ब्रिटनचे युवराज चार्ल्स यांच्या पाठोपाठ पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही करोना संसर्ग झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर जॉन्सन यांनी घरात कोंडून घेतले, तर युवराज चार्ल्स पत्नीसह स्कॉटलंडच्या घरी स्थलांतरित झाले. त्यांनी लवकर बरे व्हावे, अशा सदिच्छा चाहत्यांनी समाजमाध्यमांद्वारे दिल्या, तर त्यांच्या टीकाकारांनी शब्दास्त्रे परजली. काहींनी त्यांच्यावर प्रश्नांचे तीर सोडले, काहींनी उपहासाचे चिमटे काढले, तर काहींनी उपदेशांचे डोसही पाजले. समाजमाध्यमांचा हा नूर टिपणारा एक रोचक, खोचक आणि उद्बोधक वृत्तांत ‘एनबीसी न्यूज’ने प्रसिद्ध केला आहे. चाचणी संचांच्या कमतरतेबद्दल ब्रिटनभर तक्रार आहे, म्हणून तो टीका-टिप्पणीचा मुद्दा बनला आहे. जोखीम पत्करणाऱ्या आरोग्य सेवेतील डॉक्टर-कर्मचाऱ्यांची चाचणी करणे अशक्य असताना, सौम्य लक्षणे दिसताच युवराज आणि पंतप्रधानांची मात्र चाचणी केली जाते! त्यांच्यासाठी चाचणी संच आणले कोठून? या प्रश्नाला या वृत्तांतात ठळकपणे प्रसिद्ध केले आहे. वृत्तांतात प्रसिद्ध चित्रवाणी निवेदक पिअर्स मॉर्गन यांनी अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांची चाचणी होत नसल्याबद्दल केलेल्या उपरोधगर्भ ट्विट्सचाही समावेश आहे. मॉर्गन म्हणतात, ‘पंतप्रधान किंवा त्यांच्या मंत्र्यांची चाचणी तातडीने करण्याबद्दल कुणाला काही प्रश्न पडण्याचा प्रश्न नाही, परंतु करोनाविरुद्धच्या या युद्धात आघाडीवर लढणाऱ्यांची चाचणी होत नसल्याबद्दल मात्र प्रत्येकाला भलामोठा प्रश्न पडला आहे.’

या गदारोळात चांगल्याला चांगले म्हणणे, हा छापील माध्यमांचा गुणही दिसतोच. ब्रिटिश अर्थमंत्री (चॅन्सेलर) या नात्याने रिशी सुनक यांनी जाहीर केलेल्या ‘महिना २५०० पौंडांपर्यंत कमावणाऱ्या ज्या ब्रिटिश कामगार-कर्मचाऱ्यांचे वेतन बुडाले, त्यांना त्यापैकी ८० टक्केपर्यंत हिस्सा सरकार देईल’ या निर्णयाचे कौतुक ‘सन’, ‘एक्स्प्रेस’, ‘डेली मेल’ या ब्रिटिश वृत्तपत्रांसह ‘न्यू यॉर्क टाइम्स’नेही केले आहे. ‘आजवर अपरिचित असलेल्या मंत्र्यांचे अतुलनीय नेतृत्व’ असा या कौतुकाचा सूर आहे. मात्र टीकेचा भर पंतप्रधान जॉन्सन यांच्यावर आहे.

करोनाचा फैलाव सुरू असताना या जॉन्सन यांच्या बैठका, खलबते आणि भेटी-गाठीही सुरू होत्या. या अनुषंगाने ‘द गार्डियन’मधील लेखात, पंतप्रधानांना संसर्ग होऊ  नये याची दक्षता घेण्यात आली होती का? त्यांची चाचणी झाली, मग त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांची का नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. ‘हे वागणं बरं नव्हं!’ असे हे मुख्य प्रवाहातले वृत्तपत्र पंतप्रधानांना ठणकावते. लोकांनी घरीच थांबावे, असे आवाहन केल्यानंतर पंतप्रधान स्वत: मात्र सर्व कामे करत होते. या वृत्तात लंडन युनिव्हर्सिटी कॉलेजच्या ‘सेंटर फॉर बिहेवियर चेन्ज’ संस्थेचे संचालक प्रा. सुसान मिकी म्हणतात, ‘नेते बोलतात तसे वागत नसतील तर लोकही त्यांचे सल्ले-सूचना धुडकावतील.’ तर एडनबर्ग विद्यापीठातील ‘ग्लोबल पब्लिक हेल्थ’च्या अध्यक्ष डॉ. देवी श्रीधर यांनी, ‘नेत्यांनी एखाद्या गोष्टीचे उदाहरण स्वत:पासून घालून दिले पाहिजे’, अशा शब्दांत जॉन्सन यांच्या वागण्यावर बोट ठेवले आहे.

शरीरात करोना विषाणू घेऊन युवराज चार्ल्स पत्नीसह स्कॉटलंडच्या घरी स्थलांतरित झाल्याबद्दल टीका आणि संताप व्यक्त होत आहे. त्यापैकी प्रातिनिधिक प्रतिक्रियांवर बेतलेला लेख ‘एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केला आहे. त्यांत, कडक निर्बंध असतानाही राजपुत्राला प्रवासाची मुभा का दिली गेली, असा प्रश्न विचारून राजगादीच्या वारसदाराने इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचा आरोप करणाऱ्या प्रतिक्रियांचा समावेश आहे. त्याचबरोबर ‘तुम्ही अ‍ॅबर्डीनला विषाणू आणल्याबद्दल धन्यवाद!’, ‘तुम्हालाही घरीच थांबण्यास बजावले होते, तुम्ही खास आहात का?’ शिवाय, करोना विषाणूपासून स्वत:ला आणि आपल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी युवराजांनी बाल्मोराल गाठले, असा टोलाही प्रसिद्ध केला आहे. चार्ल्स यांनी नियमभंग केल्याबद्दल खासदार गप्प राहिले, विशेषाधिकारांच्या अशा वापराबद्दल ते बोलण्याचे धाडस दाखवतील का? या पत्रकार लेस्ली रिडॉक यांच्या प्रश्नालाही लेखात स्थान दिले आहे.

एकाहत्तरीतील चार्ल्स यांना संसर्ग होण्याचे भावनिक महत्त्व सांगणारा लेख ‘यूएसए टुडे’ने प्रकाशित केला आहे. त्यांत ‘ब्रिटिश नागरिकांचे चार्ल्स यांच्याशी भावनिक नाते आहे, ते त्यांच्या दिवाणखान्यात आहेत,’ असे भाष्य ब्रिटिश वंशाच्या सीएनएनच्या भाष्यकार व्हिक्टोरिया आर्बिटर यांनी या लेखात केले आहे. तर युवराज चार्ल्स यांच्या ९३ वर्षांच्या आई राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यानंतर राजघराण्याचे प्रमुखपद प्रथम त्यांच्याकडे येईल. परंतु काही विपरीत घडले तर चार्ल्स यांचा पुत्र प्रिन्स विल्यम राजगादीवर विराजमान होईल, असे स्पष्टीकरण राजघराण्यांचे प्रसिद्ध चरित्रकार सॅली बिडेल स्मिथ यांनी लेखात केले आहे.

संकलन: सिद्धार्थ ताराबाई