News Flash

लग्नसराई विशेष : केरळी लग्न – थालीकेट्ट  आणि साध्य

लग्न म्हणजे सहसा आयुष्यात एकदाच होणारा सोहळा. साहजिकच तो प्रत्येकाला झोकात साजरा करायचा असतो.

लग्न म्हणजे सहसा आयुष्यात एकदाच होणारा सोहळा. साहजिकच तो प्रत्येकाला झोकात साजरा करायचा असतो. तो करण्यासाठीचं माध्यम म्हणजे लग्नसोहळ्यातल्या वेगवेगळ्या प्रथा, परंपरा. आपल्याच परंपरा प्राचीन, समृद्ध असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण आपल्या देशातल्या काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत विविध प्रांतांमधल्या लग्नपद्धती, परंपरा यांच्यावर एक नजर टाकली तर थक्क करणारं वैविध्य पाहायला मिळतं.

स्वप्ना अय्यंगार, ग्रीष्मा नायर, शलाका सरफरे, भाग्यश्री प्रधान, अश्विनी पारकर

आपल्याकडची लग्नपद्धत खूप जुनी आणि म्हणूनच खूप महत्त्वाची आहे, असं प्रत्येक केरळी माणसाला वाटत असतं. त्यामुळे ते लग्नाला खूप महत्त्व देतात आणि ते खूप उत्साहाने तो सोहळा साजरा करतात. केरळी समाजात हिंदू, ख्रिश्चन तसंच मुस्लिम या तिन्ही धर्मीयांच्या पद्धतीने लग्नसमारंभ साजरा होतो.

हिंदू लग्नपद्धतीत खूप विधी असतात. त्या पुन्हा जातींनुसार बदलतात. केरळी माणूस सहसा जुन्या पद्धतींप्रमाणे पत्रिका तसंच कुटुंबाची पाश्र्वभूमी बघून मगच लग्न करायला प्राधान्य देतो. आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी योग्य जोडीदार शोधणं ही सहसा आईवडिलांचीच जबाबदारी असते. िहदू तसंच मुस्लिमांमध्ये काही विशिष्ट नात्यांमध्ये लग्न करायची पद्धत आहे. ख्रिश्चनांमध्ये मात्र अशी लग्नं होत नाहीत.

आपल्या विवाहयोग्य मुलासाठी किंवा मुलीसाठी आईवडील जोडीदार शोधायला सुरुवात करतात. इतर ओळखीच्या लोकांमधून स्थळं यायला सुरुवात होते. मग शिक्षण, नोकरी, कुटुंबाची पाश्र्वभूमी ही सगळी माहिती घेऊन त्यातून योग्य वर किंवा वधू शोधली जाते. पत्रिका जुळली की एकमेकांना भेटण्याचा कार्यक्रम होतो. पसंती झाली की साखरपुडा (एंगेजमेंट) होतो. हा लग्नाच्या प्रक्रियेमधला पहिला करार असतो. अग्नीच्या किंवा एखाद्या दिव्याच्या (निलाविलक्क) साक्षीने हा विधी होतो. वेगवेगळे मंत्र म्हटले जातात. पूजा होतात. वधूला दागिने, सिल्क साडय़ा वगैरे दिल्या जातात. नंतर दोन्ही कुटुंबांमध्ये विडय़ाची पानं, हळकुंड वगैरे ठेवलेल्या ताटांचे आदानप्रदान होतं. हे नातं आता पक्कं झालं याचं ते प्रतीक असतं. मग लग्नाची तारीख ठरवली जाते आणि आलेल्या पाहुण्यांना मेजवानी दिली जाते.

लग्नाच्या आदल्या दिवशी मुलाचे तसंच मुलीचे कुटुंबीय नातेवाईकांना एक समारंभ करून जेवायला घरी बोलवतात. लग्नाच्या दिवशी मुलाचे काही नातेवाईक मुलीच्या घरी जाऊन तिला लग्नाची साडी (मंत्रकोडी) तसंच इतर वस्तू देतात. लग्नात वधूने ती साडी तसंच त्या वस्तू परिधान करायच्या असतात. हिंदू लग्न सहसा देवळात होत. लग्नाच्या दिवशी सकाळी वधू-वर दोघंही देवाचे आशीर्वाद (थालीकेट्ट) घेण्यासाठी देवळात जातात. थालीकेट्ट विधीनंतर त्या दोघांनाही देवळाच्या गाभाऱ्यात प्रवेश करायला परवानगी नसते.

पूर्वी लग्नं वधूच्या घरी होत किंवा मंदिरात होत असत. आता बहुतांश लोक लग्नकार्यालयांमध्ये लग्नसोहळा करायला प्राधान्य देतात. कधीकधी काही कुटुंबं थालीकेट्ट हा महत्त्वाचा विधी मंदिरात करतात. त्यानंतर लग्नकार्यालयात जाऊन एकदम थाटात ‘सध्या’ हा विधी होतो. लग्ना दिवशी ‘नादस्वरा’च्या साथीने वधूचं कुटुंब वराच्या कुटुंबाचं स्वागत करतं. लग्न सोहळा संपेपर्यंत हा नादस्वराचा घोष सुरू राहतो. वधूचा भाऊ वराचे पाय धुवून त्याचं विशेष स्वागत करतो. किंडी नावाच्या एका विशिष्ठ भांडय़ात हे पाणी गोळा केलं जातं. मग सगळेजण वराला मंडपात घेऊन जातात. फुलं, दिवे हातात घेतलेल्या वधूच्या घरातल्या तरुण मुलीही त्यांच्याबरोबर असतात. या सगळ्याला ‘तालम’ असं म्हणतात. मंडप पानाफुलांनी, दिव्यांनी सजवलेला असतो.

मग वधूलाही तिच्या मैत्रिणी मंडपात घेऊन येतात. वरपक्षाकडून मिळालेली सिल्कची साडी तिने नेसलेली असते. मुहूर्तम्च्या विशिष्ट वेळेला वर तिच्या गळ्यात ‘ताली’ बांधतो. मग ते एकमेकांना हार घालतात. एकमेकांना अंगठय़ा घालतात. (हा विधी काही ठिकाणी असतो, काही ठिकाणी नसतो) मग जमलेली सगळी मंडळी वधूवरांना भेटून आशीर्वाद देतात. मग सगळ्यांसाठी मेजवानी असते. तिला ‘सध्या’ असं म्हणतात. मग वधूवराच्या घरी जायला निघते. त्याला गृहप्रवेशम् म्हणतात. त्यासाठी मुहूर्त काढला जातो. लग्नाच्याच दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी रिसेप्शन असते.

नंबुद्री समाजातील लग्नपद्धती

केरळमध्ये ब्राह्मण समाजाला नंबुद्री म्हटले जाते. त्यांच्यातील लग्नात शोडषक्रियागळ या विधींना महत्त्व असते. याचा अर्थ नंबुद्री लोकांमध्ये केले जाणारे सोळा विधी. हे सोळा विधी केल्यानंतरच नंबुद्रींमधील पुरुषांना यज्ञ करायचा अधिकार प्राप्त होतो असे मानले जाते. नंबुद्री लग्नांमध्ये यज्ञासह खूप वैदिक विधी असतात. त्यांच्या सगळ्याच विधींमध्ये अग्नीला खूप महत्त्व असते. त्यामुळे त्यांची लग्नं खऱ्या अर्थाने अग्नीच्या साक्षीने होतात. त्यांच्यामध्ये मुलाच्या घरी वेली नावाचा विधी केला जातो, तर मुलीच्या घरी ‘पेनकोडा’ किंवा ‘कन्यादान’ हा विधी केला जातो. वधूला ‘कुडी’ असे म्हटले जाते. पूर्वीच्या काळी नंबुद्रींमध्ये चार ते सात दिवस लग्नं चालत असत.

केरळी ख्रिश्चन लग्न

केरळी ख्रिश्चनांच्या लग्नातील काही पद्धती पारंपरिक ख्रिष्टद्धr(२२४)चन लग्नाच्या आहेत, तर काही पद्धतींना तिथल्या स्थानिक रीतीरिवाजांचा स्पर्श झालेला आहे. त्यांच्या धर्मानुसार लग्न करण्याआधी वधूवरांना चर्चकडून लग्नपूर्व समुपदेशन असते. त्यानंतर चर्चकडून एक औपचारिक एंगेजमेंट असते. या विधीला ‘मनसंमंदम्’ असं म्हणतात. त्यावेळी विविध प्रकारच्या प्रार्थना केल्या जातात. अंगठय़ांची देवाणघेवाण होते आणि या सगळ्याची चर्चकडे नोंद होते. त्यानंतरच्या तीनपैकी कोणत्याही रविवारी लग्नं करायचे असते. या लग्नाला कोणाचा आक्षेप नाही ना, हे पाहण्यासाठी हा मधला वेळ दिलेला असतो. त्यानंतर प्रत्यक्ष लग्नसमारंभ होतो. लग्नाच्या सगळ्या विधींना ‘मधुरम् वेक्कल’ असं म्हटलं जाते. वराला तेल लाूवन समारंभपूर्वक आंघोळ घातली जाते. मग वधूच्या भावाने धरलेल्या छत्रीखाली वर बसतो. वधूला चंदन तसंच गुलाबपाण्याने आंघोळ घातली जाते. वराची बहीण तिला नवे कपडे घालायला मदत करते. नारळ तसंच दुधापासून बनवलेली मिठाई वधूवरांना खायला दिली जाते.

प्रत्यक्ष लग्नाच्या वेळी वधू पांढराशुभ्र, पायघोळ गाऊन परिधान करते. वर सूट घालतो. दोघंही हातात पुष्पगुच्छ घेऊन चर्चमध्ये प्रवेश करतात. ते अल्थारा म्हणजेच चर्चमधल्या विशिष्ट पवित्र जागी जातात. तिथे चर्चचे मुख्य पाद्री तसंच आणखी काहीजण प्रार्थना, तसंच बायबलमधील काही वचनं म्हणतात. प्रार्थनेनंतर पाद्री कुटुंब, प्रेम, काळजी, तडजोडी या विषयावर भाषण करतात. त्याला होमिली असं म्हणतात. नंतर वधूवर दोघंही अंगठय़ांची देवाणघेवाण करतात. बायबलला स्पर्श करून देवाला लग्न टिकवण्याचं वचन देतात. मग वर वधूला ‘ताली’ बांधतो. तिला सिल्कची साडी देतो. लोक त्यांना शुभाशीर्वाद देतात. सगळ्यांसाठी मेजवानी आयोजित केलेली असते. नंतर वराचे कुटुंब त्यांच्या सोयीने रिसेप्शन करते.

केरळी मुस्लीम लग्नपद्धत

इतर सर्व ठिकाणच्या मुस्लीम समाजात ज्या पद्धतीने लग्न होते, त्याच पद्धतीने केरळी मुस्लीम समाजातही केले जाते. एंगेजमेंटसाठी सगळेजण वधूच्या घरी जमतात. केरळी मुस्लिमांच्या लग्नातले एक वेगळेपण म्हणजे वराचे कुटुंब वधूला खूप दागदागिने तसंच भरपूर भरतकाम केलेल्या साडय़ा वगैरे देते. हे दागिने खरोखरच पारंपरिक असतात. म्हणजे ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेले असतात. त्यातून आपण आपल्या भावना, मूल्य, नाती दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवतो असा त्यांचा विश्वास आहे. मुस्लीम लग्न प्रथांमधील आणखी एक वेगळेपण म्हणजे एंगेजमेंटच्या दिवशी वधूकडचे लोक वराला पैसे तसंच सोननाणं भेट देतात. यावेळी कुराणाचे वाचन केले जाते. पाहुण्यासाठी मेजवानी असते.

केरळी मुस्लीम लग्नाच्या आधीच्या दिवसाला ‘मयलांजी इडील’ असं म्हटलं जातं. या दिवशी वधूच्या घरी तिच्या नातेवाईक स्त्रिया जमतात आणि तिच्या हातापायावर मेंदी लावतात. या दिवसासाठी रचलेली खास गाणी गातात. नृत्य करतात. त्याला ओप्पना असे म्हटले जाते. वधू लग्नाची तयारी करत असताना तिला रिझवण्यासाठी केला जाणारा हा विधी आहे.

प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशी लग्नाच्या ठिकाणी वराचे आगमन झाले की विधींना सुरुवात होते. त्यात मेहेर देण्याचा विधी असतो. मौलवी कुराण तसंच लग्नाच्या कराराचं वधूवर आणि त्यांच्या नातेवाईकांसमोर वाचन करतात. दोन्ही पक्षांना हा करार मान्य केल्यानंतर म्हणजेच इज्ब ए कबुल केल्यानंतर मेहेर देण्याचा विधी होतो. निकाहनाम्यावर वधूवर, त्यांच्या दोघांचेही वडील तसंच मौलवींच्या सह्य़ा होतात. त्यानंतर मेजवानी असते.
ग्रीष्मा नायर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 1:20 am

Web Title: wedding special issue kerla marriage
Next Stories
1 लग्नसराई विशेष : मारवाडी लग्न – बत्तिशी आणि बिछुडी
2 लग्नसराई विशेष : तमीळ लग्न – वराची काशीयात्रा आणि उंझल
3 लग्नसराई विशेष : बंगाली लग्न – पाटी पात्रो आणि बऊ भात
Just Now!
X