09 July 2020

News Flash

ब्युटी पार्लरमध्ये काय असतं ?

स्वत:चं सौंदर्य खुलवण्याची नैसर्गिक ओढ पुरूषांच्या तुलनेत महिलांमधये अधिक असते

-सुनिता कुलकर्णी

सरकारने राज्यात सलून आणि ब्युटी पार्लर्स सुरू ठेवायला परवानगी दिल्यानंतर कोल्हापूरात एका सलूनमध्ये सर्वप्रथम प्रवेश केलेल्या ग्राहकाचे केस सोन्याच्या कात्रीने कापण्यात आले, यावरून या व्यावसायिकांच्या मानसिकतेची कल्पना येते.

अर्थात आता सलून, पार्लर उघडून व्यवसाय करायला मुभा मिळाली असली, तरी पुढचा काळ जास्त जोखमीचा आहे. सलून असो की पार्लर, दोन्हीकडे ग्राहकांशी थेट शारीरिक संपर्क येत असल्यामुळे, संबंधित व्यावसायिकांना आणि ग्राहकांनाही काळजी घेणं गरजेचं आहे. शिवाय या सेवा सुरू झाल्या असल्या तरी लगेचच उठून बहुतेक लोक त्यांचा लाभ घेण्यासाठी जातीलच असं नाही. पुरूषांच्या बाबतीत केस कापणं आणि दाढी या दोन मुख्य गोष्टींसाठी ते सलूनमध्ये जातात. त्याशिवाय इतरही सेवा आजकाल सलूनमधून मिळतात. पण स्त्रिया ब्युटी पार्लरमध्ये जाऊन ज्या प्रमाणात सौंदर्यवृद्धीच्या सेवा घेतात, त्या तुलनेत पुरूषांच्या बाबतीत हे प्रमाण कमी आहे. या तीन महिन्यांच्या काळात तर या सेवा बंद असल्यामुळे अनेकांनी घरच्याघरी एकमेकांचे केस कापण्याचे, दाढी वाढवण्याचे प्रयोग केले आहेत. पण करोनाच्या संसर्गाचं प्रमाण वाढतं असल्यामुळे सलून सुरू झाल्यावर पूर्वीच्याच संख्येने लोक लगेचच उठून सलूनमध्ये जातील का? हा प्रश्न आहे.

ब्युटी पार्लरचा प्रश्न आणखी वेगळा आहे. स्त्रिया फक्त केस कापण्यासाठी तिथे अजिबात जात नाहीत. त्यांचं आयुष्य पुरूषांपेक्षा अधिक रंगतदार, अधिक चैतन्यशील असतं. पुरूषांच्या तुलनेत त्या अधिक सौंदर्यासक्त असतात. त्यांच्याकडे स्वत:चं सौंदर्य खुलवण्याची नैसर्गिक ओढ पुरूषांच्या तुलनेत अधिक असते. त्यामुळे ब्युटी पार्लरमध्ये जाऊन त्यांना फक्त केस कापायचे नसतात, तर त्यांच्या वेगवेगळ्या स्टाईल्स करायच्या असतात. ते वेगवेगळ्या रंगात रंगवायचे असतात. वेगवेगळ्या प्रकारची फेशियल करायची असतात. भुवया कोरायच्या असतात. शरीरावरचे अनावश्यक केस काढून टाकायचे असतात. हातापायांचे पेडिक्युअर, मेनिक्युअर करायचे असते. हातापायाच्या नखांना आकार देऊन ती रंगवायची असतात. काही खास समारंभ असेल तर पार्लरमध्ये जाऊन मेकअप करून घेऊन आपले रुप खुलवायचे असते. या खास समारंभाची व्याप्ती घरातल्या अगदी कुत्र्यामांजराच्या वाढदिवसापासून कितीही मोठ्या प्रसंगापर्यंत असू शकते.

पण एवढंच असतं का पार्लरमध्ये ? अजिबात नाही. तिथे जीवनाचा एक विलक्षण असा निर्झर मुक्तपणे वहात असतो. तो दिसत नाही, पण तो असतो. ‘सुंदर मी होणार’ असं म्हणत ब्युटी पार्लरची पायरी चढणारी प्रत्येक स्त्री तो वाहता ठेवण्यासाठी हातभार लावत असते.  कोणत्याही ब्युटी पार्लरमधून ऐकू येणारे हास्याचे फवारे, खळाळत्या गप्पा, ‘उसकी स्कीन, उसके बाल मेरे से अच्छे कैसे’ ही असूया असणाऱ्या नजरा, सतत येणाऱ्या सौंदर्यविषयक नवनवीन उत्पादनांबद्दल जाणून घेण्याची जिज्ञासा, ते वापरून बघण्याची प्रयोगशीलता, तिथे रंगणारी गॉसिप्स, स्वत:च्या बाह्य सौंदर्याबद्दलची कमालीची दक्षता आणि बाकी सगळ्या जणींच्या बाह्य सौंदर्याबद्दलची कमालीची तुच्छता, त्याबद्दलची आत्यंतिक अशी चिकित्सक वृत्ती…ब्युटी पार्लर दहा बाय दहाच्या खोलीमधलं असो की दोन- तीन मजली असो, घराच्या गल्लीमधलं असो की ब्युटी स्टुडिओ म्हणून मिरवणारं, ब्रॅण्डेड असो… तिथलं जग असं अतिशय रसरशीत, रंगतदार असतं.

करोनाने गेल्या तीन महिन्यात ते मोडीत काढलं असलं, तरी स्त्रियांची दांडगी जीवनेच्छा ते असं कधीच मोडीत जाऊ देणार नाही. ब्युटी पार्लर्स सुरू झाली म्हणजे लगेच कदाचित ती पूर्वीसारखी भरभरून वाहणार नाहीत. तिथे मिळणाऱ्या सेवांसाठी थेट शारीरिक संपर्क अपेक्षित असल्यामुळे करोनाचा धोका टाळण्यासाठी काही काळ जावा लागेल. पण स्वत:ला सुंदर करणाऱ्या त्या जादुई गुहेची स्त्रियांची ओढ कधीच कमी होणार नाही. ‘करोनामुळे मास्क लावावा लागत असल्यामुळे लिपस्टीक लावणाऱ्या स्त्रियांची भलतीच पंचाईत झाली बुवा’ अशी टिप्पणी करणाऱ्यांना हे स्त्रियांचं हे रंगीन विश्व कधीच समजणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2020 1:16 pm

Web Title: whats in a beauty parlor msr 87
Next Stories
1 ‘पिझ्झागेट’चं भूत बाटलीबाहेर
2 साहेब, रजेस कारण की…
3 अन’फेअर’ जाहिरातीचा ‘लव्हली’ शेवट
Just Now!
X