करोनाच्या रुग्णसंख्येत अमेरिकेपाठोपाठ क्रमांक लागतो तो ब्राझीलचा. विशेष म्हणजे करोनाची स्थिती नीट हाताळली नसल्याचा आरोप या दोन्ही देशांच्या प्रमुखांवर आहे. ब्राझीलमधील करोनास्थितीचे विश्लेषण करताना माध्यमांनी अध्यक्ष याइर बोल्सोनारो आणि अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील साम्यस्थळांवर नेमके बोट ठेवले आहे.

करोना रुग्ण आणि मृतांची आकडेवारी लपवल्याचा संशय चीनवर सुरुवातीपासूनच आहे. मध्यंतरी वुहानमधील रुग्णसंख्या आधी नोंदवलेल्यापेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यास बळकटी मिळाली. इकडे ब्राझीलच्या बोल्सोनारो प्रशासनानेही करोनाची आकडेवारी लपवण्याचा प्रयत्न केला. एकूण आकडेवारी बाहेर येऊ द्यायची नाही, असा त्यांचा प्रयत्न होता. मात्र स्थानिक प्रशासन आणि माध्यमांनी करोनाबाबतची संपूर्ण आकडेवारी गोळा करतच राहण्याची भूमिका घेतली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही फटकारल्यानंतर बोल्सोनारो सरकारने पुन्हा तपशीलवार आकडेवारी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. तपशीलवार आकडेवारी प्रसिद्ध करण्याबरोबरच करोनाविरोधातील लढय़ात आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वमान्य उपाययोजना न केल्यास त्याचा फटका ब्राझीलच्या जनतेलाच बसेल, असे स्पष्ट करत न्यायालयाने बोल्सोनारो यांची कानउघाडणी केली. पण बोल्सोनारो यांच्यावर करोनाबाबतचे आकडे लपविण्याची वेळ का आली, याचे विश्लेषण अनेक माध्यमांनी केले आहे.

‘करोना हा साधा ताप आहे’, अशी बोल्सोनारो यांची सुरुवातीची धारणा होती! करोनाविरोधात उपाययोजनांबाबत स्थानिक प्रशासन आणि बोल्सोनारो यांच्यात मतभेद आहेत. इतकेच काय तर, बोल्सोनारो यांच्याशी मतभेद झाल्याने दोन आरोग्यमंत्र्यांनी राजीनामे दिले. त्यावर नेमके भाष्य करणारा लेख ‘बीबीसी’च्या संकेतस्थळावर आहे. रुग्णसंख्यावाढीमुळे ब्राझीलमधील साओ पावलो या शहरातील आरोग्ययंत्रणा कोलमडेल, असा इशारा महापौर ब्रूनो कोवास यांनी गेल्या महिन्यात दिला होता. विशेष म्हणजे, या कोवास यांनाही करोनाची लागण झाल्याचे नुकतेच वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. करोनाकाळात जागतिक आरोग्य संघटना आपली जबाबदारी नीट पार पाडत नसल्याचा दावा करत बोल्सोनारो यांनी या संघटनेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही असाच सूर लावला होता, याची आठवण ‘बीबीसी’ने या लेखात करून दिली आहे.

करोनास्थिती हाताळण्याबाबत बोल्सोनारो यांनी ट्रम्प यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला. ट्रम्प यांच्याप्रमाणे बोल्सोनारो यांनी आपल्या देशातील आरोग्यतज्ज्ञांकडे दुर्लक्ष केले, असे निरीक्षण ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या एका लेखात नोंदविण्यात आले आहे. ‘आपल्यावर अंकुश ठेवणाऱ्या संस्था उद्ध्वस्त करण्याचा बोल्सोनारो यांचा प्रयत्न दिसतो.. त्यात ते ट्रम्प यांच्यापेक्षाही यशस्वी होण्याची शक्यता आहे,’ अशी टिप्पणी या लेखात करण्यात आली आहे. याआधीच्या कोणत्याही अमेरिकी अध्यक्षांनी ब्राझीलला करोना संकट आणि राजकीय अस्थिरतेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले असते. मात्र बोल्सोनारो यांच्यावर वचक ठेवण्याऐवजी ट्रम्प हे त्यांना अधिक प्रोत्साहन देण्याची शक्यता आहे, असे नमूद करताना या लेखात दोन्ही राष्ट्रप्रमुखांना फटकारण्यात आले आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना बोल्सोनारो यांनी वैद्यकीयदृष्टय़ा सिद्ध न झालेल्या उपचारांची भलामण केली. शिवाय, ऐन करोनाकाळात ब्राझीलमध्ये बंडाची परिस्थिती निर्माण झाली, यावर प्रकाश टाकणारे दोन लेख ‘द न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये आहेत.

ब्राझीलमध्ये १२ एप्रिल रोजी करोनाबळींचा अधिकृत आकडा १,२२३ इतका होता. मात्र त्या वेळी करोनाचे उच्चाटन होत असल्याचा दावा बोल्सोनारो करत होते. मात्र आता ब्राझीलमधील करोनाबळींचा आकडा ४२ हजारांवर पोहोचला आहे. अंतरनियमासह इतर उपाययोजना करण्याचे गांभीर्य बोल्सोनारो यांच्याकडे नाही, असे ‘द गार्डियन’च्या वृत्तलेखात म्हटले आहे. आपल्या राजकीय विरोधकांनी काही राज्यांत करोनाबळींचा आकडा फुगवला आणि त्यातून त्यांना राजकीय लाभ मिळवायचा आहे. तसेच माध्यमे करोनाबळींवर अधिक लक्ष देत आहेत, असा दावा बोल्सोनारो करत आहेत. त्यांना अद्यापही परिस्थितीचे भान आलेले नाही. रुग्णवाढ अशीच कायम राहिली तर एकूण रुग्ण आणि बळींच्या संख्येत ब्राझील लवकरच अमेरिकेला मागे टाकेल, अशी भीती साओ पावलो विद्यापीठाचे आरोग्यतज्ज्ञ डॅनियल दुरांदो यांनी व्यक्त केल्याचे सांगून, ब्राझीलमधील करोनाच्या हाहाकारासह ‘गार्डियन’ने तेथील राजकीय अस्थिरतेवर बोट ठेवले आहे.

करोनास्थिती हाताळण्यावरून बोल्सोनारो यांच्यावर ब्राझीलमधील माध्यमे सडकून टीका करतात. ‘द रिओ टाइम्स’मध्ये करोनास्थितीवर भाष्य करणारे अनेक लेख आहेत. बोल्सोनारो यांची एकाधिकारशाही सुरू असल्याचे निरीक्षण त्यापैकी एका लेखात नोंदवण्यात आले आहे.

संकलन : सुनील कांबळी