सामूहिक संकटात लोक एकत्र येतात, असा अनुभव असतो.  पण करोनासारख्या जागतिक संकटकाळात विविध देश एकत्र येतीलच असे नाही. करोनाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आहेत. इराणची रुग्णसंख्याही लाखाहून अधिक आहे. या दोन्ही देशांना करोनाज्वराने हैराण केले असले तरी त्यांचा युद्धज्वर काही थांबलेला नाही. पर्शियाच्या आखातात हा युद्धज्वर तीव्र होऊ लागला आहे. त्याचे सखोल विश्लेषण करत आंतरराष्ट्रीय माध्यमांनी मार्मिक भाष्य केले आहे.

व्हेनेझुएलाकडे निघालेले इराणचे तेलवाहू जहाज रोखण्याबाबत विचार करण्यात येत असल्याचे ट्रम्प प्रशासनाने नुकतेच स्पष्ट केले. मात्र, अमेरिकेने असा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असे वृत्त एका इराणी वृत्तसंस्थेने दिले. इराण आणि व्हेनेझुएला या देशांवर आर्थिक निर्बंध आहेत. मात्र ‘दोन्ही देश स्वतंत्र असून, एकमेकांशी व्यापार करत राहतील आणि आमचे व्यापारमार्गही आम्हाला ठाऊक आहेत,’ असे प्रत्युत्तर इराण सरकारचे प्रवक्ते अली रबीई यांनी दिले आणि अमेरिका-इराण यांच्यातील तणावाच्या आगीत आणखी तेल पडले. याबाबतचे वृत्त ‘चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्क’सह विविध वृत्तसंस्था व अमेरिकी माध्यमांनी दिले आहे. इराणचे तेलवाहू जहाज रोखण्याबाबत कोणताही निर्णय घेण्याआधी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे मित्र आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याकडून सल्ला घ्यावा, अशी सूचना देणाऱ्या प्रतिक्रियांनाही अनेक माध्यमांनी स्थान दिले आहे. ब्रिटन व इराण यांच्यात ब्रिटिश जहाजावरून झालेल्या संघर्षांचा संदर्भ त्यास आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षांबाबत मार्मिक भाष्य करणारा लेख ‘द गार्डियन’मध्ये आहे. इराणशी केलेल्या अणुकरारातून बाहेर पडण्याचा निर्णय अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यापासून उभय देशांदरम्यान तणाव वाढला. गेल्या ११ महिन्यांत किमान तीनदा या देशांदरम्यान संघर्षांचा भडका उडण्याची स्थिती निर्माण झाली. यंदाच्या जानेवारीच्या सुरुवातीस अमेरिकेने इराणचा सर्वोच्च लष्करी अधिकारी कासिम सुलेमानीला ठार केल्यानंतर या देशांतील संघर्ष अधिक धारदार झाला. ट्रम्प यांनी अधिकाधिक दबाव तर इराणने अधिकाधिक प्रतिकाराचे धोरण अवलंबले. त्यामुळे युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती बिघडण्यास संवादाचा अभाव हे मोठे कारण आहे. मात्र, करोनाविरोधातील लढय़ातील अपयशावरून लक्ष विचलित करण्यासाठी अमेरिका आणि इराणचा प्रयत्न असावा, अशी टिप्पणीही ‘द गार्डियन’च्या लेखात करण्यात आली आहे.

करोनाने अनेक गोष्टी बदलल्या; अमेरिका आणि इराण यांच्यातील वैमनस्य मात्र कायम आहे, हे अधोरेखित करणारा एक लेख ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये आहे. या दोन्ही देशांनी करोनाचा प्रादुर्भाव हाताळण्याचे नियोजन केले नव्हते. या दोन्ही देशांत करोनाने मोठय़ा प्रमाणावर मनुष्यहानी झाली असूनही परस्परांचा तिरस्कार करणे काही थांबवलेले नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह विविध संस्था आणि देशांकडून इराण आर्थिक मदत मिळवू पाहात आहे. मात्र, त्यातही अमेरिका खोडा घालत आहे. करोनाकाळात तरी या देशांदरम्यान तडजोड होणे अपेक्षित होते. मात्र अनेक दशकांपासूनची ताठर भूमिकाच कायम राहिल्याचा फटका इराणी जनतेला अधिक बसेल, असे हा लेख सांगतो.

अमेरिका-इराण तणाव उघड असला तरी एकमेकांच्या देशात कैद असलेल्या आपल्या देशातील नागरिकांना सोडविण्यासाठी चर्चा सुरू असल्याबाबतचा आश्वासक वृत्तलेख ‘न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये आहे. मात्र, ही चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचलेली नाही. इराणने किमान चार अमेरिकी नागरिकांना कैदेत ठेवले आहे. अमेरिकेने २४ हून अधिक इराणी नागरिकांना डांबून ठेवल्याचा इराणचा दावा आहे. मात्र, हा एक मुद्दा सोडला तर या दोन देशांतील तणाव कमालीचा वाढला असल्याचे या वृत्तलेखातही स्पष्ट करण्यात आले आहे. इराणने आपल्याच युद्धनौकेवर चुकून क्षेपणास्त्र डागल्याचा, त्याआधी जानेवारीमध्ये इराणने दुसऱ्या देशाचे विमान पाडल्याचा उल्लेखही अनेक पाश्चात्त्य माध्यमांच्या लेखात आहे. अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याच्या नादात इराण स्वत:च्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास भाग पाडतो, असा सूर काही लेखांत आहे.

अमेरिकेच्या इराणवरील निर्बंधांवर टीका करणारे अनेक लेख ‘तेहरान टाइम्स’ने प्रसिद्ध केले आहेत. या निर्बंधांमुळे अमेरिकेचा अमानवी चेहरा समोर आल्याची टीका करणारा वृत्तलेख ‘तेहरान टाइम्स’च्या संकेतस्थळावर आहे. येत्या काही दिवसांत अमेरिका-इराण संबंध ‘नव्या वळणावर’ जातील, असा अंदाज वर्तवणारा एक लेख ‘द नॅशनल’ या अबु धाबीहून प्रकाशित होणाऱ्या दैनिकाच्या संकेतस्थळावर आहे. इराणवर कसा अंकुश ठेवावा, याबाबत अमेरिका तर लेबनॉन तसेच इराकबाबतच्या धोरणाबाबत इराण लवकरच बैठका घेणार आहे. अमेरिका-इराण संघर्षांची झळ इराकला बसतच आहे. उभय देशांदरम्यान तेढ सुटेपर्यंत तरी इराकची त्यातून सुटका नाही, असे ‘द नॅशनल’च्या लेखात नमूद करण्यात आले आहे.

संकलन : सुनील कांबळी