News Flash

लग्नसराई विशेष : मारवाडी लग्न – बत्तिशी आणि बिछुडी

हिंदू धर्मात लग्न हा गृहस्थाश्रमाकडे जाण्याचा मार्ग आहे असे मानले जाते.

लग्न म्हणजे सहसा आयुष्यात एकदाच होणारा सोहळा. साहजिकच तो प्रत्येकाला झोकात साजरा करायचा असतो. तो करण्यासाठीचं माध्यम म्हणजे लग्नसोहळ्यातल्या वेगवेगळ्या प्रथा, परंपरा. आपल्याच परंपरा प्राचीन, समृद्ध असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण आपल्या देशातल्या काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत विविध प्रांतांमधल्या लग्नपद्धती, परंपरा यांच्यावर एक नजर टाकली तर थक्क करणारं वैविध्य पाहायला मिळतं.

स्वप्ना अय्यंगार, ग्रीष्मा नायर, शलाका सरफरे, भाग्यश्री प्रधान, अश्विनी पारकर

हिंदू धर्मात लग्न हा गृहस्थाश्रमाकडे जाण्याचा मार्ग आहे असे मानले जाते. हा रस्ता पार करताना बालपण आणि शिक्षणाचे दिवस सरले की आपसुकच मुलगा काय करतो किंवा मुलगी काय करते, लग्नाचं बघताय का असे प्रश्न नातेवाईक तसेच शेजाऱ्या-पाजाऱ्यांकडून  विचारले जातात. भारतात प्रांत, जाती-धर्म वेगवेगळे असल्याने प्रत्येकाच्या रीतीरिवाजामध्ये थोडाफार प्रमाणात फरक आढळतोच. आपल्या प्रांताव्यतिरिक्त इतर प्रांतातील लग्न कसे असते हे जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. राजस्थान हे खरे तर वाळवंट, उष्ण वारे, उंट आदी गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. मात्र या गोष्टींबरोबरच घागरा, नृत्य, गोड भाषा या सर्वच गोष्टीमुळेदेखील प्रसिद्ध राज्य. याच राज्यातील लग्नपद्धतीही त्यांच्या भाषेप्रमाणेच आछो (छान) आहे.

मुलामुलींना बघण्याचा कार्यक्रम करताना मुलाचे वय २५ तर मुलीचे वय २२-२४ असते. पूर्वी हे वय आणखी कमी असायचे. परंतु आता काळानुसार काही पद्धतीत फरक पडला आहे. लग्न करताना सर्वप्रथम वराची (मुलाची) सर्व माहिती असलेला एक अर्ज वधूकडील (मुलीकडील) मंडळी पाहतात. त्यामध्ये दादी, नानी, मामा आणि त्या मुलीचं स्वत:चं आडनाव बघितले जाते. त्याला चार शाखा असे म्हटले जाते. उदाहरणार्थ मुलाची दादी आणि मुलीची दादी यांचे माहेरचे आडनाव समान असेल तर त्या स्थळाबद्दल पुढे विचार करायचा की नाही असा प्रश्न पडतो. आजकाल ही पद्धत थोडी मागे पडत चालली आहे. त्यानंतर मुलाची माहिती चांगली असल्यास मुलीचे आई-बाबा आणि नातेवाईक मुलाला बघावयास येतात. त्यानंतर त्यांना  मुलगा आवडल्यास मुलीकडील नातेवाईक मुलीला बघावयास येण्यासाठी निरोप देतात. हा निरोप मिळाल्यानंतर मुलगा आणि मुलाकडील घरातील मोठी व्यक्ती मुलीच्या घरी तिला बघावयास जातात. दोघांना एकत्र बोलायला देतात आणि त्यानंतर त्यांची पसंती विचारात घेऊन मुलीचे नातेवाईक लग्नासाठी होकार कळवतात. साखरपुडय़ाचा (सगाई) कार्यक्रम आयोजित केला जातो. हा कार्यक्रम मुलींच्या घरी पार पडतो. यावेळी मुलीच्या घरातील मंडळी आणि मुलाच्या घरातील मंडळीच उपस्थित असतात. यावेळी बाहेरील कोणालाही बोलावले जात नाही.

त्यानंतर सावाकाट (लग्नाची तारीख) काढण्यासाठी मुलीकडचे नातेवाईक मुलाकडे जातात. त्यावेळी वराच्या घरी ब्राह्मण बोलवला जातो. यावेळी सात फेऱ्यांसाठी एक मुहूर्त आणि लग्नासाठी एक मुहूर्त काढला जातो. लग्नाची तारीख ठरल्यानंतर मुलाने त्याच्या मामाक डे आणि मुलीने तिच्या मामाकडे बत्तिशी घेऊन जावे लागते. या बत्तिशीमध्ये पांढऱ्या कापडात साखरेचे बत्तासे, पैसे, ड्रायफ्रुट बांधलेले असते. ते मामा-मामीला देऊन लग्नाची तारीख काढली जाते. यावेळी त्यांच्याबरोबर आलेल्या इतर सर्व नातेवाईकांचा जेवणाचा खर्च मामा-मामी करतात. मुख्य विवाह सोहळा हा दोन किंवा तीन दिवसांचा असतो. यामध्ये कुंकू-पिठी-चाक-बान असा एक प्रकार असतो. यामध्ये कुंकू लावले जाते त्यानंतर कुंभाराकडे जाऊन चाकाची पूजा केली जाते. यावेळी मातीचे चार ढीग बनवले जातात. यातील एखाद्या ढिगामध्ये दागिना लपवलेला असतो. ज्या मातीत आपण जन्माला आलो त्या मातीची पूजा करण्यासाठी आणि आई-वडिलांनी चालवलेले चक्र पूर्ण करणार आहे, यासाठी चाकाच्या पूजेचा विधी केला जातो. मुलीकडेही हे सर्व विधी केले जातात. पिठी दस्तुर म्हणजेच हळदीचा कार्यक्रम केला जातो. हा हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर आंघोळ करून बान म्हणजेच गणेश पूजन केले जाते. मात्र पिठी दस्तुर (हळद) लागल्यानंतर मुलगा आणि मुलगी घराबाहेर पडत नाहीत. त्याच दिवशी सायंकाळी संगीताचा कार्यक्रम केला जातो. त्या दिवशी शक्य झाले नाही तर हा कार्यक्रम दुसऱ्या दिवशीही केला जातो. आजकल वधू आणि वराकडील संगीत कार्यक्रम एकत्र केला जातो. या कार्यक्रमात मारवाडी गाणी, मारवाडी नृत्य, दांडिया सादर होतात. लग्नासाठी वर आणि त्याचे सर्व नातेवाईक वधूकडे येतात. त्यांची राहण्याची सर्व सोय वधूकडील मंडळीतर्फे केली जाते. मुलाकडील मंडळीचे तिलक लावून स्वागत केले जाते. त्यांना चहा-नाश्ता दिला जातो. त्यानंतर मुलाकडील सर्व मंडळी मुलीसाठी घेतलेल्या चप्पल, लग्नाची साडी, दागिने आदि वस्तूंची देवाण करतात. त्यानंतर मुलगी मामाने दिलेली लाल-पांढऱ्या रंगाची साडी नेसून सात फे ऱ्यांसाठी उभी राहते. या सात फेऱ्या मारताना मुलाचा आणि मुलीचा उजवा हात एकमेकांच्या हातात देतात. यावेळी मुलांच्या तळहातावर ओल्या मेहंदीचा गोळा आणि त्यावर एक रुपयाचा शिक्का ठेवला जातो आणि हातावर पांढऱ्या रंगाचा रुमाल पांघरला जातो. या सातफेऱ्या झाल्यानंतर मुलीचे आईवडील कन्यादान करतात. यावेळी मुलाचे आईवडील लांबूनच सर्व लग्न पाहतात. वर वधूच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो. तसेच भांग भरून बिछुडी (जोडवी) घातली जातात. यावेळी मुलीच्या उजवीकडे मोड (एक प्रकारचा धागा) आणि मुलाच्या डावीकडे मोड बांधले जातात. हे सर्व विधी पार पडल्यानंतर दुपारचे जेवण होते. वधू व वराकडील मंडळी आराम करण्यासाठी जातात. त्यानंतर सायंकाळी ५.३० ते रात्री ११ वाजेपर्यंतचा एखादा मुहूर्त लग्नासाठी काढलेला असतो. यावेळी नवरामुलगा घोडय़ावरून वरात घेऊन आल्यानंतर तो दारावरील तोरण काठीने हालवतो. त्यानंतर त्याला मुलीकडील महिला मंडळीकडून टिळा लावला जातो. यावेळी मुलीकडील सुवासिनी महिला जावयाचे नाक धरण्याचा प्रयत्न करतात. ज्या महिलेच्या हातात नाक येईल ती महिला नशीबवान आहे असे मानतात. त्यानंतर मुलगा-मुलगी एकत्र मंडपात येतात. त्यावेळी नवकार मंत्र म्हटले जातात. आणि शुभमंगल सावधान झाल्यानंतर वरमाला घातली जाते. त्यानंतर जेवताना नवरानवरी एकमेकांना घास भरवितात.

मुलीचे आई-बाबा तिला बिदाईला गुलाबी रंगाचीच साडी देतात. ती साडी नेसून मुलीची पाठवणी करण्याची प्रथा आहे. यावेळी नवऱ्या मुलाला एका चौरंगावर बसवतात आणि त्याच्या पाठीवर एक पांढऱ्या रंगाचे कापड टाकतात. या कापडावर नवरीचा भाऊ त्याच्या हाताने कुंकुवाचा छाप काढतो. त्यानंतर नवरी सर्वाची भेट घेऊन निघते. घरात प्रवेश करताना नवरीला तांदळाचे माप ओलांडावे लागते. पाय कुंकवाचे पाण्यात भिजवून नवरी घरभर फिरते. नवरीच्या रूपाने घरात लक्ष्मी प्रवेश करते अशी या प्रथेमागची समजूत आहे. एकावर एक अशा सात पराती ठेवलेल्या असतात. नवरदेव त्या पराती काठीने वेगवेगळ्या करतो. नवरीमुलगी  सासूच्या मदतीने त्या परातींचा आवाज न करता पुन्हा एकावर एक ठेवते. तर एका परातीत ताकाचे पाणी गुलाबाच्या पाकळ्या आणि एखादा दागिना घालून नवरा-नवरीला शोधायला लावतात. त्यानंतर घरातील मोठय़ा व्यक्तीं चौरंगावर बसतात आणि सूनमुख पाहतात. यावेळी नवऱ्यामुलीला दागिने किंवा वस्तू दिल्या जातात.

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सुनेने बनविलेल्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखविला जातो आणि त्या पदार्थाचा आस्वाद घरातील मोठय़ा मंडळीकडून घेतला जातो. लग्नाचे सारे विधी येथे संपतात. मात्र लग्नाचा सारा खर्च मुलीच्यांकडूनच केला जातो.
भाग्यश्री प्रधान – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 1:19 am

Web Title: wedding special issue marwari marriage
Next Stories
1 लग्नसराई विशेष : तमीळ लग्न – वराची काशीयात्रा आणि उंझल
2 लग्नसराई विशेष : बंगाली लग्न – पाटी पात्रो आणि बऊ भात
3 लग्नसराई विशेष : गुजराती लग्न – समुरता आणि हस्तमिलाप
Just Now!
X