News Flash

लग्नसराई विशेष : साठवण.. मधुर आठवणींची!

वेडिंग फोटोग्राफीतील नवनव्या ट्रेण्ड्समुळे तर आठवणींमध्ये अधिकाधिक गंमत येते.

लग्नाचा सोहळा एका दिवसात संपत असला तरी त्या सगळ्याच्या सुंदर आठवणी टिकून राहतात त्या फोटोंच्या रूपात. आजच्या डिजिटल फोटोग्राफीच्या काळात तर त्या अधिकच सुंदर होऊन समोर येतात. वेडिंग फोटोग्राफीतील नवनव्या ट्रेण्ड्समुळे तर आठवणींमध्ये अधिकाधिक गंमत येते.

साधारण तीस-चाळीस वर्षांपूर्वी अनेक घरात दोन फोटो भिंतीवर टांगलेले हमखास दिसायचे. एक म्हणजे त्या घरातील कर्त्यां माणसाचा डिग्री घेतलेला आणि दुसरा लग्नातला. कालांतराने डिग्रीच्या फोटोचे महत्त्व कमी कमी होत संपूनच गेले. तो फोटो आताशा दिसतही नाही. लग्नाच्या फोटोचे महत्त्व मात्र डिजिटल युगातही तेवढेच टिकून राहिले. फक्त ते जाऊन बसले ते जाडजूड अल्बममध्ये. इतका जाडजूड अल्बम की तो उचलणेदेखील जड व्हावे कधी कधी.

वीस एक वर्षांपूर्वी अजून डिजिटल कॅमेरे आले नव्हते तेव्हा व्हिडीओ चित्रीकरणाची बूम होती. एखाद्या लग्नाचे व्हिडीओ चित्रीकरण होत असेल तर कोण प्रतिष्ठा होती. मग त्या चित्रीकरणावर वेगवेगळ्या चित्रपटातील लग्नाची गाण्याच्या ऑडीओ फाइल्स टाकून तयार झालेली लग्नाची टेप पाहणे हा एक सोहळा असायचा. चलचित्रीकरणाच्या वाढत्या फॅडचा फोटोग्राफीवर परिणाम होईल की काय, असेदेखील वाटू लागले होते. अशीच परिस्थिती पुन्हा आली डिजिटल कॅमेरे आणि हॅण्डीकॅम आले तेव्हा. त्यामुळे कॅमेरा अगदी सहजपणे ऑटो मोडवर ठेऊन सपासप फोटो काढायला मिळू लागले. हॅण्डीकॅमने चित्रीकरण सुलभ झाले. लग्नघरातला असा एखादा कॅमेरा असणारा भाव खाऊन जाऊ लागला. व्यावसायिक फोटोग्राफरना नाही म्हटले तरी काही प्रमाणात हा फटकाच होता. कारण लग्न हा असा प्रसंग असतो की जेथे आपण भारतीय अक्षरश: वारेमाप पैसा खर्च करत असतो. मात्र गेल्या पाच-दहा वर्षांत लग्नाच्या फोटोग्राफीचे सारे स्वरूपच बदलून गेले आहे.

हे बदल नेमके कशामुळे झाले हा तसा अभ्यासाचा विषय म्हणावा लागेल. केवळ कॅमेऱ्यातील बदल हा इतकाच मुद्दा यामध्ये नाही, तर एकूणच समाजातील बदलती मानसिकता यामागे आहे असे म्हणावे लागेल. लग्नाची फोटोग्राफी अशी वेगळी शाखाच सुरू झाली आहे. गेल्या दहा वर्षांत हा खर्च इतका वाढलाय की जणू काही तो लग्नाच्या खर्चाशीच स्पर्धा करू लागलाय.

केवळ लग्नच नाही तर प्री वेिडग फोटोग्राफीचा ट्रेण्ड सध्या जोर पकडताना दिसतोय. लग्नातील गडबडीत वधू-वरांची छबी म्हणावी तशी मोकळेपणाने टिपता येत नाही. एकतर झगमगीत कपडे सांभाळावे लागतात आणि त्यातच अनेक धार्मिक विधींची गडबड, पाहुण्या-रावळ्यांना भेटत राहणे. अशा साऱ्या धबडग्यापूर्वी रिलॅक्स मूडमधील ही फोटोग्राफी सध्या अत्यंत लोकप्रिय आहे. पण अशी फोटोग्राफी शक्यतो प्रेमविवाह असणाऱ्यांसाठी सुटेबल असते. एकतर दोघांमध्ये एक प्रकारचा मोकळेपणा असतो. तसा मोकळेपणा ठरवून केलेल्या लग्नाआधी जोडप्यांमध्ये मिळेलच याची खात्री नसते. मात्र एकजण करतो म्हणून दुसऱ्याने करायचे अशी जणू फॅशनच असल्यामुळे अनेक अ‍ॅरेंज मॅरेज करणारेदेखील प्री वेिडग फोटोशूटचा अट्टहास धरताना दिसतात.

आपल्या राज्याचा विचार करता मुंबई-पुणे या दोन शहरांतून सध्या प्री वेिडग फोटोग्राफीला मोठी मागणी दिसून येते. कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर येथे प्री वेिडगपेक्षा लग्नातील फोटोग्राफीवरच अधिक भर दिला जातो. इतका की एखाद्या लग्नाच्या फोटोग्राफीसाठी दोन-अडीच लाख रुपये देणारे देखील आहेत.

प्री वेिडगसाठी शक्यतो शहराच्या गजबजाटापासून लांब निसर्गरम्य ठिकाण निवडले जाते. तर कधी कधी शहरातील पुरातन वास्तुशैलीतील वास्तूंचा आधार घेतला जातो. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, वसईचा किल्ला ही ठिकाणं सध्या प्री वेिडगसाठी अगदी हॉट स्पॉट म्हणावी अशी आहेत. तर पुण्याजवळ तुंग-तिकोनाजवळ पवना धरणाचे बॅकवॉटर, सिंहगड, लवासाच्या बाहेरील परिसर, लवासा ही ठिकाणं पुणेकरांसाठी हॉट डेस्टिनेशन आहेत. तर कधी कधी गजबजलेल्या तुळशी बागेतदेखील प्री वेिडग फोटोशूट केले जाते. महाराष्ट्रात सध्या लोकप्रिय चित्रपटाचे चित्रीकरण झालेल्या ठिकाणी देखील प्री वेिडग शूट केले जाते. अशा प्रकारचे एक चित्रीकरण निवतीच्या जवळ नुकतेच पार पडले. तर महाराष्ट्राच्या बाहेर जयपूर, गोवा, काश्मीर, लेह लडाख आणि अगदी कच्छच्या रणरणत्या रणातदेखील प्री वेिडग फोटोशूट करणारे हौशी लोक आहेत. ही हौसच, त्यामुळे त्याला मोल नाहीच. सध्या तीस-चाळीस हजारांपासून ते पाच-दहा लाखांपर्यंत कितीही खर्च केला जातो. पैसे खर्च करायची तयारी असली तरी प्री वेिडगमध्ये लोकांचा प्रसिद्ध ठिकाणांचा आग्रह असतो, त्यांना दुसरे चांगले आणि इतरांना कमी माहीत असलेले ठिकाण कमी खर्चात उपलब्ध करून दिले तरी ते नको असते असे वेिडग फोटोग्राफर राजस देशपांडे सांगतात.

सध्या देशात नसलेला पण परदेशात लोकप्रिय होत असलेला प्री वेिडगचा आणखीन एक प्रकार म्हणजे अंडरवॉटर शूटिंग. किमान पाच-दहा लाख रुपयाचे बजेट असेल तर हे शक्य होते आणि असे पैसे खर्च करणारेदेखील अनेकजण आहेत.

प्री वेिडगसारखा हल्ली पोस्ट वेिडगचा ट्रेण्डदेखील मूळ धरूलागल्याचे दिसत आहे. लग्नातला तामझाम न बाळगता लग्नानंतर शांतपणे एक-दोन दिवसांनी केलेले फोटोसेशन हल्ली काही ठिकाणी आढळते. सर्वसाधारणपणे एखादा छोटासा स्वत:पुरता असा अल्बम केला जातो. हा प्रकार तसा तुलनेने अजून फारसा लोकप्रिय झालेला नाही, असे धनश्री आवळसकर सांगतात.

छापील अल्बम हाच आठवणींचा ठेवा होता तेव्हा छायाचित्रांच्या संख्येला मर्यादा होत्या. पण आता डिजिटलच्या जमान्यात पाच-सहाशे फोटोग्राफ्स दिले तरी ते कमीच पडतात असे वेिडग फोटोग्राफर धनश्री आवळसकर सांगतात. संख्येबाबत जरी असा अघळपघळपणा असला तरी एकंदरीत वेिडग फोटोग्राफीच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे एकूणच लग्न समारंभात सजगता वाढली असल्याचे धनश्री आवळसकर नमूद करतात. लग्न सभागृहाची सजावट, अ‍ॅम्बियन्समध्ये झालेला बदल, प्रत्येक व्यक्तीच्या प्रेझेन्टेशनमध्ये आलेली सजगता ही काही प्रमाणात तरी लग्नाच्या फोटोग्राफीमुळे आल्याचे म्हणावे लागेल. इतकेच काय तर मुलांमध्येसुद्धा कलर ट्रेण्ड वाढल्याचेदेखील त्या नमूद करतात. लग्नाच्या आधीच्या इतर अनेक कार्यक्रमांतदेखील बराच बदल झाला आहे. कारण आपण जे काही करणार आहोत ते कॅमेऱ्यातदेखील चांगले दिसायला हवे, उठून दिसायला हवे अशी अपेक्षा असते. कारण ते सर्व अल्बममध्ये जाणार असते.

वेिडग फोटोग्राफीमुळे जसा या अ‍ॅपिअरन्समध्ये बदल झाला आहे तसाच एक चांगला बदल झाला आहे तो कॅण्डीड फोटोग्राफीमुळे. यापूर्वी लग्नाचे फोटो म्हणजे केवळ ठोकळेबाज फोटो असायचे. सतत आपले हसत कॅमेऱ्याकडे डोळे करून हे सारे सुरू असायचे. पण वेिडगमधील कॅण्डीड फोटोग्राफीमुळे वेगवेगळे मूड पकडले जाऊ लागले.

फोटोग्राफीत केलेल्या गुंतवणुकीचा लवकरात लवकर परतावा देणारा असा हा वेिडग फोटोग्राफीचा व्यवसाय म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. फोटोग्राफीच्या इतर प्रकारांमध्ये तुलनेने गुंतवणुकीवर परतावा मिळण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. तुलनेने वेिडग फोटोग्राफीत बऱ्याच प्रमाणात पैसे सुटत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेक होतकरू छायाचित्रकार या प्रकाराकडे वळू लागले आहेत. नव्यानेच हा व्यवसाय सुरू केलेले राजस देशपांडे सागंतात की, सध्या तरी हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर किमान चार-पाच लाखांची गुंतवणूक करावी लागते. सुरुवातीला नवीन असताना बराच संघर्ष करावा लागतो.

सर्वच प्रकारची फोटोग्राफी करणारे फोटोग्राफर गणेश बागल सांगतात की, सध्या या व्यवसायाकडे नोकरदार लोक खूप मोठय़ा प्रमाणात वळत आहेत. दहापैकी सहा लोक तरी आठवडाभर नोकरी करून वीकेण्डला लग्नाची फोटोग्राफी करत असतात. यामध्ये इंजिनीअिरगमधील व आयटी क्षेत्रातील अनेक तरुण आढळतात. केवळ वेिडग फोटोग्राफी हेच त्यांचे अर्थाजनाचे साधन नसते. त्यामुळे अशा वेळी जे नियमित फोटोग्राफर आहेत त्यांच्या व्यवसायावर परिणाम होतो.

दुसरा मुद्दा आहे तो हातात डीएसएलआर आला की स्वत:ला फोटोग्राफर समजण्याचा. याबाबत ते सांगतात की सोशल मीडिया आल्यानंतर व्यक्त होण्याला जशी संधी मिळाली आणि प्रत्येकजण स्वत:ला पत्रकार समजू लागला तसाच हा प्रकार आहे. पण हे होणारच आहे. त्यामुळे पैसे मिळवून देणारा व्यवसाय असला तरी त्यात सध्या बराच संघर्षदेखील आहेच.

गेल्या काही वर्षांत डेस्टिनेशन वेिडग हा प्रकार चांगलाच रुळला आहे. डेस्टिनेशन वेिडगची क्रेझ गेल्या पाच वर्षांत प्रचंड वाढली आहे. गोवा, जयपूर अशी ठिकाणे यासाठी खास ओळखली जातात. अशा डेस्टिनेशन वेिडगसाठी खास फोटोग्राफरची गरज असते. आणि काही ठरावीक फोटोग्राफर्स खास अशा डेस्टिनेशनसाठीच ओळखले जातात. गेल्या एक-दोन वर्षांतील या वाढत्या ट्रेण्डमुळे काही फोटोग्राफर्सनी चक्क गोव्याला स्थलांतर केले आहे. गोवा राज्याला २०१५ चे देशातील सवरेत्कृष्ट वेिडग डेस्टिनेशन म्हणून गौरविण्यात आले आहे, हे खास नमूद करावे लागेल. एकूणच हे सारे पाहता केवळ लग्नातल्या मधुर आठवणींच्या साठवणीने एक प्रकारच्या इंडस्ट्रीला सुरुवात झाली आहे, असे म्हणावे लागेल.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com @joshisuhas2

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 1:27 am

Web Title: wedding special issue wedding photo album
Next Stories
1 लग्नसराई विशेष : ऑनलाइन सोयरीक
2 लग्नसराई विशेष : व्हर्च्युअल कांदेपोहे
3 लग्नसराई विशेष : शुभमंगल सावधान…
Just Now!
X