठय़ा संख्येने आणि इतकी कौशल्यपूर्ण हत्यारे क्वचितच इतर जागी आढळून येतात. जमिनीखाली जवळपास एक मीटपर्यंत या हत्यारांचा जाड थर पसरलेला आहे. एकंदर लाखो हत्यारे आजही जमिनीखाली गाडलेल्या स्थितीत आहेत. उत्तरोत्तर विकसित होत जाणाऱ्या कौशल्यांचा आणि घडणाऱ्या मानवी उत्क्रांतीच्या अभ्यासासाठी प्रागतिहासिक काळातील हत्यारानिर्मितीचे हे स्थळ अत्यंत महत्त्वाचे आहे. उपलब्ध माहिती आणि ज्ञात संशोधन कार्याच्या अनुषंगाने हे स्थळ महाराष्ट्रातील सर्वात मोठे अश्मयुगीन स्थळ म्हणता येऊ शकते. तसेच देशातील इतर अग्रणी स्थळांमध्ये याचा समावेश होऊ शकतो.

या स्थळी असलेली मौल्यवान दगडी हत्यारे आणि त्यांची कौशल्यपूर्ण निर्मिती अत्यंत वैविध्यपूर्ण आहेत. म्हणूनच हे स्थळ आपल्या प्रागतिहासिक भूतकाळाचा खजिना म्हणून जतन करणे आवश्यक आहे. त्याबरोबरच एक बहुमूल्य वारसास्थळ म्हणून त्याचे संवर्धन होणे नितांत गरजेचे आहे.

अस्तित्वाला धोका

सध्या चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प या पापमियाँ टेकडीच्या जागेवर उभारला जात आहे. प्रकल्पासाठी प्रस्तावित १०० एकर जागेभोवती संरक्षक िभत बांधून प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या वेगवान बांधकामामुळे पापामियाँ टेकडीवरील लाखो वर्षे जुन्या अश्मयुगीन स्थळाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. प्रत्येक दिवसागणिक स्थळाचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर पुढे सरकत होते. त्यातल्या त्यात या स्थळास महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभाग वा भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने संरक्षित स्मारक म्हणून सूचित न केल्याने त्याचा बचावाचा मार्गही जवळपास बंद झाला आहे. सद्यस्थितीत बहुतांश सरकारी उच्चपदस्थ पुरातत्त्वशास्त्रज्ञांना पापामियाँ टेकडीच्या नेमक्या स्थानाबद्दल आणि तिथल्या प्रागतिहासिक अवशेषांबद्दल माहिती नाही आणि स्थानिक लोक तर त्यापासून पूर्णत: अनभिज्ञ आहेत.

संवर्धनाचे प्रयत्न

१३ एप्रिल २०१८ मध्ये या स्थळास प्रथम भेट दिल्यानंतर इतस्तत: विखुरलेली शेकडो अश्मयुगीन हत्यारे पाहून मला तत्क्षणीच हे स्थळ ऐतिहासिकदृष्टय़ा आत्यंतिक महत्त्वाचे असल्याचे जाणवले. त्याक्षणीच मी या स्थळाला वाचविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे मनाशी ठरविले. संपूर्ण क्षेत्राच्या सर्वेक्षणानंतर पृष्ठभागावर विखुरलेल्या त्या दगडी हत्यारांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून एक दीर्घ अहवाल तयार केला. त्यानंतर जिल्हाधिकारी, राज्यपुरातत्त्व विभाग संचालक-मुंबई व नागपूर, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग-दिल्ली व नागपूर, पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय, युनेस्को-दिल्ली कार्यालय इ. ठिकाणी पत्रव्यवहार चालू ठेवला आणि सातत्याने या विषयाचा पाठपुरावा केला. एकीकडे वेगवान बांधकामामुळे या अश्मयुगीन स्थळाभोवती मृत्यूचा पाश आवळला जात होता आणि दुसरीकडे हे स्थळ वाचेल की नाही याची काहीच शाश्वती नव्हती.

परंतु अखेरीस मुख्यमंत्री कार्यालयाने या संवेदनशील विषयाची दखल घेतली आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांनी १५ नोव्हेंबर २०१८ रोजी या विषयाबाबत एक तातडीची बैठक बोलावून त्यातून महत्त्वपूर्ण तोडगा काढला. यातून असा निर्णय झाला की, या जागेवरील अश्मयुगीन हत्यारे, जीवाश्मे आणि इतर अवशेष संग्रहित करून त्यांचे एक संग्रहालय त्याच जागी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात केले जाईल. या जागी डेक्कन महाविद्यालय, पुणे आणि राज्य पुरातत्त्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उत्खननाचे काम हाती घेतले जाईल. प्रागतिहासिक काळाविषयी स्पष्ट कल्पना देण्यासाठी या उत्खनन झालेल्या जागेवर काचेचे अर्धगोलाकार आवरण उभारले जाईल आणि प्रागतिहासिक मानवी प्रतिकृती (भीमबेटकाप्रमाणे) तयार केल्या जातील. अशा प्रकारे, पर्यटकांना आकर्षति करण्यासाठी आणि राज्याचे प्रागतिहासिक पर्यटनस्थळ तयार करण्यासाठी या जागेचा विकास केला जाईल. जेणेकरून याचा पर्यटन विकासासाठीदेखील हातभार लागेल आणि त्यातून राज्यास महसूलसुद्धा प्राप्त होईल. साधारणत: दोन एकर जमीन या पुरातत्त्वीय स्थळासाठी राखीव ठेवण्यात आली असून त्या स्थळाला संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात येणार आहे.

संवर्धनासाठीची हालचाल

तत्संबंधीच्या मूलभूत सुविधांचा विकास झाल्यास पर्यटकांना आकर्षति करण्यासाठी आणि महसूल उभारणीसाठी पुरेशी क्षमतादेखील पापामियाँ टेकडी स्थळामध्ये आहे. अशा प्रकारे हे भारतातील एकमेवद्वितीय असे अश्मयुगीन हत्यारांचे संग्रहालय म्हणून नावारूपाला येऊ शकते. जिल्ह्य़ातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या पर्यटकांना आकर्षति करण्यासाठी उपयुक्त स्थळ ठरू शकते. त्यातून जिल्हा पर्यटनाला निश्चितच महत्त्वाचा हातभार लागू शकेल. आज पापामियाँ टेकडी हे प्रागतिहासिक स्थळ वाचविण्यासाठी केलेले प्रयत्न सार्थकी लागल्याचा मला आनंद आहे. लोकाभिमुख विकास घडवीत असताना तो शाश्वत आणि सर्वसमावेशक बनविण्यात प्रशासन व नागरी समाज हे दोन्ही समान भागधारक असणे नितांत आवश्यक आहे. तेव्हाच तो विकास हा चिरंतन आणि मूलगामी विकास म्हणता येऊ शकतो. वरील उदाहरणावरून ही गोष्ट ठामपणे रुजेल असा मला विश्वास वाटतो. मला आशा आहे की, पापामियाँ टेकडी स्थळ हे भविष्यातील ऐतिहासिक वारसा संवर्धनाच्या दृष्टीने निश्चितच एक आदर्श उदाहरण ठरेल.