-सुनिता कुलकर्णी

ऑलिम्पिक हा क्रीडा क्षेत्रामधला महत्त्वाचा सोहळा. पण यावर्षी जपानमधल्या टोक्यो इथं होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा करोनामुळे पुढे ढकलल्या गेल्या आहेत आणि त्या पुढच्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान होतील असं जाहीर करण्यात आलं आहे. पण आता तर त्या पुढच्या वर्षी देखील आणखी पुढे ढकलल्या जातील अशी कुजबूज सुरू झाली आहे. शिवानी नाईक यांनी इंडियन एक्स्प्रेसमध्ये ही बातमी दिली आहे.

टोक्योच्या साथरोग निरीक्षण समितीने अलीकडेच नाइटक्लबमध्ये गाणं, नाचणं याबरोबरच मोठमोठ्याने संगीत वाजवणं यावर बंदी घातली. अशा कानठळ्या बसवणाऱ्या संगीतामुळे तिथे असणाऱ्या लोकांना एकमेकांच्या तोंडाजवळ जाऊन बोलावं लागतं आणि त्यामुळे करोनाचा प्रसार होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. जपानने २५ मे रोजी आरोग्य आणीबाणी उठवली असली तरी तिथे दिवसाला दोन डझन करोना रुग्ण  आढळायला लागले आहेत. त्यातही जास्त प्रमाण नाइटक्लबमध्ये येणाऱ्या लोकांमधून आहे. त्यामुळे तिथल्या आरोग्य तज्ज्ञांना करोनाची दुसरी लाट येण्याची भीती वाटते आहे. म्हणूनच आता पुढच्या वर्षीची ऑलिम्पिक स्पर्धा तरी घेता येईल का? असा प्रश्न संबंधितांना पडला आहे.

विचार करा, ऑलिम्पिकसाठी उभ्या करण्यात आलेल्या नगरीमध्ये एका वेळी दहा हजार खेळाडू असणार, त्यांचा सपोर्ट स्टाफ असणार. वेगवेगळे अधिकारी असणार. जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमधून येणाऱ्या लोकांमुळे तिथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होणार. या सगळ्याच्या परिणामाचा विचार करता पुढच्या वर्षी तरी ऑलिम्पिक्स होणार का हा प्रश्न आहे.
जपान टुडेने जपानच्या ऑलिम्पिक समितीचे सदस्य हारूहुकी ताकायेशी यांचा हवाला देऊन म्हटलं आहे की २०२१ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा घेणं हे मुख्य उद्दिष्ट आहे, पण त्या घेणं शक्य झालं नाही तर आपण त्यासाठीही तयार असलं पाहिजे. पण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे थॉमस बाच सांगतात की असा कोणताही प्लान बी आम्ही केलेला नाही. तर जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्या मते २०२१ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा घेणं हा एकच पर्याय आहे.

असं असलं तरी सध्याच्या परिस्थितीत करोना व्हायरसवर कोणतंही औषध नाही आणि या विषाणूचा प्रसार ज्या वेगाने होतो आहे, तो पाहता पुढच्या वर्षीच्या म्हणजे आधीच पुढे ढकलल्या गेलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांवरदेखील प्रश्नचिन्हच आहे.
काही खेळाडूंनी जुलै २०२१ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार असं गृहित धरून तयारी सुरू केली असली, तरी वास्तव परिस्थिती पाहता ते कठीण असल्याचंच दिसतं. कारण जगभरातून येणाऱ्या खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी यजमान देशात करोनाचं प्रमाण शून्यावर आलेलं असायला हवं, ही टोक्योमध्ये ऑलिम्पिक घेण्यासाठीची पूर्वअट असेल. ऑस्ट्रेलियाच्या डिकीन विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे जॉन ग्लोस्टर सांगतात की, ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या चार आठवड्यांपासून करोना रुग्णांचं प्रमाण शून्यावर आलं आहे. तिथे आता नवीन रुग्णांचं प्रमाणही शून्यावर आलं आहे. यजमान देशातही ते असंच शून्यावर येणं अपेक्षित आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेशीही सल्लामसलत करणार आहे. कारण वर्षभराच्या काळात सगळ्या जगात करोना रुग्णांची संख्या शून्यावर आलेली असेल अशी अपेक्षा करणं थोडं अती आहे. ग्लोस्टर सांगतात की कदाचित असंही केलं जाईल की ज्या देशातून करोना रुग्णांची संख्या शून्यावर आलेली नसेल, त्या देशातून येणाऱ्या खेळाडूंचं विलगीकरण करणं, त्यांची करोना चाचणी घेणं असे उपाय असू शकतात. ऑलिम्पिक नगरीमध्ये हजारो खेळाडून राहणार, एकत्र जेवणार, बसने फिरणार, प्रॅक्टिस करणार अशा वेळी एकाला जरी संसर्ग झाला असेल तरी सगळ्या व्यवस्थेवर पाणी फिरवलं जाऊ शकतं.

डिकीन विद्यापीठाचे क्रीडा व्यवस्थापक आणि संचालक डेव्हिड शीलबरी सांगतात की, सगळ्या जगात करोना नियंत्रणात आल्याशिवाय ऑलिम्पिक स्पर्धा भरवली जाणं मला तरी अशक्य वाटतं. अन्यथा ज्या देशांमध्ये करोना नियंत्रणात आलेला नाही, त्यांना या स्पर्धांमध्ये भाग घेता येणार नाही असं काहीतरी करावं लागेल.

इकडे २०२० च्या ऑलिम्पिक स्पर्धा २०२१ मध्ये ढकलल्यामुळे जपानचं दोनशे ते सहाशे कोटी डॉलर्सचं नुकसान झालेलं आहे. त्या आणखी वर्षभर पुढे गेल्या तर ऑलिम्पिकचं आयोजित करणं जपानला शक्य होईल असं दिसत नाही. अशा परिस्थितीत कदाचित त्या रद्दच होतील. कारण जपानमध्ये २०२२ मध्ये विंटर गेम्सही आहेत. दोन्हीसाठी एकाच वर्षात प्रायोजक तसंच प्रक्षेपक मिळवणं खूप कठीण होऊन बसेल.

ऑलिम्पिकप्रमाणेच बीजिंग विंटर गेम्स, फिफा वर्ल्ड कप, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स याबरोबरच आणखीही आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे प्रायोजक आपापल्या स्पर्धांसाठी पैसा कसा उपलब्ध करायचा या चिंतेत आहेत.

शिवाय ऑलिम्पिक स्पर्धांना दोन वर्षे उशीर झाला तर पुढची स्पर्धा २०२४ मध्ये घ्यायची की २०२६ मध्ये हा प्रश्न आहेच. खेळाडूंच्या बाजूने विचार करायचा तर दोन वर्षे स्पर्धा पुढे जाणं हे काही खेळाडूंसाठी त्यांच्या करियरला पूर्णविराम देणारंही ठरू शकतं. त्यामुळे स्पर्धा रद्द होणं किंवा पुढे ढकलली जाणं दोन्ही पर्याय अनेक प्रश्न निर्माण करणारे आहेत.