News Flash

लग्नसराई विशेष : पंजाबी लग्न – वरना आणि मिलनी

पंजाबी लग्नामध्ये सगळ्यात पहिला विधी मंगनी किंवा शगुनचा असतो.

लग्न म्हणजे सहसा आयुष्यात एकदाच होणारा सोहळा. साहजिकच तो प्रत्येकाला झोकात साजरा करायचा असतो. तो करण्यासाठीचं माध्यम म्हणजे लग्नसोहळ्यातल्या वेगवेगळ्या प्रथा, परंपरा. आपल्याच परंपरा प्राचीन, समृद्ध असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण आपल्या देशातल्या काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत विविध प्रांतांमधल्या लग्नपद्धती, परंपरा यांच्यावर एक नजर टाकली तर थक्क करणारं वैविध्य पाहायला मिळतं.

स्वप्ना अय्यंगार, ग्रीष्मा नायर, शलाका सरफरे, भाग्यश्री प्रधान, अश्विनी पारकर

भारताच्या सगळ्या प्रांतांमध्ये लग्नाच्या विधीमध्ये बरेचसे साम्य असले तरी त्यांचे नामकरण मात्र भिन्न स्वरूपात आढळून येते. लग्नापूर्वी, मुलीच्या घरी आणि मुलाच्या घरी करायच्या विधी तसेच लग्नाच्या विधी असे लग्न परंपरेमध्ये वेगवेगळे भाग असतात. या पद्धतीत बऱ्याचशा सारख्याच स्वरूपात आढळतात. पंजाबी विवाह सोहळा म्हटला तर भांगडा नृत्य, लग्नापूर्वीची जय्यत तयारी आणि शाही विवाह सोहळा डोळ्यासमोर उभा राहतो. पंजाबी संस्कृतीचं प्रतिबिंब या शाही सोहळ्यामध्ये दिसून येत असतं.

लग्नापूर्वीचे विधी

पंजाबी लग्नामध्ये सगळ्यात पहिला विधी मंगनी किंवा शगुनचा असतो. मुलीच्या घरचे भेटवस्तू, दागिने आणि अन्य साहित्यासोबत सगाई ठरवण्यासाठी मुलांच्या घरामध्ये दाखल होतात. आणि तेथे सगाईचा दिवस ठरवून दोन्ही कुटुंबांची भेट होत असते. त्यामध्ये रोका हा एक छोटेखाने कार्यक्रम होत असतो. त्यावेळी कुटुंबीय, मित्रमंडळी आणि नातेवाईक होणाऱ्या जोडीला आर्शीवाद देतात. मुलीचे मामा मुलीला भेट वस्तूच्या स्वरूपात नथ देतात. हीच नथ मुलगी लग्नामध्ये घालत असते. सगाईचा दिवस ठरलेला असतो. हा दिवस लग्नाच्या दहा दिवस ते एक आठवडा आधी असतो.  यामध्ये मुलीचे कुटुंबीय मुलाच्या घरामध्ये भेटवस्तू आणि तिलक लावण्याचे सामान घेऊन जातात. मुलीचे वडील मुलाच्या कपाळावर टिळा लावतात आणि आशिर्वाद देतात. आणि त्या बदल्यात मुलाकडची मंडळी सात सुक्या फळांची टोपली मुलीला भेट म्हणून देतात. त्यानंतर वधू-वर एकमेकांना अंगठय़ा घालतात. लग्नाच्या आदल्या दिवशी मेहंदीचा कार्यक्रम रंगतो. अत्यंत दिमाखामध्ये साजरा होणाऱ्या या सोहळ्यासाठी वधू आणि वराच्या घरामध्ये मेहंदी लावणाऱ्यांना बोलावले जाते. घरातील सगळ्या महिलांना मेहंदी लावण्यात येते. वधूच्या दोन्ही हात आणि पायांवर मेहंदी लावण्यात येते. विशेष म्हणजे वधूला लावण्यात येणारी मेहंदी तिची होणारी सासू पाठवत असते.

वधू-वरांच्या घरातील कार्यक्रम

लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांमध्ये मुलीच्या घरामध्ये चुडा हा एक विशेष सोहळा असतो. पंजाबी लग्नातील वधूला लाल आणि क्रीम रंगाच्या बांगडय़ांचा संपूर्ण सेट दिला जातो. मुलीचा मामा तिला या बांगडय़ा देतो. या बांगडय़ा वधूने लग्नापूर्वी पाहायच्या नाहीत, असा संकेत आहे. लग्न मंडपात जाईपर्यंत तो चुडा रुमालाने झाकून ठेवला जातो. मुलीच्या घरामध्ये हळदीचा कार्यक्रमही धूमधडाक्यात साजरा होतो. घरामध्ये चार दिवे लावले जातात. त्याच्या समोर मुलीला बसवण्यात येते. मुलीचे मित्रमैत्रिणी, कुटुंबीय आणि नातेवाईक हळद आणि तेलाचा लेप मुलीच्या शरीराला लावतात. मुलीचा चेहरा चमकण्यासाठी हा विधी केला जातो. हा विधी झाल्यानंतर वधू आणि वरांनी एकमेकांना भेटू नये अशीही परंपरा तिथे आहे. एकीकडे मुलीच्या घरात लग्न सोहळ्याचा उत्साह वाढत असतो. तर मुलाच्या घरामध्येही वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात.

सरबाला हा वराच्या घरातील एक कार्यक्रम असून या वेळी एका लहान मुलाला नवऱ्या मुलाप्रमाणे सजवण्यात येते. हाच मुलगा नवऱ्यामुलासोबत घोडय़ावर बसतो. वराच्या बहिणीच्या मुलाला अर्थात भाच्याला किंवा छोटय़ा भावाला हा मान दिला जातो. लग्नाच्या विधीसाठी जाण्यास नवरामुलगा तयार झाल्यानंतर त्याची बहीण त्याची पूजा करून त्याच्या डोक्याला सेहरा बांधते. तर वराची भावजय पुढे येऊन त्याची नजर काढते. त्याला काजळाचा टिळा लावला जातो याला वरना असे म्हणतात. त्यानंतर घोडय़ावर चढणे हा विवाहपूर्वीचा सगळ्यात शेवटचा विधी असून त्यानंतर विवाहाच्या स्थळी नवरामुलगा दाखल होतो.

लग्नाचा मुख्य विधी…

लग्नाच्या ठिकाणी दाखल झालेल्या नवरामुलाचे आणि वधूचे कुटुंबीय एकमेकांना भेटतात. पुजारी यावेळी अरदास वाचन करतात याला मिलनी असे म्हटले जाते. विवाह स्थळी एकमेकांसमोर आलेले मुलगा आणि मुलगी एकमेकांना वरमाला घालतात. त्यानंतर कन्यादान आणि फेऱ्यांचा विधी सुरू होतो. मुलीचे वडील मुलाच्या हातात अंगठी घालून त्याची मुलगी नवऱ्याच्या स्वाधीन करतात. अग्नीला साक्षी ठेवून फेरे मारले जातात. त्यानंतर नवरामुलगा नवरीच्या भांगामध्ये सिंदूर भरून गळ्यात मंगळसूत्र घालतो. मोठय़ांचे आशीर्वाद घेऊन पंजाबी विवाह पार पडतो.
शलाका सरफरे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 1:15 am

Web Title: wedding special issue punjabi marriage
Next Stories
1 लग्नसराई विशेष : तेलुगु लग्न – पेलिकुथुरू  आणि जीलकरा बेल्लम
2 लग्नसराई विशेष : हे बंध रेशमाचे… पहिल्या भेटीत प्रेमात – मृण्मयी देशपांडे
3 लग्नसराई विशेष : सहजीवनाची गुरुकिल्ली
Just Now!
X