22 February 2020

News Flash

वाचन फराळ : स्वागत दिवाळी अंकांचे

दिनकर गांगल यांनी त्या काळातल्या तत्त्वाग्रहांचा वेळोवेळी उल्लेख केला आहे.

lp43     यंदा ग्रंथालीला चाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने या अंकात संस्थापकांपैकी एक दिनकर गांगल यांनी ‘खुल्या विचारांचे बहुमुखी व्यासपीठ’ या लेखात ग्रंथालीच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला आहे. वाचक चळवळ ते प्रकाशन संस्थेपर्यंतचा ग्रंथालीचा हा प्रवास म्हणजे आपल्या समाजाच्या गेल्या तीस वर्षांच्या वाटचालीचा एक प्रकारचा आलेखच आहे. दिनकर गांगल यांनी त्या काळातल्या तत्त्वाग्रहांचा वेळोवेळी उल्लेख केला आहे. तो बदलत्या मानसिकतेवर अप्रत्यक्ष बोट ठेवणारा आहे. आणीबाणीलाही या वर्षी ४० वर्षे झाली. पत्रकार सतीश कामत यांचा आणीबाणीचे सुलभीकरण हा लेख विचारप्रवृत्त करणारा आहे. त्याशिवाय पी. एन. धर आणि पुपुल जयकर यांच्या पुस्तकांमधल्या आणीबाणीविषयक लेखनाची जोड भर घालणारी आहे. आल्हाद गोडबोले यांनी ‘अवर फादर्स, अवर मदर्स’ या दुसऱ्या महायुद्धावरील अमेरिकेत दाखवल्या गेलेल्या जर्मन मालिकेबद्दल लिहिलेला लेख माहितीपूर्ण आहे. आज जगभरात स्थलांतराच्या मुद्दावरून घमासान सुरू असताना शेखर देशमुख यांचा ‘स्थलांतर थांबले, माणूस संपला’ हा लेख मानवी स्थलांतराचा व्यापक भूमिकेतून आढावा घेतो. अनंत लाभसेटवार यांनी अमेरिकन वैपुल्याची अडगळ हा लेख लिहिला आहे. ‘प्रिय अण्णा’ हा वर्षां गजेंद्रगडकर म्हणजेच डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या मुलीने लिहिलेला लेख बापलेकीचं नातं उलगडून दाखवतो. रमेत रमले, रमणी मी, हा सोनाली कुलकर्णी यांचा, वाडीचं कूळ आणि वस्तीचं मूळ हा मुकुंद कुळे यांचा लेख वाचनीय आहे. सआदत हसन मंटो यांची लायसन्स ही कथा, प्रेमा तुझा रंग कसा हा स्मिता भागवत यांचा लेख अंकात आहे.                                                                                                                                                                                   शब्द रुची
संपादक – सुदेश िहगलासपूरकर, मूल्य-१२० रुपये

lp44साहित्यआभाच्या अंकात ‘साजरी झाली दिवाळी’ या लेखात बेला शेंडे, अपर्णा पाध्ये, शर्वरी जमेनीस, चिन्मय मांडलेकर, भारती आचरेकर अशा विविध सेलेब्रिटींनी दिवाळीविषयी लिहिले आहे. माधव पोतदार यांनी शाहीर अमरशेख यांच्यावर गाणे, जगणे आणि अभिनयाचा साक्षात्कार घडवणारे अमर शेख हा लेख लिहिला आहे. जगणं सुसह्य़ होतंय का या परिसंवादात अशोक चौसाळकर, रत्नाकर महाजन, हेमंत देसाई, प्रमोद मुजुमदार, कुमार सप्तर्षी, भागा वरखडे, सहभागी झाले आहेत. तेव्हा ओशाळले सर्व धर्म, प्रकाश आणि माती, हवामान बदल, शेती आणि जगण्याची लढाई हे लेख वाचनीय आहेत. विद्यमान कुटुंबपद्धती आणि समाजशास्त्रीय परिणाम या विषयावर मोहन ढवळीकर यांनी गांभीर्याने मांडणी केली आहे. फास्ट फूड संकटाचा नवा टप्पा या विषयावर डॉ. अभिजीत वैद्य, शोभा भागवत, अवंती देशपांडे, डॉ. कल्याण गंगवाल, डॉ. सतीश नाईक यांचे लेख आहेत. कुठे गेल्या कामागर चळवळी या विषयावर अजित अभ्यंकर, शिवाजी कऱ्हाळे, अरविंद श्रौती, उल्का महाजन, मुक्ता मनोहर, भारत पाटणकर यांनी चर्चा केली आहे.
साहित्यआभा
संपादक- शारदा धुळप, मूल्य- २०० रुपये

lp45उद्योजक तसंच उद्योजकता डोळ्यांसमोर ठेवून हा अंक काढलेला आहे. ‘इझ ऑफ डुइंग बिझनेस इन महाराष्ट्र’ ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत अंकात आहे. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या उद्योगविश्वाचा त्यातल्या घडामोडींचा, त्यातल्या आव्हानांचा आढावा घेतला आहे. सामान्य माणसासाठी सर्च इंजिन म्हणून महत्त्वाचं असलेल्या गुगलचं महत्त्व आपण समजत असतो त्याहून किती तरी अधिक आहे हे उद्योजकांचा साथीदार या शैलेश राजपूत, शैवाली वर्दे यांच्या लेखातून लक्षात येतं. या लेखातून त्यांनी गुगलच्या उद्योजकांना उपयोगी पडणाऱ्या पंचवीस टूल्सची माहिती दिली आहे. उद्योगमंत्र्यांच्या मुलाखतीतूनही राज्यातल्या उद्योगस्थितीचा आढावा घेतला गेला आहे. प्रचलित आणि पर्यायी विकास धोरण या लेखात डॉ. सुलभा ब्रrो यांनी आपल्या देशाचे उद्योगधोरण बडय़ा कंपन्यांचा नफा वाढवणारे आणि श्रमिक आदिवासींना विस्थापन करणारे कसे आहे याची मांडी केली आहे. महाराष्ट्रातील उद्योग दिशा आणि दशा या लेखात परकीय गुंतवणूक आणून उद्योग वाढवण्याच्या धोरणावर टीका केली आहे. ऑनलाइन विक्रीची सप्तपदी या लेखात डॉ. वैशाली वाढे यांनी व्यवस्थापन पद्धतींचा आढावा घेतला आहे. उद्योजकांच्या प्रेकर कथाही वाचनीय आहेत.
स्मार्ट उद्योजक
संपादक शैलेश राजपूत, मूल्य- १५० रुपये

lp46ग्राहकांचं हित हा उद्देश असणाऱ्या ‘ग्राहकहित’ या दिवाळी अंकाने नेहमीप्रमाणे यंदाही वाचकांना वैविध्यपूर्ण लेखांची मेजवानी दिली आहे. ‘ध्यासगाथा’, ‘वसा आणि वारसा’, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-माध्यमातला आणि वास्तवातला’ या तीन विभागांमध्ये ‘ग्राहकहित’ हा दिवाळी अंक प्रकाशित झाला आहे. तिन्ही विभागांचे विषय उत्तम असून त्यातील लेखही वाचनीय आहेत.

इतरांसाठी, इतरांच्या भल्यासाठी, संघटित होऊन झटलेल्या, उत्कृष्ट कामगिरी केलेल्या काही कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांची गाथा ‘ध्यासगाधा’ या विभागात आहे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, आर. के. लक्ष्मण, बाळासाहेब देवरस, डॉ. नरेंद्र नाभोलकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, आप्पा पेंडसे आणि स्टीव्हन स्पीलबर्ग आदि व्यक्तींचा यात समावेश आहे. त्यांच्या कार्याचा आढावा, वैशिष्टय़े, संघर्ष, विचारप्रणाली, मते अशा विविध पैलूंवर भाष्य करणारे लेख ‘ध्यासगाथा’मध्ये आहेत. या विभागाची सुरुवातच प्रेरणा देणारी असल्यामुळे संपूर्ण विभाग वाचनीय आहे. विशेष म्हणजे या लेखांमध्ये तत्कालीन काही छायाचित्रेही प्रसिद्ध केल्याने वाचकांना संग्रहासाठी उपयुक्त ठरू शकतो.

‘वसा आणि वारसा’ हाही आणखी एक वाचनीय विभाग आहे. विविध क्षेत्रातील कौटुंबिक वारसा पुढे नेणाऱ्या कुटुंबाची संख्या कमी नाही. आपल्या व्यवसायाचं महत्त्व जाणून घेणं त्या-त्या कुटुंबासाठी आवश्यक असतंच. अशाच काही कुटुंबाची कहाणी या विभागातून मांडण्यात आली आहे. ते करीत असलेल्या कामाचं महत्त्व आणि आवश्यकता जाणून कला व्यवसायाचा वारसा पिढय़ान्पिढय़ा वृद्धिंगत करणाऱ्या ३२ कुटुंबाची कहाणी यामध्ये दिली आहे. समाजकारण, पत्रकारिता, कला व्यवसाय, प्रकाशन, उद्योग, राजकारण, पत्रकारिता इत्यादि क्षेत्रातील प्रत्येकी एका कुटुंबाचा यात समावेश आहे.

या दिवाळी अंकाचे वैशिष्टय़ म्हणजे यातील ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-माध्यमातला आणि वास्तवातला’ हा तिसरा विभाग. संघस्थापनेच्या नव्वदाव्या वर्षांचे औचित्य म्हणून या विभागात संघासंबंधीचा परिसंवाद मांडलेला आहे. यात विविध राजकीय विचारप्रवाहातील आणि संघातील अनुभवी मान्यवरांचे लेख आहेत. माध्यमांमध्ये संघाची प्रतिमा काय आहे, कशी उभी केली जाते, संघाकडून माध्यमांशी संपर्क होताना काय कमी-जास्त होतंय असे विविध मुद्दे या परिसंवादात नमूद केले आहेत.

कर्तृत्ववान व्यक्तींची गाथा, विविध व्यवसायांचा-विचारप्रणालीचा कौटुंबिक वारसा असलेली घराणी आणि माध्यम व वास्तवातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं स्वरूप अशा विविध विषयांवरील विभाग देणारा ‘ग्राहकहित’ हा दिवाळी अंक संग्रही ठेवावा असा आहे.
ग्राहकहित
संपादक – सूर्यकांत पाठक, मूल्य – १०० रुपये.

lp47डोंगरभटक्यांच्या विश्वाची खबरबात देणारा जिद्दच्या दिवाळी अंकात अनेक नावीन्यपूर्ण विषयांचा समावेश आहे. कर्चा पर्वताजवळील आजवर अजिंक्य असलेल्या शिखरावरील मोहिमेचा आनंद शिंदे यांनी मांडलेला थरारक अनुभव मोहीम – शिखर सावरकरमध्ये उलगडला आहे. हे शिखर सर केल्यानंतर त्याचे शिखर सावकर असे नामकरण करण्यात आले आहे. या मोहिमेचे वर्णन प्रेरणादायी आहे. टाटा मोटर्सच्या पापसुरा शिखर मोहिमेचे विस्तृत वर्णन डॉ. अमित प्रभू यांनी लिहिले आहे. धनंजय मदन या हाडाच्या भटक्याने आजवरच्या भटकंतीतून लाभलेलं संचित माझी भटकंती व वन्यजीव- एक सुंदर शिकवण या लेखात मांडले आहे. खंडाळा घाटातील नाथबाबाची गुहा या धम्माल पावसाळी ट्रेकची माहिती गजानन परब यांच्या लेखातून मिळते. बापूजी मुदगल देशपांडे नांदोशीकर, बाजीराव पेशवे – अभेद्य योद्धा, यूएसजे म्हणजेच युनायटेड स्टेटस ऑफ जावळी आणि महाराष्ट्र नामाची प्राचीनता हे राजाराम शंकर पाटील देशपांडे, शिल्पा परब-प्रधान, अरुण भंडारे यांच्या अभ्यासपूर्ण लेखातून अनेक अज्ञात गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.  हे सर्वच लेख मुळातून वाचण्यासारखे आहेत. भटक्यांना इतिहासाची अनेक कवाडे यातून खुली होणारे आहेत. आवर्जून संग्रही ठेवावा असा हा अंक आहे.
जिद्द
संपादक – सुनील राज, किंमत – रु. ५०/-.
lp48इतिहास, भूगोल, भटकंती, दैवते, नकाशावाचन, जैववैविध्य अशा एखाद्या किल्ल्याच्या अनुषंगाने येणाऱ्या सर्वच विषयांचा वेध घेणारा किल्ला हा विशेषांक म्हणावा लागेल. नेहमीच्या सरधोपट विषयांच्या पलीकडे जाणारे लेख हे या अंकाचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे डोंगरभटक्यांना शारीरिक परिश्रमाच्या पलीकडे जात अनेक विषयांचा खुराक मिळणार आहे. गडकिल्ल्यांवरील देवदेवता हा डॉ. गो. बं. देगलूरकर यांचा लेख, नकाशाद्वारे दुर्गवेध हा आनंद पाळंदे यांचा लेख, मिलिंद आमडेकर यांनी वर्णिलेल्या अगडबंब तोफा, आंध्रातल्या अनोख्या शिवस्मारकावरील विश्वास पाटील यांचा लेख, अष्टप्रधान मंडळावरील सुहास सोनावणे यांचा लेख हे इतिहासप्रेमी डोंगरभटक्यांच्या ज्ञानात भर टाकणारे आहेत. दुर्गप्रतिमा आणि दुर्गरंग या दोन्ही लेखातून एक वेगळी दृष्टी लाभते.

अंकाचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे नेहमीच्या चर्चेतल्या किल्ल्यांवर वर्णनात्मक लेख यात नाहीत. कंधार, नळदुर्ग, टॉवर ऑफ लंडन, जिंजीचा किल्ला, मंगळवेढे, नगरधन किल्ला यांवरील महेश तेंडुलकर, अनिल नेने, डॉ. प्रभाकर देव, गोपाळ देशमुख, अमोल सांडे यांचे लेख आवर्जून वाचावे असे आहेत. संपूर्ण रंगीत असा हा आकर्षक पद्धतीने सजवल्यामुळे अनेक गडकिल्ल्यांची सफर घडते. प्रत्येक इतिहासप्रेमी, किल्लेप्रेमी आणि डोंगरभटक्यांनी संग्रही ठेवावा असा हा अंक आहे.
किल्ला
संपादक – रामनाथ आंबेरकर, किंमत – रु. ३००/-.

प्रतिनिधी – response.lokprabha@expressindia.com

First Published on December 4, 2015 1:17 am

Web Title: welcome diwali anka 2
Next Stories
1 कथा : एका चोराची कथा
2 ललित : वाट
3 फोर्ट लॉडरडेलचे बेघर