News Flash

‘तिला’ही साजशृंगारासह निरोप

जिवंतपणीच नरकयातना भोगणाऱ्यांचं मृत्यूनंतर काय होतं?

|| शर्मिष्ठा भोसले

जिवंतपणीच नरकयातना भोगणाऱ्यांचं मृत्यूनंतर काय होतं? नाइलाजाने शरीरविक्रयाच्या व्यवसायात येणाऱ्या, जवळच्या माणसांकडून फसवल्या गेलेल्या, समाजाने झिडकारलेल्या स्त्रियांच्या मृत्यूनंतरच्या वास्तवाचा शोध-

एकच अरुंद खोली. खोलीत दाटीवाटीनं बसवलेले पलंग. सगळ्या पलंगांपुढे लावलेले पडदे जुनकट झालेले. मळकट गुलाबी-निळ्या भिंती, एका भिंतीवर ठोकलेल्या पत्र्याच्या वळचणीवर ठेवलेल्या देव-देवीच्या तसबिरी, सगळ्या अनोळखी. आतल्या रिकाम्या पलंगांवर सांडलेला झिरो बल्बचा लाल प्रकाश.

‘देख, ये रेड लाइन है’ साऊ अक्का बोलत राहते.. ‘यहां कोई नई लडकी दाखिल होती ना, तो हम बोलते अब ये कौन आगई इधर मरनेको? यानी समझी ना तू?’ मी मान डोलावली. ऐकता-ऐकवताना एक अनोळखी वास मेंदूच्या नसा उचकटवत राहिला. कळेना कशाचा.
साऊ अक्का. ती देवदासी आहे. मी तिला मृत्यूसंबंधी बोलतं करण्याच्या प्रयत्नात प्रश्न विचारल्यावर ती म्हणते, ‘त्याचं काय एवढं, आमच्या इथल्या बायकापोरी मरतात. मुस्लीम असली तर मुल्ला बोलावतो. म्हणतो, ‘बाबा, पढ तुझा फातेहा.’ हिंदू असली तर बामन आणतो, मंत्र म्हणायला. कसाय, जिवंत होती तवर इथं नरकात होती. मेल्यावर तरी जरा शांती भेटावं ना तिला! या लायनीत कोनीच बाई तिच्या मर्जीनं येत नाही. रोजच मरत असती ती.’ साऊ अक्का हे कमालीच्या थंड आवाजात बोलते.

मी मग उगाच विषय बदलते, ‘तुम्ही लोक गावी जाता की नाही कधी?’ साऊची अजून एक मत्रीण येऊन बसलेली असते. तीपण कानडी. देवदासी. म्हणते, ‘गावी आम्ही जास्त जात नाही. एकतर पशाची अडचण आणि अंतरं लांब-लांब. कुणी-कुणी मरतं तेव्हा, कुणाचा शादीब्याह असतो तवाच आम्ही जातो. बाकी इकडूनच पसे पाठवत राहतो.’ दरम्यान, आणखी काही जणी घोळक्यात येऊन आमच्याजवळ बसल्या. धंद्याचा टाइम नसल्यानं सगळं निवांत होतं.

तितक्यात एक साडीवाला आला. कुणी दास म्हणून. बंगाली मुस्लीम मुली इथं खूप असतात. त्यानं जास्त बंगाली साडय़ा आणल्या होत्या. मृत्यूविषयी बोलता-बोलता वेगळ्याच जगात पोचलेल्या सगळ्या जणी एकदमच जशा काही भानावर आल्या. साडीवाल्याला त्यांनी गाठोडं खोलायला सांगितलं. सगळ्या जणी साडय़ा बघताना हरखून जात राहिल्या..

बोलताना समजलं, अनेकदा या वेश्यांचे नातेवाईक, अगदी रक्ताच्या नात्यातले लोकसुद्धा त्या मेल्यावर गावाकडून इकडं येत नाहीत. अशा वेळी आपापल्या पदरचे पसे घालून, चंदा गोळा करून बाकीच्या वेश्या आणि दलाल लोक यांचा अंत्यसंस्कार करतात. हे शक्यच झालं नाही तर महानगरपालिकेची गाडी येते आणि प्रेत घेऊन जाते. एक जण बोलते, ‘असं बेवारस मरणं वाईट असतंय बघ. पण नशीब आता एकेकीचं! काय करणार?’

साऊ अक्का आणि तिची मत्रीण देवदासी आहे. त्यांच्यात जाळत नाहीत, पुरतात. त्या बाईला सगळा साज-शृंगार करून, यल्लम्मा देवीची गाणी म्हणत निरोप दिला जातो. मगाशी भिंतीवर पाहिलेली ती देवीची तसबीर यल्लम्मा देवीची असल्याचं आत्ता कळालं.
एक बंगाली मुस्लीम मुलगी म्हणते, ‘आम्ही ब्राह्मणाला किंवा मुल्लाला विचारतो, ‘ये औरत अच्छे टाइमपे मरी के नई? कैसा रहेताय,
वो खराब टाइमपे मरी, तो उसका पसा वो बम्मन न लेताय. पर बुरा वकत होगा, तो उसके नामपे एक काला मुर्गा और निंबू समशानमें चढाके आते.’

कालिया भेटले. मूळचे मराठवाडय़ातले. लोक म्हणतात, कालिया तिथले सगळ्यात जुने दलाल आहेत. कालिया सांगतात, ‘पूर्वी वेश्यांचं आधार कार्ड, रेशन कार्ड नसायचं. मग त्यांना स्मशानभूमीत जाळायचं तर त्यांच्याकडं कुठलंच आयकार्ड, ओळख नसायची. अशा वेळी मीच त्यांचा भाऊ म्हणून तिथं नाव लावायचो. मग कुठं अंतिम संस्कार व्हायचा. असं अनेक जणींचा मी आजवर भाऊ बनलोय.’
एक जण बोलली, ‘लोकं वाईट मरणाला म्हणतात -कुत्ते की मौत, तसं आम्ही कधी कधी बोलतो, रंडी की मौत. रंडी की मौत मरना बुरा रहेताय देख..’ मी विचारते, ‘यानी कैसी मौत?’ त्यावर ती बोलते, ‘यानी गुमनामीकी, बदनामीकी मौत. जिसके मौतपे शायदही कोई रोताय. बहोत लोगा खूश होते. चलो इसकी जान छुटी..’

एक होती जरा तारुण्य ओसरलेली. डोळ्याखाली खूप सारी काळी वर्तुळं. बोलली, ‘‘आम्ही आमच्यासोबत झोपलेले लोक मरताना अनुभवलेत. कसाय ताई, अनेकदा म्हातारेकोतारेबी येतेत आमच्याकडे. त्यांना पलंगावरच हार्टअ‍ॅटक येतो, नसता बीपी हाय व्हतं. मंग काय, जागेवरच खल्लास! पण त्याच्या घराच्याला हा माणूस इथं मेला हे बाहेर कळू द्यायचं नसतंय. मग ते लोकं त्याला तिथून गपचूप घेऊन जातेत. आम्हीबी कुणाला काय बोलत-सांगत नाही. त्याच्या घरचे पोलिसांना पसे देऊन मरण्याचं खोटं कारण नोंदवून टाकतेत. आमच्या इथं यायचं तर सगळ्याला असतंय. पण येण्याचा डाग लोकाला जितेपणीच काय मरणानंतरपण नको असतंय.’
वेश्यांमधल्या अनेक जणी आत्महत्या करतात. यार धोका देतो. कुणी त्यांचे पसे लुबाडून नेतं, रखेल म्हणून ठेवलेल्यानं हाकलून दिलेलं असतं, असं बरंच काय-काय.. ‘आता काही महिन्यांपूर्वीच एका नेपाळी वेश्येनं आत्महत्या केली. भर रस्त्यात जाळून घेतली बघ. तिला एका पोरानं प्रेमात धोका दिलता.’ एक कुणी बोलली आणि मृत्यूविषयी बोलता-बोलता ती एकदमच आपल्या मुला-बाळांविषयी बोलाय लागते. तिला कदाचित असुरक्षित वाटू लागतं..

निघताना लक्षात येतं, डोक्यात अखंड भणभणणारा तिथला तो वास वीर्याचा होता.. वाटून गेलं, वीर्याचा वास जगण्यासारखा असतो की मरणासारखा?

response.lokprabha@expressindia.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 3:15 am

Web Title: what is death
Next Stories
1 प्रथा-परंपरा श्रद्धा
2 ‘मोक्षप्राप्ती’चा मार्ग
3 सदाको आणि क्रेन पक्षी
Just Now!
X