News Flash

हर शख्स परेशान सा क्यों है…

शहरे फक्त पैशांवर चालत नाहीत, तर त्यांना कष्टकऱ्यांच्या कष्टांचीही जोड असते.

करोनाच्या उद्रेकामध्ये सगळेच होरपळून निघत असले तरी तुलनेत आर्थिक परिस्थिती बरी असलेले आपापल्या घरांमध्ये सुरक्षित आहेत, लहानसहान कामं करून आपल्या कुटुंबाचं पोट भरणारे आपापल्या वस्त्यांमधल्या घरांमध्ये आहेत. बरेचजण कुठेकुठे सरकारने उभ्या केले त्या असऱ्यांमध्ये आहेत आणि  बरेचजण हजारो किलोमीटरवरच्या आपापल्या गावी चालत गेले आहेत.

मुंबईसारख्या महानगरामध्ये, ठाणे, नवी मुंबई, पुणे अशा शहरांमध्ये परप्रांतीयांच्या वाढत्या संख्येवरून नेहमीच हवा तापवली जाते. पण आज या ठिकाणी दूध – पेपर टाकणारे, इस्त्री करणारे, भाज्या, फळांची विक्री करणारे, अँपवरून ऑर्डर दिल्यावर अन्न पदार्थ आणून देणारे, ऑनलाइन खरेदी केल्यावर त्या वस्तू घरपोच आणून देणारे, सिक्युरिटी गार्ड, घरकाम करणाऱ्या स्त्रिया, ओला – उबर गाड्या चालवणारे ड्रायव्हर, वेगवेगळ्या गोदामांमध्ये मालाची चढ उतार करणारे हमाल, बांधकाम मजूर अशी अनेक प्रकारची कामं करणारे परप्रांतीय जिवाच्या भीतीने आपापल्या गावी परतले आहेत.

लॉक डाऊन जेव्हा केव्हा संपेल तेव्हा ही सगळी माणसं लगेचच परततील का याविषयी आज तरी कुणीही काहीही सांगू शकत नाही. खरं म्हणजे जीवाच्या भीतीने शहरातून आपापल्या माणसांमध्ये निघून गेलेली ही मंडळी लगेचच परतण्याची शक्यता तशी कमीच आहे. आज करोना इतकंच या मंडळींच्या नसण्यामुळे देखील शहरामधलं जनजीवन ठप्प झालं आहे. आपल्याकडे अर्थातच चांगल्या नोकरीतून कष्ट करून मिळवलेला पैसा आहे आणि राहण्यासाठी सुस्थितिमधील घर आहे म्हणजे आपल्याला या शहरांमध्ये जगण्याचा जन्मसिद्ध हक्क आहे, असं मानून कष्टकऱ्यांबद्दल असहिष्णुता बाळगणाऱ्या मंडळींना आता कदाचित त्यांचं महत्व समजलं असेल, अशी आशा बाळगायला हरकत नाही. कारण कोणतंही शहर फक्त उंच इमारती आणि त्यातल्या मोठमोठ्या आलिशान घरांनी, मॉल्सनी बनत नाही, तर तिथे वावरणाऱ्या मंडळींसाठी काम करणाऱ्या कष्टकरी समाजाचा, त्याच्या जगण्याचा, आकांक्षांचा, गरजांचाही विचार करावा लागतो. त्यांच्यासाठीही घरं बांधावी लागतात. त्यांची मुलं जाऊ शकतील अशी शाळा- कॉलेजे उभारावी लागतात.

शहरे फक्त पैशांवर चालत नाहीत, तर त्यांना कष्टकऱ्यांच्या कष्टांचीही जोड असते. आपल्या कार्पोरेट कार्यालयातील महत्वाच्या मिटींगला वेळेवर पोहोचण्यासाठी घरकामातील मदतनीस, कचरा उचलणारा, दूधवाला, पेपरवाला, इस्त्रीवाला, ओला -उबरवाला हे सगळेच नीट जगायला हवे आहेत हा आपल्याला करोनाने दिलेला धडा आहे, असं म्हणायला हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 1:43 pm

Web Title: why everyone is upset msr 87
Next Stories
1 भारतीय मायकल (बाबा) जॅक्सन
2 #छोट्याप्रेमकथा चा ट्रेण्ड व्हायरल
3 करोनाशी दोन हात : चंद्रपूरकरांनी तयार केला कलरकोड
Just Now!
X