25 February 2020

News Flash

गोठलेल्या ‘चद्दर’वर!

कडाक्याच्या थंडीत पूर्णपणे गोठलेल्या झंस्कार नदीवरील पदभ्रमण हा जीवघेणा अनुभव आपल्यामधल्या धाडसाला नवे पैलू पाडतो.

गोठलेल्या निसर्गाचा हा आगळावेगळा अविष्कार अनुभवायचा असेल तर लडाखमधील चद्दर ट्रेकला जायलाच हवं.

ऋतू पर्यटन
विवेक नागवेकर – response.lokprabha@expressindia.com

कडाक्याच्या थंडीत पूर्णपणे गोठलेल्या झंस्कार नदीवरील पदभ्रमण हा जीवघेणा अनुभव आपल्यामधल्या धाडसाला नवे पैलू पाडतो. गोठलेल्या निसर्गाचा हा आगळावेगळा अविष्कार अनुभवायचा असेल तर लडाखमधील चद्दर ट्रेकला जायलाच हवं.

छंद.. मग तो कोणताही असो; पण प्रामाणिक असावा. माझा आवडता छंद पदभ्रमण. सह्यद्री आणि हिमालय. माझी लडाखशी नाळ जोडली गेली ती १९८७ सालापासून. ती आजपर्यंत टिकून आहे. युथ होस्टेलबरोबर लडाखमधील पहिले पदभ्रमण सुरू केले होते. त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. तीन शिखरे आणि अनेक पदभ्रमण मोहिमा पूर्ण केल्या. अजूनही हा प्रवास सुरू आहे. मात्र लडाखमधील अशीच एक चद्दर पदभ्रमण मोहीम मला सुखाने झोपू देईना.

जानेवारी आणि फेब्रुवारी दरम्यान या भ्रमणाचा काळ सुरू होता. या महिन्यात लडाखमध्ये कडाक्याची थंडी असते. त्या ठिकाणी दिवसा -१० अंश सेल्सियस आणि रात्री -४० अंश सेल्सियस तापमान असते. खरे तर हा जीवघेणा अनुभव असतो. संपूर्ण झंस्कार नदी गोठल्याचे दृश्य विलोभनीय कमी आणि भयावह अधिक असते. वरच्या भागावरून कडक झालेला बर्फ आणि काही क्षण कान लावून स्तब्ध उभे राहिले, तर बर्फाखालून खळाळणाऱ्या पाण्याचा आवाज येत असतो. राहण्याची, खाण्या-पिण्याची व्यवस्था जवळपास नसतेच. तहान लागली, तर समोर अफाट पाणी आहे. सोबत पाण्याची बाटलीदेखील आहे. मात्र, पाण्याचा बर्फ झालाय आणि बर्फ वितळवण्यासाठी इंधन कुठून आणणार? तिथे सगळ्याच नसíगक सुविधांचा अभाव असतो. कडेकपारीतील नसíगक गुहेत राहायचे. अशात जेवणाचा विचारही मूर्खपणाचा ठरावा. कधी तरी पुढचे पाऊल टाकल्यावर चादर दुभंगली तर अवघ्या क्षणात खेळ खल्लास होऊ शकतो. माणूस जिवंत वा मृत आहे हे जगाला कित्येक दिवस कळणारदेखील नाही. बर्फमय चादरीवरून चालताना प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकणे क्रमप्राप्त ठरते. नियोजित वेळेत पोहोचण्याचे ठिकाण केवळ अध्र्या तासांवर येऊन ठेपले आहे आणि डोळ्यांसमोर चादर दुभंगली तर अध्र्या तासावरच्या ठिकाणापर्यंत पोहोचायला एकतर वेळ लागेल, नाही तर सरळ स्वर्ग गवसेल.

अशी ही माहिती मला मिळाली. निश्चय केला, जवळच्या मित्रांना विचारले; पण त्यांनी या वेडेपणाला नकार दिला. कारण अनिश्चित वातावरण आणि होणारा खर्च. शेवटी ठरले एकटय़ाने जायचे आणि यशस्वी होऊनच परतायचे. मी तयारी केली अन् विमानात बसलो.  तीन तासांनंतर उद्घोषणा झाली की, आपण थोडय़ाच वेळात लेहमध्ये बकुला विमानतळावर उतरणार आहोत. बाहेरील तापमान -१५ अंश सेल्सियस आहे, असे ऐकून अंगात कापरे भरले. लेह भूमीवर पाय ठेवला आणि असे वाटले की, याच विमानाने परत फिरावे. पण नाही. हॉटेलमध्ये पोहोचलो. संपूर्ण दिवस आराम केला. वातावरणाशी जुळवून घेणे सुरू केले. दुसऱ्या दिवशी मार्गदर्शक आले. त्यांनी मार्ग ठरवला. चििलग, टिलडडो, मारकलाक, योकमाडो, नेरक, सरकडो (सर्वात थंड ठिकाणी रात्री -४० अंश सेल्सियस तापमान असते), हनामूर, पिशू, कर्षां आणि पदम, याच मार्गाने परत लेहला यायचे.

झंस्कार नदी पदमला उगम पावते ती लेहला सिंधू नदीला नीमू गावात मिळते. हे नदीवरील अंतर ४४ किलोमीटरचे आहे. तसे पाहता लेह ते पदम रस्त्यावरील अंतर ४५० किलोमीटर आहे. हिवाळ्यात हा रस्ता अति बर्फवृष्टीमुळे बंद असतो. अशा वेळी झंस्कार नदी चििलगपर्यंत पूर्ण गोठते. नदीवर बर्फाची चादर तयार होते. त्यावेळी लेहवासी लेह-पदम-लेह हा प्रवास या चादरीवरून करतात. तेच पदभ्रमण मी दोन मार्गदर्शकांच्या साहाय्याने पूर्ण केले. तेच हे चद्दर पदभ्रमण होय.

तिसऱ्या दिवशी पदभ्रमण सुरू झाले. नदीच्या चादरीवर पाय ठेवला आणि घसरून पडलो. सुरुवात चांगलीच झाली. मार्गदर्शकांनी उचलले. चादरीवर चालण्याचे शिक्षण दिले. पदभ्रमण सुरू झाले. आजूबाजूचा अवर्णनीय निसर्ग बघून असे वाटले की, स्वर्ग म्हणतात तो हाच का? मात्र, अशात छायाचित्रण कोणत्या भागाचे करावे हा प्रश्न पडला. सोबत कॅमेरा बॅटरीची मर्यादा तर होतीच. माझ्याकडे आठ बॅटरीज होत्या आणि वीज नसल्यामुळे चार्जिगचा प्रश्नच नव्हता. अति थंडीमुळे कॅमेरा चालणे खूप कठीण होते. तरीही कॅमेरा आणि बॅटरीला ऊब देऊन छायाचित्रण सुरू होते.

एकदा सकाळी उठलो आणि विधीसाठी बाहेर पडलो. काही अंतर चालून गेल्यावर एक जागा पाहिली अन् खाली बसणार तेवढय़ात स्नो लेपर्डचे महाराजांचे (हिम चित्ता) दर्शन झाले. थंडीतही घाम फुटला. स्नो लेपर्ड महाराजांची आणि माझी नजरानजर झाली. मला वाटते, साहेबांचे पोट भरले असावे म्हणून ते तेथून निघून गेले. या १६ दिवसांत अप्रतिम अवर्णनीय निसर्ग पाहिला. कॅमेरा आणि बॅटरी यांनी चांगली साथ दिल्यामुळे प्रकाशचित्रणाची मफील सुंदर जमली. त्यामुळेच मी नामांकित छायाचित्रकार झालो. अशा या चद्दर पदभ्रमणात मी स्वर्ग जिवंतपणी अनुभवाला. अंगावर साधा ओरखडा न उमटता परत आलो. हेच ते लडाखचे देणे होते.

First Published on July 19, 2019 1:04 am

Web Title: zanskar river in winter travel special
Next Stories
1 जीवनानंदाचे प्रतीक चेरीब्लॉसम
2 अॅप्रिकॉट ब्लॉसमची स्वर्गीय अनुभूती
3 मृत्युतांडवाच्या स्मृती जागवताना…
Just Now!
X