News Flash

ज्ञानोपासनेची संस्कृती…

सम्राट अकबराच्या कारकीर्दीत (इ.स. १५५६ ते १६०५) तर या ज्ञानसाधनेला राजाश्रय मिळाला होता.

|| अब्दुल कादर मुकादम

इस्लाममध्ये ज्ञानोपासनेची जी संस्कृती १४ व्या शतकापर्यंत सार्वत्रिक होती, तिचा धागा रमजानशीही जुळतो…

इस्लामी कालगणनेनुसार रमजान हा नववा महिना. या महिन्याच्या सत्ताविसाव्या रात्री मक्केजवळच्या हिरानामक गुहेत इस्लामचे संस्थापक हजरत महंमद पैगंबर यांना पहिला साक्षात्कार झाला आणि त्यांच्या मुखातून कुराणाचा पहिला संदेश प्रकटला. हा संदेश ज्ञानसाधनेचा व त्याच्या प्रसाराचा होता. कुराणाच्या ९६ व्या अध्यायातील १ ते ५ श्लोकांत तो नोंदला गेला आहे. इ. स. ६१० मध्ये कुराणाचा पहिला संदेश प्रकट झाला, तेव्हापासूनच इस्लामी ज्ञानसाधनेची सुरुवात झाली व पुढील आठ शतके-म्हणजेच सातव्या शतकाच्या सुरुवातीपासून चौदाव्या शतकाच्या अंतापर्यंत इस्लामी संशोधकांनी व विचारवंतांनी शिस्तबद्धपणे व सातत्याने ही परंपरा समृद्ध करण्याचा प्रयत्न केला.

भारतात नवव्या, दहाव्या शतकापासून मुस्लीम राज्यकत्र्यांच्या आक्रमणांना सुरुवात झाली; त्या काळी भारतात समृद्ध संस्कृती होती. निखळ ज्ञानोपासनेची ओढ असलेल्या इस्लामी अभ्यासक व संशोधकांनाही तिची भुरळ पडली नसती तरच नवल! भारतात आलेल्या अशा अनेक विद्वान संशोधकांनी संस्कृत भाषा शिकून तिच्यावर प्रभुत्व मिळवले आणि संस्कृत भाषेतील ज्ञानभांडार पूर्वग्रहविरहित दृष्टीने व ज्ञानोपासनेच्या बांधिलकीने अरबी, पर्शियन भाषांत अनुवादित केले. अल् बेरूनी व अमीर खुसरो ही दोन नावे सर्वप्रथम नजरेसमोर येतात. अल् बेरूनीने इ.स. १००७ ते १०२५ अशी १८ वर्षे उत्तर भारतात अनेक ठिकाणी प्रवास करून धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा, तत्त्वज्ञान, खगोलशास्त्र, आयुर्वेद, गीता अशा अनेक विषयांचा सखोल अभ्यास केला होता. याच काळात महंमद गझनीने केलेल्या अत्याचार व विध्वंसावर अल् बेरूनीने कठोर टीका केली आहे. प्रवासात त्याने मिळविलेले ज्ञान आणि अनुभव ‘तहकीक मा-लि-ल-हिंद’ या ग्रंथात तपशिलाने शब्दबद्ध केले आहेत. एडवर्ड सी. साको यांनी ‘अल-बरुनीज इंडिया’ या नावाने हा ग्रंथ अनुवादित केला, त्याचे मराठी भाषांतरही (‘अल् बेरूनीचा भारत’, साहित्य अकादमी) उपलब्ध आहे. भारताच्या मध्ययुगीन इतिहासाचे अव्वल साधन म्हणून हा ग्रंथ संशोधन क्षेत्रात मान्यता पावला आहे. अमीर खुसरो हाही याच सहिष्णू आणि उदारमतवादी परंपरेचा पाईक. त्याचा जन्म उत्तर प्रदेशातील ईटा येथे इ.स. १२५३ साली झाला, पण दिल्ली ही त्याची कर्मभूमी होती. त्याने दिल्लीचे प्रसिद्ध सुफी संत हजरत निझामुद्दीन अवलिया यांच्याकडून त्या पंथाची दीक्षा घेतली होती. अमीर खुसरोला हिंदू उपनिषदांतील व इतर तत्त्वज्ञानात्मक प्रणालीतील संकल्पनांनी प्रभावित केले होते. भारतीय शास्त्रीय संगीताला त्याने दिलेले वेगळे व नवे परिमाण हे त्याचे भारतीय संस्कृतीतील महत्त्वपूर्ण योगदान म्हटले पाहिजे.

या दोघांप्रमाणेच, अपरिचित असलेल्या संशोधक विचारवंतांची यादीही मोठी आहे. अबू सालेह शुऐब हा त्यांच्यापैकी एक. त्याने महाभारताचे पर्शियन भाषेत भाषांतर केले. पुढे अबू हसन जलाली याने इ.स. १०२६ मध्ये आणखी एक सुधारित आवृत्ती प्रसिद्ध केली. याच सुमारास इब्न उल मुक्का याने ‘पंचतंत्र’ या नीतिकथा संग्रहाचे ‘कलिलेह-ओ-दिमानेह्’ या नावाने अरबीत भाषांतर केले. मग गझनवी सुलतान इब्राहिम इब्न-मसूदच्या काळात दारुल इन्शा या संस्थेचा सचिव अबुल सा-अली मुस्तफी याने त्याची पर्शियन आवृत्ती काढली. त्यानंतर मुल्ला हुसेन काशीदी याने आणखी एक गद्यात्मक आवृत्ती काढली. या पर्शियन गद्य आवृत्तीचे नाव होते : ‘अन्वर-इ- सुहेली’!

सुलतान फिरोजशाह तुघलख (इ.स. १३५१ ते १४१३) याने नागरकोट राजाचा पराभव केला तेव्हा ज्वालामुखी मंदिरात त्याला जवळपास १,३०० संस्कृत ग्रंथ आढळले. त्यात अनेक ग्रंथ खगोलशास्त्रावरचे होते. त्याने मंदिरातील पंडितांच्या सहकार्याने या ग्रंथांची पर्शियन भाषेत भाषांतरे करून घेतली. त्यात इझुद्दीन खालिद याने भाषांतर केलेला ‘दलाई अल-फिरुजशाही’ हा ग्रंथ महत्त्वाचा मानला जातो. याच काळात वराहमिहीरचा ‘पंचसिद्धान्तिक’ हा ग्रंथ शम्स-ए-शिराजी याने अनुवादित (‘तर्जुमा-ए-वराही’) केला. ‘संगीत दर्पण’ या ग्रंथाचे पर्शियन भाषांतरही उपलब्ध आहे.

सुलतान सिकंदर लोधीच्या कारकीर्दीत मिया वाहावत खान याने ‘अगाध महावैद्यक’ या वैद्यकशास्त्रावरील ग्रंथांचे केलेले ‘टिब्बते सिकंदरी’ हे भाषांतर म्हणजे या ज्ञानोपासनेच्या परंपरेतील महत्त्वाचा टप्पा मानला पाहिजे. या ग्रंथात मानवी शरीररचना, रोगनिदान, उपचार पद्धत याविषयी तपशीलवार विवेचन आहे. युनानी वैद्यकशास्त्रावर आयुर्वेदाचा खूपच प्रभाव आहे आणि या परंपरेने ते मुक्तपणे मान्य केले आहे.

ज्ञानसाधनेची ही परंपरा काश्मीर आणि दक्षिणी प्रांतातही पोहोचलेली आढळते. कल्हण याचा ‘राजतरंगिणी’ हा ग्रंथ काश्मीरच्या मध्ययुगीन इतिहासाचा आधारग्रंथ मानला जातो. ‘बहुरुल असमये’ या नावाने त्याचा पर्शियन अनुवाद झाला आहे. पण अनुवादकाचे नाव उपलब्ध नाही. मात्र हैदर मलिक बिन हसन मलिक याने त्याचा ग्रंथ ‘तारीख-ए- कश्मिरी’ (काश्मीरचा इतिहास) या भाषांतराच्या आधारे लिहिला असल्याचे नमूद केले आहे.

सम्राट अकबराच्या कारकीर्दीत (इ.स. १५५६ ते १६०५) तर या ज्ञानसाधनेला राजाश्रय मिळाला होता. त्यामुळे या काळात तत्त्वज्ञान, विज्ञान व इतर विषयांवरील महत्त्वाच्या संस्कृत ग्रंथांच्या भाषांतरांसाठी अनेक विद्वान त्याच्या पदरी होते. तत्कालीन प्रसिद्ध कवी फैजी, अब्दुल कादीर बदायुनी, धर्मशास्त्रज्ञ नकीब खान, तत्त्वज्ञ सुलतान ठाणेसरी आणि विचारवंत मुल्ला शिरी ही त्यांपैकी काही नावे. अकबराचा वजीर अबुल फझल याला त्याच्या कार्यात सहकार्य, मार्गदर्शन करण्यासाठी तत्त्वज्ञान व विज्ञान विषयातील अनेक पंडितांची नेमणूक करण्यात आली होती.

अब्दुल कादीर बदायुनी याने भवन खान (हा धर्मांतरित ब्राम्हण होता) याच्या सहकार्याने रामायणाचे भाषांतर केले. त्यानंतर त्याच्या चार संक्षिप्त आवृत्त्याही निघाल्या. त्यातील पहिली गिरधारदास कायस्थ याने काढली होती आणि ती बादशहा जहांगीरला अर्पण करण्यात आली होती. महाभारताच्या १८ व्या पर्वाचे पर्शियन भाषांतर ‘रझम नामा’ या नावे प्रसिद्ध झाले, त्यात कवी फैजी याने सुधारणा करून आणखी दोन पर्वांची भर घातली. फैजी याने ‘भगवद्गीता’, भास्कराचार्यांचा ‘लीलावती’ हा ग्रंथ आणि सोमसागराच्या ‘कथासरित्सागर’ या ग्रंथाचे भाषांतर केले होते. वेदान्त तत्त्वज्ञान, योगवासिष्ठ आणि भागवत पुराण यांवर आधारित ‘शरीक-उल मारिफत’ हा फैजीचा ग्रंथ पर्शियन साहित्यात महत्त्वाचा मानला जातो.

शहाजहानचा ज्येष्ठ पुत्र दाराशिकोह हा या सर्व प्रतिभावंतांचा शिरोमणी मानला पाहिजे. काशीला जाऊन तेथील पंडितांकडून तो संस्कृतभाषा शिकला. ‘सिरे अकबर’ या नावाने त्याने उपनिषदांचे भाषांतर केले आहेच, पण त्याचबरोबर योगवासिष्ठ व भगवद्गीता या ग्रंथांचा पर्शियन भाषेत अनुवादही केला आहे. त्याचा ‘मज्मे अल बहारिन’ (म्हणजे दोन सांस्कृतिक- हिंदू आणि मुस्लीम- महासागरांचा संगम) हा ग्रंथ म्हणजे भारतातील मिश्र संस्कृतीचे प्रतीक आहे.

औरंगजेबाचे धर्मवेड सर्वश्रुत आहे आणि तो संगीतद्वेष्टाही होता. असे करण्याने आपण धार्मिक आदेशांचे काटेकोर पालन करीत आहोत असा त्याचा दावा होता. विरोधाभास असा की, त्याच्याच कारकीर्दीत मिर्झा रोशन दामीर याने भारतातील संगीत व नृत्य या विषयावरील ‘पारिजातक’ या ग्रंथाचे ‘तजुर्मा अल् पारिजातक’ या नावाने भाषांतर केले आहे. ही यादी आणखी वाढवता येईल, पण स्थळमर्यादा विचारात घेऊन काहींचा ओझरता उल्लेख करत आहे. ‘बहरुत हयान’ (अमृतकुंड), ‘सुफरी-उल-कुलून’ (हितोपदेश), ‘रागा-ए-हिंदी’ (धृपद गायिकेतील चिजांचा संग्रह) तसेच ‘रागविभोर’, ‘रागदर्पण’ या ग्रंथांतील संगीत शास्त्रावरील चर्चा ही त्यांपैकी काही नावे आहेत.

तेराव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंतचा कालखंड हा सर्वसाधारणपणे भारताच्या मध्ययुगीन इतिहासाचा कालखंड. हा केवळ इस्लामी आक्रमणाचा आणि अन्याय-अत्याचारांचा कालखंड मानला जातो, हे वादापुरते मान्य केले तरी; त्याला समांतर अशी ही ज्ञानोपासनेची प्रचंड परंपरा याच काळात निर्माण झाली हे वास्तव नाकारता येत नाही. ही परंपरा निर्माण करणारे सर्वच लेखक, विचारवंत प्रतिभाशाली होते आणि त्यांची पहिली बांधिलकी त्यांच्या प्रतिभेशी होती, हे त्यांनी आपल्या कृतीने दाखवून दिले आहे. त्यांची त्यांच्या धर्मावर श्रद्धा होती; पण त्यात अनाठायी आग्रह नव्हता. केवळ ज्ञानलालसा, ज्ञानोपासना हीच त्यांची इतिकर्तव्यता होती. त्या भूमिकेशी प्रामाणिक राहिल्यामुळेच वेगळ्या संस्कृतीत असलेले ज्ञानभांडार आपल्या धर्मबांधवांना समजू शकेल अशा भाषेत त्यांनी आणले. एका अर्थाने कुराणाचे आदेश व पैगंबराचे आदर्श मानून आपली ज्ञानसाधना केली.

ही परंपरा चौदाव्या शतकापर्यंत सुरू होती. म्हणूनच इस्लामी संस्कृती समृद्ध होऊ शकली. त्यानंतर मात्र ही विधायक परंपरा खंडित झाली. ज्ञानाची व्याख्या इस्लामी धर्मशास्त्र व धार्मिक परंपरांपुरती मर्यादित करण्यात आली. हे ज्ञान ज्याने मिळवले तो अलीम म्हणजे ज्ञानी (उलेमा हे या शब्दाचे अनेक वचन) म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यामुळे एकेकाळी गतिशील असलेली इस्लामी संस्कृती कुंठित झाली. त्यातून मुक्त होऊन ती पहिल्यासारखी गतिशील होईल, अशी चिन्हे तूर्तास तरी दिसत नाहीत.

लेखक राजकीय-सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत.

arumukadam@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 12:00 am

Web Title: culture of enlightenment in islam according to islamic chronology ramadan is the ninth month akp 94
Next Stories
1 आरक्षण कोण देणार आणि कसे?
2 हवामान बदलास महाराष्ट्र सज्ज?
3 सत्तांतरानंतरचे ‘गोकुळ’… 
Just Now!
X