अनेकांची लग्नविषयक काही ना काही स्वप्नं असतात. पण नेहमीच्या साच्यातलं लग्न करण्याला काहींची नापसंती असते. मग अशा वेळी ‘कुछ हट के करते है’ असं ठरवून वेगळी वाट धरली जाते. लग्नात विविध प्रयोग करत आजची तरुणाई लग्नाचा खऱ्या अर्थाने आनंद घेताना दिसते आहे.

‘वाट्टेल तेवढा खर्च होऊ  दे’पासून ‘कशाला हवी एवढी उधळपट्टी’पर्यंत लग्नसोहळ्याविषयी प्रत्येकाचं मत वेगळं. मानपान, देणं-घेणं, गावजेवण, लोक काय म्हणतील यातून बाहेर पडून विवाह सोहळे आज बरेच प्रगल्भ झाले आहेत. आजच्या पिढीने वर्षांनुवर्षांच्या कर्मठ चौकटी मोडताना, अर्थपूर्ण विधींचा वारसा मात्र जपला आहे. आपलं लग्न आपल्याला हवं तस्संच व्हावं, त्यात आपल्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंब दिसावं आणि मुख्य म्हणजे ते केवळ अंधानुकरण न ठरता त्याला विशिष्ट अर्थ लाभावा म्हणून ही पिढी आग्रही आहे. त्यांच्या या प्रयोगशीलतेला मागच्या पिढीचंही सक्रिय पाठबळ लाभलं आहे. म्हणूनच आज प्रत्येक लग्नाचा चेहरा वेगळा दिसतो.

Shukra Gochar in Mesh
२४ तासांनी ‘या’ ६ राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? शुक्रदेवाच्या कृपेमुळे व्यापारात होऊ शकतो मोठा फायदा
vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?

स्वप्नालीला कधी वाटलं नव्हतं की ती लग्न करेल. तिला सह्यद्रीत, हिमालयात खूप भटकायचं आहे. लग्नाच्या नावाखाली मांडल्या जाणाऱ्या बाजाराचा तिला तिटकारा होता, पण या भटकंतीतच असा एक मित्र मिळाला की ज्याच्यासोबत बंधनातसुद्धा मुक्त राहता येईल अशी खात्री वाटली. स्वप्नाली धाबुगडे आणि विवेक पाटील विवाहबद्ध होणार होते. लग्न हटके पद्धतीने करायचं हे पक्कं होतं. आपण ट्रेकर आहोत, तर कोणत्या तरी गडावर लग्न करू, असं ठरलं. पण घरी नकारघंटा वाजली. कळसुबाई शिखरावर लग्नं.. शक्यच नाही! घरच्यांचं मन वळवण्यात र्वष गेलं. अखेर त्यांनी होकार मिळवलाच आणि जोरदार तयारी सुरू केली. मुहूर्त वगैरे भानगड नव्हती. ट्रेकिंगसाठी हिवाळा उत्तम म्हणून २८ डिसेंबर २०१४ला लग्न करायचं ठरलं. रेकी करून आल्यावर कळलं की इथे तर काहीच सुविधा नाहीत. पण त्यातच खरं चॅलेंज होतं आणि त्या दोघांनी, त्यांच्या मित्रांनी ते स्वीकारलं. कळसूबाई चढू शकतील अशाच व्यक्तींना आमंत्रण दिलं. भटजीबुवा- उमेश वेसवीकर चाळिशीतले. लग्न ठरल्यापासून त्यांनी जॉगिंग सुरू केलं. या दोघांनी खडवलीतल्या वृद्धाश्रमात साखरपुडा केला होता, तेव्हाही वेसवीकर यांनीच विधी केले होते. पाहुण्यांच्या टीम्स तयार केल्या. प्रत्येक टीमसोबत अनुभवी ट्रेकर्स होते. २७च्या सकाळपासूनच लग्नाचं सामान घेऊन टीम्स चढू लागल्या. रात्री ११ला शेवटची टीम पोहोचली. तब्बल १२५ जणांचं वऱ्हाड आणि सोबत गावातील २५ माणसं. रात्री खिचडी खाऊन सर्व जण टेंटमध्ये झोपले. पहाटे साडेपाचला महाराष्ट्रातल्या सर्वोच्च शिखरावर उगवत्या सूर्याच्या साक्षीने धुक्याच्या पडद्यासमोर लग्न करायचं होतं. वर वीज नाही. त्यामुळे टॉर्चच्या प्रकाशात नऊवारी साडी, हेअरस्टाइल अशी सगळी कसरत केली. स्पेशल दिवशी मस्त दिसायला हवंच ना? आई-बाबांच्या इच्छेप्रमाणे विधिवत विवाह झाला. शास्त्रापुरत्या अक्षता बाकी सर्वानी फुलं उधळली आणि तासाभरात वऱ्हाड खाली उतरू लागलं. बेसला एका घरात गावकऱ्यांनीच मांडव टाकला होता. पंगत बसली आणि आगळावेगळा विवाह झोकात पार पडला.

* * *

शायली फावडे आणि तेहान कशाळकरचं लग्न ठरलं. काही तरी हटके पाहिजेच होतं. तेहानची वहिनी- दीप्ती वेब डिझायनर. कोणत्याही कार्यक्रमाचं ऑनलाइन आमंत्रण बनवायचं झालं की सगळे तिच्याकडेच जात. तेहानच्या लग्नातही ही जबाबदारी तिच्याकडे आली. ‘एवढं ट्रॅफिक, आडवी-तिडवी पसरलेली मुंबई, त्यात चप्पे चप्पे पे अपने दोस्त. एक काम करू या, झक्कास वेबसाइटच तयार करू. तुमचं लग्न कसं ठरलं, ठरल्यापासून लग्न लागेपर्यंत काय काय धम्माल झाली, तुमचा लाइफ पार्टनर दिसतो कसा, करतो काय सगळं तिथे सांगू या. तिथूनच सगळ्यांना इन्व्हाइटपण करता येईल. कोण येतंय कोण नाही तेसुद्धा जाणून घेता येईल.’ दीप्तीने प्रस्ताव मांडला. बघता बघता शायली-तेहानच्या जोडीसारखीच सुंदर वेबसाइट तयार झाली. http://tehanwedsshaylee.in बिग्गेस्ट डेच्या काऊंटडाऊनपासून, गुगल लोकेशन, आरएसव्हीपीपर्यंत सारं काही एका क्लिकवर. २६ नोव्हेंबरला ते दोघे गोड बंधनात अडकले आणि लग्गेच लग्नाचे फोटो अपलोड करून वेबसाइट अपडेट झालीसुद्धा. आहे की नाही सगळं सुपरफास्ट?

गंमत एवढय़ावरच संपत नाही. शायली-तेहानने लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांसाठीसुद्धा भारी आयिडया शोधली. सेल्फी पॉइंटसाठी शिवाजी पार्क कशाला हवं? त्यांनी त्यांच्या सेल्फीवेडय़ा मित्रांसाठी विवाहस्थळीच अफलातून पिक्चर पॉइंट बनवला. बस्स, नवरा-नवरीला कॉम्प्लेक्स देतील एवढे फोटो मित्रांनी क्लिक केले.

* * *

कीर्तनेंच्या विधात्रीचा उत्साह कायम एव्हरेस्टच्या उंचीवर असतो. पथनाटय़, गायन, नोकरी आणि बरंच काही करता करता तिला फायनली तिचा मिस्टर परफेक्ट मिळाला. निखिल नेवाळकर. ७ डिसेंबर २०१५ला अक्षता पडणार हे निश्चित झालं. शेकडो सेल्फी सामावून घेणारा आयफोन म्हणजे बाईसाहेबांचा जीव की प्राण. तर मग आमंत्रणही मोबाइल फोनमधून देण्याचं ठरलं. दोघांची खेळकर नोकझोक दाखवणाऱ्या एका छोटय़ाशा व्हिडीओने सर्वाना अगत्याचं आमंत्रण दिलं. ज्यांनी हा व्हिडीओ पाहिला त्यांनी तो आणखी १० जणांना दाखवला. सर्वानाच खूप आवडला.

* * *

प्रेमविवाहाची अडथळा शर्यत अखेर विजय साळुंखे आणि शैलजाने जिंकली. सामाजिक संस्थेसाठी काम करताना जुळलेली ही मनं. साहजिकच मित्रपरिवार मोठा आणि तेवढाच प्रयोगशील. या मित्रांनी मंगल कार्यालयातल्या एका रिकाम्या भिंतीवर फ्रेंडशिप रिबन्स बांधल्या. त्यांना ठरावीक अंतरावर घुंगरू बांधले. कागदाचे काही तुकडे आणि पेन तिथे ठेवला. पाहुण्यांनी त्या कागदांवर नवपरिणीत वधू-वरासाठी शुभेच्छा लिहिल्या. जवळच्या मित्रांनी त्या दोघांबद्दलच्या भावना मांडल्या आणि ही छोटेखानी शुभेच्छापत्रं रिबिन्समध्ये अडकवली. शुभेच्छांचा हा ठेवा आजही त्यांनी जपून ठेवला आहे.

* * *

ओंकार डंके.. मूळचा लातूरचा. मीडियात करियर करायचं म्हणून मुंबईत आलेला. वडील अरुण डंके राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत. २५ जानेवारी २०१५ला ओंकारचा विवाह झाला. लातूरचे असल्यामुळे दुष्काळाचा दाह काय असतो याची डंके कुटुंबीयांना कल्पना होती. त्यामुळे आपल्या कुटुंबातला आनंद दुष्काळामुळे पिचलेल्या व्यक्तींमध्ये वाटण्याची कल्पना बाबांनी मांडली. कुटुंबीयांनीही लगेच होकार दिला आणि लग्नातील खर्च कमी करून एक लाख रुपयांची देणगी जनकल्याण समितीच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांपर्यंत पोहोचवली. त्यानिमित्ताने इतरांच्या घरातही आनंदाचे किरण पोहोचल्याचं समाधान त्यांना मिळालं.

* * *

– ज्योत्स्नाला लग्नातील विधी महिला पुरोहिताकडूनच करून घ्यायचे होते. हा हट्ट तिने पूर्ण करून घेतला. शिवाय लग्नातील आहेराची रक्कम एका आजारावरील उपचारांसाठी दिली.

– आणखी एक असाच अवलिया, त्यानं त्याच्या लग्नात आहेर पुस्तकांच्या स्वरूपात स्वीकारला. विवाहस्थळी चक्क पुस्तकांचा स्टॉल लावला होता. जेवढय़ा किमतीचा आहेर करणार असाल, तेवढय़ा किमतीची पुस्तकं द्या, असं सांगितलं होतं. गोळा झालेली सगळी पुस्तकं त्याने वाचनालयांना देणगी म्हणून दिली.

वधू-वराची एन्ट्री

घोडय़ावरून एन्ट्रीची फॅशन गेली. आता रंगीबेरंगी लाइट्समध्ये झगमगणारी बाइक, डेकोरेट केलेली ओपन जिप्सी, बैलगाडी एवढेच नव्हे तर ट्रकमधूनही नवरदेव अवतरतात. नवरीच्या एन्ट्रीमध्ये तेवढं वैविध्य आलं नसलं तरीही डोलीला पर्याय म्हणून फुलांच्या चादरीखालून (चद्दर) एन्ट्री करण्याची फिल्मी पद्धत अनेकांनी स्वीकारल्याचं दिसतं.

* * *

आमंत्रण पत्रिका

आमंत्रण पत्रिकांचं रूप खूप वेगाने बदललं आहे. ऑनलाइन इन्व्हिटेशनच्या रेटय़ाला तोंड देताना छापाल पत्रिकांच्या स्वरूपात बरेच बदल झाले आहे. चौरस, आयत यातून बाहेर पडून पत्रिका विविध आकार धारण करू लागल्या आहेत. देवाचे नाव घेऊन सुरू होणारा आणि ‘आमच्या ताईच्या लग्नाला यायचंच हं’ वर संपणारा मजकूरही मागे पडला असून त्यातही विविध प्रयोग होत आहे.

व्हॉट्सअपने काम खूपच सोपं केलं आहे. त्यामुळे लग्नात आमंत्रण पत्रिका हा आजही अपरिहार्य भाग असला तरीही सोबत व्हॉट्सअपवर पाठवण्यायोग्य आमंत्रण बनवणे अत्यावश्यक ठरले आहे. यात कॅरीकेचर, नवरा-नवरीचा जीवनप्रवास, प्री-वेडिंग फोटोशूटमधील फोटो, व्हिडीओ यांचा वापर होत आहे.

* * *

रीटर्न गिफ्ट्स

लग्नानिमित्त जमलेल्या मोठय़ा समुदायाला पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या वधू-वरांची संख्या वाढू लागली आहे. ही जोडपी रोपटी, शोभिवंत कुंडय़ा, विविध वनस्पतींच्या बिया अशा वस्तू देऊन उपस्थितांचे आभार मानतात. पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत असलेल्या संस्थाही त्यांना हातभार लावतात. याव्यतिरिक्त अंध, अपंग, गतिमंद मुलांनी तयार केलेल्या मेणबत्त्या, साबण, पणत्या अशा वस्तू देऊन सामाजिक भानही जपण्याचा प्रयत्न होत आहे.

* * *

डेस्टिनेशन

डेस्टिनेशन वेडिंग ‘अपने बस की बात नही’ असं म्हणत त्यावर काट मारण्याऐवजी आपल्या बजेटमध्ये बसतील अशी नवी डेस्टिनेशन शोधून काढली जात आहेत. राजस्थानी हवेली परवडली नाही म्हणून काय झालं, पुण्यातल्या वाडय़ात किंवा कोकणातल्या कौलारू घरातही थाटात लग्न करणाऱ्यांची संख्या वाढत आहेत. फार्महाउसवर, शेतात, समुद्रकिनारी असलेल्या बंगल्यात ‘पुरे तामझाम के साथ’ लग्नं लावली जातात. त्या थीमनुसार डेकोरेशन, मेनू, गिफ्ट्स, कॉश्च्युम्स सगळं खास तयार केलं जातं. गोव्यातली बोट ते काश्मीरमधील हाउसबोट ज्याला जे जमेल, परवडेल, भावेल ते तो करत आहे.

* * *

वेशभूषा

बनारसी शालू, पैठणी साडीचं वेड कमी झालं आहे. भरगच्च वर्क  केलेला लेहंगा किंवा इव्हिनिंग गाउन हे हल्लीच्या वधूंचे सर्वाधिक आवडते पोशाख आहेत. लग्न लावताना नऊवारी साडी नेसण्याची क्रेझ मात्र आजही कायम आहे. नवरदेवही बरेच प्रयोगशील बनले आहेत. साउथ इंडियन साडय़ा नेसण्याचं प्रमाण वाढत आहे. नवरा नवरीला मागे टाकेल असा उत्साह हल्ली वऱ्हाडी दाखवतात. लग्नाची खबर मिळताच आप्तांमध्ये ‘काय घालायचं’ यावर खल सुरू होतो. मग एकाच रंगाचे किंवा दोन रंगांचं कॉम्बिनेशन असलेले कपडे, फेटे किंवा पगडय़ा, पैठणी अशी एखादी थीम ठरते आणि ठरलेल्या प्लॅनची शक्य तेवढी अंमलबजावणीही केली जाते.

* * *

मेजवानी

मसालेभात आणि जिलेबी, लाडूचे दिवस इतिहासजमा झाले. आपण ग्लोबल सिटिझन झाल्याची जाणीव लग्नमंडपांत सर्रास होऊ  लागली आहे. नूडल्स, पास्ता, पिझ्झा असं बरंच काही सामावलं गेलं आहे. पूर्वापार शाकाहारी असणाऱ्या मराठमोळ्या लग्नसोहळ्यांतही मांसाहाराला स्थान मिळू लागलं आहे. पाणीपुरी, डोसाचे काउंटर गर्दी खेचताना दिसतात. वेलकम ड्रिंक्स, स्टार्टर्सचेही नवनवे प्रकार येऊ  लागले आहेत.

* * *

रुखवत

रुखवताच्या टेबलवरून भलामोठ्ठा लाडू, भारंभार भांडीकुंडी गायब होऊन वधू-वरांच्या फोटोंचे कोलाज केलेली फ्रेम, फॅमिली ट्री, लहानपणी मिळालेली बक्षिसं, बालपणीची लाडकी बाहुली, अगदी लहान वयातला जपून ठेवलेला ड्रेस अशा वस्तू तिथे दिसू लागल्या आहेत.

जरा हटके…
प्रत्येकाच्या आवडीनिवडी विचारात घेऊन त्यानुसार नियोजन करावं लागतं. पुण्यात लग्न असेल, तर वाडा थीम, गोव्यात असेल तर बीच थीम अशी योजना असते. वाडा थीम असेल तर नक्षीदार लाकडी खांब, कमानी लावून विवाहस्थळ सजवलं जातं. बीच थीम असेल, तर त्यानुसार रंगसंगती असते. माशांच्या आकृत्या सजावटीसाठी वापरल्या जातात. पाहुण्यांच्या रूममधले गिफ्ट हॅम्पर्स त्या-त्या ठिकाणानुसार ठरतात. महाबळेश्वरला लग्न असेल तर स्ट्रॉबेरी, जेली, गोव्यात असेल तर काजू दिले जातात. काही लग्नांमध्ये आम्ही कस्टमाइज्ड न्यूजपेपर्स बनवतो. तीन-चार दिवसांचा सोहळा असेल, तर काल काय-काय झालं, आज काय होणार आहे, याचं सचित्र वृत्त त्यात असतं. रातोरात हे न्यूजपेपर प्रिंट करून आणले जातात आणि सकाळी प्रत्येक पाहुण्याच्या रूममध्ये पोहोचवले जातात. वधू-वर पक्षांमधील मोकळेपणा वाढावा म्हणूनही काही प्रयोग आम्ही करतो. उदाहरणार्थ- व्याही भोजनाच्या दिवशी दोन्ही पक्षांची क्रिकेट मॅच ठेवली जाते. त्यामुळे सगळ्यांना एकत्र धमाल करता येते आणि औपचारिक अवघडलेपण दूर होतं. म्युझिक सर्कल हासुद्धा अफलातून प्रकार आहे. यात पाहुण्यांना जेम्बे हे वाद्य देऊन वर्तुळात उभं केलं जातं. इन्स्ट्रक्टरच्या सूचनांप्रमाणे सर्व पाहुणे वाद्य वाजवतात. हा प्रकारही पाहुण्यांना खूप आवडतो. परदेशातील नातेवाईकांनाही सोहळ्याचा आनंद घेता यावा म्हणून स्काइप, गुगल हँगआउट्सवरून लाइव्ह स्ट्रीमिंगचाही पर्याय आम्ही उपलब्ध करून दिला आहे.
– सत्यश्री पानसे, वेडिंग प्लॅनर, द जॉयस्मिथ

लग्नाची वेबसाइट
तेहानच्या लग्नाचं इन्व्हिटेशन बनवायचं होतं. पत्रिका हरवण्याची शक्यता असते. व्हॉट्सअपवर पाठवलं तर हजारो इमेजेसच्या गर्दीत हरवू शकतं. म्हणून वेबसाइट बनवायचं ठरवलं. त्यात दोघांचा जर्नी, त्यांची वैशिष्टय़, त्यांचे मित्र,आमंत्रण, लग्नाचं काउंटडाउन सगळं दिलं. हल्ली आम्ही वेडिंग हायलाइट्सचे व्हिडीओ बनवतो. दोन-दोन तासांचं व्हिडिओ शूटिंग पाहायला हल्ली कोणाकडेच वेळ नसतो. त्यामुळे सगळ्या सोहळ्यांचा जास्तीत जास्त १५ मिनिटांचा झकास व्हिडीओ तयार केला जातो. त्यात नातेवाइकांचे बाइट्सही असतात. हा नवा प्रकार लोकांच्या पसंतीस उतरत आहे.
– दीप्ती कशाळकर, http://diptik.in/
विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.com