लग्न होऊन त्या घराचं माप ओलांडलं की सुरू होते, नवी भूमिका, नवं आयुष्य, नव्या जबाबदाऱ्या. म्हणूनच या नव्या आयुष्यात पाऊल ठेवण्याआधी स्पिन्स्टर पार्टी.. मुली सगळी ओझी फेकून देऊन या पार्टीत एकदम धमाल करतात आणि मग नव्या आयुष्याला सामोरं जायला सज्ज होतात.

चिप्सची पाकिटे सोफ्यावर पडलीयेत. कोल्ड ड्रिंक्सच्या बाटल्या जमिनीवर. आकांक्षा तिच्या लॅपटॉपवर काहीतरी काम करीत बसलीए.

‘‘अरे, याला काय अर्थ आहे. आपण आठ वाजता भेटायचं ठरवलेलं ना.. सव्वानऊ होत आले. ही पारो राहिली कुठे अजून..? सगळा मूड स्पॉइल करते यार.. अक्की कॉल कर पुन्हा तिला, मगाशी निघालेली ना घरून, आता कुठे हरवलीए का रस्त्यात..?’’ वैतागून(?) चिप्सचा बकाणा तोंडात भरत सायलीने जवळपास ओरडतच आकांक्षाला सांगितलं. तिच्या वैतागवाडीवर आकांक्षा काही बोलणार तेवढय़ात दारावरची बेल वाजली.

‘‘आली भवानी एकदाची.’’ असं म्हणत आकांक्षा चिप्सचं पाकीट घेऊन दरवाजाच्या दिशेने धावली. दारात कीर्ती उभी होती. ‘‘सी.. कीर्ती पण आली.. व्हेअर दी हेल इज पारो?’’

‘‘आली नाही ती अजून..? ती तर सगळ्यांच्या आधी येऊन तयारी वगरे करणार होती ना. दुसरीकडे जाऊन तयारी करतेय की काय?’’ कीर्तीने आत येताच बडबड सुरू केली. ‘‘तू विचारूच नकोस तिच्याबद्दल. येऊच दे आता तिला.’’ सायलीच्या हातातल्या चिप्स पाकिटाचा आतल्या चिप्ससहित चुराडा झाला होता.

‘‘हे माय लव्हली ब्राइड टू बी..’’ असं  म्हणतानाच घट्ट मिठी मारत कीर्तीने जवळपास आकांक्षाला आवळूनच टाकले. आकांक्षाने कसंबसं स्वत:ला तिच्या ‘मगर’मिठीतून सोडवलं.

‘‘तू अजून काम करतेस..? जाळून टाक आधी तो लॅपटॉप.’’ कीर्तीने एक जळजळीत कटाक्ष लॅपटॉपकडे टाकला अन् तो खरंच जळून वगैरे जाईल या भीतीने आकांक्षाने त्याला पोटाशी धरले. ‘‘हो गं.. थोडंच बाकी होतं, अन रूपाली पण अजून आली नाही, म्हटलं जितकं होतंय तितकं करून टाकू काम.’’

‘‘ए मॅड आहेस का तू.? आज आपली स्पिन्स्टर पार्टी. ए, आणि तू हे काय काम वगैरे घेऊन बसली आहेस? आकांक्षा, अगं आठवडय़ावर आलंय तुझं लग्न. त्यानंतर यू विल नो मोर बॅचलर.. कळतंय का तुला? इट्स अ बिग थिंग..’’

कीर्तीच्या आवाजाबरोबर तिचा बीपी पण चढतंय की काय या भीतीने आकांक्षाने तिला सोफ्यावर बसवलं. ‘‘चिल किटी. लग्नच होतंय माझं.. फासावर नाही जात आहे. मला..’’

‘‘.ते कळेलच तुला अक्की.. व्हेरी सून..’’ सायली किचनमधून जवळपास ओरडलीच.

‘‘..हो तर भारी सून होणार आहे आपली अक्की’’ उघडय़ाच असलेल्या दरवाजातून ओढणी सावरत रूपाली आली. कीर्ती आणि आकांक्षाने एकवार तिच्याकडे पाहिले आणि मग किचनकडे. काखोटीला लावलेली फुलाफुलांची बॅग, अन् निळ्या रंगाचा पंजाबी सूट अन् त्यावर तितकीच विसंगत ओढणी अशा अवतारातली रूपाली आणि तिचा आवाज ऐकून किचनमधून हातात चाकू घेऊन बाहेर आलेली सायली.. दोघीही समोरासमोर उभ्या.. कीर्ती आणि आकांक्षा दोघींनी पण मनोमन आपापल्या शेवटच्या इच्छा ठरविल्या. कारण आता तिथे जे घडणार होतं त्याला तिसऱ्या महायुद्धापेक्षा कमी लेखण्याची कोणाचीही हिंमत नसती झाली. सायलीने हाताच्या मुठी अगदी घट्ट आवळलेल्या, ती अचानक रूपालीजवळ गेली आणि अचानक सगळं अवसान गळाल्यागत ती तिला म्हणाली, ‘‘काय ए हे रूपाली, किमान आज तरी वेळेत यायचंस ना, आजची रात्र आपल्याला आकांक्षासाठी स्पेशल करायची आहे हे माहीत होतं ना तुला.. का असं करतेस तू..?’’

‘‘सॉरी गं. त्याचं काय झालं नां..’’ असं म्हणत रूपाली मटकन सोफ्यावर बसली. बाजूला ठेवलेली कोल्डिड्रक ती घटाघट प्यायली. त्या तिघींनीही एकमेकींकडे पाहिले. रूपालीची ‘त्याचं काय झालं ना’ची रेकॉर्ड त्या सगळ्यांना पाठ होती. बबडू म्हणजे तिचा चार वर्षांचा मुलगा कसा जेवतच नव्हता, मग बबडूचे बाबा कसे उशिराच घरी आले, मग त्यांना खूप भूकच कशी लागली, मग सासूने वेळेवर औषधंच कशी नाही घेतली. हे सगळं त्यांना तोंडपाठ होतं. त्यांना तेच तेच ऐकण्याचा प्रचंड कंटाळा आलेला; पण रूपालीला मात्र तेच तेच सांगण्याचा कधीच कंटाळा यायचा नाही. यावेळी मात्र कीर्तीने रूपालीच्या ‘त्याचं काय झालं नां’च्या गाडीला करकचून ब्रेक लावला आणि यूटर्न घेऊन तिला मूळ मुद्दय़ावर आणलं. ‘‘सो फायनली.. आकांक्षा तू लग्न करतेस. यू नो लग्न ठरल्यापासून आपण नीट भेटलेलोच नाही आहोत, धड बोललेलोच नाही आहोत. मला तर सगळं ऐकायचंय.  तुम्ही कसं काय भेटलात, काय बोललात, कसं जुळलं सगळं..’’

‘‘ए बाई, तू थांब जरा. आपलं खायचं काय ए..? पुलाव करूया का?’’

‘‘मी ऑर्डर केलंय. येईल इतक्यात.’’ किचनमधून सायलीचा हुकूमवजा आवाज आला.

‘‘ए सायली, काय करतेस तू आत? मगाशी एवढं रूपाली आली नाही म्हणून तणतणत होतीस अन् आता सगळे आलेत तर किचनमध्ये जाऊन बसली आहेस. ये ना बाहेर. काय करतेस.?’’ आकांक्षा जवळ जवळ ओरडलीच.

‘‘आले गं. हे ते सॅण्डविच, तेच बनवत होते.’’

‘‘अं थँक यू सायू.. देव तुझं भलं करो. मी ऑफिसमधून निघाल्यापासून काहीच खाल्लेलं नाहीये.. अन् सध्या तर इतकं फ्रस्टेड व्हायला होतं ना ऑफिसमध्ये.. टारगेट्स, परफॉर्मन्स, गोल्स या सगळ्यांची झापडं लावलीएत आपण. आजूबाजूला कुठे बघायचंच नाही आता. वयाच्या २७व्या वर्षीच मला इतका उबग यायला लागला आहे ना या सगळ्याचा. कधी कधी तर सगळं सोडावंसं वाटतं.’’ कीर्ती बोलत असताना आकांक्षाने हळूच आपल्या लॅपटॉपमध्ये पाहिले, ‘‘आय नो किट्टी, शेअर दी सेम फीलिंग. पण एवढा डोक्याला शॉट झालं ना की सरळ आरडाओरडा करून घ्यायचा, खूप ओरडायचं. इतरांवर नाही स्वत:वर एकदम बेस्ट वाटतं.’’

सँडविच जवळ जवळ कोंबतच सायली म्हणाली, ‘‘ए पोरींनो काय बोलत बसलाय तुम्ही? आज बॅचलर पार्टी आहे. आकांक्षाची मजा करू ना जरा. ए आकांक्षा सांग ना कसं जमलं तुमचं, तुझ्या शाळेतला मित्र आहे ना तो?’’ रूपालीने आपला मोर्चा आकांक्षाकडे वळविला.

‘‘हो म्हणजे आम्ही लहानपणापासून एकमेकांना ओळखायचो आणि मग बोलायचोही, खूप छान बोलायचो. मी तर सर्व शेअर करायचे, आणि मग मागच्या वर्षीपासून आईबाबा माझ्यासाठी मुलगा शोधायला लागले हेही त्याला माहीत होतं. मी दोन-तीन मुलं पाहिली. पण यू नो काही ना काही खटकायचं. अडकायचं. मला वाटायचं मी कमी पडतेय कुठेतरी. काहीतरी विसरतोय आपण. मागे ठेवतेय. एके दिवशी मी असंच बोलता बोलता त्याला म्हणाले की मी उद्या मुलगा पाहायला जातेय तर, एकदम प्रपोजच केलं त्यानं मला..’’

‘‘मग..?’’ सायलीचा परत प्रश्न आला.

‘‘मग काय.. मला ऑबिव्हसली कळलंच नाही काय होतंय ते आणि तेव्हा काय बोलावं ते, पण मग दुसऱ्या दिवशी आम्ही भेटलो, बोललो आणि घरी सांगितलं. घरच्यांनी पण ते मनावर घेतलं आणि ठरलं. बस्स..’’

‘‘बस्स? झालं. नो फॅमिली ड्रामा? म्हणजे रडारड वगैरे?’’ कीर्तीने तसा व्हॅलिड प्रश्न विचारला.

‘‘हो ना. मला पण वाटतं गं तसं आमचं बोअिरगच होतं ना एकूण लग्न ठरणं. बाय द वे सायली तू लवकरच लग्न करतेस ना? उडते हुए पंछी ने खबर दी है मुझे..’’ आकांक्षाने हसत हसत सायलीला टोला लगावला.

‘‘किल दॅट उडता हुआ पंछी.. इथे एक मुलगा धड मिळत नाहीये हवा तसा. लग्न काय करू.? सगळे एकजात बावळट. ज्यांना डेट केलं, ते पण शामळू नुसते. तो आठवतोय ना मी सांगितलेला ग्रुपवर.. मला म्हणत होता, ‘माझ्या आईला तिच्या सुनेने घराबाहेर पडलेलं आवडत नाही. मग काय करायचं मी, घरी बसून राहायचं पारोसारखं?’’ सायलीनं बॉल हळूच रूपालीच्या कोर्टात सरकवला.

‘‘ए गप हां. तुला काय वाटतं घरी असलेल्या बायकांना काही कामं नसतात? तुमच्यापेक्षा जास्त काम आम्ही करतो. तेही बिनपगारी.. पण ना वाटत गं कधीतरी की आता बाहेर पडायला हवं, एवढं शिकलो ते काय घरी बसायला.? पण ना भीतीसुद्धा वाटते, जगाच्या खूप पाठी असल्याची. त्या गर्दीत गुदमरून जाण्याची. म्हणून मला किट्टीचं कौतुक वाटतं. किती छान इस्टॅब्लिशड झालीये ना ती..’’

‘‘ए हॅलो  हॅलो..’’ रूपालीला मध्येच तोडत कीर्ती बोलायला लागली ‘‘हे सगळं वरवरून दिसतंय यार. करिअर ना आपल्याला एका पॉइंटपर्यंत पुरतं. त्याच्यापुढे आणि त्याच्याबरोबर आपल्याला कुणाची तरी साथ लागते. मी ना करिअरपाठी धावता धावता या गोष्टींना वेळच नाही दिला आणि आता असं झालंय की कोणी सापडतच नाहीये. पार्टनर म्हणून कधी कधी तर भीती वाटते की माझं लग्नच नाही झालं तर..’’ कीर्तीच्या या वाक्यानंतर हॉलमध्ये अगदी मिट्ट शांतता भरून राहिली.

‘‘ओय तुम्ही काय रडारडा लावलीये? ती पोर बिचारी घाबरली बघा.. अक्के तू चिल मार. या देवदास टाइप मुलीचं ऐकू नकोस, आपण एन्जॉय करू.. आजची पार्टी आणि तुझं लग्न पण..’’ सायलीने तो शांततेचा फुगा टचकन फोडला.

आधी हळू आवाजात सुरू असणाऱ्या गझल्सची जागा आता आवाज आणि हार्ट बीट दोन्ही वाढविणाऱ्या संगीताने घेतली.

‘‘सायले सुकी का आहे पार्टी?’’ नाचत नाचत कीर्तीने विचारले. सायलीने तिघींच्या गळ्यात हात घातला, ‘‘कारण नशा चढायला आपल्याला दारूची गरज नाही. आपल्या गप्पा पुरेशा आहेत.’’

दूर असूनही बबडू आणि बबडूचे बाबा काय करत असतील याचा विचार करणारी रूपाली, नव्या अवकाशात जुनं गाठोडं घेऊन जायला निघालेली आकांक्षा, ‘योग्य पार्टनर’च्या शोधात असणारी कीर्ती आणि ‘मस्तमौला’ जगायचं आणि आल्या दिवसाला आवेगानं अन् आवेशानं सामोरं जाणारी सायली. चौघीही बेभानपणे नाचत होत्या, कसलाही विचार न करता. तरीही कशात तरी गुंतलेल्या. आज लुकलुकणाऱ्या चांदण्यांचं तेज वाढलेलं आकाशातही आणि इथेही…
प्राची साटम – response.lokprabha@expressindia.com