News Flash

लग्नसराई विशेष : तमीळ लग्न – वराची काशीयात्रा आणि उंझल

‘यंदा कर्तव्य’ असणाऱ्या मुला-मुलींची पसंती झाली की दोन्ही घरांत उत्साहाचे वारे वाहू लागतात.

लग्न म्हणजे सहसा आयुष्यात एकदाच होणारा सोहळा. साहजिकच तो प्रत्येकाला झोकात साजरा करायचा असतो. तो करण्यासाठीचं माध्यम म्हणजे लग्नसोहळ्यातल्या वेगवेगळ्या प्रथा, परंपरा. आपल्याच परंपरा प्राचीन, समृद्ध असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण आपल्या देशातल्या काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत विविध प्रांतांमधल्या लग्नपद्धती, परंपरा यांच्यावर एक नजर टाकली तर थक्क करणारं वैविध्य पाहायला मिळतं.

स्वप्ना अय्यंगार, ग्रीष्मा नायर, शलाका सरफरे, भाग्यश्री प्रधान, अश्विनी पारकर

‘यंदा कर्तव्य’ असणाऱ्या मुला-मुलींची पसंती झाली की दोन्ही घरांत उत्साहाचे वारे वाहू लागतात. आसेतूहिमाचल भारतात कुठेही जा. विवाहाच्या विविधतेने नटलेल्या रंगीबेरंगी पद्धतीत एक समान सूत्र नेहमी आढळते. हे सूत्र दाक्षिणात्य विवाह पद्धतीतल्या परंपरांमध्येही दिसते. प्रथम पसंती झाल्यानंतर निश्चितधर्म् (साखरपुडा) विधी केला जातो. यामध्ये वधू-वर परस्परांना अंगठी घालतात आणि विवाहाची तिथी, स्थळ निश्चित केले जाते. यावेळी वस्त्रालंकार देऊन एकमेकांचा यथोचित मान केला जातो.

आता प्रत्यक्ष विवाहाच्या तयारीला सुरुवात होते. दोन्ही घरी दारात मांडव घालून ‘पंडकाल पूजा’ म्हणजे मांडव पूजा सुवासिनींकडून केली जाते. मंगलकार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी गणेशाचे आणि कुलदेवतेचे स्मरण, आवाहन करून ‘नांदी’ (देवक ठेवणे) विधी केला जातो. यावेळी धान्याचे कांडणही केले जाते.

लग्नाच्या आदल्या दिवशी कल्याणमंडपम्मध्ये (कार्यालयात) समारंभपूर्वक स्वागत केले जाते. त्यानंतर ‘वरपूजा’ (सीमांतपूजन) केली जाते. परस्परांकडील नातेवाइकांची ओळख, आदर- सत्कार केला जातो. मुलाचे आणि मुलीचे आईवडील वधु-वरांची पूजा करून त्यांना वस्त्रालंकार देतात. यावेळी एकीकडे नादस्वरम् (बँड) आणि संगीत चालू असते. ज्यामध्ये शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायकाची मैफल चालू असते आणि रसिक आस्वाद घेत असतात. विवाहाच्या आदल्या सूरमयी संध्याकाळचा समारोप सुग्रास मिष्टान्न भोजनाने होतो.

दाक्षिणात्य विवाहपद्धतीत मुलीला तिच्या भावी संसारासाठी लागणाऱ्या वस्तू (रुखवत) एका स्वतंत्र खोलीत ‘सीरवासम्’मध्ये आकर्षक रचना करून मांडून ठेवतात. त्यामध्ये देव्हारा, देवदेवतांच्या मूर्ती, पूजेची उपकरणी असतात. याशिवाय केळी, नारळ, चुरमुरे-डाळ-गूळ यांच्या शंकूच्या आकारातले मोठे लाडू, बर्फी, मिठाया, विविध प्रकारचे चिप्स, चकल्या हे पदार्थही मांडून ठेवले जातात. या सर्व ‘पिणयारम्’ची यथासांग पूजा केली जाते. वरपक्षातील ज्येष्ठ स्त्रिया, सुवासिनींना बोलावून हे सर्व दाखवले जाते अािण मग या खोलीला कुलूप लावून त्याची किल्ली वरपक्षाकडे सोपवली जाते.

दक्षिणेकडे आणखी एक गमतीशीर रीत पाळली जाते. ती म्हणजे लग्नापूर्वी नवऱ्या मुलाने केलेली ‘काशीयात्रा’..! मला लग्नबंधनात अडकायचे नाही असे म्हणून नवरा मुलगा छत्री, काठी, चप्पल, कमंडलू अशा मोजक्या वस्तू घेऊन काशीला विद्याभास करायला निघतो. मात्र मामा म्हणजे मुलीचे वडील त्याची समजूत काढून गृहस्थाश्रमाचे महत्त्व समजावतात. आपली शीलवान, गुणवान, सुंदर, चतुर मुलगी देण्याचे कबूल करतात. आणि मग तो अध्र्या वाटेवरून परत फिरतो. अशा या उपवराला ही उपवधू तीन वेळा ‘जयमाला’ (हार) घालून वरते. अशा तऱ्हेने या वधू-वराला ओवाळून त्यांना घेऊन येतात. या वधू-वराला लक्ष्मी-नारायणाचे प्रतीक मानले जाते. या लक्ष्मी- नारायणाचा कौतुक सोहळा म्हणून दाक्षिणात्य पद्धतीत आणखी एक  परंपरा आवर्जून  पाळली जाते. ती म्हणजे ‘उंझल’. एका सुंदर सजविलेल्या झोपाळ्यावर या वधू-वरांना  बसवून त्यांचे पाय धुतले जातात. ओवाळून दूध-केळे दिले जाते. पाच सुवासिनी या जोडप्याची दृष्ट काढतात. थोडा वेळ त्यांना या झोपाळ्यावर झुलविले जाते. आता आदरपूर्वक, वाजतगाजत आत नेऊन विवाहाचे पुढील विधी केले जातात.

गौरी पूजा (गौरीहर पुजणे), पाद्यपूजा, कन्यादान, पाणीग्रहण, लाजाहोम, गृहप्रवेश, लक्ष्मीपूजा असे सर्व महत्त्वाचे विधी करण्यासाठी सुमारे दोन तासांची मुहूर्त वेळ काढली जाते. आमंत्रित मंडळी या मुहूर्तावर येऊन वधू-वराला आशीर्वाद देतात. झोपाळ्याचा विधी करून आत आलेली वधू गौरी पूजा करते. यानंतर मुलीचे आईवडील विधिवत कन्यादान करतात. नवरामुलगा मुलीच्या गळ्यात ‘ताली’ (मंगळसूत्र) बांधतो. या ‘मांगल्यधारणम्’ विधीच्या वेळी पारंपरिक वाद्यांचा नादस्वरम् केला जातो. यानंतर सप्तपदी, लाजाहोम हे विधी केले जातात. नवपरिणीत दाम्पत्याने आकाशातले वसिष्ठ – अरुंधती नक्षत्र पहायचे असते जेणेकरून भावी जीवनात त्यांची एकमेकांवर  दृढ निष्ठा, प्रेम ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ राहील. दाक्षिणात्य पद्धतीत अजूनही धार्मिक पद्धतीनेच विवाह विधी केले जातात.

विवाह संपन्न झाल्यावर मुलीचा नव्या घरी तांदळाने भरलेला कलश ओलांडून गृहप्रवेश होतो. येणाऱ्या नववधूचे लक्ष्मीपूजन केले जाते. एकंदरीत दाक्षिणात्य विवाह सोहळे नयनरम्य असतात. विविधरंगी कांजीवरम् सिल्क साडय़ा, रंगीबेरंगी सुवासिक हार, गजरे, सुबकपणे केलेली आरास बघत राहावीशी वाटते. लग्नविधींमध्ये विशिष्ट पद्धतीने नेसलेल्या कांजीवरम सिल्कच्या नऊवारी साडय़ा ही तर खासियतच आहे! याशिवाय वेगवेगळी पक्वाने, मिठाया, मैसूरपाक, अतरसम्, पायसम् (खीर) यांचा तर आवर्जून उल्लेख करावा लागेल. तऱ्हेतऱ्हेचे भाताचे प्रकार, सांबार, वडे, अपलम् (पापड), तेंकोळ, मुरुक्कू, (चकल्या) या सगळ्या पारंपरिक पदार्थाची मेजवानी तर हवीच..!! त्याशिवाय लग्नविधी संपन्न कसा होईल? शेवटी काय म्हणतात ना..

कन्या वरयते रुपम्, माता वित्तम्।
पिता शीलम्, बान्धवा: कुलमिच्छन्ती।
मिष्टान्नं इतरेजन:॥
स्वप्ना अय्यंगार – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 1:18 am

Web Title: wedding special issue tamil marriage
Next Stories
1 लग्नसराई विशेष : बंगाली लग्न – पाटी पात्रो आणि बऊ भात
2 लग्नसराई विशेष : गुजराती लग्न – समुरता आणि हस्तमिलाप
3 लग्नसराई विशेष : पंजाबी लग्न – वरना आणि मिलनी
Just Now!
X