|| अमृतांशु नेरुरकर

एकोणिसाव्या शतकात गोपनीयतेसंदर्भात सुरू झालेली चर्चा पुढील काळात विविध प्रकारे विस्तारत गेली, ती कशी?

Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
t plus zero settlement system marathi news, what is t plus zero settlement in marathi
विश्लेषण: आजच व्यवहार, आजच सेटलमेंट… शेअर बाजाराच्या T+0 प्रणालीचे आणखी कोणते फायदे?
bhang uses
विश्लेषण : भांगेचे ‘हे’ गुणकारी फायदे माहीत आहेत का?
Why are we 50 years behind the world in the field of irrigation
आपण सिंचन क्षेत्रातच तेवढे जगाच्या ५० वर्षे मागे का?

‘हार्वर्ड लॉ रिव्ह्यू’मध्ये प्रकाशित झालेला वॉरन आणि ब्रॅण्डाईस या विधिज्ञद्वयीचा लेख व्यक्तीच्या गोपनीयतेच्या (प्रायव्हसी) अधिकाराचा हिरिरीने पुरस्कार करणारा होता यात काही वादच नाही. गोपनीयतेची संकल्पना, सद्य परिस्थितीतील तिची निकड व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे तिच्या होणाऱ्या उल्लंघनाची प्रथमच इतक्या सुसूत्रपणे मांडणी केल्यामुळे त्या लेखाच्या अनुषंगाने या विषयावर साधकबाधक चर्चा अमेरिकेत विविध स्तरांवर होऊ लागली. एवढेच नव्हे, तर लेख प्रसिद्ध झाल्यानंतरच्या केवळ दोन दशकांत अमेरिकेत लढल्या गेलेल्या गोपनीयतेसंदर्भातल्या किमान डझनभर खटल्यांचा निवाडा करताना वकील व न्यायाधीशांनी या लेखाचा संदर्भ दिला.

योगायोगाची गोष्ट म्हणजे, जे (कथित) कारण या लेखाचे प्रेरणास्थान होते त्या संदर्भातल्या खटल्यावर निकाल देताना अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाने याच लेखाचा व त्यात ऊहापोह केलेल्या तत्त्वांचा संदर्भ दिला. आपल्या लहान भावाचे समलिंगी वर्तन गोपनीय ठेवण्याचा अधिकार त्याला मिळावा, ज्यामुळे त्याला सामाजिक जाचाला सामोरे जावे लागणार नाही, या प्रेरणेतून १८९० साली लिहिलेल्या या लेखाचा आधार अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाने २०१५ साली समलिंगी विवाहाला घटनादत्त हक्क म्हणून कायदेशीर मान्यता देताना घेतला. १२५ वर्षांनी का होईना, पण एक वर्तुळ पूर्ण झाले!

गेल्या शतकभरात वॉरन आणि ब्रॅण्डाईसने गोपनीयतेसंदर्भात विशद केलेल्या ‘एकांत जतन करण्याचा अधिकार (राइट टु बी लेट अलोन)’ या संकल्पनेचा बऱ्याच विद्वानांनी विविध प्रकारे विस्तार केलाय. सुप्रसिद्ध अमेरिकी लेखक हेन्री जेम्सने वृत्तपत्रांमुळे होणाऱ्या खासगीपणाच्या उल्लंघनासंदर्भात पुष्कळ लिखाण केलेय. वॉरन आणि ब्रॅण्डाईसला समकालीन असलेल्या या लेखकाने त्यांच्याच लेखाला आधारभूत ठेवून माध्यमांच्या सनसनाटीकरणाच्या (सेन्सेशनलायझेशन) हव्यासामुळे माणसांच्या व्यक्तित्वावर होणारा घाला व गोपनीयतेच्या होणाऱ्या तडजोडीविरोधात चांगलाच आवाज उठवला.

अमेरिकेतील ख्यातनाम मानसशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यासक विल्यम जेम्सने एकोणिसावे शतक संपता संपता मानसशास्त्रावर ‘द प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी’ नावाचे एक नितांत सुंदर पुस्तक लिहिले. मानवाच्या मनोव्यवहारांबद्दलचे विवेचन करताना गोपनीयतेच्या मुद्द्यावर त्याने महत्त्वाचे भाष्य केलेय. विल्यम जेम्सच्या म्हणण्यानुसार, कोणतीही व्यक्ती त्या त्या परिस्थितीनुरूप, वेगवेगळ्या लोकांपुढे भिन्न स्वरूपांत व्यक्त होत असते. आपल्या व्यक्तिमत्त्वाचे अशा वेगवेगळ्या स्वरूपांत प्रकटीकरण करण्यासाठी स्वत:बद्दलच्या खासगी माहितीला काही प्रमाणात गुप्त ठेवण्याचे धोरण ती व्यक्ती स्वीकारते. म्हणूनच स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यासाठी खासगी माहितीच्या वहनावर त्या व्यक्तीचे संपूर्ण नियंत्रण असणे गरजेचे आहे, हा महत्त्वाचा मुद्दा त्याने मांडला. विल्यम जेम्स हा वर उल्लेखलेल्या हेन्री जेम्सचा सख्खा भाऊ होता, हा आणखी एक गमतीशीर योगायोग!

प्रख्यात अमेरिकी समाजशास्त्रज्ञ एरविंग गॉफमनने विल्यम जेम्सच्या वरील मुद्द्यावर वेगळ्या पद्धतीने भाष्य केलेय. त्याने समाजजीवनाला रंगभूमीची उपमा दिलीय. या रंगभूमीच्या व्यासपीठावर प्रत्येक व्यक्ती एका नटासमान वावरत असते व आपली भूमिका पार पाडत असते. पण या व्यासपीठामागे एक ‘बॅकस्टेज’ असते, जे सर्वांना दिसूही शकत नाही आणि त्यात अगदी थोड्या ‘अधिकृत’ व्यक्तींनाच प्रवेश असतो. सार्वजनिक व्यासपीठावर योग्य पद्धतीने व्यक्त होण्यासाठी प्रत्येक व्यक्ती या खासगी बॅकस्टेजचा वापर करत असते. थोडक्यात, आपले व्यक्तिमत्त्व घडविण्यात गोपनीयतेचा अधिकार अबाधित राहण्याची आत्यंतिक गरज आहे, हा मुद्दा गॉफमन ठासून मांडतो.

विसाव्या शतकात गोपनीयतेच्या संकल्पनेला बऱ्याच प्रमाणात समाजमान्यता आणि काही प्रमाणात राजमान्यता मिळायला सुरुवात झाली असली, तरीही या संकल्पनेच्या विरोधात असणाऱ्या टीकाकारांची संख्याही कमी नव्हती. बऱ्याचदा ही टीका राजकीय किंवा व्यावसायिक हितसंबंध जपण्यासाठी केली जात असल्यामुळे तिचा इथे उल्लेख करण्याची आवश्यकता नाही. पण प्रख्यात कायदेपंडित आणि अर्थतज्ज्ञ रिचर्ड पॉसनर यांची आणि त्यांनी गोपनीयतेच्या अधिकारावर आर्थिक मुद्द्यांवरून केलेल्या टीकेची दखल घेणे जरुरी आहे.

कायदा आणि न्यायदान क्षेत्रातील अमेरिकेमधील एक अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून रिचर्ड पॉसनर ओळखले जातात. केवळ विधि आणि अर्थ या विषयांवरच नाही, तर राजकीय, सामाजिक, पर्यावरणीय विषयांवर त्यांनी ४० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. प्रदीर्घ काळ शिकागोच्या उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्यायदानाचे काम केल्यानंतर आज ८२ व्या वर्षीदेखील शिकागो विधि महाविद्यालयात पॉसनर प्राध्यापकाच्या भूमिकेतून विद्यादान करत आहेत.

पॉसनरनी नेहमीच कायद्याच्या अंमलबजावणीचा आर्थिक अंगाने अभ्यास केलाय आणि गोपनीयतेचा विचार करतानासुद्धा त्यांनी हेच तत्त्व अंगीकारलेय. त्यांच्या म्हणण्यानुसार, गोपनीयतेच्या अधिकाराचा दुरुपयोग कोणतीही व्यक्ती तिच्याबद्दलची नकारात्मक, अविश्वासार्ह वा अगदी लांच्छनास्पद माहिती लपविण्यासाठी करू शकेल. हे एक वेळ सामाजिक जीवनात क्षम्य असेल, पण कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारात एका व्यक्तीने केलेल्या लपवाछपवीची समोरच्या व्यक्तीला जबर किंमत द्यावी लागू शकते.

एका उदाहरणाने वरील मुद्दा नीट समजून घेता येईल. समजा, तुम्हाला तुमची जुनी गाडी विकायची आहे. चार महिन्यांपूर्वी त्या गाडीला एक मोठा अपघात झाला होता व त्यात तिच्या इंजिनमधल्या काही भागांचे पुष्कळ नुकसान झाले होते. गाडी विकताना गाडीबद्दलचा हा इतिहास गोपनीय ठेवण्याचा किंवा न ठेवण्याचा तिच्या विकल्या जाण्याच्या शक्यतेवर आणि तिला मिळू शकणाऱ्या किमतीवर नक्कीच सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम होईल. गोपनीयतेच्या अधिकाराचा दुरुपयोग करून माहितीच्या पारदर्शकतेला हरताळ फासणे आर्थिकदृष्ट्या प्रचंड नुकसानकारक ठरू शकते व त्यामुळेच खासगी माहितीच्या गोपनीयतेचा अमर्यादित स्वरूपात अधिकार कोणत्याही व्यक्तीकडे असणे घातक ठरेल, असे आग्रही प्रतिपादन पॉसनर करतात.

पॉसनरच्या वरील मुद्द्यांना प्रभावीपणे खोडून काढण्याचे काम जॉर्जटाऊन विश्वविद्यालयात कायद्यासंबंधातील विषयांची प्राध्यापैकी करणाऱ्या जुली कोहेन यांनी केलेय. बौद्धिक संपदा, विदासुरक्षा आणि गोपनीयता या विषयांमधल्या एकविसाव्या शतकातील प्रमुख विचारवंतांपैकी एक म्हणून कोहेन ओळखल्या जातात. या विषयासंदर्भात अस्तित्वात असलेल्या कायद्यांचे डिजिटल युगातील आव्हानांच्या अनुषंगाने अद्ययावतीकरण करण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केलेय. कोहेन यांच्या मते, पॉसनर यांचा गोपनीयतेकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीसा एककल्ली आहे. केवळ अर्थशास्त्राच्या अंगाने विश्लेषण केल्यामुळे गोपनीयतेसंदर्भातल्या सामाजिकदृष्ट्या संवेदनशील अशा इतर पैलूंकडे साफ दुर्लक्ष होते. कोहेन यांनी गोपनीयता किंवा खासगीपणाच्या दोन पावले पुढे जाऊन स्वायत्तता (ऑटोनॉमी) जपण्याची संकल्पना मांडली आहे, ज्यामुळे व्यक्तीला स्वत:चे निर्णय कोणत्याही प्रकारच्या सक्तीशिवाय घेता येतील.

गोपनीयतेच्या विषयावर कदाचित आजवरचा सर्वसमावेशक अभ्यास अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात संशोधन व अध्यापन करणाऱ्या हेलन निसनबॉम यांनी केलाय. त्यांनी लिहिलेल्या आणि २००९ साली प्रकाशित झालेल्या ‘प्रायव्हसी इन कॉन्टेक्स्ट’ या अत्यंत वाचनीय पुस्तकात गोपनीयतेची संकल्पना विस्तृतपणे विशद केली आहे. निसनबॉम यांच्या म्हणण्यानुसार, गोपनीयतेची सर्व बाबतीत लागू पडेल अशी एकच एक व्याख्या करणे योग्य नाही. गोपनीयतेचे निकष हे काळानुसार, त्या त्या वेळेच्या परिस्थितीनुसार, तसेच सामाजिक, सांस्कृतिक मूल्यांनुसार बदलत असतात; ज्याच्यासाठी त्यांनी ‘कॉन्टेक्स्टच्युअल इंटीग्रिटी’ असा शब्दप्रयोग योजला आहे.

उदाहरणार्थ, भिन्न समाजांत खासगी माहितीच्या गोपनीयतेचे निकष वेगवेगळे असू शकतात. जसे अमेरिकेत नोकरीसाठी आलेल्या उमेदवाराला त्याच्या धर्माबद्दलची माहिती विचारणे निषिद्ध मानले जाते, त्याउलट भारतात धर्म तसेच जातीबद्दलची माहिती सर्वच ठिकाणी (शाळा-महाविद्यालय प्रवेश, सरकारी वा खासगी नोकरी, इत्यादी) विचारली जाते. एखादी गोष्ट एका विशिष्ट कालखंडात गोपनीय मानली गेली असेल, तर कालांतराने त्यात बदल होऊ शकतो. एकोणिसाव्या तसेच विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अमेरिका किंवा युरोपात एखाद्या व्यक्तीने आपल्या समलिंगी जाणिवा जाहीर करणे अयोग्य समजले जाई; कारण समाज त्याकडे हेटाळणीयुक्त नजरेने बघत असे. एकविसाव्या शतकात मात्र या गोष्टीला सामाजिक व कायदेशीर मान्यता मिळाल्यामुळे वरील निकषात पूर्णपणे बदल झालाय. थोडक्यात, गोपनीयतेचा विचार करताना सामाजिक, सांस्कृतिक तसेच त्या वेळच्या परिस्थितीचा संदर्भ तपासून घ्यावा लागेल, असे निसनबॉम सांगतात, ज्यात बऱ्याच अंशी तथ्य आहे.

असो. गोपनीयतेसंदर्भात जगभरातील विद्वानांनी केलेले विचारमंथन जाणून घेतल्यानंतर गोपनीयतेची नेमकी व्याख्या पुढील लेखात समजून घेऊ…

लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील ओपन सोर्स, विदासुरक्षा व गोपनीयता तसेच डिजिटल परिवर्तन या विषयांचे अभ्यासक आहेत.

amrutaunshu@gmail.com