एकेकाळी जवळचा काका-मामा, मावशी-आत्या करत असे ते काम आता मॅट्रिमोनियल साईट्स करू लागल्या आहेत. लग्न जुळवण्यासाठी मुलीच्या आईवडिलांना आता वरपक्षाचे उंबरठे झिजवावे लागत नाहीत, तर कॉम्प्युटरचा कीबोर्ड बडवावा लागतो. लग्न ठरवण्याच्या या ऑनलाइन ट्रेण्डविषयी..

चार नातेवाईक एकमेकांना भेटले की ज्या काही चर्चा होतात त्यामध्ये एक विषय अगदी हटकून येतो, तो म्हणजे त्या गोतावळ्यातील लग्नाळू मुला-मुलींचा. त्या गोतावळ्यात अमक्याची मुलगी, नाहीतर तमक्याचा भाचा, कुणाची नात, कुणाचा पुतण्या यंदा कर्तव्य आहे गटातला असतो. मग त्याचे गुण-अवगुण वर्णन सुरू होते. त्याच गोतावळ्यात कोणीतरी लग्न जमवण्याचे उद्योग करणारा असतो. किंबहुना तो स्वयंघोषितपणे त्या अमुकतमुकच्या नातीच्या, भाच्याच्या लग्नाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतो. कधी काळी हे अगदीच मर्यादित वर्तुळात होत असे. पण अगदी खेडोपाडय़ापासून ते शहरांपर्यंत सर्रास दिसणारे चित्र होते. सोयरीक जुळवणारे तर अगदी हमखास त्यासाठीच ओळखले जायचे. किंबहुना भारतीयांच्या व्यवच्छेदक लक्षणामध्येच त्याचा समावेश होतो असे म्हणावे लागेल. पण लग्न जुळवण्यासाठी हाच आणि हाच एकमेव पर्याय आहे का? किंबहुना तीस-चाळीस वर्षांपूर्वीच विवाह मंडळांच्या आगमनानंतर यात बराच बदल झाला आहे. त्याचबरोबर वृत्तपत्रातील विवाह जाहिरातींनीदेखील लग्न जुळवण्याची संधी दिली. गोतावळ्यातील चर्चा होत असतातच, पण त्यापलीकडे जाऊन उपलब्ध झालेला विवाह मंडळांचा आणि वृत्तपत्रातील जाहिरातींचा पर्याय अनेकांना सोयीस्कर वाटू लागला. अर्थातच त्यामुळे अगदी जवळच्या नातेवाईकांनादेखील लग्न ठरल्यावरच कळू लागले.

Royal Enfield Bullet Fire On Road In pune Bullet catches fire due to extreme heat
पुणेकरांनो सावधान! पहिल्यांदा स्फोट, नंतर आग, नवी कोरी बुलेट भररस्त्यात जळून खाक; VIDEO होतोय व्हायरल
another sort of freedom 2
काळाबरोबर वाहणं..
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?
diver artist uma mani began exploring new depths to life at age 49
४९ व्या वर्षी शिकल्या स्कुबा डायव्हिंग; आज समुद्र संरक्षणासाठी करतायत मोलाचे काम; कोण आहेत उमा मणी?

साधारण ९०च्या दशकात इंटरनेटच्या वापरामुळे हे सारे चित्र पूर्णपणे बदलून गेले. आजवर गोतावळ्यात सुरू असणारी चर्चा, विवाह मंडळांतील पायपीट किंवा वर्तमानपत्रातून मोजक्याच आणि किचकट शब्दांत मांडलेले व्यक्तिमत्त्व या साऱ्याला मॅट्रिमोनिअल वेबसाइटनी थेट पर्याय उभा केला. अगदी थेट आव्हानच. पण इंटरनेट आपल्या रक्तात अजून भिनलेलं नव्हतं. १९९७ ला शादी डॉट कॉम (पूर्वीचे सगाई डॉट कॉम), नंतर लगेच आलेले भारत मॅट्रिमोनी, गेल्या पाच-दहा वर्षांत विवाह, बंधन, हमसफर, जीवनसाथी अशा आज जवळपास पन्नास-शंभर पोर्टल्सनी सोयरीक करण्याचे अक्षरश: लाखो पर्याय निर्माण केले आहेत.

खरं तर लग्न ही अत्यंत वैयक्तिक बाब. पण लग्नाला अनुरूप मुलगा-मुलगी शोधणे हे नाही म्हटले तर आपल्याकडे सार्वजनिक कामच झालेय. अर्थातच मॅट्रिमोनिअल साइट्सवरचा सुरुवातीचा प्रतिसाद अगदीच तोकडा म्हणावा असा होता. किंबहुना काहीच कोठेच जमत नसेल तर मॅट्रिमोनिअल साइट्सवर पण नोंदणी करायची असाच एक कल काही वर्षांपूर्वीपासून दिसून येतो. आजदेखील काही प्रमाणात हा कल आहेच. पण एकूणच येथील वावर हा गेल्या पाच वर्षांत वाढलेला आहे. शादी डॉट कॉम या वेबसाइटवर तब्बल ३५ दशलक्ष प्रोफाइल्सची नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी ३० टक्के प्रोफाइल्स हे एनआरआय आहेत.

येथे गर्दी वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे तंत्रज्ञानाने दिलेली वर्गीकरणाची सुविधा. एखाद्या विवाह मंडळात अथवा वृत्तपत्रात किचकट जाहिरातींतून आपल्याला हवा तो मुलगा किंवा मुलगी शोधण्याच्या अवघड कामातून या पोर्टल्सनी तुमची सुटका केली. शहर, खाण्यापिण्याच्या सवयी, व्यसने, नोकरी, शिक्षण, आवड, पगार असे किमान २५ – ३० रकाने यामध्ये असतात. वय, उंची, वजन वगैरे मूलभूत बाबी तर आहेतच. पण या सर्व माहितीचे वर्गीकरण अगदी सहज होत असल्यामुळे अपेक्षित मुलगा-मुलगी शोधण्याचे काम सोपे होते. पत्रिका पाहणे वैगरे तर अगदी सर्रास सर्व साइट्सवर आढळते. पण इतर स्वभावविशेष आणि त्यानुसारच्या अपेक्षा किती जुळतात हेदेखील हल्ली प्रत्येक साइटवर गणित करून मांडले जाते. आणि त्यानुसार रोजच्या रोज तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकणाऱ्या स्थळांची माहिती ई-मेल्स, मोबाइल मेसेजेस अशा माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहचत असते. इतक्या विस्तृत वर्गीकरणाची गरज का आहे यासंदर्भात शादी डॉट कॉमचे मुख्य विपणन व्यवस्थापक अदित्य सावे सांगतात की, लग्न करताना प्रत्येकजण समान गुणधर्म शोधत असतो. कुठूनतरी पुढील टप्प्यावर जाण्याची सुरुवात करणे गरजेचे असते. त्यामुळे किमान आवश्यक गोष्टी तर येथे द्याव्या लागतातच, पण त्याचबरोबर पूरक माहिती आम्ही देत असतो. जेणेकरून लोकांचा वेळ वाचू शकेल.

अशा अनेक चाळण्या लागल्यानंतर जेव्हा तुम्हाला एखादे स्थळ पसंत पडते तेव्हा पुढील बोलणी करण्यासाठी अनेक साइट्स या तुमच्याकडून अतिरिक्त आकार घेतात. किंबहुना तुमचे प्रोफाइल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी विशेष सभासदत्वदेखील घेता येते.

मॅट्रिमोनिअल साइट्सवर इतक्या सर्व चाळण्या असल्या तरी त्याबाबत अनेकांचे आक्षेप ऐकायला मिळतात. तेथे खोटी माहिती टाकलेली असते, मॅट्रिमोनिअल साइटवर जुळलेली लग्ने मोडण्याचे प्रमाण अधिक आहे असा आक्षेप मध्यंतरी चर्चेत होता. एका वृत्तपत्राने तर महानगरातील अध्र्याहून अधिक घटस्फोट हे मॅट्रिमोनिअल वेबसाइटवरील जुळलेल्या लग्नापैकी असल्याचे मांडले होते. आपल्या पारंपरिक रचनेत लग्न ठरवताना सासर-माहेरची माणसे कसून चौकशी करतात. सोयरीक जुळवण्यातला तो एक महत्त्वाचा टप्पाच असतो. अशीच चौकशी खरे तर मॅट्रिमोनिअल साइटवर स्थळ पसंत पडलेल्यांनी करण्याची गरज असल्याचे यातून अधोरेखित होताना दिसते. पण आपल्या भारतीय डिजिटल निरक्षर मानसिकतेमुळे, इंटरनेटवर दिसते ते खरे मानायची आपली सवयच येथे नडते.

मॅट्रिमोनिअल साइटवरील गर्दीचं विश्लेषण करायचे तर येथे अगदी १८ वर्षांपासून ते पन्नास-साठीच्या घरातील सर्वासाठी सर्व स्थळे उपलब्ध आहेत. घटस्फोटित, विधवा/विधुर यांच्या प्रोफाइल्सची देखील येथे गर्दी दिसून येते. ही या सुविधेची जमेची बाजू म्हणावी लागेल. कोणालाही न भेटता घरबसल्या आपली माहिती वेबसाइटवर अपलोड करायची सुविधा हा त्यामागील महत्त्वाचा घटक म्हणावे लागेल. विशेषत: घटस्फोटित, विधवा/विधुर आणि वयस्क अशांसाठी ही सुविधा कोणताही मानसिक त्रास होऊ न देता वापरणे शक्य झाले आहे.

हे माध्यम जरी इंटरनेट आधारित असे प्रगत माध्यम असले तरी त्यावरील वावर हा बऱ्यापैकी पारंपरिकच आहे असे दिसून येते. आघाडीच्या पोर्टल्सचा आढावा घेतला तर लक्षात येते की, देशातील यच्चयावत जाती-जमातींसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. ही यंत्रणा इतकी विस्तृत आहे की अगदी देशस्थ-कोकणस्थ अशा उपजातींपर्यंत विभागली आहे. आपल्या समाजरचनेत मुळापर्यंत रुजलेल्या विवाहरचनेचे हे ऑनलाइन प्रतीकच म्हणावे लागेल. त्यामुळे आजकालचे तरुण-तरुणी जातीपाती-धर्माला इतके महत्त्व देतात का, असा प्रश्न पडतो. त्याचे उत्तर हो असेच आहे. आणि विविध पोर्टल्सवरील हे वर्गीकरण नेमकेपणाने दिसून येते. वर्षभरापूर्वी ‘लोकप्रभा’ने केलेल्या सर्वेक्षणातूनदेखील जाती-धर्माच्या बंधनाची अपेक्षा अधोरेखित करण्यात आली होती हे येथे यानिमित्ताने नमूद करावे लागेल.

अर्थातच अशा जाती-धर्माच्या आणि अगदी बारीक बारीक तपशिलांच्या वर्गीकरणामुळे हवे ते स्थळ शोधायला सोपे असणे ही गरज असल्याचा फायदा मॅट्रिमोनिअल साइट्सना लोकप्रिय करण्यात हातभार लावताना दिसतो. त्यामुळे व्यवसायवृद्धीमध्ये या अशा जातीपाती-धर्माधारित विभागणीची गरज असल्याचे दिसून येते.

त्याच जोडीला गेल्या चार-पाच वर्षांत जवळपास सर्वच पोर्टल्सनी स्वत:ची अ‍ॅप विकसित केली आहेत. त्यामुळे मोबाइलवरून आपापल्या सोयीने स्थळांचा शोध घेण्याकडे कल वाढत असल्याचे अनेक साइट्सच्या आकडेवारीवरून दिसून येते. शादी डॉट कॉमच्या पोर्टलचा ७० टक्के वापर हा मोबाइल अ‍ॅप्सच्या माध्यमातून केला जातो. वैयक्तिक, खाजगी अशा या बाबीमध्ये संगणकावर ही शोधाशोध करण्यापेक्षा मोबाइल अ‍ॅप असणे सोपे जात असल्यामुळे या वापरावर भर दिल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

मॅट्रिमोनिअल साइट्सचा इतका बोलबाला झाला असला तरी ग्रामीण भागात आजदेखील त्याचा फारसा वापर होताना दिसत नाही. त्यासंदर्भात शादी डॉट कॉमचे मुख्य विपणन व्यवस्थापक अदित्य सावे सांगतात की, ग्रामीण भागात आजदेखील ओळखीपाळखीतून लग्ने जुळवली जातात. जेथे आजूबाजूला कोणीच ओळखीचे नाही तेथे ऑनलाइनचा आधार घेतला जातो. त्यामुळे शहरी भागात (जिल्ह्य़ाच्या ठिकाणी) मॅट्रिमोनिअल साइट्स वापरण्याचे प्रमाण बरेच आहे. मुख्यत: इंटरनेट कनेक्टिव्हिटी हा देखील महत्त्वाचा घटक असल्यामुळे शहरातील वापर वाढताना दिसतो.

यात सर्वात महत्त्वाचा नोंद घेण्याचा भाग म्हणजे तरुणाईचा थेट वाढता सहभाग. मुला-मुलीचे लग्न ठरवणे ही आपल्याकडे आजही आई-वडिलांची जबाबदारी असे आजही मानले जाते. पालक-पाल्य यांच्यातील जबाबदारी आणि कर्तव्याचे समीकरण आजही रूढ आहे. पण मॅट्रिमोनिअल साइटच्या विस्तारानंतर स्थळ शोधण्यात आणि लग्न ठरविण्याची जबाबदारी मुला-मुलींकडे हस्तांतरित झालीय असे म्हणायचे का? आज शादी डॉट कॉमवरील ७० टक्के प्रोफाइल्स हे मुलाने अथवा मुलीने स्वत:च भरलेले आहेत. हा बदल नेमका काय दर्शवतो?  याबाबत अदित्य सावे सांगतात, ‘‘आपल्याकडे लग्न हा घरातील प्रत्येकाचा सहभाग असणारा विषय. प्रत्येकाला काही ना काही तरी त्यात भूमिका बजावायची असते. आज मुले-मुली स्वत:च स्थळ शोधत असले तरी हे काम पूर्णपणे त्यांच्या हातात गेलेय असे म्हणता येणार नाही. तर लग्नाच्या प्रक्रियेमधील मुला-मुलींचा थेट सहभाग आता वाढला आहे. किंबहुना त्यांच्या मताचे महत्त्व त्यातून अधोरेखित होताना दिसते.’’

आज अगदी प्रत्येकजण प्रेमविवाह करत नसला तरी अ‍ॅरेंज मॅरेजमध्ये देखील आजच्या पिढीतील मुले-मुली स्वत:चे निर्णय स्वत:च घेताना दिसतात. मॅट्रिमोनिअल वेबसाइट हा अर्थातच त्यासाठी गरजेचे माध्यम म्हणावे लागेल. देशातील अठरापेक्षा अधिक वयोगटातील एकूण ८१ कोटी ४५ लाख लोकसंख्येच्या निम्मी संख्या ही १८-३५ या गटातील आहे. आणि ही पिढी चांगलीच टेक्नोसॅव्ही आहे. एक पर्याय म्हणून किंवा गरज म्हणून ते अशा पोर्टल्सचा वापर करतच राहाणार. त्यातील गुणदोष तपासावे लागतील पण त्यातूनच एक मोठी उद्योगव्यवस्था तयार झालेली दिसून येते. शादी डॉटकॉम, भारत मॅट्रीमोनी यांनी ऑनलाइन सोयरीकची सुविधा दिली आहे तर आता त्याच जोडीने अनेक नव्या पोर्टल्सनी त्याहीपुढे जाऊन लग्नाचा हॉल, मेकअप, फोटोग्राफी, हनिमून बुकिंग अशा सुविधा द्यायला सुरुवात केली आहे. आणि हे सर्व ऑनलाइनच्या माध्यमातून पुरवले जाते. भारत मॅट्रिमोनी तर लवकरच ३५० कोटी रुपयाचे भागभांडवल जमा करण्यासाठी शेअर बाजारात उतरणार आहे. एका सर्वेक्षणानुसार भारतातील या मॅट्रिमोनिअल पोर्टल्सचा म्हणजेच ऑनलाइन सोयरीकीचा व्यवसाय २०१७ पर्यंत २२५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या घरात जाण्याची शक्यता आहे. याच सर्वेक्षणानुसार २०१३ साली देशात जवळपास ५० दशलक्ष लोक मॅट्रिमोनिअल वेबसाइटचा वापर करतात. आज एकटय़ा शादी डॉटकॉमवरच ३५ दशलक्ष सभासद आहेत. ही सारी आकडेवारी एकंदरीतच भविष्यातील या ऑनलाइन सोयरीकीकडे निर्देश करणारी आहे.

माहितीची खात्री आणि फसवणूक

ऑनलाइन असणारी माहिती ही पूर्ण खरी मानणारे आणि इंटरनेटवर असणाऱ्या घटकांना काही अर्थ नसतो असे थेट विभाजन आपल्याकडे आढळते. मॅट्रिमोनिअल वेबसाइट्च्या वाढत्या वापरानंतर या विषयावर अनेक वेळा चर्चा झाली. २०१२ मध्ये अशाच एक पोर्टलच्या आधारे एका महिलेची गंभीर फसवणूक उघडकीस आली होती. परदेशी राहात असल्याचे खोटे प्रोफाइल तयार करून मिशेल विल्यम्स नामक व्यक्तीने मुंबईतील एका महिलेला तब्बल दोन लाख ९३ हजारांचा गंडा घातला होता. न्यायालयात या खटल्याच्या निकालात यामध्ये मॅट्रिमोनिअल साइटचा दोष नसल्याचे कोर्टाने नमूद केले. अर्थातच ऑनलाइन सोयरिकीमध्ये पोर्टलची भूमिका नेमकी कुठे संपते आणि ग्राहकाची भूमिका कुठे सुरू होते याबाबत आपल्याकडे नाही म्हटले तरी गोंधळच आहे. याबाबत केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१५ मध्ये मॅट्रिमोनिअल साइटच्या नियमनासाठी एक समिती नेमली होती. त्याबाबतचा अहवाल जून २०१६ मध्ये सरकारला सादर करण्यात आला होता. तो आजही पूर्णपणे जाहीर करण्यात आलेला नाही. पण या शिफारसींनुसार प्रत्येक सभासदाची ओळख व्हेरिफाय करणे पोर्टलवर बंधनकारक करण्यात आले आहे.  तसेच वापरकर्त्यांच्या आयपी अ‍ॅड्रेसचा ट्रॅक ठेवणे बंधनकारक आहे. तसेच आपली वेबसाइट ही लग्न जुळवणारी आहे डेटिंगसाठी नाही हे स्पष्ट करणे बंधनकारक केले आहे. अर्थात या शिफारसींबद्दल आजही पोर्टल्समध्ये संदिग्धता दिसून येते.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com @joshisuhas2