17 January 2021

News Flash

सामाजिक : नास्तिकांचं जग

नास्तिकतेची चर्चा होणं गरजेचं आहे, असं या मंडळींना वाटत आहे.

गेली दोन वर्षे काही तरुण एकत्र येऊन नास्तिक मेळावे घेत आहेत. आम्ही नास्तिक आहोत, असं उघडपणे सांगत आहेत. नास्तिकतेची चर्चा होणं गरजेचं आहे, असं या मंडळींना वाटत आहे.

‘‘बाता मारतात नुसते, बाहेर नावाला नास्तिक म्हणून सांगतात, पण दार बंद करून पूजा करत असतील गुपचूप!!’’  हे माझ्या आईचे, मी नास्तिक झालोय हे कळल्यानंतर मांडलेले मत. आपला आज्ञाधारक मुलगा नास्तिक झालाय हे कळल्यानंतर, तो कुणा तरी नास्तिकाच्या मागे लागूनच नास्तिक झालाय असा ग्रह तिने करून घेतला होता. ती व्यक्ती कोण हेही तिला कळत नव्हते. नंतर मी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत काम करायला लागल्यानंतर नरेंद्र दाभोलकरही असेच दिखाऊ नास्तिक असतील, असे सांगण्याचा तिने प्रयत्न केला.

नास्तिकाबद्दल सर्वात प्रथम जर महत्त्वाचे काही गरसमज असतील तर,

‘‘हा कुणाच्या नादी लागून नास्तिक झालाय?’’ (बहुतांशी पालक या गटात मोडतात)

‘‘तुझ्या आयुष्यात काही वाईट घडले का?’’ (कामावरचे सहकारी ज्यांना अचानक कळते की एरवी चांगली श्रद्धाळू वाटणारी ही व्यक्ती नास्तिक आहे आणि मूर्तिपूजा सोडा; पण मनातल्या मनातपण देवाची प्रार्थना करत नाही.)

‘‘काही नाही, एकदा फटका बसला नं कीआठवेल देव.’’ (हे आपले असेच बिचारे मनाची समजूत करून घेणारे जवळचे नातेवाईक.)

‘‘नास्तिक म्हणजे दुराचारी’’ (ज्यांची आयुष्यात एखाद्याही नास्तिकाशी मत्रिपूर्ण गाठभेट झाली नाही अशा व्यक्ती.)

खरोखरच नास्तिकांचं असं काही वेगळं जग असतं का? या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे खरं तर. थोडंसंच वेगळं असतं फार काही वेगळं नसतं. हे थोडंसं वेगळं आणि इतरांसारखं काय असतं हे मांडण्याचा हा छोटा प्रयत्न.

त्या आधी नास्तिक म्हणजे काय याची व्याख्या करावीच लागणार. हे असं व्याख्या वगैरे करणं हा आम्हा नास्तिकांचा मोठा दुर्गुण म्हणा. त्याशिवाय चालतच नाही. तर नास्तिक म्हणजे कोण, हे आधी ठरवायला हवं. कारण प्रदेश, धर्म आणि व्यक्तीइतकेच काळानुसारपण शब्दाचे अर्थ बदलत जातात. ‘‘वेद न मानणारा तो नास्तिक’’ ही फार जुनी व्याख्या आहे. काहींना वाटते की पूजा, कर्मकांडे न करणारा तो नास्तिक. अशी व्यक्ती देवाचे अस्तित्व मानते, फक्त पूजा करत नाही. काहींना देवावर रागावलेला, आयुष्यात देवाची पूजा करूनही अयशस्वी ठरल्यामुळे देव वगैरे झूट आहे, असं सांगणारा मनुष्य नास्तिक असं वाटतं असतं. काही धर्म तर त्यांचा विशिष्ट देव न मानणारे सर्वच पाखंडी आहेत असं मानतात. त्यांच्या मतानुसार त्यांचा धर्म सोडून इतर सर्व धर्मीय खोटय़ा देवाची पूजा करतात म्हणून नरकात वगैरे जाणार असतात. या विविध मतांच्या गदारोळात नुकत्याच झालेल्या नास्तिकांच्या मेळाव्यात नास्तिक म्हणजे कोण हे सांगणारा जाहीरनामा काय म्हणतो ते पाहू .

‘‘जगाची निर्मिती आणि नियंत्रण कुणी सर्वशक्तिमान अलौकिक शक्ती करते अशी कल्पना आम्ही नाकारतो.’’

ही आजची कालसापेक्ष व्याख्या आहे. जगाची निर्मिती कुणी अलौकिक शक्तीने केली असेल किवा नियंत्रणदेखील अशी शक्ती करते ही एक कल्पना किवा अंदाज आहे आणि तो आम्हाला मान्य नाही. कारण त्या बाजूने काहीच पुरावा नाही. अशी स्पष्ट भूमिका नास्तिक मेळाव्याच्या निमित्ताने घेणारे पुढे येत आहेत.

नास्तिकांवर असणारे अनेक आरोप, त्यांच्याबद्दलचे गरसमज दूर करण्यासाठी अशा स्वरूपाचे मेळावे घेतले जात आहेत. हे गरसमज काय आहेत आणि त्याबद्दल नास्तिकांचे म्हणणे काय आहे?

सर्वात पहिला गरसमज ज्याला मी राजकीय गरसमज समजतो, तो म्हणजे, ‘नास्तिक लोक दुराचारी किवा बेफिकीर असतात. त्यांना समाजाशी, नतिकतेशी काही घेणेदेणे नसते’. हा समज, राजकीय गरसमज अशासाठी कारण एका विशिष्ट समूहवादी मानसिकतेतून नास्तिकांकडे बघितल्यामुळे असे मत तयार झाले आहे. काही जण पुढे जाऊन असेही म्हणतात की, जे दुराचारी असतात ते सर्वच नास्तिक असतात. हे मत खोडून काढायची गरजही नाही. आजूबाजूला नजर टाकली तरी कळू शकते की, हे खरे नाही. गुपचूप स्मगिलगचा माल दानपेटीत टाकायची नास्तिकाला गरज तरी आहे का? त्यामुळे देव मानणारी व्यक्तीदेखील दुराचारी असू शकते. सगळेच नास्तिक दुराचारी असतात, असे ज्यांना वाटते त्यांनी शहीद भगतसिंग यांचे ‘मी नास्तिक का आहे?’ हे अगदी तासाभरात वाचून होईल असे पुस्तक वाचावे.

शहीद भगतसिंग यांना तुम्ही दुराचारी म्हणाल का? शहीद भगतसिंग नास्तिक होते, असं सांगितलं की, काही जण त्यांनी जेलमध्ये ‘ग्रंथसाहिबा’ वाचला याचा पुरावा पुढे करतात तेव्हा मला हसू येते. एका बाजूला तुम्ही धार्मिक ग्रंथ वाचा, मग तुम्हाला कळेल देव म्हणजे काय, असे म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही ग्रंथ वाचलात, कारण तुम्ही धार्मिक आहात, असेदेखील म्हणायचे. नास्तिकाच्या मनोवृत्तीतील हाच प्रमुख फरक आहे. भगतसिंग यांनी धार्मिक ग्रंथ वाचले हे सांगण्यासाठी खरे तर पुरावा द्यायची गरज नाहीये. स्वत:च त्यांनी तसे सांगितले आहे. कोणतीच पुस्तके फक्त त्याचे आचरण करण्यासाठी वाचू नका, त्यावर टीका करा आणि जे बुद्धीला पटेल तेच स्वीकारा, ही भगतसिंग यांची भूमिका जवळजवळ सर्वच नास्तिकांच्या मनोवृत्तीचे प्रतिनिधित्व करते.

नास्तिक लोक हे आस्तिकांना हीन दर्जाचे किवा मूर्ख समजतात का? अशीही भीती आस्तिकांना वाटत असते. खुद्द नास्तिक असणाऱ्या व्यक्तींचा हा आक्षेप आहे की, नास्तिकांनी असे मेळावे घेण्यामागे असा उद्देश असावा. असे कसे शक्य आहे? जी व्यक्ती कमालीची कोषात राहते तीच असा विचार करू शकते. नास्तिक काही वेगळ्या बेटावर राहणारा प्राणी नव्हे. त्याच्या अगदी जवळचे लोक आस्तिक असतात. त्यांच्याशी तो रोज व्यवहार करत असतो. आपण सर्वच बाबतींत हुशार आहोत असे समजणारी व्यक्ती मानसिकदृष्टय़ा आजारी म्हणायला हवी. नास्तिक होणे हे बुद्धिमत्तेपेक्षा त्याच्या जीवनातील प्रश्नावर अवलंबून आहे. अर्थात बुद्धिमान असणाऱ्या बहुतांशी लोकांना असे प्रश्न कधी ना कधी पडतात आणि नास्तिक बनण्याच्या प्रक्रियेमध्ये सुरुवात होते. काहींच्या मनात असे प्रश्न सहज स्फुरतात, तर काहींच्या मनात त्या प्रश्नाचा भुंगा कुणी तरी लावून देतो. काही झाले तरी कुणाच्या तरी प्रभावाने एखादी व्यक्ती नास्तिक झाली असे होत नाही. ती व्यक्तिगत प्रक्रिया आहे.

मग तुम्ही नास्तिकांचे मेळावे तरी का घेता, हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. असे मेळावे घेण्यामागे प्रमुख उद्देश म्हणजे ‘नास्तिक व्यक्ती समाजाचा एक भाग आहेत हे ठसवणे, नास्तिक म्हणून आम्हाला वेगळे स्थान वगैरे नकोय. एखादी व्यक्ती िहदू, मुस्लीम असल्याचे तुम्ही स्वीकारता ना? मग एखादी व्यक्ती ईश्वर नावाच्या कल्पनेवर विश्वास नाही ठेवत हे स्वीकारायला जड जाऊ नये’. आम्ही काही एका हातात बंदूक आणि दुसऱ्या हातात भगतसिंग यांचे ‘मी नास्तिक का आहे?’ असे पुस्तक घेऊन उभे राहिलो नाहीत. अतिरेकी नास्तिक म्हणून ज्यांची संभावना केली जाते ते ‘रिचर्ड डॉकिन्स’देखील पुस्तकेच लिहितात हो!! फार फार तर भाषणे देतात.

खर सांगू का नास्तिकांचे फक्त नास्तिक म्हणून संघटन उभे राहणे अशक्य आहे. ते एकत्र येतील काही मानवतावादी कामासाठी, शोषणाविरोधात आवाज उठवण्यासाठी. त्यामुळे नास्तिकांचे संघटन हा मुद्दा गरलागू आहे.

काही नास्तिक लोकांचेही आस्तिक लोकांबद्दल गरसमज असतात. आपण नास्तिक आहोत हे सांगितले तर आस्तिक लोकांना आवडणार नाही असे त्यांना वाटते. ज्यांच्यापासून भीती वाटते ते आस्तिक लोक कोण असतात? आपलेच लोक असतात. ते सुरुवातीला वाद घालतील, भांडतील, काही काळ रागावतील; पण ते आपलेच लोक असतात. हा राग जास्त काळ टिकत नाही. माझाच नाही तर माझ्या अनेक नास्तिक मित्रांचा हा अनुभव आहे. माझे मित्र प्रसाद म्हणून काही आणले की देताना म्हणत की, ‘‘प्रसाद म्हणून नको खाऊस, पण शिरा म्हणून तरी खा.’’ आता आता ते सांगायचीपण गरज नाही. नास्तिक आहोत हे जगाला कळले तर जग आपल्यावर नाराज होईल, ही भीती व्यर्थ आहे. हा विश्वास आहे म्हणून तर नास्तिक मेळावा घेतला जात आहे.

नास्तिक व्यक्ती अनतिक नसतात हे मान्य, पण त्यांच्यावरील धार्मिक संस्कारामुळे ते नतिक झाले, पण पुढच्या पिढीचे काय? या प्रश्नाच्या उत्तरासाठी बाबा आमटे यांच्या कुटुंबाकडे बघायला हरकत नाही किंवा तीन वर्षांपूर्वी डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर त्यांची दोन्ही मुले ज्या पद्धतीने व्यक्त झाली ते पाहता खरंच नीतिमत्तेच्या शिकवणीसाठी देवाची गरज असते का, हा प्रश्न पडायला हवा.

मी सारखे प्रश्नच का उपस्थित करत आहे असाही विचार मनात येत असेल, पण खरे सांगायचे तर आमचा प्रश्नावर जास्त विश्वास आहे. एक उदाहरण म्हणून व्यक्तिगत अनुभव सांगतोय. हल्लीच भारत-वेस्ट इंडीज सामन्यात भारत हरला. माझ्या सात वर्षांच्या मुलाला फक्त आपण विरुद्ध कुणी तरी असं काही चाललं आहे असं कळत होतं. आपण हरलो हे कळल्यावर तो चिडला. थोडा शांत झाल्यावर त्याला विचारले की, तुला वाईट वाटतेय ना? तो हो म्हणाला. ‘‘तुला जर इतके वाईट वाटत असेल तर त्या काकांना किती वाईट वाटत असेल ना! आपण त्यांना फोन करू.’’ असे म्हणून मित्राला फोन लावून दिला. एकाच वेळेस तणाव नियोजन आणि दुसऱ्यांच्या भावना समजून घेण्याची शिकवण अनुभवातून देता येते. नतिकता किवा जीवनातील ताण सहन करण्याची शक्ती अनेक अनुभवांतून येत असते. पुस्तकातील उतारे वाचून किंवा कुण्या शक्तीची भीती दाखवून येणारी नीतिमत्ता आणि ताण सहन करण्याची क्षमता ठिसूळ असते. आपल्या मुलांना अशा अनुभवातून जाऊ देण्याची आणि ते कसे हाताळायचे याची सातत्याने शिकवण गरजेची असते.

आता राहिला सारखेपणा!!

नास्तिक असणे ही जीवनातील एक बाब झाली. बाकी सर्व आस्तिक असा की नास्तिक असे वेगळे काही नसते. ताण सर्वाना येतात. कधी कधी ते अनावर होतात. त्यात आस्तिक-नास्तिक असण्याचा काही संबंध नाही. आजूबाजूला सगळे नास्तिक नसतात म्हणून काही कुणी उठल्यासुटल्या त्यांच्याशी भांडणे करत नाही. आणि अशी भांडणे करायला परदेशातून कुणी पसेही पाठवत नाही.

मी नास्तिक आहे असे कळल्यावर काहींना माझ्या मुलाची दया आली. त्यांना वाटते की मुलाचे बालपण वाया गेले. नास्तिकांची मुले बिचारी घरी डिस्कव्हरी चॅनेल बघत मोठी होतात, घरी खेळणे वज्र्य असून नाकाला चष्मा लावून अभ्यासात गढलेली असतात, असा काही लोकांचा ग्रह असतो. खरे तर परिस्थिती अगदी उलटी आहे. आमची मुले त्यांच्या बापालापण घाबरत नाहीत. त्यामुळे घरी राज्य मुलांचेच असते बहुधा. आईप्रमाणे बापालापण अरेतुरे करणारी मुले इतर नातेवाईकांच्या जिवाला घोर लावतात. काहीच कसे संस्कार नाहीत मुलांना असेही नाक मुरडतात. संस्कार म्हणजे जबरदस्ती नव्हे. मुलांनी मोकळेपणाने व्यक्त व्हावे, आई-बापालापण प्रश्न करावेत, ही आमची संस्काराची व्याख्या. खरे तर अशा लेखातून नास्तिकांचे जग नाही कळणार. त्यासाठी एखाद्या तरी नास्तिकाशी मत्री कराच. जरा लक्ष दिलेत तर आजूबाजूलाच एखादा नास्तिक असणारच आणि त्यासाठी नास्तिकांनीदेखील उघडपणे आपण नास्तिक आहोत हे सांगणे गरजेचे आहे. आपण नास्तिक झालो म्हणून महान आहोत, असा विचार असेल तर काढून टाकाच, पण नास्तिक आहोत असे कळल्यावर सर्व जग तुमच्या विरोधात जाईल अशी भीती बाळगण्याची पण गरज नाही.
संजय सावरकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2016 1:17 am

Web Title: world of atheist
टॅग God
Next Stories
1 केल्याने होत आहे रे… राष्ट्रपतींशी दोन हात…
2 केल्याने होत आहे रे… आरटीओला चाप!
3 केल्याने होत आहे रे… होय, ‘पादचारी प्रथम..’
Just Now!
X