News Flash

लग्नसराई विशेष : शुभमंगल सावधान…

वैवाहिक नातेसंबंधांत येणाऱ्या समस्येवर शोधल्या जाणाऱ्या उपायांना विवाह समुपदेशन असं म्हटलं जातं.

बोहल्यावर उभं राहिल्यावर मंगलाष्टकांतील ‘शुभमंगल सावधान’ या शब्दांनी नवीन जोडप्याला त्याच्या वैवाहिक जीवनाविषयी सावध केलं जातं असं म्हणतात. गेल्या काही वर्षांत मात्र विवाहापूर्वी आणि विवाहानंतरही समुपदेशनाच्या मदतीचा हात घेतला जातो आहे. दोघांचं सहजीवन अधिक सुखी होण्यासाठी वैवाहिक समुपदेशन ही काळाची गरज ठरते आहे.

स्थळ : एखादं छोटेखानी कार्यालय. तिथं भरलेला भावी वधूवर मेळावा. पालकांसह आलेल्या विवाहइच्छुक तरुण-तरुणींच्या पुढय़ात एकमेकांच्या माहितीच्या फाइल्स असतात. ही मंडळी लक्ष देऊन व्यासपीठावरील समुपदेशक काय सांगतो किंवा सांगते आहे हे लक्ष देऊन ऐकतात. हे एक प्रकारे विवाहपूर्व समुपदेशन नसलं तरी त्यासंदर्भातल्या कार्यशाळेचं हे चित्र आता दुर्मीळ राहिलेलं नाही.

वैवाहिक नातेसंबंधांत येणाऱ्या समस्येवर शोधल्या जाणाऱ्या  उपायांना विवाह समुपदेशन असं म्हटलं जातं. साधारणपणं गेल्या सहा ते दहा वर्षांपासून लोक या समुपदेशनाकडं वळायला लागले आहेत. पूर्वी फारच टोकाची भांडणं झाली किंवा काही लंगिक समस्या (सेक्शुअल डिसफंक्शन) उद्भवली तरच येत असत. आता आपलं जमत नाहीये, असा संशय आला तरी समुपदेशनासाठी येतात. वैवाहिक समुपदेशनाचे दोन प्रकार असतात- विवाहपूर्व समुपदेशन आणि विवाहानंतरचं समुपदेशन. विवाहपूर्व समुपदेशनात जोडीदार कसा निवडावा, काय अपेक्षा असाव्यात, तडजोड कशा पद्धतीनं कराव्या लागतात आदी मुद्दे विचारात घेतले जातात. एकूणच वैवाहिक जीवनाबद्दलची माहिती दिली जाते. काही वेळा लग्न ठरलेली जोडपीही वेगवेगळी पाश्र्वभूमी असलेली असल्यानं एकत्र आल्यानंतर एकमेकांशी कसं पटवून घेता येईल, कशा पद्धतीनं सहजीवन सुखी करता येईल, हे समजून घेण्यासाठी विवाहपूर्व समुपदेशनासाठी जातात.

कधीकधी आपल्या प्रश्नाकडे वस्तुनिष्ठ, निरपेक्ष वृत्तीने विचार करणाऱ्या व्यक्तीची आवश्यकता वाटते. अशा वेळी आपले विचार, भावना, परिस्थिती जाणून निर्णय घेण्यास आपणास आपण निवडलेल्या किंवा विचार करत असलेल्या निर्णयाप्रती जाण्याच्या वाटेतील वस्तुस्थितीची उकल करून देणारी व्यक्ती म्हणजेच समुपदेशक. त्याविषयी चर्चा होते, असेच कर, असं सांगितलं जात नाही. विवाहापूर्वी, विवाह झाल्यानंतर आणि कधीकधी घटस्फोट घेतल्यानंतरही विविध कारणांसाठी समुपदेशकाची आवश्यकता वाटू शकते. केवळ उपदेश न करता, पर्यायांची चर्चा करणारी, त्या अनुषंगानं वास्तवाचं भान आणून देणारी व्यक्ती म्हणजे समुपदेशक.

बहुतेकदा कुठल्या ना कुठल्या कारणावरून नवराबायकोचं पटेनासं होतं, वादाचे मुद्दे निर्माण होतात. त्यावेळी वैवाहिक समुपदेशनासाठी लोक जातात. कधी लंगिक समस्या असतात. तर कधी अपेक्षा आणि वास्तवामध्ये तफावत आढळते. अपेक्षाभंग व्हायला लागतो. मग आपला निर्णय चुकला की काय, असं त्या व्यक्तीला वाटू लागतं. तेव्हा कधी स्वतहून पुढाकार घेऊन, बऱ्याचदा मित्रमंडळी किंवा नातेवाईकांनी सांगितल्यामुळं आणि कधीकधी न्यायालयानं सांगितल्यामुळं समुपदेशन घेतलं जातं. वैवाहिक समुपदेशन हे आहे ते विवाहसंबंध सुरळीत चालावेत, सुखाचे व्हावे, सहजीवन चांगलं व्हावं, यासाठी केलं जातं.

ख्रिश्चन धर्मात विवाहाआधी विवाहेच्छुक जोडप्याला समुपदेशन करतात. त्यावेळी एकमेकांच्या वैवाहिक जबाबदाऱ्यांची चर्चा होते. त्यासाठीच्या कार्यशाळेत विवाहाशी निगडित मुद्दे समजावले जातात. उदाहरणार्थ- वैवाहिक जीवनात शारीरिक संबंधांमुळं अनेकदा  समस्या उद्भवू शकतात. ते व्यवस्थित असतील तर वैवाहिक नातेसंबंध व्यवस्थित राहायला मदत होते. स्त्री-पुरुषांच्या भावनातला फरक, जीवनात तडजोड कशी करावी, नवराबायकोचं नातं कसं असावं, एकमेकांना मदत कशी करावी, एकमेकांच्या नातलगांचा योग्य मान कसा ठेवावा आदी गोष्टी जोडप्यांनी समजून घेणं अपेक्षित असतं. त्यामुळं नातं अधिक दृढ होण्यास मदत होते. वसईत कॅथलिक समाजात चार दिवसांच्या विवाहपूर्व मार्गदर्शन शिबिरात समुपदेशन केलं जातं. प्रत्येक चर्चनुसार हा कालावधी कमीजास्त असू शकतो. शिबिरात सहभागी होणारी जोडपीही एकमेकांशी संवाद साधतात. या विवाहपूर्व समुपदेशनामध्ये बदलती जीवनशैली आणि कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळं एकमेकांसाठी वेळ न मिळणं, सोशल मीडिया आदी नवीन मुद्देही विचारात घेतले जातात. वैवाहिक जीवन सुखी असेल तर त्याचा परिणाम मुलांवर होतो. त्यांना सुरक्षित वाटतं. पण त्यांना असुरक्षितता वाटल्यास सगळ्याच परीनं त्यांच्या भविष्यावर वाईट परिणाम होऊ शकतो, हेही समजावलं जातं. विवाहपूर्व मार्गदर्शन शिबीर आणि विवाहानंतरच्या समुपदेशनामुळं वैवाहिक जीवनात फायदा होऊन जीवनविषयक दृष्टिकोन बदलल्याचा अभिप्राय अनेक तरुण जोडपी समुपदेशकांना देतात.

काही अधिक जागरूक लोक विविध संस्थांतर्फे आयोजल्या जाणाऱ्या विवाहविषयक कार्यशाळांनाही जातात. मात्र त्याला थेट समुपदेशन असं संबोधलं जात नाही. अलीकडं बरेचजण प्रेमविवाह करतात किंवा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असतात. तेव्हा त्यांच्या नातेसंबंधात समस्या निर्माण झाल्यास (रिलेशनशिप डिसऑर्डर) तर लग्नाआधीच या गोष्टींवर विचार केला जातो. पुढं लग्न करावं नाही वगरे.. ते विवाहपूर्व समुपदेशनावर ठरतं. समुपदेशकाकडे आपलं मन मोकळं करण्याची संधी मिळते. आपले प्रश्न ऐकून घेऊन त्यावर काही उपाय सुचवले जाऊ शकतात किंवा मार्गदर्शन मिळू शकतं, म्हणून समुपदेशन घेतलं जातं. समुपदेशनासाठी सुशिक्षित जोडपी थोडी लवकर जातात. काही वेळा डॉक्टरांकडे गेल्यावर लक्षात येतं की, औषधगोळ्यांपेक्षा समुपदेशनाची अधिक गरज आहे. समुपदेशनासाठी जाण्याचं सुशिक्षित, उच्च-मध्यमवर्गीयांत प्रमाण जास्त असलं तरीही समाजाच्या सर्व स्तरांतील लोकं हळूहळू समुपदेशनासाठी जायला लागले आहेत.

मुद्दे मतभेदांचे

लग्नानंतर काही वेळा मतभेदाचे मुद्दे पुढं येतात. त्यात पूर्वी सासरच्या मंडळींचा जाच, नवऱ्याला दारूचं व्यसन असणं, काही लैंगिक समस्या यांचा प्रामुख्यानं समावेश होता. तर आता आमचे स्वभाव एकमेकांना अनुरूप नाहीत हा मुद्दा प्रकर्षांनं पुढं येतो. लैंगिक असमाधान हा मुद्दा आता स्त्रियाही स्पष्टपणं नमूद करतात. तर क्वचित काही वेळा सासरचा जाच होतो, असंही सांगितलं जातं. विवाहपूर्व समुपदेशनात दोघं नातेसंबंधांत (रिलेशनशिपमध्ये) आहेत आणि समुपदेशनासाठी येतात, तेव्हा काही वेळा एक व्यक्ती जोडीदाराकडे शारीरिक संबंधांची मागणी करते. तेव्हा दुसरी व्यक्ती त्यासाठी तयार नसते आणि आपण होकार दिला नाही तर आपले संबंध बिघडतील, अशी भीती त्या व्यक्तीला वाटते. त्यामुळं त्यांना समपुदेशन केलं जातं. तर काही वेळा इन्टिमेट रिलेशनशिप असेल तर दोघंही तेवढेच ठाम असू शकतात. दोघांचे दोन वेगळे दृष्टिकोन असतात. तर्कसंगती वेगळी असते. मी बरोबर आहे, हे दोघांचंही म्हणणं असतं. दोघांनाही समस्या सोडवायची असते, उत्साह असतो, पण त्यासाठी जाबाबदारी घेणं, ही गोष्ट तुलनेनं वरवरची असते. त्यासाठी वेळ देणं, विचारांमध्ये प्रत्यक्ष बदल स्वतलाच करावा लागेल, यासाठी मनाची तयारी दाखवणं, हा खरा कळीचा मुद्दा ठरतो. आठवडय़ातून एकदा आपण या विषयाची चर्चा करूया, मग सल्ला देता येईल, असं समुपदेशकानं सांगितल्यावर आमचा जॉब महत्त्वाचा आहे, आम्हांला वेळ नाही, अशा सबबी सांगत दोघांकडून समुपदेशन पुढं ढकललं जातं.

एकमेकांना वेळ देता येत नाही, हा सध्याचा खूप मोठा प्रश्न आहे. विशेषत कॉर्पोरेट सेक्टरमधील जोडप्यांचे कामाचे तास जास्त आहेत. बाहेरगावी जाण्याचं दोघांचं प्रमाण अधिक असतं. एकमेकांसोबत घालवलेला वेळ फारसा नसल्यामुळं दोघांमधला संवाद संपणं आणि नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होणं, याची शक्यता अधिक वाढते. अशा कामासाठी भरपूर वेळ द्यावा लागणाऱ्या व्यवसायांमध्ये (प्रोफेशन्स) कामाचा ताण घेऊन जगणारे नवराबायको असतात. शिवाय मुलं, नातलग, कौटुंबिक जबाबदाऱ्या उचलणं अशा विविध विषयांवरून वादविवाद सुरू होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो आíथक बाजूचा. आíथक स्वातंत्र्य स्त्रीला असणं-नसणं आणि अर्थार्जनाच्या एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करणं, या दोन्ही गोष्टींमुळं आíथक स्वातंत्र्य हा खूप मोठा मुद्दा होऊ शकतो. त्यावरून वादविवाद होऊ शकतात. स्त्रीच्या दृष्टीनं तो महत्त्वाचा ठरू शकतो. एकमेकांविषयीच्या अपेक्षा करिअरविषयक किंवा जोडीदारानं आपल्याशी कसं वागावं ही अपेक्षा किंवा जीवनशैलीशी निगडित असणाऱ्या आयुष्याच्या ठाम कल्पना आणि अपेक्षा पूर्ण होत नाही, असं दिसल्यावर खटके उडायला लागतात. त्यामुळं वास्तववादी काय भूमिका असायला पाहिजे, यासाठीही समुपदेशनाची गरज भासते.

व्यक्त व्हा, पण जपून

सध्या सोशल मीडियाचा प्रभाव आणि परिणाम अनेकांच्या आयुष्यावर होताना दिसतो आहे.

सोशल मीडियामुळं एक प्रकारची असुरक्षिततेची भावना निर्माण होते. कधी उगीचच संशयाचं भूत एखाद्याच्या मागं लागू शकतं. उदाहरणार्थ नवऱ्याच्या फेसबुकवर इतक्या मत्रिणी का आहेत किंवा बायकोला तिच्या मित्राचा इतक्या उशिरा का मेसेज आला वगरे. हा संशय टाळण्यासाठी मोकळेपणानं गोष्टी एकमेकांशी शेअर करणं आवश्यक असतं. विश्वासावरच नात्याची उभारणी होत असते. तो ढासळला तर अशा गोष्टींमुळं असुरक्षितता वाढून किंवा खटके उडून समुपदेशनासाठी जाण्याची वेळ येते.

व्हॉटस् अ‍ॅपमुळं भांडणं फार होतात. हे भांडण वाढू शकतं. पूर्वी घरातून बाहेर पडताना नवराबायकोचं भांडण झालं तरी ऑफिसमधल्या घडामोडींमुळं तो राग शांत होत असे किंवा त्यावरून लक्ष दुसरीकडं वळत असे. त्यामुळं घरी आल्यावर राग राहिला असेल असं नाही. पण आता व्हॉटस् अ‍ॅपमुळं अनेकदा दोघं समोरासमोर नसली तरी मेसेजच्या माध्यमातून हे भांडण दिवसभर चालू राहातं. रागाच्या भरात काहीही बोललं जाऊ शकतं. समजा काही वेळा थोडा विचार करून दोघांपकी एकानंही मेसेज करायचा नाही असं ठरवलं, तरी कदाचित दुसरी व्यक्ती म्हणेल की आपण भांडलो, पण दिवसभरात तू व्हॉटस् अ‍ॅप केलं नाहीस, हे तू मुद्दाम केलंस, वगरे. त्यामुळं दोघांनी समजूतदारपणं आधीच ठरवलं की, भांडण झालंच तरी व्हॉटस् अ‍ॅप करायचं नाही, तरच हे भांडण वाढणार नाही.

समजा फेसबुकवर एकानं फिरायला गेल्यावरचे फोटो टाकले आणि त्यावर त्याच्या जोडीदाराला न आवडणाऱ्या मित्र किंवा मत्रिणीनं कॉमेंट केली, तर वाद होऊ शकतो. मला न विचारता फोटो कसा पोस्ट केला, अशी विचारणा होऊ शकते. मग पुढं मुद्दय़ाला मुद्दे वाढून गोष्ट अधिक गुंतागुंतीची होऊ शकते. जोडप्यात चांगला समजूतदारपणा असेल तर मग प्रश्न येत नाही. काही वेळा कदाचित कुणी फोटो पोस्ट केले नाहीत, तरी त्यावरूनही वाद होऊ शकतो. त्यामुळं विवाहपूर्व समुपदेशनात पुढचं आíथक, कौटुंबिक आदी नियोजनाविषयी बोलून घ्या, या मुद्दय़ांमध्ये आता  सोशल मीडियावरच्या तुमच्या इमेजविषयीही ठरवा, असं सांगावं लागतं.

विचार व्हायलाच हवा

नातेसंबंधांत पझेसिव्हनेस असणं, मारहाण करणं हे अनेकदा होतं. अशा गोष्टी घडल्यास त्या नात्याला पुढं नेण्यात अर्थ नसतो, तसा सल्ला समुपदेशक देतात. मुलगे आणि मुली दोघंही एकमेकांना मारतात, अशा घटना घडतात. काही वेळा जोडीदाराला मानसिकदृष्टय़ा त्रास दिला जातो. दुसऱ्या व्यक्तीला सतत टोकणं, त्याच्यावर बंधनं आणणं वगरे गोष्टींत पझेसिव्हनेस असतो. काही वेळा विवाहाला पालकांचा नकार असतो. जाती-धर्माचा अडसर असू शकतो.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिक आजार. दोघांपकी कुणाही एकाला मानसिक आजार असेल तर त्याची दुसऱ्याकडं बघण्याची मानसिकता बदलते. त्यामुळंही नातेसंबंधांत समस्या निर्माण होतात. उदहरणार्थ- एका मध्यमवयीन जोडप्याचं नातं चांगलं होतं. एकाएकी बायकोला नवऱ्याची किळस वाटू लागली. त्यामागचं कारण शोधल्यावर कळलं की त्यांना अतिनराश्य आलं होतं. त्यात माणसाला नकारात्मकता येते. मग मेनोपॉजमुळं आलेल्या त्या नराश्यावर उपचार आणि थोडय़ाशा समुपदेशनानं त्यांचं नातं सुरळीत झालं. दुसऱ्या एका उदाहरणात नवऱ्याला सारखा संशय यायचा की बायकोचं अफेअर आहे. तो तिला त्याबद्दल सतत विचारायचा. त्याच्या मानसिक आजारावर उपचार करून त्याला समुपदेशन केलं गेलं त्याचा संशय बऱ्याच अंशी कमी झाला. हा संशय कसा हाताळावा, हे बायकोलाही सांगितलं गेलं. त्यानंतर नातं बऱ्यापकी पूर्वपदावर आलं.

बऱ्याचदा मानसिक आजार आहे, ही गोष्ट चटकन स्वीकारली जात नाही. व्यक्तीला वाटतं की नातेसंबंधांमुळं नराश्य आलं आहे. नातं सुधारल्यावर नराश्य जाईल. त्यामुळं समस्येची उकल चटकन होत नाही आणि ती लांबवली जाते. त्यामुळं गोष्टी अधिक अवघड होऊन बसतात. एखादं उदाहरण असंही येतं की, नवराबायकोचं नेहमीचं भांडण असतं. फक्त त्या दोघांची विचारसरणी अशी होती की, आपलं भांडण झालंय म्हणजे नकारात्मकता आहे नात्यात. त्यामुळं आता आपला घटस्फोट होईल का, एवढा अतिविचार दोघंजणं करायचे. आपलं भांडण अजिबात होणार नाही, अशी परिस्थिती त्यांना हवी असल्यानं ते समुपदेशनासाठी गेले. मग यु कॅन डिसअँग्री बट यु कॅन बी टुगेदर हे रिलेशनशिप स्किल त्यांना समजावलं गेलं.

कल भविष्याचा

येत्या १० वर्षांचा विचार केल्यास मल्टिपल रिलेशनशिप अर्थात एकाहून अधिक नातेसंबंधांचा विचार करावा लागेल. अशी नाती आपल्याकडं पूर्वीपासून आहेत, फक्त ती आता उघडकीला येताहेत. आता शालेय वयातच साधारणपणं सहावीपासूनच जोडय़ा तयार व्हायला लागतात. येत्या दहा वर्षांत हीच मुलं मोठी होतील. ती कदाचित मल्टिपल रिलेशनशिपमध्ये असू शकतील. अशा नात्यांतला विश्वास हा मुद्दा थोडा विचित्र असू शकतो. सहनशीलताही तुलनेनं कमी असते. समुपदेशन करून आपण हेच नातं टिकवायचं का, ते संपवून दुसऱ्या नात्याकडे वळायचं, कदाचित हा एक प्रश्न निर्माण होऊ शकेल. रिलेशनशिप कमिटमेंटचा इश्यू येऊ शकतो. कदाचित असं होईल की नातेसंबंधांपेक्षा लैंेगिक संबंध अधिक ठेवले जातील. कारण तशी परिस्थिती निर्माण होईल. व्यक्तिस्वातंत्र्यामुळं लोकं एकटे राहतील. पूर्वी लोक रिलेशनशिपमध्ये असले तरी आईवडिलांसोबत राहायचे. पण तरुण वयातच स्वतंत्र घर असेल आणि त्यांची जीवनशैली वेगळी असेल हे पालकांनी स्वीकारलेलं असेल. आता लोकांचं व्यक्तिस्वातंत्र्य (इंडिव्हिज्युएलिटी) वाढतंय. बहुतांशी एकच मूल असतं आणि त्याला खूप महत्त्व दिलं जातं. त्यामुळं ही मुलं मोठी झाल्यावर नातेसंबंधांत दुसऱ्यालाही तेवढंच महत्त्व आहे, हे समजणं कदाचित पुढल्या पिढीला कठीण जाऊ शकेल.

सध्या घटस्फोटाचं प्रमाण वाढतं आहे. यामागची कारणं शोधली असता त्या त्या परिस्थितीनुसार योग्य कारणं असतातच. उदाहरणार्थ शारीरिक, मानसिक छळ असतो. एकमेकांशी न जुळणं यांच्याबरोबरीनं आपल्या विविध प्रकारच्या अपेक्षा जोडीदारानं पूर्ण न करणं ही कारणं वाढत चालली आहेत. वाढतं शहरीकरण आणि बदललेल्या जीवनशैलीत हळूहळू सामंजस्य, सहनशीलता कमी होतेय. ‘यूज अ‍ॅण्ड थ्रो’ची संस्कृती आणि पाश्चात्त्यीकरण वाढीस लागलं आहे. त्यामुळं पटत नसेल तर दूर होऊया, हा विचार पटकन करणारी पिढी हळूहळू तयार होते आहे. एकीकडं आपण स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी करतो आहोत, त्या पाश्र्वभूमीवर दोघांच्या कामाचं वाटप प्रत्यक्षात होत नाही. त्यातूनही अपेक्षाभंग होतो. दोघांचीही जुळवून घेण्याची क्षमता हळूहळू कमी होत चालल्यासारखी आहे. समाज व्यक्तिकेंद्री बनत चालला आहे. घरातली कामं असतील, कौटुंबिक जबाबदाऱ्या असतील, दोघांच्या पालकांची जबाबदारी असेल, एकत्र-विभक्त राहाण्याचा निर्णय यांवर वाद होण्याची शक्यता वाढते आहे.

सकारात्मक नातं फुलवताना

आपल्या नात्याला फुलवण्यासाठी त्याला रुजून बहरू देण्यासाठी दोघांनीही कष्ट घ्यायला हवेत. कुणीही आपल्या नात्याला गृहीत धरू नये. जोडीदाराला योग्य तो वेळ द्यावा. त्याला कायम पािठबा द्यावा. प्रसंगानुरूप नात्याच्या गरजेनुसार ते समजून घ्यावं. केवळ लग्न झालं म्हणजे गोष्टी साध्य होत नसतात. त्या नात्यात तेवढीच खोली आणि समज येण्यासाठी आयुष्यभर त्या नात्याला प्रेमाचं, स्नेहाचं आणि विश्वासाचं खतपाणी स्वतच घालावं लागतं. दोघांतलं नातं कायम चांगलं ठेवलं तर त्यातल्या ताणतणावाला व्यवस्थितपणं सामोरं जाता येईल.

रिलेशनशिप म्हणजे एकमेकांचा मानसिक आधार. त्यामुळं बाकीच्या परिस्थितीशी थोडं जुळवून घ्यायला हवं. उदाहरणार्थ अनेकदा भांडण कशावरून होतं की, बायकोचा स्वयंपाक आईसारखा होत नाही आणि ती तो शिकत नाहीये. किंवा नवरा हवे तेवढे पसे कमावत नाही. अशा गोष्टींची तडजोड करायला पाहिजे. ‘ही व्यक्ती आपली आहे. तिचं आपल्यावर प्रेम आहे,’ ही गोष्ट सर्वाधिक महत्त्वाची आहे. जोडीदारावर कितीही विश्वास असेल, तुम्ही नात्याच्या सुदृढतेसाठी कितीही कष्ट घेत असाल, तडजोड केलेली असेल, तरीही नात्यात कधीतरी ताण येतो. अशा वेळी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून दोघांनी त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करावा. किंवा भोवतालांपकी अथवा त्रयस्थपणं दोघांची बाजू ऐकण्याची आवश्यकता असल्यास समुपदेशकांची मदत घेऊ शकता.

लग्नाआधीच स्वतचं आणि भावी जोडीदाराच्या वास्तवाचं भान असणं अतिशय गरजेचं असतं. लग्नाआधीच्या भेटींत अर्थार्जनाच्या अपेक्षा, भविष्य आणि करिअरचं नियोजन आदी विविध विषयांवरची एकमेकांची मतं जाणून घ्यायला हवीत. त्यामुळं विवाहनंतरचे प्रश्न सुलभ होण्याची शक्यता असते. सजगपणं आणि जाणीवपूर्वक एकमेकांशी चर्चा करायलाच हवी. लग्नानंतरही एकमेकांच्या संवादामध्ये मोकळेपणा असणं, दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टी शेअर करणं, एकमेकांच्या सल्ल्यानं निर्णय घेणं, घरातल्या जबाबदाऱ्या आणि कामाचं योग्य वाटप करणं, आíथक स्वातंत्र्य या गोष्टी आचरणात आणल्या तर समुपदेशनाला जाण्याची वेळ येणार नाही. एक सुदृढ नातं तयार होईल.

(ज्येष्ठ समुपदेशक प्रतिमा हवालदार, समुपदेशक डॉ. वाणी कुल्हाळी, समुपदेशक डॉ. जान्हवी केदारे आणि वसई येथील वलेरियन रॉड्रिक्स चर्चमधील समुपदेशक यांच्याशी केलेल्या चच्रेतून हा लेख लिहिला आहे.)

समुपदेशकाची गरज कशासाठी?

एक काळ असा होता की, आपल्या नात्यातील किंवा परिचयातील कुटुंबातील उपवर तरुण-तरुणी यांचाच विचार विवाह जुळवताना वडीलमंडळी करत असत. आज ही परिस्थिती बदलली आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय यानिमित्तानं अनेक ठिकाणी जावं लागतं. नवीन परिचय होतात, त्यामुळं योग्य/आवडता जोडीदार शोधण्यासाठी तरुण-तरुणी किंवा घरातील वडीलमंडळी यांचा शोधपरीघ विस्तारित झाला आहे. लग्न हा एक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा, आपल्या कुटुंबाखेरीज एक नवीन नातं जोडायचं असतं. हे नातं ज्या व्यक्तीशी जोडायचं असतं, त्या व्यक्तीबरोबर आपल्या आवडीनिवडी जुळाव्यात, सहवासात आनंद वाटावा अशी अपेक्षा असते. त्या व्यक्तींचं वय, शिक्षण, दिसणं इतपत ते मर्यादित नसतं. समाजव्यवस्था बदलत चालली आहे आणि निश्चितच आपल्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षाही बदलणं स्वाभाविक आहे.

पूर्वी एक प्रकारे अलिखितपणं स्त्री-पुरुषांनी करावयाच्या कामांची चौकट आखली गेली होती. आज त्यात बदल घडला आहे. विचार आणि व्यवहार स्वातंत्र्यासोबत असणारे फायदे-तोटे दोन्ही असतात. त्याचे पडसाद उमटताहेत. एकत्र कुटुंबपद्धतीत एकाच ठिकाणी दोन-तीन पिढय़ा एकत्र असत. सल्ला, मार्गदर्शन, अनुभव, निरीक्षण हे दैनंदिन जीवनात घडतच असे. आज कुटुंब छोटं झालं आहे. कधी कधी याचा वैयक्तिक घडणीवर परिणाम होण्याची शक्यता असते. अनेक प्रश्न अनुत्तरित राहातात. कधी संकोच वाटतो म्हणून तर कधी अनेकांचं ऐकल्यामुळं गोंधळ उडतो. मित्रपरिवार जवळचा वाटतो, परंतु जडणघडण वेगळी असल्यामुळं निर्णय घेणं सोपं होतंच असं नाही.

मतभेदांची कारणं

विविध गोष्टी जोडप्यामध्ये मतभेदाचं कारण ठरू शकतात. काही वेळा प्रेमविवाह असतो. एकमेकांसोबत बराच वेळ घालवलेला असतो. पण लग्नानंतर नाही जमत. कारण अनेकदा २४ तास एकमेकांसोबत राहिल्यावर ती व्यक्ती दुसऱ्याला कळू लागते. त्यात दैनंदिन सवयींपासून सगळ्या गोष्टींचा समावेश असतो. काही वेळा दोघांपकी एकाला मानसिक आजार असतो आणि त्या मानसिक आजाराशी दुसऱ्याला जमवून घेणं कठीण असतं. असा आजार कधी सांगितला जात नाही, किंवा असा आजार आहे, हे माहिती नसतं किंवा तो ओळखता आलेला नसतो. पूर्वी सासरी जाच वगरे मुद्दा असायचा, आता तो कमी झालाय. काही वेळा पशांचा प्रश्न उद्भवून तुझा-माझा आणि आपला पसा असा मुद्दा पुढं येतो. दोन्हीं बाजूंनी विवाहबाह्य़ संबंध असू शकतात, त्यावेळी परिस्थिती कठीण होते. विविध तऱ्हेची व्यसनंही कारणीभूत ठरू शकतात. काही वेळा मात्र मुलांसाठी परिस्थितीचा अपरिहार्यपणं स्वीकार केला जातो.

काळ बदलतोय…

पूर्वी आपल्या समस्या सांगितल्या जात नव्हत्या. किंवा आहे ती परिस्थिती स्वीकारली जात होती. हे प्रमाण थोडं कमी व्हायला लागलंय. आता आपल्या प्रश्नाचा कुणी मुळापासून विचार करेल का, असा विचार केला जाऊ लागलाय. लग्न केल्यावर लगेच काही गोष्टी जाणवलेले किंवा लैंगिक प्रश्न जाणवणारेही येतात. माहिती, ज्ञान, आíथक बाजू सक्षम असलेल्या या व्यक्तींनी आपापलं स्थान मिळवलंय. त्यांची बाजू मांडताना ती सयुक्तिकपणं मांडतात. मात्र त्यांना चर्चा करून निर्णय घ्यायचा आहे, स्वतच्या विचारांना पडताळून पाहायचं असतं. या सगळ्या प्रक्रियेकडं अलिप्तपणं बघता येईल का, त्याचे अनुषंगिक परिणाम काय होतील याचीही त्यांना पुरेशी कल्पना असते. आता सगळ्या मुद्दय़ांवर ही मंडळी बोलायला लागली आहेत. ‘कसं सांगू’, ‘काय सांगू’ या विवंचनेचं प्रमाण कमी झालं आहे. संगणक, नवनवीन अ‍ॅप्लिकेशन्स यांत सतत गुंतून राहाण्याचं प्रमाण लक्षणीय आहे. खूप काम असतं, वेळ नसतो ही बाब पुढं येतेय. मोकळ्या गप्पांसाठी आवश्यक असणारा वेळच नाहीये. कधीकधी माहितीची देवाणघेवाण होते, पण गप्पांच्या ओघात ‘माणूस कळणं’ राहूनच जातं.. त्यामुळं अधिकाधिक संवाद साधून समोरच्या व्यक्तीला जाणून घेणं, हे आपल्या हाती राहातं.
राधिका कुंटे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 1:24 am

Web Title: wedding special issue marriage
Next Stories
1 लग्नसराई विशेष : सार्थ लग्नम्!
2 लग्नसराई विशेष : आली मंगल घटिका…
3 लग्नसराई विशेष : आकांक्षाची स्पिन्स्टर पार्टी
Just Now!
X