सुनिता कुलकर्णी

तो एका हिरव्या जांभळ्या रंगाच्या गुहेतून धावत सुटला होता. गुहेच्या भिंतीना असलेली काटेरी टोकं सारखी पुढे येऊन त्याला टोकायला बघत होती आणि त्यांच्यापासून जीव वाचवत तो धावत सुटला होता. एरवी कॉम्प्युटरवर खेळल्या जाणाऱ्या गेममध्ये असतं तसं येणारे सगळे अडथळे जीवाच्या आकांताने ओलांडत तो गुहेबाहेर पडला. समोर विस्तीर्ण प्रदेश होता. पण सगळाच निर्मनुष्य आणि शुष्क. समोर फक्त आकाश, धरती आणि तो… एकटाच…

हे कुठल्या रहस्यमय कादंबरीतलं वर्णन नाही तर कुणा एकाला पडलेलं स्वप्नं आहे. आपण अडथळे ओलांडत कुठेतरी धावतो आहोत किंवा पूर्णपणे एकटे आहोत असं किंवा या स्वरुपाची स्वप्नं अलीकडच्या काळात अनेकांना पडत आहेत, ती टाळेबंदी किंवा विलगीकरणाचा त्यांच्या मनावर होत असलेल्या परिणामांमुळे.

टाळेबंदी, करोनाचा संसर्ग होण्याची भीती, विलगीकरण या सगळ्या काळात लोकांना कुठली स्वप्नं पडतात याचा अभ्यास जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो आहे. लोकांना या काळात भीतीदायक, एकटेपणा अधोरेखित करणारी स्वप्नं पडत आहेत आणि त्याचा त्यांच्या झोपेवर परिणाम होतो आहे, असं या अभ्यासांमधून पुढे येत आहे.

बोस्टन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मेडिसिनचे स्वप्न या विषयातले तज्ज्ञ डॉ. पॅट्रिक मॅक्नामारा सांगतात की, आपण सहसा आरइएम म्हणजे रॅपिड आय मूव्हमेंट स्लीप या प्रकारची झोप घेतो. त्यात तीव्र विशेषत: नकारात्मक भावना हाताळल्या जातात. आत्ता कोविड महासाथीच्या काळात लोकांच्या मनावर खूप ताण आहे, काळजी आहे त्यामुळे त्यांना तशा प्रकारची स्वप्नं पडत आहेत. सतत वाटणारी भविष्याची चिंता, फारशा शारीरिक हालचाली नसणं याचा परिणाम होऊन त्यांना नीट झोपही लागत नाही. सतत जाग येत राहते. आदल्या दिवशीच्या संदभार्तल्या एखाद्या गोष्टीतला काहीतरी संदर्भ पकडून स्वप्नं पडत राहतात.

फ्रान्समधल्या लीऑन न्यूरोसायन्स रीसर्च सेंटरमध्ये मार्चपासून सुरू असलेल्या स्वप्नांच्या अभ्यासातून काढला गेलेला निष्कर्ष असा आहे की, लोकांना महासाथीच्या काळात स्वप्न पडण्याचं प्रमाण पूर्वीपेक्षा ३५ टक्के जास्त आहे आणि त्यातही नकारात्मक स्वप्नांचं प्रमाण १५ टक्क्यांनी वाढलं आहे.

द इटालियन असोसिएशन फॉर स्लीप मेडिसिननेही लोकांच्या करोनाकाळातल्या स्वप्नांचा अभ्यास करायला घेतला आहे. त्यांच्या मते या काळातल्या ताणतणावाचा लोकांच्या झोपेवर परिणाम झाला आहे. त्यांना भीतीदायक स्वप्नं पडण्याचं प्रमाण वाढलं आहे.

तुम्ही दिवसभर ज्या भावना मनात घेऊन वावरत असता त्याच भावना स्वप्नांमधूनही व्यक्त होतात. त्यामुळे काहीजणांना आपण करोना विषाणूला पकडलं आहे आणि नियंत्रणात आणलं आहे असंही स्वप्नं पडलं तर काहीजणांना करोना विषाणू म्हणजे एखादा कीटक, झोंबी, एखादी धूसर आकृती असावी असंही स्वप्नं पडलं.