लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जात असल्या तरी त्याचा मार्ग आता बदलतोय. आताच्या नेटसॅव्ही पिढीला पर्याय उपलब्ध झालाय तो मॅट्रिमोनी साइट्सचा.

पण या व्हर्चुअल कांदेपोह्यांचा आस्वाद घेताना तरुणांना या पर्यायाचं

स्वरूप आवडतंय, पटतंय का याचा विचार व्हायला हवा.

‘लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात,’ असं म्हटलं जातं. पण प्रत्यक्षात त्या जोडायला एखादं माध्यम लागतं. मग ते नातेवाईकांनी सुचवलेली नात्यातली स्थळं असोत, विवाह मंडळातील जाडजूड फाइल्सच्या गर्दीतील एक फाइल असो किंवा प्रेमात पडून जोडली गेलेली गाठ असो. सध्याच्या टेक्नोसॅव्ही पिढीसाठी मॅट्रिमोनी साइट्सचा पर्यायसुद्धा आहेच. अगदी लॅपटॉपच्या मोठाल्या स्क्रीनपासून आता अ‍ॅपच्या स्वरूपात हातातल्या मोबाइलवर डोकावणाऱ्या या मॅट्रिमोनी साइट्सचा मार्ग सहज उपलब्ध झाला आहेच. पण त्याचं स्वरूप नक्की तरुणाईला भाळतंय का, हा विचार मात्र व्हायला हवा.

* * *

‘मी मॅट्रिमोनी साइटवर माझं नाव नोंदवतेय.’

तिने एक दिवस सहज ग्रुपमध्ये जाहीर केलं. या बातमीने काहींचे डोळे मोठे झाले. एका मोबाइलकिडय़ाने मोबाइल स्क्रीनवरून स्वत:चं डोकं वर काढायची तसदीही न घेता, ‘हम्म’ इतकाच प्रतिसाद दिला. तर एक-दोघांनी ‘तुला काय गरज मॅट्रिमोनी साइट्सची. तुला काय कोणीही मिळेल,’ हे पटवायचा प्रयत्न तिला केला.

‘कोणीही मिळेल ना? मग तुम्ही शोधा माझ्यासाठी. मी तयार आहे भेटायला,’ यावर मात्र कोणीच बोललं नाही. ‘पण मॅट्रिमोनी साइट्स कशाला? नात्यात बघ ना.’ मधूनच कोणीतरी फुसकी सोडलीच.

साधारणपणे लग्नाची वयं झालेल्या मित्र-मत्रिणींच्या ग्रुपमध्ये अशा प्रकारचे संवाद कधीतरी होतातच. मुळात एकदा वयाची पंचविशी सरली किंवा जॉबमध्ये कुठे जाऊन थोडंसं स्थिरस्थावर होतोय, हे लक्षात आलं, की घरात लग्नाचा विषय सुरू होतो. मग हळूहळू हा विषय मित्रांच्या ग्रुपमध्ये शिरू पाहतो. आतापर्यंत कट्टय़ांवर सँडविचचा शेवटचा तुकडा कोण खाणार यावरून भांडणारे वस्ताद आता एकमेकांकडून भावी जीवनसाथीच्या व्याख्या समजावून घेत असतात. पण या सगळ्यातसुद्धा मॅट्रिमोनी साइट्सकडे मात्र शंकेच्या नजरेने पाहिलं जातं. मुळात रोजच्या आयुष्यातल्या अगदी छोटय़ात छोटय़ा बाबींसाठी गुगलबाबावर अवलंबून असलेल्या आजच्या पिढीला याच इंटरनेटवर एका क्लिकवर आपला जोडीदार निवडण्याची पद्धत आवडायला हवी. मात्र प्रत्यक्षात मॅट्रिमोनी साइट्सबाबत सर्वाधिक शंका घेतली जाते.

गटवारीच्या गाळण्या

मॅट्रिमोनी साइट्स निवडण्याचा प्रवास एखाद्या क्विझ शोप्रमाणे पर्यायांनी भरलेला असतो, असं म्हणायला हरकत नाही. तुमचा धर्म, जात, लाइफस्टाइल या प्रत्येक गाळणीत गाळून घेतलं जातं. अगदी प्रत्येक समाजाच्या स्वतंत्र मॅट्रिमोनी साइटपासून प्रत्येक धर्मागणिक वेगवेगळ्या साइट्स पाहायला मिळतात. यातून तुमच्या आवडीची साइट निवडून त्यात नाव नोंदणी केली, की तुमच्यासमोर तुमच्यासाठी अनुरूप जोडीदारांची यादी येते. समोरच्याचं नाव, दिसणं, राहण्याचं ठिकाण याच्यासोबत सर्वप्रथम नजरेत भरणारा रकाना म्हणजे त्याचा पगार किंवा वार्षकि उत्पन्न. या फेरीत पास झालं, की नजर पुढच्या बाबींकडे वळते. मुळात आतापर्यंतच्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीशी भेटताना, मत्री करताना माणसाचा स्वभाव, वागणूक पाहिली जाते. आपल्याकडे ‘पशापेक्षा माणूस पहावा’ असं म्हटलं जातं, पण इथे मात्र प्रकरण पूर्णपणे विरुद्ध असतं. आपल्या आयुष्यभराचा प्रश्न आहे, त्यामुळे जोडीदाराची आíथक बाजू तपासणं महत्त्वाच असतं, हे मानलं तरी याला प्राधान्य द्यावं का? हा प्रश्न उरतोच. बरं हे झाल्यावर राहाण्याचं ठिकाण, उंची, वजन, पत्रिका या सगळ्या गाळण्या असतातच. ‘मुलीची उंची अपेक्षेपेक्षा तीन इंचाने कमी आहे,’ ‘थाईज थोडय़ा जाडच आहेत,’ ‘डोक्यावर केस कमीच आहेत ना,’ ही कारणं नकार कळवायला पुरेशी असतात. मुलांच्या बाबतीतसुद्धा घर कुठे आहे, पगार किती, बहीण-भाऊ किती यांच्यावरून नकार होकार ठरतात. ‘केवळ मुलगा आहे म्हणून त्याने तिशीच्या आधीच महिना लाखभर पगार, ऐसपस घर असावं अशी मुलींकडच्यांची इच्छा असते. पण ही मागणी करताना, प्रत्यक्षात आपली मुलगी किती कमावते आहे, तिचं शिक्षण किती याकडे मात्र दुर्लक्ष करतात. आम्हीही माणसं आहोत, पसे छापायचं मशीन नाही, याची जाणीव त्यांना होत नाही,’ असं स्वप्निल मांजरेकर सांगतो.

पत्रिकेचा विषय येतो तेव्हा गुणांची बेरीज-वजाबाकी समजण्या-पलीकडचीच. त्यातही पत्रिकेत मंगळ असेल, तर पुढे काही होईल याची अपेक्षाच सोडा. हल्ली अ‍ॅप्समुळे पत्रिका जुळवणं सोप्पं झालंय. समोरच्याला फोन करून जन्मदिवस आणि वेळ विचारली, की दुसऱ्या मिनिटाला हातात पत्रिका हजर. त्यात गुण जुळविण्याची सोय असतेच.  या सगळ्यात नेमका माणूस पारखायचा राहूनच जातो आणि जेव्हा संधी मिळते, तेव्हा या गाळण्यातून गाळून राहिलेला चोथा हाती लागतो. मुंबईची कीर्ती पाटील सांगते, ‘नक्की समोरचा आपल्याला कशावरून तपासतो आहे, हेच लक्षात येत नाही. केवळ पत्रिकेतले गुण जुळताहेत म्हणून मुलाला भेटायला सांगतात. पण तेच गुण जुळत नसले, तर एकमेकांना आवडून पण नकार दिला जातो.’

स्टायलिश म्हणून काम करणाऱ्या प्रियांका सुर्वेला तिच्या कामाच्या अनिश्चित वेळेमुळे मॅट्रिमोनी साइटवर बरेच नकार पचवायला लागले. ‘मुलांना काम करणारी मुलगी तर हवी असते, पण तिने नऊ ते पाच ऑफिसमध्ये काम करून घरी येऊन स्वयंपाक करावा, हीदेखील त्यांची अपेक्षा असते.’ तिचा या साइट्सबद्दलचा अनुभव सांगते. पण याच साइटच्या मदतीने तिची तिच्या भावी जोडीदाराशी भेट झाली आणि ते विवाहबंधनात जोडले गेले. अर्थात साइटचे अनुभव त्यालाही चुकले नव्हते. लहानपणी आई-वडिलांचं छत्र हरविल्याचा परिणाम मुलींच्या नकारास कारणीभूत ठरला. मुंबईत स्वत:च्या मालकीचं घर, चांगलं शिक्षण आणि उत्तम मिळकत हे सगळे प्लस पॉइंट त्याच्या उपयोगास आले नाहीत.

संस्कारी डेटिंग साइट्स

आसावरी पवारने सहज म्हणून मॅट्रिमोनी साइटवर नाव नोंदवलेलं. ठरल्याप्रमाणे दोन उमेदवार तिने निवडलेसुद्धा. पहिल्या भेटीत एका उमेदवाराने तिच्यासोबत सेल्फीचा हट्ट धरला. जुजबी बोलण्यावरून आणि पहिल्या भेटीत इतकी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या मुलाचं तिला आश्चर्यच वाटलं. अशाच प्रकारचे काही अनुभव आल्यावर तिने शेवटी साइटवरून स्वत:चं नाव काढून टाकलं. डेटिंग अ‍ॅप्स, साइट आता कुठे भारतात रुळू लागलेत. पण त्याआधी या मॅट्रिमोनी साइट्सचा वापर डेटिंग साइट म्हणूनही केला जायचा. मुंबईचा नितीन देशमुख सांगतो, ‘मागे माझ्या मित्राने गंमत म्हणून मॅट्रिमोनी साइटवर स्वत:चं नाव नोंदविलं होतं. तिथे तो मुलींशी गप्पा मारायचा.’ साइटवरील शिक्षण, नोकरी यांचा व्यवस्थित तपशील न देता भरमसाट पगाराचा आकडा लिहलेले कित्येक प्रोफाइल्स याच प्रकारातील असतात, हे उमेदवाराची माहिती नीट वाचल्यास लक्षात येतं. सोशल मीडियावर प्रत्येकजण आपल्याबद्दल विस्तृत माहिती लिहेलच असं नसतं. पण मॅट्रिमोनी साइट्स मात्र लग्नाच्या उद्देशाने प्रत्येक बारीक बाबींची नोंद असते. त्यामुळे अशा वेळी उमेदवाराची पूर्ण माहिती मिळते.

बहुतेकदा उमेदवारांच्या ऐवजी त्यांचे घरचे फॉर्म भरतात. अशा वेळी समोरच्याला आपल्या जोडीदाराकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत, हे लक्षातच येत नाही. ‘माझा मुलगा सुस्वभावी आहे. तो आठवडय़ातून दोनदा मांसाहार करतो,’ फॉर्मच्या पहिल्याच रकान्यात मुलाबद्दलची माहिती देताना तो मांसाहार किती करतो, यावरून त्याची पारख कशी होऊ शकते? मुळात ‘ सुस्वभावी वधू/वर हवा’ हा उल्लेख करताना, ‘सुस्वभावी’पणाची व्याख्या नक्की कशी करावी? आणि आपलं वागणं एखाद्याच्या ‘सुस्वभावी’पणाच्या पारडय़ात तोलू शकेल याचं मोजमाप आपण कसं करावं? मग तिथे या कितीदा मांसाहार करतात, किती पार्टी करतात, किती तोकडे कपडे घालतात या प्रश्नांची उत्तरं मदतीस येतात का?

पडताळणी करायची कशी?

लग्न करायचं ठरल्यावर एक दिवस उत्साहाच्या भरात ऊर्मिला भावेने (नाव बदललेलं) मॅट्रिमोनी साइटवर तिचं नाव नोंदवलं. एका मुलाने तिला इंटरेस्ट पाठविला. तिला त्याचं प्रोफाईल फारसं आवडलं नाही, त्यामुळे तिने दुर्लक्ष केलं, पण नंतर सहज त्यांच्या गप्पा वाढल्या, भेटीगाठी वाढल्या. पण एका भेटीमध्ये त्याची बायको आणि मुलगा तिच्यासमोर आले आणि त्याचं लग्न दोन वर्षांपूर्वीच झालेलं हे उघड झालं. या धक्क्यातून ती अजूनही सावरली नाही. मुळात या साइट्सवर उमेदवाराची संपूर्ण माहिती दिली असली, तरी ती खरी असेल याची खात्री कशी करावी हा प्रश्न उरतोच. कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी यांच्यामार्फत केली जात नाही. नितीन असाच एक अनुभव सांगतो, ‘माझ्या ओळखीतील एकाने मुलीकडच्यांना आपण ऑफिसमध्ये मोठय़ा हुद्दय़ावर असल्याचं भासवलं. त्यासाठी एक दिवस ऑफिसच्या सहकाऱ्यांना आपल्याशी अदबीने वागायची विनंती केली आणि मुलीला ऑफिसमध्ये घेऊनही गेला. लग्नानंतर तो अगदीच कमी पगाराची नोकरी करत असल्याचं मुलीकडच्यांना लक्षात आलं. स्वत: असे अनुभव अनुभविल्यावर या साइट्सबद्दल साहजिकच शंका उपस्थित होते.’ अशा प्रसंगी दोष कोणाला द्यायचा आणि मुळात दोष देऊन हाती काय लागणार? पाठलाग करणं, सतत फोन, मेसेजेस करून त्रास देणं हे प्रकार इथे सहज घडतात. मुळात कित्येकदा समोरच्यांना नकार पचवणं शक्य होत नाही. पहिल्या भेटीतच लग्नाची स्वप्नं पाहिली जातात. पण आयुष्यभराचा निर्णय एका भेटीत घेता येऊ शकत नाही, ही बाब त्यांना लक्षातच येत नसल्याचं, आसावरी सांगते.

साइटवर एखादा मुलगा आवडल्यास काही दिवस बोलल्यावर प्रियांका एखाद दिवशी अचानक त्या मुलाला भेटायला बोलवायची. ‘ठरवून भेटलं, की समोरच्याला इम्प्रेशन पडायची संधी मिळते. तो तयारीनिशी येतो. आठवडय़ाभराच्या बोलल्यानंतर त्याचं घर, ऑफिस या ठिकाणांचा अंदाज येतो. तिथे स्वत: जाऊन त्यांच्याशी अचानक भेट ठरवली की खरा माणूस कळतो. समोरचा प्रत्यक्ष आयुष्यात जसा असतो, तसा भेटतो,’ असं ती सांगते. अर्थात पडताळणीच्या अशा मार्गाना काही मर्यादा आहेतच. पण थोडक्यात हा सगळाच जुगार असल्याचं ती सांगते.’ सात-आठ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लग्न केलेली जोडपी तुटल्याचं मी पाहिलंय. नक्की कुठलं नातं टिकेल, कोणतं नाही हे काहीच सांगू शकत नाही,’ असाच तिचा अनुभव असल्याचं ती सांगते.

या साइट्सवर जोडय़ा जुळतात, लग्नं ठरतात हे सत्य आहेच. त्यात वाद नाही. पण त्याआधी अगदी डोळे बंद ठेवून समोरच्यावर विश्वास ठेवायचा किंवा सततच्या नकारांनी खचून त्याचा वैयक्तिक आयुष्यावर परिणाम करून घ्यायचा हे प्रकार होणार नाहीत याची काळजीही घ्यावी लागतेच. शेवटी म्हणतातच ना ‘लग्न पाहावं करून..’

(या लेखातील सर्व नावे संबंधितांच्या विनंतीवरून बदललेली आहेत.)
मृणाल भगत – response.lokprabha@expressindia.com