17-lp-mrunmayi-weddingलग्न ही प्रत्येकाच्याच आयुष्यातली महत्त्वाची गोष्ट. मग त्याला सेलिब्रिटी तरी अपवाद कसे असतील? सतत धावफळीचं, लाइमलाइटमधलं आयुष्य जगणाऱ्या सिने-नाटय़-टीव्ही क्षेत्रातल्या कलाकारांचा आयुष्यातल्या या नाजूक नात्याकडे बघायचा दृष्टिकोन नेमका कसा असतो..

माझं ‘लग्न होतंय’ याचं दडपण मला कधीच आलं नाही. लग्नानंतर आयुष्य बदलतं वगैरे असं म्हणतात पण मला असं काही जाणवत नव्हतं. अनेकांना लग्नाचं दडपण येतं असतं तर माझं तसंही काही झालं नाही. लग्न कसं होईल काय होईल याची मला अजिबात चिंता नव्हती. या सगळ्याचं श्रेय मी स्वप्निल राव म्हणजे माझ्या नवऱ्याला देते. त्याच्यात आणि माझ्यात एक वेगळंच मैत्रीचं नातं आहे. फक्त त्याच्याशीच नाही तर त्याच्या आईबाबांशीसद्धा माझी मैत्रीच आहे. त्याच्या आईबाबांनाही मी आईबाबा अशीच हाक मारते. त्यांच्याशी माझं खूप चांगलं बॉण्डिंग झालंय. त्यामुळे कधीकधी मी त्याच्या आईबाबांबद्दल बोलतेय की माझ्या आईबाबांबद्दल हे लोकांना पटकन कळत नाही, इतकं आमचं नातं मस्त आहे. स्वप्निलच्या निमित्ताने मला असा जोडीदार मिळाला आहे जो मला मी आहे तशी स्वीकारतो, सांभाळून घेतो आणि समजून घेतो. अभिनय क्षेत्रात गेल्या सात वर्षांपासून काम करत असल्यामुळे मी मुंबईत राहते. मुंबई-पुणे असा प्रवास सतत सुरू असतो. आता लग्नानंतरही हा मुंबई-पुणे प्रवास सुरुच राहणार आहे. लग्नानंतरही ‘सासर-माहेर’ अशी भावना माझ्या मनात येणार नाही, कारण माझ्यासाठी दोन्ही घरं सारखीच आहेत. प्रेमळ आणि काळजी करणारी. आमचं अरेंज मॅरेज म्हणजे ठरवून केलेलं लग्न आहे. खरंतर हे सांगून कोणाचाही विश्वास बसणार नाही. कारण आमच्यातलं बॉण्डिंग आम्ही खूप वर्षांपासून एकमेकांना ओळखतो, जाणतो असंच आहे. खरंतर माझ्या प्राधान्यक्रमावर लग्न हे नव्हतंच. माझ्या आईच्या सांगण्यानुसार मी स्वप्निलला भेटायला तयार झाले. आमची भेट अगदी सहज होती पण त्या भेटीतच आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. प्रेमात ‘क्लिक होणं’ म्हणजे काय ते अनुभवलं. पण, आईचं म्हणणं त्या वेळी ऐकलं आणि स्वप्निलसारखा जोडीदार मला मिळाला. लग्नामध्ये काय काय धमाल करायची याची माझ्यासह माझ्या मित्रपरिवारामध्ये आणि कुटुंबीयांमध्ये खूप उत्सुकता होती.

Chandrashekhar Bawankule,
धैर्यशील मोहिते पाटलांच्या राजीनाम्यावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “शरद पवारांचा…”
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?
raveena tandon breakup with akshay kumar
अक्षय कुमारशी ब्रेकअप झाल्यावर केलेला आत्महत्येचा प्रयत्न? रवीना टंडन पहिल्यांदाच उत्तर देत म्हणाली, “खूप सारी…”

18-lp-amruta-weddingसाथ महत्त्वाची  -अमृता खानविलकर

लहान असताना मला नेहमी वाटायचं माझं प्रिन्सेस वेडिंग व्हायला हवं. ती गंमत होती. पण, नंतर अभिनय क्षेत्रात आल्यानंतर मला मराठी लग्नांबद्दल खूप आकर्षण वाटू लागलं. मराठमोळी लग्न परंपरा मला आवडू लागली. माझ्या आईला मी नेहमीच हिरवा चुडा आणि मंगळसूत्र घातलेलं बघितलंय. मलाही तसंच काहीसं करावंसं वाटायचं. पण थोडं मोठं झाल्यानंतर या सगळ्या विचारांमध्ये तुमच्या जोडीदाराची महत्त्वाची भूमिका असते. मी आणि माझा नवरा हिमांशु मल्होत्रा बारा वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. आमच्या लग्नाला दोन र्वष झालीत. लग्नात प्रेम, काळजीसह सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही एकमेकांना किती साथ देता, कसे जुळवून घेता, हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं, हे त्याने मला समजवलं. जोडीदार निवडताना त्याच्याशी जमतंय का, हे तपासणं गरजेचं असतं, हे त्याचं मत मला पटतं. हिमांशु माझा नवरा तर आहेच, पण तो अत्यंत जवळचा मित्रही आहे. आम्हा दोघांबाबत अशी एकही गोष्ट नाही जी आम्हाला माहीत नाही. आम्ही सगळं एकमेकांशी शेअर करतो. मी एखाद्या गोष्टीसाठी त्याच्यावर अवलंबून राहू शकते हा विश्वास मला त्याच्यामुळे मिळतो. जितके आम्ही एकमेकांच्या जवळ आहोत तितकेच आम्ही एकमेकांना स्पेसही देतो. हिमांशु पंजाबी आणि मी मराठी; अशा परिस्थितीत लग्न दोन्ही पद्धतींनी करण्याचे प्रकार घडताना दिसतात.  पंजाबी लग्न खूप लॅव्हिश असतं. त्यामुळे दोन्ही पद्धतींनी लग्न करणं आम्हाला शक्य नाही, असं मी त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं. त्यामुळे पंजाबी पद्धतीने आमचं लग्न झालं. आयुष्यात काही प्रसंगी तडजोड करावी लागते. पण आपल्या एक पाऊल मागे जाण्याने गोष्टी सोप्या होत असतील तर अशा तडजोडीचं अजिबात वाईट वाटत नाही. मी माझं लग्न मस्त एन्जॉय केलं होतं. मराठमोळ्या लग्नाची माझी हौसमौज मी माझ्या धाकटय़ा बहिणीच्या, अदितीच्या लग्नात पूर्ण केली.

21-lp-shreya-weddingदृष्टिकोन बदलला – श्रेया बुगडे

आमच्या पिढीतल्या अनेकींना लग्न म्हणजे ‘अडकणं’ वाटतं. पण इतकी र्वष माझ्या आईबाबांचं नातं बघून माझ्या मनात कधीच तसा विचार आला नाही. लग्न म्हणजे बंधनात अडकणं असं मला कधीच वाटलं नाही. मी लग्न या संकल्पनेकडे खूप सकारात्मक दृष्टिकोनातून बघते. निखिल शेठने म्हणजे माझ्या नवऱ्याने मला प्रपोज केलं, तेव्हा मी त्याला, त्याच्या आईबाबांना आपलं नातं मान्य आहे का, असा पहिला प्रश्न केला. कारण एखादी मुलगी अभिनेत्री असते तेव्हा तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या आईबाबांसाठी ती गोष्ट खूप महत्त्वाची ठरते. म्हणजे ती संसार करेल का, राहील का अशा अनेक शंका त्यांच्या मनात असतात. आमच्या क्षेत्राशी जोडल्या गेलेल्या अनेक गोष्टी याला कारणीभूत आहेत. याचं आणखी एक कारण आहे आमच्या आधीच्या पिढीतल्या बायका शारीरिक, भावनिक, आर्थिकदृष्टय़ा त्यांच्या नवऱ्यांवर अवलंबून असायच्या. म्हणून त्यावेळी घटस्फोट फारसे होत नसत. पण, आताच्या तरुणी आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी असल्यामुळे त्या त्यांचे निर्णय घेऊ शकतात. पण, माझ्या वेळी मला यापैकी कशालाही सामोरं जावं लागलं नाही. निखिलच्या घरी माझ्या क्षेत्राबद्दल अजिबात आडकाठी नव्हती. किंबहुना माझे सासू-सासरे माझ्या कामात मला फक्त पाठिंबाच देत नाहीत तर माझ्या कामाचं कौतुकही करतात. निखिल आणि माझं नातं आजही मैत्रीचंच आहे. एकमेकांना समजून घेतलं की अनेक गोष्टी सोप्या होतात, हे आम्ही दोघेही शिकलो आहोत. म्हणूनच आम्ही एकमेकांकडून कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा ठेवत नाही. त्या ठेवल्या की आपण दुखावलो जातो. मी माझ्या काही मैत्रिणींचे संसार बघितले होते. काहींना तर करिअर वगैरे सोडावं लागलं होतं. पण, हे सगळे विचार माझ्या लग्नानंतर बदलले आहेत. आम्ही कोणीच टिपीकल बायको, नवरा, सासू-सासरे असे वागत नाही. त्यामुळे लग्न या संकल्पनेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आपली वागणूक, आपले विचार यांवर आपण लग्नाकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतो हे अवलंबून आहे. घरी गेल्यावर आपली कुणीतरी वाट बघतंय, ही भावना सुखावणारी आहे.

19-lp-chinmay-weddingमैत्रीचा नियम लग्नानंतरही – चिन्मय उदगीरकर

मी आणि माझी बायको गिरिजा जोशी आधीपासूनच एकमेकांचे चांगले मित्र आहोत. एकमेकांचे विचार, मतं, स्वभाव असं सगळंच आम्ही जाणतो. आमच्या दोघांच्याही घरी आमच्या मैत्रीविषयी माहिती होतं. त्यामुळे त्यांनीच लग्नाचा प्रस्ताव आमच्यासमोर मांडला. आम्हीही त्यावर विचार केला आणि लग्नासाठी तयार झालो. आम्हाला एकमेकांबाबत लग्न करण्याइतका विश्वास वाटू लागला तो मैत्रीतूनच. आमच्या मैत्रीवर नवराबायको या नव्या नात्यामुळे नकारात्मक परिणाम अजिबातच होत नव्हता. याचा प्रत्यय आम्हाला लग्नानंतरही येत आहे. आम्ही नेहमी म्हणतो की, आमच्या मैत्रीचं रूपांतर लग्नात झालंय. त्यामुळे इथेच अध्र्या गोष्टी जमून आल्या. लग्न म्हटलं की जबाबदारी असते. मग ती आर्थिक, व्यावहारिक, प्रापंचिक, भावनिक अशी सगळीच असते. पण ती तुम्हाला आवडली, हवीहवीशी वाटली तरच तुम्ही लग्न एन्जॉय करू शकता. जबाबदारी आवडणं हे खूप महत्त्वाचं आहे. आम्ही एकमेकांच्या आवडीनिवडीचा आदर करतो, वैचारिक स्वातंत्र्य देतो. आमचा मैत्रीपासूनचा एक नियम आहे. दिवसभरात जे जे घडतं, ते सगळं एकमेकांशी शेअर करायचं. मग ते काहीही असो, प्रवासातला अनुभव, कामाच्या ठिकाणचा किस्सा, वाचत असलेल्या पुस्तकातली काही मतं असं काहीही असलं तरी एकमेकांना सांगतोच. मैत्रीपासूनचा हा आमचा नियम आम्ही आताही तसाच पाळतो.

20-lp-siddharth-weddingलग्नाची व्याख्या समजून घेतली – सिद्धार्थ मेनन

मला लग्न करायच्या आधी लग्न या संस्थेविषयी फारशी माहिती नव्हती. त्यामुळे ते खूप रोमँटिक वाटायचं. मोठा होत गेलो आणि त्यातल्या बारीक-सारीक गोष्टींची जाणीव होत गेली. अनेक प्रश्न पडत होते. एकेका प्रश्नाची उत्तरं मिळत गेली. आमच्या पिढीची लग्नाची वेगळी व्याख्या असू शकते, या मतापर्यंत मी पोहोचलो. हळूहळू मी लग्नाची व्याख्या समजून घेतली. मी लग्न करतोय असं सांगितल्यावर अनेकांनी माझ्याकडे खूप संशयाने बघितलं होतं. कारण एखादा अभिनेता लग्न करतोय, याकडे आजही वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं. माझी वागणूक चांगली आहे, मी लोकांचा आदर करतो, आयुष्यात माझी काही ध्येयं आहेत, या सगळ्याची जाणीव असताना मी लग्नासाठी योग्य नाही का, असा विचार मनात आला. मी महिन्याला लाखभर पगार घेतो, मोठं घर, गाडी आहे तरच मी लग्न करू शकतो, असं आहे का, असेल तर मला हे पटत नव्हतं. आयुष्यात सेटल झाल्यावर लग्न करू, हे मत मला रुचत नाही. खरंतर मनापासून वाटल्यावरच लग्न करावं. पण, हे सगळ्यांनाच पटतं असं नाही. मला लग्नसंस्था खूप रोमँटिक वाटते म्हणून मी लग्न केलं. मी आणि माझी बायको पूर्णिमा नायर आम्ही एकमेकांना बांधून ठेवलं नाही. आमच्या आवडीनिवडी सारख्या आहेत. आमच्यात मतभेदही आहेत. पण, आम्हाला आयुष्य कसं जगायचंय यावर आमचं एकमत आहे. पूर्णिमा लग्नानंतर आठ महिने नोकरीनिमित्त दुबईला होती. पण, त्या दिवसांमध्ये मी तिला कधीच ‘नोकरी सोडून भारतात ये’ असं सांगितलं नाही किंवा तिनेही लग्नाआधी ‘तू आधी मोठा स्टार हो मगच आपण लग्न करू’ असं सांगितलं नाही. असं करायला ते काही बिझनेस डील नाही. अनेकांच्या लग्नात ‘असंच झालं पाहिजे’, ‘इतक्याचे दागिने द्या’ अशा अनेक गोष्टी ठरवल्या जातात. हे आम्हाला आमच्या लग्नात नको होतं. एकमेकांसोबत राहायचं असेल तर ते प्रेमासाठी राहायला हवं. जोडीदाराच्या संघर्षांत आपली साथ असणं आणि एकत्र एखादं ध्येय गाठणं हे फिलिंग जास्त छान आहे.
शब्दांकन : चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com @chaijoshi11