News Flash

लग्नसराई विशेष : तेलुगु लग्न – पेलिकुथुरू  आणि जीलकरा बेल्लम

आपल्या देशातील भौगोलिक स्थिती आणि प्रादेशिक वैशिष्टय़ांवर लग्नसंस्कृती अवलंबून आहे.

लग्न म्हणजे सहसा आयुष्यात एकदाच होणारा सोहळा. साहजिकच तो प्रत्येकाला झोकात साजरा करायचा असतो. तो करण्यासाठीचं माध्यम म्हणजे लग्नसोहळ्यातल्या वेगवेगळ्या प्रथा, परंपरा. आपल्याच परंपरा प्राचीन, समृद्ध असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण आपल्या देशातल्या काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत विविध प्रांतांमधल्या लग्नपद्धती, परंपरा यांच्यावर एक नजर टाकली तर थक्क करणारं वैविध्य पाहायला मिळतं.  स्वप्ना अय्यंगार ’ ग्रीष्मा नायर ’ शलाका सरफरे ’ भाग्यश्री प्रधान ’ अश्विनी पारकर

आपल्या देशातील भौगोलिक स्थिती आणि प्रादेशिक वैशिष्टय़ांवर लग्नसंस्कृती अवलंबून आहे. आंध्रप्रदेशमधील तेलुगु लग्नसोहळ्यातही याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. तेथे पिकणारे अन्नधान्य याचा मुख्यत: नारळ, तांदूळ, खजुर, गूळ, जिरे यांचा त्यांच्या लग्नसोहळ्यात समावेश असतो. या अन्नधान्य व पदार्थाचा तेथील लग्नसोहळ्यात वैशिष्टय़पूर्ण पद्धतीने वापर केला जातो. तसेच या लग्नसोहळ्यात वधूचा आणि वराचा सुंदर असा पोशाख या लग्नसोहळ्याला वेगळेपण देतो. मूळ लग्नाचे विधी पाच दिवस आधी सुरू होतात. त्याआधी ज्याप्रमाणे मराठी संस्कृतीमध्ये साखरपुडा होतो तसेच त्यांच्याकडे निश्चयम् हा सोहळा असतो.

निश्चयम् : वधू-वराच्या लग्नाची तारीख ठरवण्याचा महत्त्वाचा दिवस. या दिवशीच साखरपुडा किंवा इंग्रजीत ज्याला आपण ‘एंगेजमेंट’ म्हणतो तो सोहळा केला जातो. या दिवशी वराकडची मंडळी वधूकडे येतात. वधूला पाच प्रकारची फळे, खजुर, हळद, कुंकू, तांदूळ, कपडे ज्यात साडी आणि चोळी असते असा शगुन घेऊन येतात. त्याचबरोबर वधूकडची मंडळी वराला पाच प्रकारची फळे, खजुर, हळद-कुंकू, तांदूळ, वरासाठी कपडे, त्याच्या आईवडिलांसाठी कपडे असे वराला देतात. वधू व वर एकमेकांसोबत अंगठी किंवा चैन अदलाबदल करतात. या दिवशी लग्नाची तारीख ठरवली जाते. पंचांग बघून मुहूर्त काढतात. ब्राह्मण वधू व वराला एक पत्र देऊन तुमचा विवाह सोहळा ठरला आहे असे सांगतो.

पेलिकुथुरू : यामध्ये पाच सुवासिनी एकत्र येऊन खलबत्त्यात हळद कुटतात. लग्नसोहळ्याची सुरुवात याच कामाने करण्याची प्रथा आहे. पाच दिवस आधी ही हळद वधूला लावली जाते. सर्व नातेवाईक एकत्र येऊन वधूला ही हळद लावतात. यामुळे वधूची कांती उजळते व ती अधिक सुंदर दिसते असे मानतात. वराच्या घरीही वराला हळद लावली जाते. वधूचा हळदीचा सोहळा हा वधूच्या घरी होतो व वराचा हळदीचा सोहळा हा त्याच्या घरी होतो. या पाच दिवसांत वधू व वर घराबाहेर पडू शकत नाहीत.

लग्नसोहळ्यामधील परंपरा

शहरात सर्व लग्नं हॉलवर होत असली तरी गावात अजूनही वधूच्या किंवा वराच्या घरीच लग्नं केली जातात. काही ठिकाणी वधूच्या घरी लग्न होते तर काही ठिकाणी वराच्या घरी लग्न होते. ज्या वेळी वराच्या घरी लग्न होते त्या वेळी वधू व तिचे कुटुंबीय शेजारील घरात येऊन थांबतात.

मंगल स्नानम् : लग्नाच्या दिवशी वधू व वराला तेल लावून स्नान घातले जाते. याला मंगल स्नानम् असे म्हणतात. त्यानंतर वधू व वराच्या पुढील आयुष्यासाठी तसेच हा लग्नसोहळा निर्विघ्नपणे पार पडावा याच्यासाठी आरती केली जाते.

गौरीपूजा : या दिवशी वधू घरून निघण्याआधी गौरीपूजा करते. गौरीदेवीला फुले, हळद, कुंकू लावून सौभाग्याचे प्रतीक असलेल्या गौरीची याचना केली जाते.

गणेशपूजा : ज्याप्रमाणे वधू गौरीपूजा करते त्याप्रमाणे मुलगा गणेशपूजा करतो. शुभकार्याची सुरुवात गणेशपूजेने करण्याची प्रथा आहे. त्याप्रमाणे वरही गणपतीची आराधना करतो.

तेरेसल्ला : वधूला शेजारील घरातून तिचे सासू-सासरे मंडपात घेऊन येतात. ज्या वेळी हॉलवर लग्न होते तेव्हा वराकडची मंडळी वधूचे स्वागत करतात व वधूकडची मंडळी वराचे स्वागत करतात. त्यांच्यामध्ये पडदा असतो.

कन्यादान : मूळ लग्नसोहळा साधारण तासभर चालतो. यामध्ये कन्यादानाचा विधी पार पडतो. यामध्ये वधूचे आईवडील वराचे पाय धुतात. कारण या विधूमध्ये वराला विष्णूच्या रूपात पाहिले जाते.

जीलकरा बेल्लम : जीलकरा बेल्लम हा तेलुगु लग्नसोहळ्यातील अत्यंत महत्त्वाचा विधी असून या विधीशिवाय लग्नसोहळा अपूर्ण समजला जातो. यामध्ये जिरे आणि गूळ एकत्र वाटून त्याचे मिश्रण तयार करून ते मिश्रण विडय़ाच्या पानाला लावले जाते. हे विडय़ाचे पान वधू व वराच्या डोक्याला लावले जाते. वधू व वराने एकमेकांच्या आयुष्यातील कडू-गोड प्रसंगांना आनंदाने सामोरे जावे हा संदेश देण्याचा उद्देश या विधीमागे आहे.

मंगळसूत्र धरना : यामध्ये वर वधूला मंगळसूत्र घालतो. ही मंगळसुत्रे दोन प्रकारची असतात. एक आईकडील मंगळसूत्र, दुसरे सासरकडील मंगळसूत्र. अशा प्रकारे वर वधूला दोन मंगळसूत्रे घालतो.

फेरे : यामध्ये वधू व वर पवित्र अग्नीभोवती फेरे घेतात. यामध्ये वर दोन फेऱ्यांमध्ये पुढे असतो उरलेल्या फेऱ्यांमध्ये वधू पुढे असते. दरम्यान यामध्ये तांदूळ आणि हळद एकत्र करून अक्षता तयार केल्या जातात.

तलंब्रालु : यामध्ये या तांदूळ आणि हळद मिश्रित अक्षता वधू-वराच्या डोक्यावर टाकते व वर वधूच्या डोक्यावर टाकतो. त्याचप्रमाणे वधू व वराचे नातेवाईक तांदूळ हळद मिश्रित अक्षता, फुलांच्या पाकळ्या, थर्माकोल बॉल्स एकत्र करून वधू व वराच्या डोक्यावर टाकतात. हे समृद्धी आणि समाधानाचे प्रतीक मानले जाते.

शालीपाकम् : यात वधूला जोडवी घातली जातात.

पारंपरिक खेळ : लग्नसोहळ्या-दरम्यान काही पांरपरिक खेळ खेळले जातात. ज्यामध्ये वराला व वधूला हळदीच्या पाण्यातील अंगठी शोधायची असते. ही अंगठी शोधण्याच्या तीन फेऱ्या होतात. त्यानंतर अशाच प्रकारची स्पर्धा नणंद आणि वधूमध्येदेखील होते.

अरुंधती नक्षत्राचे महत्त्व : लग्न झाल्यानंतर वधू व वराला दोघांना एकत्र घेऊन अरुंधती नक्षत्र दाखवले जाते.

तेलुगु लग्नसोहळ्यातील पोशाख : वधू सुरुवातीला साडी कंबरपट्टा, तेलुगु पद्धतीची बिंदी, दागिने असा पोशाख करते, तर वर सोनेरी रंगाची कडा असलेली लुंगी, व सदरा असा पोशाख करतो. लग्नसोहळ्यामध्ये वधूचा पोशाख बदलला जातो ज्यात तिला लाल काठ असलेली पांढऱ्या रंगाची साडी घालावी लागते.

(या सर्व लेखांमधील माहितीसाठी संगीता मुत्था, मिहीर, नीरजा ठकार, सुजॉय तसेच अशिमा घोष, राजू खुराणा आणि हेमा राव यांची मदत झाली.)
अश्विनी पारकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 1:14 am

Web Title: wedding special issue telgu marriage
Next Stories
1 लग्नसराई विशेष : हे बंध रेशमाचे… पहिल्या भेटीत प्रेमात – मृण्मयी देशपांडे
2 लग्नसराई विशेष : सहजीवनाची गुरुकिल्ली
3 दत्तजयंती : भगवान दत्तात्रेयांचा वारसा
Just Now!
X