News Flash

लग्नसराई विशेष : गुजराती लग्न – समुरता आणि हस्तमिलाप

इतर भारतीय लग्नपद्धतींप्रमाणेच गुजराती लग्नपद्धतही वैशिष्टय़पूर्ण आहे.

लग्न म्हणजे सहसा आयुष्यात एकदाच होणारा सोहळा. साहजिकच तो प्रत्येकाला झोकात साजरा करायचा असतो. तो करण्यासाठीचं माध्यम म्हणजे लग्नसोहळ्यातल्या वेगवेगळ्या प्रथा, परंपरा. आपल्याच परंपरा प्राचीन, समृद्ध असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण आपल्या देशातल्या काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत विविध प्रांतांमधल्या लग्नपद्धती, परंपरा यांच्यावर एक नजर टाकली तर थक्क करणारं वैविध्य पाहायला मिळतं.

स्वप्ना अय्यंगार, ग्रीष्मा नायर, शलाका सरफरे, भाग्यश्री प्रधान, अश्विनी पारकर

इतर भारतीय लग्नपद्धतींप्रमाणेच गुजराती लग्नपद्धतही वैशिष्टय़पूर्ण आहे.  वधू-वरांनी एकमेकांना पसंत केल्यानंतर सगाई म्हणजेच साखरपुडा केला जातो. हल्ली सगळीकडे िरग सेरिमनीचा ट्रेण्ड असला तरी  गुजराती समाजामध्ये आजही पांरपरिक पद्धतीने हा सोहळा पार पडतो. यामध्ये एका चौरंगावर वधूला बसवले जाते. त्यानंतर  सासरकडची मंडळी मुलीला लग्नबेडीत बांधण्यासाठी प्रामुख्याने पैंजण भेट देतात. तसेच लाल रंगाची चुनरी देऊन तिच्या  सौभाग्यवती होण्याच्या प्रवासाला शुभारंभ होतो. त्यानंतर वरपक्ष व वधुपक्ष एकमेकांना गूळ आणि धण्याचा प्रसाद तसंच शगुन म्हणून सव्वा रुपया देतो. मग हे लग्न ठरले असे घोषित केले जाते.

लग्नपढी

लग्नाच्या काही दिवस आधी वर आणि वधुपक्षातील मंडळी एकत्र बसून एका कागदावर हाताने पत्रिकेचा संपूर्ण मजकूर लिहितात. त्यानंतर वधूचे औक्षण करून ही लग्नपढी एका रंगीत धाग्यात बांधून तिला दिली जाते. गुजराती समाजामध्ये हा विधी झाल्यानंतर लग्न मोडत नाहीत. त्यामुळे हा विधी लग्नाच्या खूप आधी केला जात नाही तर काहीच दिवस आधी केला जातो. एकदा ही लग्नपढी धाग्यात बांधल्यानंतर पुन्हा कधीही उघडली जात नाही. त्यानंतर वधुपक्ष वर पक्षाला ही लग्नपढी नेऊन देतात. या विधीनंतर वधू आणि वर एकमेकांना भेटू शकत नाहीत. त्यानंतर लग्नविधींच्या दरम्यानच त्यांना एकमेकांना भेटता येते.

मुख्य लग्नविधी : समुरता

गुजराती समाजामध्ये लग्नविधीचा शुभारंभ हा ‘समुरता’ने होतो. म्हणजेच लग्नाच्या आदल्या दिवशी मूग पाखडून ते दान  केले जातात. त्यानंतर इतर विधींना सुरुवात केली जाते. तीन दिवस आधी हा विधी होतो.

गणेश स्थापना

या समाजामध्ये मडक्यात गणेशपूजन केले जाते. त्यासाठी कुंभाराच्या चाकाचीही पूजा यावेळी केली जाते. कुंभार जसा मातीला आकार देतो, त्याचप्रमाणे आम्ही आमच्या मुलीला चांगल्या संस्कारांसह तुमच्याकडे पाठवीत आहोत. त्याचे प्रतीक म्हणून कुंभाराच्या मडकी तयार करण्याच्या चाकाची पूजा केली जाते. गुजराती समाजामध्ये मांडवाच्या चारही बाजूंना सात मडकी एकावर एक ठेवली जातात. त्यानंतर वर-वधूच्या घरात मांडव उभारले जातात. ज्या मांडवात लग्नविधी होणार आहे, तो मजबूत रहावा यासाठी कुटुंबातील चार तरुण मुले मिळून मंडप मुरत हा विधी करतात. लग्नाचे सर्व विधी याच मांडवात करावे लागतात.

सांजी

लग्नाच्या आदल्या दिवशी वधू-वराला हळद लावली जाते. त्यानंतर सायंकाळी ‘सांजी’चा सोहळा साजरा केला जातो. त्यामध्ये घरातील महिला पारंपरिक लग्नगीत गातात. त्यानंतर गुजराती पारंपरिक नृत्य म्हणजेच गरबा रास होतो.

लग्न

वरपक्षाकडची मंडळी जेव्हा वधूच्या दारी येतात, तेव्हा वधूची बहीण सर्वाचे स्वागत करते, त्याला ‘सामयु’ म्हणतात. यामध्ये पारंपरिक पद्धतीचा ‘इंदोणी’ म्हणजेच कलश डोक्यावर घेऊन वराचे स्वागत केले जाते. गुजराती समाजामध्ये व्याह्य़ांना अलिंगन देऊन त्याचे स्वागत करतात. त्याला ‘वेवाही मनाना’ असे संबोधले जाते. त्यानंतर लग्नविधीला सुरुवात होते. वधूचे कन्यादान केले जाते. कन्यादानाच्या वेळी वधू माहेरची साडी नेसते. त्या साडीला पानेदर असे म्हणतात. त्यानंतर  वरपक्षाकडून वधूसाठी ‘घरचोला’ म्हणजेच लग्नसाडी डोक्यावर पांघरली जाते. ही लग्नसाडी केवळ वधूच नेसू शकते. एखादी स्री सुहासिनी म्हणून मृत्यू पावली तर तिला घरचोला साडी नेसवून तिला निरोप दिला जातो. त्यामुळेच गुजराती समाजामध्ये या साडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यानंतर वधूचे आई-बाबा तिचा हात वराच्या हातात देतात, या विधीला हस्तमिलाब म्हणतात. त्यानंतर त्यांचे गटबंधन केले जाते. त्यानंतर वर-वधू हवनकुंडाला फेरे घालतात. सौराष्ट्रात केवळ चारच फेरे घेतले जातात, त्यांना ‘चोरीफेरा’ असे म्हणतात. त्यानंतर वर-वधू सर्वाचे आशीर्वाद घेतात. त्यानंतर वर आणि वधू सात वचन घेतात. लग्न संपन्न होते.

बिदाई

पूर्वीच्या काळी गावांमध्ये अंधाऱ्या रात्री मुलीला निरोप दिला जात असे. त्यामुळे जाताना मुलीच्या हातात माहेरून एक दिवा दिला जात असे. मात्र ही प्रथा आजही एक वेगळ्या अर्थाने पूर्ण केली जाते. वधू तिच्या हातातील दिव्याच्या स्वरूपात कुटुंबामध्ये आनंदाचा प्रकाश घेऊन येते. तसेच तिला गाडीने सासरी घेऊन जाणाऱ्या चालकाचे औक्षण केले जाते. मग मुलीची पाठवणी केली जाते. अशा प्रकारे गुजराती समाजामध्ये अत्यंत पारंपरिक पद्धतीने विवाह संपन्न होतो.
शलाका सरफरे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 1:16 am

Web Title: wedding special issue gujarati marriage
Next Stories
1 लग्नसराई विशेष : पंजाबी लग्न – वरना आणि मिलनी
2 लग्नसराई विशेष : तेलुगु लग्न – पेलिकुथुरू  आणि जीलकरा बेल्लम
3 लग्नसराई विशेष : हे बंध रेशमाचे… पहिल्या भेटीत प्रेमात – मृण्मयी देशपांडे
Just Now!
X