News Flash

प्रतिक्रिया : झाडय़ा जमात – शोध, बोध व विश्लेषण

डॉ. विशाखा कांबळे यांचा विवेचनात्मक लेख ‘झाडय़ा जमात’ (लोकप्रभा : १४ ऑगस्ट) वाचनात आला.

डॉ. विशाखा कांबळे यांचा विवेचनात्मक लेख ‘झाडय़ा जमात’ (लोकप्रभा : १४ ऑगस्ट) वाचनात आला. त्यात त्यांनी विविध शब्दकोशांच्या आधारे झाडीचा शब्दार्थ दिला आहे. झाडी म्हणजे गर्द झाडाझुडपांनी व्यापलेले जंगल. त्यांनी अभिनव मराठी शब्दकोशानुसार झाडीचा एक अर्थ चांदा व भंडारा हे महाराष्ट्रातील जिल्हे असा दिला आहे. जिल्ह्य़ाच्या पुनर्रचनेनुसार आज ते भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली असे आहेत. वस्तुत: तो भाग लगतच्या मध्य प्रदेशचा भूभाग कांकेर बस्तपर्यंत विखुरलेला आहे यालाच झाडी अथवा झाडीपट्टी म्हणतात. त्याच एका शब्दार्थात ‘झाडी-जाडपी’ या ‘अन्य’ एक नाम असं विश्लेषण आहे वस्तुत: ते झाडपी आहे. वऱ्हाडकडची मंडळी त्यांना झाडपी अथवा झाडप्या म्हणतात. प्रत्युत्तरादाखल तेही त्यांना वऱ्हाडी अथवा गमतीने वऱ्हाडय़ा म्हणतात. झाडीपट्टीच्या या भागात पूर्वी किर्र घनदाट जंगलं होती. जंगलात मोहाची विशाल प्रमाणात झाडं होती. मोहाचा सडा अन् घमघमाट असायचा. या जिल्ह्य़ात मोह, पर्यायाने मोहाची दारू व डिंक याचे उत्पन्न असून मोठी बाजारपेठ होती. सदर लेखात झाडीपट्टीत राहणारी जमात म्हणजे झाडय़ा जमात होय म्हटलेले आहे. वस्तुत: झाडीपट्टीत विविध जाती-जमातीचा बहुजन समाज विस्तृत प्रमाणात आहे. जंगली भागात गोंड जमातीची बहुलता आहे. त्यांचा उदरनिर्वाह मुख्यत: शेतीवर आहे, ते झाडपाला, जडीबुटी व तंत्रमंत्राचे विशेष जाणकार आहेत.
दिवाळी सरल्यावर वर्षांकाठी गावोगावी मंडई म्हणजे सणावाराची जत्रा भरते. त्याच दिवशी रात्री दंडार किंवा उंढार (लोकनाटय़ाचा प्रकार)चा प्रयोग पहाट उजाडेपर्यंत केला जातो. त्यात प्रामुख्याने पौराणिक कथा व पात्र असतात. पुरुष स्त्रीपात्राच्या भूमिकेत असतात. झाडीबोलीची आपली विशेषत: आहे. ती बहुतेक हिंदीमिश्रित असून संपूर्ण झाडीपट्टीत बोलली जाते. ज्या अर्थी गोंडी बोली स्वतंत्र वेगळ्या वळणाची असून गोंड जमातीपुरती मर्यादित आहे.
प्रस्तुत लेखात काही शब्द आलेले आहेत ते बहुतेक असे असावे, असे वाटते. जाडपी- झाडपी-बॉडी (सदरा)-बंडी, बारशिंग-बाशिंग, कोंबडीचे पिल्लू तलेग-तलंग, याशिवाय यात म्हटले आहे. लग्नानंतर धेंडा (वऱ्हाडी मंडळीचा नाच) केला जातो. वास्तविक लग्न लागल्यानंतर धेंडा लागला असे म्हणतात. याचा अर्थ धूमधडाक्यात वाजत-गाजत लग्न लागले. एके ठिकाणी म्हटले आहे, मुलीला कपडे, दागदागिने, गाय, बकरे अशी खंडणी दिली जाते. ती खंडणी नसून द्याज म्हणजे दहेज (आंधन) आहे. पुढे म्हटले आहे विवाहित-अविवाहित स्त्रिया कलदारची (मण्यांची) माळ वापरतात. माळेत पाच ते सात कलदार असतात. येथे कलदार म्हणजे मणी नव्हे, चांदीचा चमकदार रुपया. कधी काळी इंग्रजांच्या काळात तो चलनात होता. आज आपला चलनात असलेला रुपया माळेत वापरतात. आपल्याकडे विवाहित स्त्रिया मंगळसूत्र घालतात तसे गोंड जमातीतील विवाहित स्त्रिया ५-७ कलदार रुप्याची माळ घालतात. याशिवाय गळ्याभोवती चांदीची जाड आणि गोल सरी घालतात. या जमातीतील दागदागिन्यांसाठी प्रामुख्याने चांदीचा वापर केला जातो, असे दिसून येते.
सदर लेखात पुढे म्हटले आहे- (झाडय़ा जमात) नागपंचमीला नागाची पूजा करतात. भिंतीवर नाग काढला जातो. यावरून हे नागवंशीय आहेत, हे लक्षात येते. नेमके हेच रीतिरिवाज आमच्या बौद्ध धर्मीयात (पूर्वाश्रमीच्या महार जातीतसुद्धा) होते व आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मतानुसार महार जात ही नागवंशीय आहे. त्यांची वसाहत नाग नदीच्या काठावर होती. त्यावरून नागपूर नाव पडले. म्हणून त्यांनी नागपूर या ठिकाणी लाखो अनुयायासह बौद्ध धर्माची दीक्षा स्वीकारली. लेखात झाडय़ाच्या उत्तरोत्तर मानववंशाचा तक्ता दाखवला आहे. त्यात बौद्ध संस्कृती मुळात नाग संस्कृतीशी जोडली गेल्याचे दिसून येते.
झाडय़ा जमात मूर्तिपूजक नसून निसर्गप्रेमी आहे. त्या जमातीत साखरदेव, बूडा बाप (बूडाजी) अपभ्रंश भूराजी यांची मान्यता आहे. झाडीपट्टीतील पूर्वाश्रमीच्या महार जातीत मूल जन्माला आले त्या प्रसंगी बाहेरदेव व भूराजीला नवस फेडायचे. जुन्या काळापासून ठरलेल्या निर्जन जागी जाऊन एका झाडाखाली कोंबडे, बकरे द्यायचे. त्यात कुठलीही मूर्ती न्यायची नाही. तेच भूराजी व बाहेरदेवाचे स्थान आहे अशी त्यांची श्रद्धा असायची. हा प्रकार विदर्भातील गोंदिया, भंडारा भागातील आहे. अर्थात धर्मातरामुळे हे सगळे पार संपुष्टात आले. त्याच प्रकारे विदर्भ-वऱ्हाड व इतर भागांत व लगतच्या बालाघाट, मंडला, वस्तर या भागांतही मागासवर्गीयाच्या बाहेर देव, भिंगरदेव, भूराजी, मरीमाय, मातामाय, बोंबलाई, खोकलाई इ. कुलदेवता अस्तित्वात आहेत आणि होत्या. यावरून गोंड जमातीच्या रीतिरिवाजाशी व मान्यतेशी वरील साम्य दिसून येते.
प्रस्तुत लेखात झाडय़ा जमातीची व्याख्या करताना म्हटले आहे- ‘जी जमात झाडाच्या, झाडीच्या, झाडीपट्टीच्या प्रांतात राहते, ती झाडय़ा जमात होय’ परंतु त्याबाबतीत उद्धृत केलेल्या विविध शब्दकोशात झाडय़ा जमातीचा उल्लेख नाही. वास्तविक झाडीपट्टीत राहणाऱ्या महार, मांग, गोंड, गोवारी या सर्वच मागासवर्गीय जाती-जमातीला झाडय़ा नव्हे, तर झाडीपट्टीत राहणारा, झाडपी अथवा झाडप्या म्हणतात. तरी या बाबत बोली-भाषेत शब्दांचा अपभ्रंश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेवटी प्रत्येक मागासवर्गीय जाती वा जमातीच्या रीतिरिवाज व मान्यतेबाबत साम्य असून ती कुठल्या न् कुठल्या कारणाने एकमेकांशी गुंफलेली आहे.
सी. बी बोरकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2015 1:14 am

Web Title: zadya jamaat
टॅग : Pratikriya
Next Stories
1 आवाहन
2 संमेलन : सांगड कार्यकर्त्यांची
3 उपक्रम : गाढवांचा फॅशन शो..!!
Just Now!
X