ज्याची भीती होती तेच घडते आहे. शत्रूच्या पहिल्या हल्ल्याने झालेल्या पडझडीतून सावरण्याआधीच युरोपात दुसरा हल्ला झाला आहे. माघार घेत असल्याचे भासवून केलेला शत्रूचा दुसरा हल्ला आधीपेक्षा अतिघातक असतो असे म्हणतात. पहिल्या हल्ल्यातून धडा न घेतलेला युरोपही हडबडला आहे. करोना साथीच्या दुसऱ्या हल्ल्याने तेथील यंत्रणा आणि व्यवस्था भेदरल्या, भांबावल्या आहेत. त्यांना टाळेबंदी आणि संचारबंदी ही ब्रह्मास्त्रे पुन्हा तैनात करावी लागली आहेत. चेक प्रजासत्ताकाचे पंतप्रधान आंद्रे बबिश यांनी तर पुन्हा कडक निर्बंध लागू करताना नागरिकांची पाचदा क्षमा मागितली आहे, आणि ती मागताना ‘‘चूक झाली, हे पुन्हा घडेल असे वाटले नव्हते,’’ असे म्हटले आहे. माध्यमांनी मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेचे गांभीर्य अधोरेखित करताना सावध पवित्रा घेतला आहे.

चेक प्रजासत्ताक आपल्याच यशाचा बळी ठरल्याचे पंतप्रधान आंद्रे बबिश यांनी मान्य केल्याचा उल्लेख करून ‘सीएनएन’ वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावरील वृत्तलेखात त्यांचा तपशीलवार माफीनामाच अवतरणांकित केला आहे. अर्थव्यवस्थेच्या संरक्षणाचे कारण देऊन आंद्रे यांनी कठोर निर्बंध लागू करण्यास नकार दिला होता. काही बाबतींत तज्ज्ञांच्या इशाऱ्यांकडेही दुर्लक्ष केले होते. परिणामी विषाणूचा फैलाव अनियंत्रित होत गेला, असे निरीक्षणही या वृत्तात नोंदवले आहे. त्याशिवाय युरोपात- म्हणजे पोलंड, जर्मनी, फ्रान्स, स्पेन, ब्रिटनमध्ये करोनाचा वणवा पुन्हा कसा भडकत चालला आहे, याच्या संख्याधारित वास्तवाकडेही ‘सीएनएन’ने लक्ष वेधले आहे.

‘ल माँद’ या फ्रेंच वर्तमानपत्राने ‘करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रतिकार करा’ अशा शीर्षकाचे संपादकीय लिहिले आहे. भारत, ब्राझिलमधील साथीची तीव्रता कमी झाली आहे आणि युरोप हा साथीच्या उद्रेकाचा नवा केंद्रबिंदू ठरला आहे. युरोपीय महासंघातील देशांमध्ये आरोग्याबाबत समन्वयाचा अभाव असल्याचे भाष्यही त्यात करण्यात आले आहे. युरोपीय महासंघातील देशांमध्ये रुग्णशोध, विलगीकरण, स्क्रीनिंग याबाबतीत खूप काही करण्यासारखे आहे. म्हणून- या दुसऱ्या हल्ल्याचा प्रतिकार एकत्रितपणे करू या, असेही आवाहन या लेखात केले आहे.

एरवी नागरिकांची बाजू घेऊन सत्ताधारी नेते तसेच प्रशासकीय यंत्रणांवर प्रहार करणाऱ्या ‘द गार्डियन’ने संपादकीय लेखात थोडा निराळा आणि नरमाईचा सूर लावला आहे. करोनाच्या दुसऱ्या हल्ल्यास फक्त राज्यकर्त्यांना जबाबदार धरता येणार नाही, कारण पश्चिम युरोपातली उत्तम प्रशासनेही साथीशी लढताना हतबल होताना दिसत आहेत, असे निरीक्षण ‘द गार्डियन’ने नोंदवले आहे. स्थानिक पातळीवर टाळेबंदी लागू करून करोनाची दुसरी लाट थोपवण्याचे ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे आडाखे अपयशी ठरल्याची टिप्पणी करताना, ‘अपयशाची संपूर्ण जबाबदारी जॉन्सन सरकारवर टाकता येणार नाही, त्यामागे अनेक कारणे आहेत,’ अशी पुष्टीही त्यात जोडली आहे. त्याचबरोबर राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक आयवर क्रू यांच्या, ब्रिटनबाबतच्या ‘अलीकडच्या काळातील ढिसाळ प्रशासकीय कारभार’ या शेऱ्याचा उल्लेख करून ‘आता पुन्हा करोनाबाबतची नवी धोरणे युद्धपातळीवर आखण्याची आवश्यकता आहे,’ असेही संपादकीयात सुचवले आहे.

प्राग येथील अमेरिकी पत्रकार ब्रॅडली ब्लँकनशिप यांचा, ‘चेक प्रजासत्ताकावरील दुसऱ्या करोना लाटेवरून आपण काय शिकावे?’ या शीर्षकाचा लेख चीनची सरकारी वृत्तवाहिनी ‘चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्क’ अर्थात ‘सीजीटीएन’ने संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. चेक प्रजासत्ताकाच्या अनुभवावरून आपल्याला काही धडे घेतले पाहिजेत, असे ब्लँकनशिप यांनी म्हटले आहे. ते कोणते? एक : पहिली लढाई जिंकलो म्हणून लगोलग आपण विषाणूविरुद्धचे युद्ध जिंकल्याच्या भ्रमात राहू नये; दोन : दुसऱ्या संभाव्य हल्ल्याची भीती गृहीत धरून त्याला परतवून लावण्यासाठी चाचण्या, रुग्णसंपर्क शोध, रुग्णालयांची क्षमता यांत वाढ करावी; आणि तीन : युद्ध जिंकल्याची घोषणा अतिलवकर करणे हा आत्मघात ठरू शकतो. म्हणून ‘करोनाविरुद्धचे युद्ध दीर्घकालीन आहे, याची कल्पना असताना बेसावध न राहता नागरिकांना वास्तवाची जाणीव करून देणे आवश्यक असते आणि त्याची सुरुवात सरकारच्या विश्वासार्ह संदेशांद्वारे होते,’ अशा शब्दांत ब्लँकनशिप यांनी लेखाचा शेवट केला आहे.

करोनाचा दुसरा हल्ला होणार हे गृहीत धरून चीनने त्याला तोंड देण्याची तयारी केली होती. त्यामुळे दुसऱ्या हल्ल्याला त्याने परतवून लावले, असे म्हटले जाते. ‘द आर्ट ऑफ वॉर’ या युद्धनीतीवरील प्रसिद्ध प्राचीन चिनी ग्रंथात सेनापती सन त्सू म्हणतो : ‘युद्ध सुरू असताना ते लवकर संपवून शांतता प्रस्थापित करा आणि शांततेच्या काळात युद्धसज्जता, युद्धकौशल्ये वाढवा.’ मात्र, करोनाशी लढताना नेमका याच प्राचीन चिनी ‘शहाणिवे’चा विसर प्रगत युरोपला पडला!

(संकलन : सिद्धार्थ ताराबाई)